मृण्मयी पाथरे

काय मंडळी? कसे आहात? हे वर्ष कसं भरभर सरलं कळलंच नाही ना? माझा मेंदू अजूनही करोनाकाळानंतर ऑनलाइन जगातून ऑफलाइन जगात काम करताना चाचपडतोय (हे लिहितानासुद्धा जगभरात करोना पुन्हा डोकं वर काढू लागल्यामुळे मनोमनी करोनाकाळ नक्की संपला की नाही, याची धाकधूक आहे). आपलं शिक्षण कोणत्या वर्षी संपलं, आपण कमवायला लागल्यापासून किती वर्ष किंवा महिने झाले, याबद्दल बोलताना आपल्यापैकी कित्येक जण अजूनही गफलत करत आहेत. ‘अव्हेंजर्स’मध्ये काही वर्ष ब्लीप झाल्यासारखं आपल्या सगळय़ांचं आयुष्यही गेल्या दोन-अडीच वर्षांच्या पोकळीतून या ‘न्यू नॉर्मल’ फेजमध्ये आलं आहे. यामुळे निर्माण झालेल्या अभ्यासातील, कामातील आणि नात्यांतील निरनिराळय़ा बदलांशी जुळवून घ्यायला बऱ्याच जणांना वेळ लागतो आहे आणि ते साहजिकच आहे.

vladimir putin threatens nuclear war
युक्रेनमध्ये सैन्य पाठवल्यास जागतिक अण्वस्त्र संघर्षांचा पुतिन यांचा इशारा
vicky kaushal reveals he changed after marrying with katrina kaif
“गेल्या ३३ वर्षांत मी कधीच…” कतरिनाबरोबरच्या नात्याबाबत विकी कौशलने पहिल्यांदाच केले भाष्य, म्हणाला, “आता पहिल्यासारखं…”
Accidental death of a 9 year old boy after a rickshaw with more than capacity passengers overturned panvel
पनवेल: क्षमतेपेक्षा अधिक प्रवाशांची रिक्षा कलंडल्याने ९ वर्षीय बालकाचा अपघाती मृत्यू
What is tax harvesting and what to be careful about
Money Mantra: टॅक्स हार्वेस्टिंग काय असतं? ते करताना काय काळजी घ्यावी?

गेल्या दोन-तीन वर्षांत बदलती शिक्षण आणि आर्थिक व्यवस्था, त्यामुळे विद्यार्थ्यांच्या पुस्तकरूपी अभ्यासात आणि वास्तवातील कौशल्यात वाढलेली तफावत, मोठय़ा प्रमाणावर होणारी टाळेबंदी, नव्या नोकऱ्यांची कमी झालेली संख्या आणि त्यामुळे निर्माण झालेली अस्थिरता, कमावण्याचं वय असूनही कुटुंबीयांवर वाढलेली आर्थिक निर्भरता, लॉकडाऊनमुळे नात्यांची बदललेली गणितं, घरातील आणि मनातील वाढलेल्या अंतरामुळे आलेला दुरावा आणि त्यामुळे झालेले वाद किंवा ब्रेकअप्स अशा कित्येक गोष्टी आपल्यापैकी काही जणांनी अनुभवल्या. ज्या व्यक्तींना त्यांच्या स्वप्नांना आणि आकांक्षांना एका विशिष्ट वेळेत पूर्ण करायचं होतं अशा मंडळींना करोनामुळे आलेल्या अनिश्चिततेशी जुळवून घ्यायला बऱ्यापैकी वेळ लागला.

अगदी विशीत असलेल्या तरुणांनाही आपलं आयुष्य आपल्या हातून निसटून जातंय की काय, अशी भीती वाटू लागली. ‘पुनश्च हनिमून’ या नाटकात संदेश कुलकर्णी यांनी यावर खूप चपखल संवाद लिहिला आहे – ‘आपण सगळेच भूतकाळ, वर्तमान आणि भविष्य एकाच क्षणी जगत असतो’. असं असलं तरी आपण भूतकाळ आणि भविष्याची चिंता करता करता वर्तमानात जगायचं विसरून जातो, नाही का? याचंच मूर्तिमंत उदाहरण म्हणजे आपला वाढलेला इंटरनेटचा वापर! आपल्यापैकी कित्येक जण आजही बाहेर जेवायला किंवा फिरायला गेलो, तर सोशल मीडियावर पोस्ट करण्यासाठी एखाद्या विशिष्ट अँगलने, प्रकाशझोत आणि सावलीचा ताळमेळ जमवून जास्त लाइक्स आणि कॉमेंट्स मिळाव्यात म्हणून फोटोज आणि व्हिडीओज रेकॉर्ड करतो. या सगळय़ा गडबडीत जेवण किंवा निसर्गाचा मनसोक्त आस्वाद घ्यायचा कुठे तरी विसरून जातो. आणखी एक उदाहरण म्हणजे लॉकडाऊनमध्ये ओटीटीवरचे कार्यक्रम आणि सिनेमे पाहता पाहता आपल्यापैकी काही जणांनी दिवसरात्र इतक्या कथा िबजवॉच केल्या की त्यांचा सारांश समजायला, ती कथा किंवा त्यातील पात्र आपल्या आत मुरायला, त्यांच्याबद्दल विचार करायला वेळच उरला नाही. आपण काय पाहिलं, ऐकलं, वाचलं याबद्दल मेंदूला प्रोसेस करायला वेळच दिला नसल्याने आपल्यासमोर जगभरातील मनोरंजनाची मेजवानी असतानादेखील सॅचुरेशन पॉइंट आल्यामुळे कालांतराने कंटाळा येऊ लागला.

तसं पाहिलं तर साधारणत: विशी ते पस्तिशीपर्यंतचा टप्पा आयुष्याला कलाटणी देणाऱ्या क्षणांनी भरलेला असतो. करोनामुळे नेमक्या याच क्षणांना आपल्याला मुकावं लागतंय की काय, असं वाटू लागलं. हा काळ एरवी कितीही उत्साहवर्धक वाटला, तरी अनेकांसाठी तो भीतीयुक्तही असू शकतो. असं असूनही अनेक जण आपलं आयुष्य किती ‘सॉर्टेड’ किंवा ‘सेटल्ड’ आहे हे दाखवण्याची धडपड करतात. एकदा शिक्षण झालं की आपल्या आयुष्याला दिशा देणारे निर्णय घेण्यासाठी मार्क्‍स, बक्षिसं अशा ठोस मूल्यमापनाच्या पद्धती नसतात. यशापयशाच्या व्याख्या आपणच वेळोवेळी बनवत जातो किंवा इतर व्यक्ती या व्याख्या आपल्याला जाणवून देतात. त्यामुळे स्वत:च सगळय़ा गोष्टींची माहिती मिळवून, चाचपडत का होईना, आपल्याला पुढे जावं लागतं. यात आपल्याला पालक, मित्रपरिवार आणि जोडीदाराची साथ असेल, तर हा प्रवास थोडा कमी खडतर वाटू शकतो. मात्र, ही साथ नसेल, तर माणसं सभोवताली असतानादेखील एकाकी वाटू शकतं. याव्यतिरिक्तही आयुष्यात चढउतार सतत येतच राहतात. या चढउतारांना आपण कसं सामोरं जातो, यावर केवळ आपलंच नव्हे तर आपल्यासोबत असलेल्या इतर व्यक्तींचं मानसिक आरोग्यही अवलंबून असतं.

असं असलं तरी, करोनाच्या या जागतिक महामारीमुळे आपल्या आयुष्यात काही चांगल्या गोष्टीही परत आल्या. अभ्यासाच्या आणि कामाच्या ढिगाऱ्यात अडकल्यामुळे ज्या मैत्रीकडे किंवा नात्यांकडे लक्ष देता येत नव्हतं, ती नाती पुनरुज्जीवित झाली. लॉकडाऊनमध्ये कुठेही बाहेर न पडता एकाच ठिकाणी अनेक आठवडे किंवा महिने राहिल्यामुळे काही जण कित्येक वर्षांनी आपलं शरीर आणि मन आपल्याला नक्की काय सांगायचा प्रयत्न करतंय याकडे जाणीवपूर्वक लक्ष देऊ लागले. अनेकांना बरीच वर्ष दुर्लक्ष केलेल्या शारीरिक व्याधी आणि मानसिक समस्यांबद्दल आता मात्र काही तरी करायला हवं असं प्रकर्षांने जाणवू लागलं. जी मंडळी आतापर्यंत इतरांनी दाखवलेल्या वाटेवर फार विचार न करता चालत होती, त्यांना लॉकडाऊनमध्ये स्वत:ची आणि स्वत:ला आवडणाऱ्या गोष्टींची नव्याने ओळख झाल्याने, त्यांनी आयुष्य ‘ऑटो पायलट’ मोडवर न जगता स्वत:च्या टम्र्सवर जगायला सुरुवात केली. या काळात अनेक जणांना मानसिक आरोग्याचं महत्त्व पटलं आणि आपल्या विचारांच्या- भावनांच्या गुंत्याला समजून घेण्यासाठी काही मंडळींनी मानसशास्त्रज्ञांशी सल्लामसलत करायला सुरुवात केली. आपणही गेलं वर्षभर वेगवेगळय़ा विषयांवर आणि त्यातून मानसिक आरोग्यावर होणाऱ्या परिणामांवर प्रकाशझोत टाकला.

गतवर्षांचा आढावा घेतला तर आपण थेरपीपासून मानसोपचारतज्ज्ञांनी दिलेल्या औषधांपर्यंत, जेंडर आयडेंटिटीपासून लैंगिकतेपर्यंत, विषमिलगी नात्यांपासून पॉलीअ‍ॅमरस नात्यांपर्यंत, ब्रेकअप आणि चीटिंगपासून लग्नापर्यंत, गरोदरपणापासून ते प्रजनन क्षमतेत येणाऱ्या अडचणींपर्यंत, टॉक्सिक पॉजिटिव्हिटीपासून नकारात्मकतेपर्यंत कित्येक विषयांचा ऊहापोह केला. यांतील ‘प्राउड टू बी क्वीअर’, ‘लैंगिकता उलगडताना’, ‘पॉलीअ‍ॅमरीची दुनिया’, ‘गुड न्यूज कधी देताय?’, ‘गोळय़ांचा मामला’ अशा कित्येक लेखांना केवळ महाराष्ट्रभरातूनच नव्हे तर भारतातून परदेशी स्थायिक झालेल्या लोकांकडूनसुद्धा भरभरून प्रतिसाद मिळाला. यावरून या विषयांबद्दल अधिक खोलवर आणि केवळ एक-दोनदा नव्हे तर सतत चर्चा करणं किती गरजेचं आहे याची जाणीव झाली. यापुढेही आपण सारे एकत्र येऊन या आणि इतर अनेक विषयांना स्पेस दिली, आपल्याला माहीत असलेल्या आणि नसलेल्या सगळय़ाच विषयांबद्दल कुतूहल दाखवलं, मानसिक स्वास्थ्याची काळजी घेणं ही केवळ एका व्यक्तीची नव्हे तर तिच्या आजूबाजूच्या सगळय़ा मंडळींची जबाबदारी आहे हे समजून घेतलं, इतरांपेक्षा आपण वरचढ कसे हे दाखवण्यापेक्षा एकमेकांना सुदृढ आयुष्य जगण्यासाठी साथ दिली, तर येणारं नवं वर्ष ‘हॅपी’ असेल, नाही का?                                                

 (समाप्त)

viva@expressindia.com