अश्विनी खांडेकर
आपल्याला लहानपणापासून सवय असते, कोणी फीडबॅक दिला की आपल्याकडून दोनच प्रतिक्रिया उमटतात. एकतर त्याबद्दल वाईट वाटून घ्यायचं किंवा मग आव्हान म्हणून ते स्वीकारायचं. फीडबॅक हा प्रकार आपल्याला सगळीकडेच अनुभवायला मिळतो. अगदी रस्त्यात चालतानासुद्धा ‘जरा डावीकडे चला’ असं आपल्याला कोणी म्हणून जातं, तेव्हा हाही एकप्रकारचा फीडबॅकच असतो. कधी त्यावर आपण हसून पुढे जातो, तर कधी कधी आपल्याला फार राग येतो. पण, या सगळ्यात एक गोष्ट आपण लक्षात घेत नाही. मुळात कुठल्याही प्रकारचा फीडबॅक हा सकारात्मक पध्दतीने (constructively) घ्यायला हवा.
सुरुवातीला एक साधा प्रश्न. फीडबॅक म्हणजे नेमकं काय? सोप्या भाषेत सांगायचं तर आपल्या कामाबद्दल किंवा वागण्याबद्दल केलं जाणारं ऑब्झर्व्हेशन. ऑफिसमधील कामाच्या दृष्टीने विचार करायचा झाला तर आपल्याकडून असणार्या वरिष्ठांच्या अपेक्षा आणि प्रत्यक्षात आपल्याकडून होणारं काम यांच्यातलं अंतर म्हणजे फीडबॅक असं म्हणता येईल. एकप्रकारे आपण जिथे कमी पडतो आहोत ते भरून काढण्याचा एक प्रयत्न या अर्थाने फीडबॅककडे पाहायला हवं. फीडबॅक हा नेहमीच चूक दाखवण्यासाठी नसतो, कधी तो कौतुकरुपातही मिळतो, कधीतरी त्यात सूचकपणा असतो, कामाला दिशा देण्याचा एक प्रयत्न असतो किंवा आपल्या उणिवा सुधारण्याची संधीही असते.
ऑफिसमध्ये आपण नेहमी वेगवेगळ्या प्रकारचे फीडबॅक ऐकतो. काही फीडबॅक हे थेट आणि स्पष्ट (डायरेक्ट)असतात. ‘तुमच्या या प्रेझेंटेशनमध्ये क्लॅरिटी कमी आहे’ अशा स्वरुपाचा किंवा काहीवेळा तुम्हाला स्पष्टपणे सांगितलं जात नाही. तर सांगणारा आपल्याला त्याच्या बोलण्याच्या टोनमधून, बॉडी लँग्वेजमधून काही गोष्टी जाणवून देतो. किंवा कधीतरी छोट्या कमेंट्समधूनही इनडायरेक्ट फीडबॅक दिले जातात. काही फीडबॅक हे थेट ॲक्शनेबल म्हणजे नेमकं काय करायचं आहे हे समजावून देणारे असतात, पुढे काय बदल हवे आहेत हे सांगितलं जातं. तर अनेकदा फीडबॅक हे फक्त मत व्यक्त करण्यापुरती मर्यादित असतात. या सगळ्या प्रकारातला फरक ओळखणं फार महत्त्वाचं असतं. कारण, प्रत्येक फीडबॅकवर जर एकसारखीच रिॲक्शन दिली, तर आपला गोंधळ अधिकच वाढणार आहे.
अनेकदा पॉझिटिव्ह फीडबॅक मिळतात तेव्हा आपल्याला त्यात काहीच अडचण वाटत नाही, सगळ्यांनाच आनंद वाटतो. पण, ज्या क्षणी आपल्याला एखादा निगेटिव्ह फीडबॅक मिळतो किंवा कामामध्ये काही सुधारणा सांगितली जाते तेव्हा आपण ती बाब निगेटिव्हली घेतो आणि इथेच खरी परीक्षा असते. मला सुध्दा काम करताना बर्याच वेळा वेगवेगळ्या प्रकारचे फीडबॅक मिळाले आणि अजूनही मिळतात. जोवर आपण जिवंत आहोत, काम करतो आहोत, तोवर कोणी ना कोणी आपल्याला ऑब्झर्व्ह करतच राहणार. पण, याचा अर्थ फक्त आपण चुकतो आहोत असा होत नाही. कित्येकदा आपल्या स्वभावात, कामात, दृष्टिकोनात सुधारणा व्हावी, बदल व्हावा या उद्देशाने फीडबॅक दिला जातो. आपल्यातल्या क्षमता समोरच्या व्यक्तीला लक्षात येतात. मात्र, आपल्यालाच आपल्याकडे काय ताकद आहे याची जाणीव नसते, ते लक्षात आणून देण्यासाठी फीडबॅकचा उपयोग केला जातो.
कोणाकडून तरी काही फीडबॅक मिळाला की स्वत:लाच प्रश्न विचारत बसण्याची मला खूप सवय होती. ‘माझ्याकडून असं कसं झालं?’, ‘मी कुठे चुकले?’, हजार प्रश्नं आणि त्या प्रश्नांबरोबर आत्मविश्वास डगमगायला लागतो, इतका की दुसर्या दिवशी अक्षरश: काहीतरी अपराध केल्यासारखं वाटत राहातं. मग काही दिवस शांतता, गिल्ट आणि प्रत्येक गोष्टीत एक्स्ट्रा काळजी घेण्याचा प्रयत्न केला जातो. पण, या सगळ्यामुळे आपल्यात सुधारणा होत नाही हे हळूहळू लक्षात येत गेलं. उलट आपण स्वत:लाच पुढे जाण्यापासून थांबवतो. जेव्हा माझीच चूक आहे, या विचाराने आपण स्वत:वर सगळं घेत जातो तिथे लर्निंगची प्रक्रिया थांबते. त्याचं कारण आपल्याला सतत आतून वाटत असतं की सगळ्यांनी आपलं कौतुक करावं, आपण कधीच चुकू शकत नाही. खरंतर, हा आपण करून घेतलेला भ्रम आहे, पण तोच आपल्या चुका स्वीकारण्यातला मोठा अडथळा ठरतो. आपण चुकलो आहोत, हे मान्य करायची तयारीच नसेल, तर सुधारण्यासाठीही आपण कधीच तयार होणार नाही.
याबाबतीत एक साधा अप्रोच उपयोगी पडतो. तुम्हाला फीडबॅक मिळाल्यानंतर लगेच त्यावर रिॲक्ट होऊ नका, प्रतिक्रिया देण्याची घाई करू नका. समोरचा काय सांगतो आहे हे आधी पूर्णपणे ऐकून समजून घ्यायचा प्रयत्न करा. पटकन दिलेली पहिली रिॲक्शन ही अनेकदा भावनिक असते, थोडं थांबून उत्तर देण्याचा प्रयत्न केला तर आपल्यालाही विचार करायला वेळ मिळतो आणि स्पष्टता येते. ज्यांच्याकडून फीडबॅक मिळतो आहे, त्यांना प्रश्न विचारणं खूप गरजेचं आहे. नेमकं कुठे, कधी, काय वेगळं करता आलं असतं हे त्यांच्याकडून समजून घेण्याचा प्रयत्न करायला हवा. ‘एखादं उदाहरण देता का?’ किंवा ‘तुमच्या मते मी काय बदल करू शकते?’ अशा साध्या साध्या प्रश्नांतून आपल्याला त्या फीडबॅकवर नेमकं काय ॲक्शन घ्यायची आहे, काय करायचं आहे हे लक्षात येतं.
सगळेच फीडबॅक योग्य किंवा अगदी अचूक नसतात. काही योग्य असतात, काही अपूर्ण, तर काही चुकीचेही असू शकतात. त्यामुळे फीडबॅक फिल्टर करणं हे सुद्धा एक स्किल आहे. सगळं ऐकायचं, पण सगळ्यावर रिॲक्ट व्हायचं नाही, हा छोटासा बदलही मोठा परिणाम घडवून आणतो. काही गोष्टी जाणीवपूर्वक टाळायलाच हव्यात. सगळ्यांना खुश करण्याचा प्रयत्न करणं किंवा सतत तुलना करत राहणं, यामुळे आपण थकतो आणि आपला फोकसही हरवतो. त्यात अजून एक मोठा ट्रॅप म्हणजे अतिविचार (overthinking). एखादा फीडबॅक मिळाल्यानंतर त्याचाच विचार करत बसणं, स्वत:वरच शंका घेत राहणं यातून काहीच बदलत नाही. शेवटी फीडबॅक हा आपल्याला तोडण्यासाठी नसतो, तर घडवण्यासाठी असतो, ही साधी गोष्ट मनाशी घट्ट बांधून घ्यायला हवी. त्यातही एखाद्याने फीडबॅक दिला तरी त्यातलं काय घ्यायचं आणि काय सोडून द्यायचं, हा निर्णय पूर्णपणे आपल्या हातात असतो. फीडबॅक हा कोणीतरी आपल्यावर केलेला हल्ला आहे, या अर्थाने विचार न करता त्याकडे सूचना किंवा सूचक माहिती म्हणून पाहण्याचा आपण प्रयत्न करू तेव्हा कुठे आपल्याला आयुष्यात पुढे जाणं किंवा प्रगती करणं ही गोष्ट थोडी सोपी वाटायला लागेल.
viva@expressindia.com
