‘तू ठीक आहेस ना?’ हा प्रश्न आपण अनेकदा विचारतो, पण त्याचं उत्तर खरंच ऐकण्यासाठी आपण खरचं थांबतो का? सप्टेंबर हा आत्महत्या प्रतिबंध आणि मानसिक आरोग्याबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठीचा महिना आहे. याच काळात मुंबई आयआयटीमधल्या विद्यार्थ्याच्या आत्महत्येची घटना समोर आल्याने तरुणांच्या मानसिक आरोग्याचा प्रश्न पुन्हा सगळीकडे चर्चेत आला. अशा घटनेनंतर काही दिवस सोशल मीडियावर चर्चा होते, वेगवेगळे अंदाज व्यक्त केले जातात, अख्ख्या जगाला सल्ले दिले जातात आणि पुन्हा आयुष्य नेहमीच्या वेगाने सुरू होतं. मात्र, अशा घटनांकडे केवळ बातमी म्हणून न पाहता, आपल्या आजूबाजूच्या तरुणाईच्या भावनिक जगाकडे सजगपणे पाहण्याची संधी म्हणून बघितलं पाहिजे. एखादा तरुण वरवर वागण्यात अगदी नॉर्मल, हसतमुख आणि ‘ऑल गुड’ दिसत असला तरी मनातून तो एखाद्या मोठ्या स्ट्रगलमधून जात असू शकतो. त्यामुळे आत्महत्या प्रतिबंध ही केवळ डॉक्टर, काउन्सेलर किंवा मानसोपचारतज्ज्ञांची जबाबदारी नसून कुटुंब, मित्र, शिक्षक आणि संपूर्ण समाजाच्या संवेदनशीलतेशी जोडलेली गोष्ट आहे.
आजच्या तरुणांना अनेक ठिकाणी अनेक प्रकारच्या संधी भरभरून मिळतात. पण, कदाचित त्यामुळेही प्रेशरसुद्धा वाढलं आहे. चांगले मार्क्स, करिअर, प्लेसमेंट, घरच्यांच्या अपेक्षा, रिलेशनशिप्स, आर्थिक प्रश्न आणि सोशल मीडियावर सतत दिसणार्या इतरांच्या ‘परफेक्ट’ आयुष्याशी होणारी तुलना, या सगळ्यांचा मनावर परिणाम होऊ शकतो. विशेषत: घरापासून दूर राहणारे विद्यार्थी अभ्यास, हॉस्टेल लाइफ, स्पर्धा आणि भविष्याची चिंता एकाच वेळी हाताळत असतात. प्रत्येक व्यक्तीची परिस्थिती आणि तिचा सामना करण्याची क्षमता वेगळी असते. त्यामुळे एखाद्याचा प्रॉब्लेम आपल्याला छोटा वाटला म्हणून त्याच्यासाठीही ती बाब छोटीशीच असेल असं नाही. ‘एवढंच तर झालंय’ यापेक्षा ‘तुला यात नक्की काय कठीण वाटतंय?’ किंवा ‘कसलं नेमकं टेन्शन येतंय?’ हा दृष्टिकोन अधिक संवेदनशील आहे. कारण, मानसिक त्रास हा नेहमी बाहेरून दिसतोच असं नाही आणि त्याचं मोजमापही तिसर्या माणसाला करता येत नाही.
‘ज्याचं जळतं, त्यालाच कळतं’ अशी मराठीत एक म्हण आहे. ज्याला खरंच त्रास होतोय त्यालाच त्याची तीव्रता नेमकी जाणवत असते. त्यामुळेच आत्महत्या प्रतिबंधात संवादाला विशेष महत्त्व आहे. एखादा मित्र अचानक सगळ्यांपासून दूर राहू लागला, त्याच्या आवडत्या गोष्टींमध्ये इंटरेस्ट कमी झाला, सतत निराश किंवा हताश बोलू लागला, स्वत:बद्दल खूप नकारात्मक भाषा वापरू लागला किंवा ‘माझ्यामुळे सगळ्यांना त्रास होतो’ अशा भावना व्यक्त करू लागला, तर त्याकडे लक्ष देणं गरजेचं असतं. अशा वेळी लगेच सल्ला देण्यापेक्षा त्याचं बोलणं शांतपणे ऐकणं अधिक उपयोगी ठरू शकतं. मित्रांमध्ये एक साधा ‘चेक-इन’ म्हणजेच ‘काय चाललंय तुझं सध्या?’, ‘तू शांत शांत का आहेस? बोलायचं असेल तर मी आहे’ एवढी साधीशी सुरुवात असू शकते. मात्र, मित्रांनी प्रत्येक समस्या स्वत:च सोडवण्याचा प्रयत्न करण्याऐवजी, परिस्थिती गंभीर वाटली तर विश्वासू व्यक्ती किंवा मानसिक आरोग्य तज्ज्ञाची मदत घेण्यासाठी पुढाकार घेणंही महत्त्वाचं आहे. कोणाचं आयुष्य ‘वाचवण्याची’ जबाबदारी एका कोणावर ठेवण्यापेक्षा योग्य मदत मिळवून देणं हे जास्त योग्य आणि गरजेचं आहे. यासाठीच काउन्सेलिंगकडे पाहण्याचा दृष्टिकोनही बदलण्याची गरज आहे. अजूनही अनेकांच्या मनात ‘काउन्सेलरकडे कोण जातं?’ किंवा ‘मला काही इतकं पण वेड लागलेलं नाही’ अशा कल्पना आहेत. विशेषत: तरुण मुलांमध्ये कोणाचीतरी मदत मागावी लागणं म्हणजे आपला ‘वीकनेस’ जाहीर करण्यासारखं वाटू शकतं. प्रत्यक्षात काउन्सेलिंग म्हणजे एखाद्यावर शिक्का मारणं नव्हे. अभ्यासाचं प्रेशर, करिअरची चिंता, नात्यांमधला गोंधळ, सततचं ओव्हरथिंकिंग किंवा आयुष्यातला एखादा कठीण टप्पा याबद्दल प्रशिक्षित व्यक्तीशी बोलणं ही सेल्फ-केअरची एक पद्धत आहे. जसं शरीराला त्रास झाला तर डॉक्टरकडे जाणं नॉर्मल आहे, तसंच मनावरचा ताण वाढला तर काउन्सेलरशी बोलणंही नॉर्मल व्हायला हवं. प्रॉब्लेम खूप वाढल्यानंतरच मदत घेण्याऐवजी सुरुवातीच्या टप्प्यावरच बोलण्याची सवय लागणं अधिक चांगलं आहे. कुटुंबाची भूमिकाही या सगळ्यात महत्त्वाची आहे. अनेकदा पालकांच्या अपेक्षा चुकीच्या नसतात. मुलांनी सुरक्षित भविष्य घडवावं, एवढीच त्यांची इच्छा असते. मात्र, हीच अपेक्षा सततच्या तुलनेत किंवा परफॉर्मन्सच्या दबावात बदलली, तर त्याचा भावनिक परिणाम होऊ शकतो. ‘किती मार्क्स मिळाले?’ या प्रश्नाइतकाच ‘तुला कसं वाटतंय?’ हा प्रश्नही घरात महत्त्वाचा व्हायला हवा. मुलाने अपयश सांगितलं, एखादी संधी गमावली किंवा करिअरबद्दल संभ्रम व्यक्त केला, तर लगेच तुलना किंवा टोमणे मारण्याऐवजी संवादासाठी स्पेस देणं आवश्यक आहे. ‘काहीही झालं तरी आमच्याशी बोलू शकतोस’ ही भावना तरुणाला भावनिक सुरक्षितता देऊ शकते. मानसिक आरोग्याबद्दलची जागरूकता घरापासून सुरू झाली तर मदत मागण्याबद्दलची भीतीही कमी होऊ शकते.
तरुणाईचा सगळ्यात जास्त वेळ कॉलेजमध्ये जातो. त्यामुळे कॉलेज आणि विद्यापीठांनीही मानसिक आरोग्याला एखाद्या वर्कशॉपपुरतं मर्यादित न ठेवता ‘कॅम्पस कल्चर’चा भाग बनवण्याची गरज आहे. विद्यार्थ्यांना काउन्सेलिंग कुठे मिळेल, इमर्जन्सीच्या वेळी कोणाशी संपर्क साधायचा आणि एखादा मित्र गंभीर संकटात दिसत असेल तर काय करायचं, याची स्पष्ट माहिती असणं आवश्यक आहे. शिक्षक, वॉर्डन, रूममेट आणि स्टुडंट सपोर्ट टीम यांच्यातही या बाबतीत मूलभूत संवेदनशीलता असायला हवी. शारीरिक प्राथमिक उपचारांसारखंच ‘सायकॉलॉजिकल फर्स्ट एड’ हेसुद्धा पॉप्युलर आणि सगळ्यांना माहिती असण्याची, येत असण्याची आवश्यकता दिवसेंदिवस वाढते आहे. मानसिक आरोग्याची सुरक्षित जागा म्हणजे फक्त काउन्सेलिंग रूम नव्हे, तर असं कॅम्पस कल्चर जिथे मदत मागणं ऑकवर्ड वाटत नाही आणि कोणालाही जज केलं जाणार नाही, अशी खात्री असते. विशेषत: स्पर्धात्मक शिक्षणाच्या वातावरणात ‘परफॉर्मन्स’सोबत ‘वेल-बिइंग’लाही महत्त्व देणं गरजेचं आहे.
आजच्या जेन झीला ‘सगळं स्वत: मॅनेज कर’ असं सांगण्यापेक्षा ‘गरज पडली तर कोणाकडे मदत मागायची’ हे शिकवण्याची वेळ आली आहे. मित्रांमधील छोटासा चेक-इन, घरातला मोकळा संवाद, कॉलेजमधली सपोर्ट सिस्टीम आणि काउन्सेलिंगकडे पाहण्याचा नॉर्मल दृष्टिकोन या सगळ्या गोष्टी आत्महत्या प्रतिबंधाच्या मोठ्या चित्राचा भाग आहेत. आत्महत्या प्रतिबंधाचा अर्थ फक्त एका महिन्यात जागरूकता निर्माण करणं नाही; तर अशी सामाजिक संस्कृती तयार करणं आहे जिथे ‘मी स्ट्रगल करतोय’, ‘मला मदत हवी आहे’ किंवा ‘माझं मन ठीक नाही’ हे शब्द बोलताना कुणालाही लाज किंवा जजमेंटची भीती वाटणार नाही. प्रत्येक समस्येचं उत्तर आपल्याकडे असेलच असं नाही, पण कठीण काळात एखाद्याला एकटं पडू न देणं आपल्या हातात नक्कीच असतं. कधी कधी त्याची सुरुवात एखाद्या साध्याशा चौकशीच्या प्रश्नाने होऊ शकते.
viva@expressindia.com
