चौकटीच्या पलीकडं जाऊन विचारांच्या कक्षा रुंदावत जैविक मानववंशशास्त्रात संशोधन करणारी न्यूझीलंडच्या डय़ुनेडिनमधल्या ओटॅगो युनिव्हर्सिटीत पीएच.डी. करणारी नेहा ढवळे सांगतेय, तिचे अनुभव.

नेहा ढवळे,डय़ुनेडिन (न्यूझीलंड)

 

हाय फ्रेण्ड्स! शीर्षकात इतिहास आणि संशोधन विषय पाहून पान उलटू नका. अनेकांना वाटतो तसा इतिहास मुळीच रटाळ विषय नाहीये. उलट त्यातल्या शाखा-उपशाखांनी त्याला अधिकाधिक समृद्ध केलंय. सातत्यपूर्ण संशोधनांनी काही नवीन मुद्दे प्रकाशात आलेत, येताहेत.. मी इतिहासात पदवी घेतली मुंबई विद्यापीठाची. मला आधीपासून पुरातत्त्वशास्त्रात रस होता. मात्र आपल्याकडं पुरातत्त्वशास्त्राचा अभ्यास अंडरग्रॅज्युएट स्तरावर म्हणावा असा विस्तारलेला नाहीये. इतिहासाच्या पदवी अभ्यासक्रमादरम्यान पहिल्या-दुसऱ्या वर्षांत मी मुंबई विद्यापीठाच्या ‘सेंटर फॉर एक्स्ट्रा म्युरल स्टडीज’मधून आर्किओलॉजीचा सर्टिफिकेट कोर्स केला. या कोर्समुळं मला पुरातत्त्वशास्त्रात आणखीनच रस वाटू लागला. त्यामुळं पुण्याच्या डेक्कन कॉलेजमध्ये पुरातत्त्वशास्त्रात एम.ए. केलं. लहानपणी आईबाबा मला खूप पुस्तकं वाचायला देत असत. आत्ता जाणवतंय की, योगायोगानं मामाकडून जी पुस्तकं वाचायला आणायचे ती माझ्या टॉपिकशी मिळतीजुळती होती.
मास्टर्सच्या काळात लक्षात आलं की, भारतात पुरातत्त्वशास्त्राला वाव हा एवढाच आहे. त्यामुळं पुढं नोकरी किंवा संशोधन करायची तयारी ठेवली होती. पीएच.डी. भारतात करायला तयार होते. मास्टर्सच्या दुसऱ्या वर्षांला प्रबंध लिहिताना मी मानववंशशास्त्राकडं वळले. मला हा विषय खूप आवडतो. पण त्यातही आपल्याकडं बऱ्याचदा सामाजिक मानववंशशास्त्र असतो आणि पुरातत्त्वशास्त्राच्या अनुषंगानं मानववंशशास्त्र खूप कमी वेळा शिकवलं जातं. माझ्या थिसिसचा विषय होता जैविक मानववंशशास्त्र अर्थात बायोलॉजिकल अँथ्रोपॉलॉजी. भारतात या मानववंशशास्त्रातले विषयातले खूप चांगले संशोधक आहेत. पण या विषयाला फारसं युनिव्हर्सिटी एक्सपोजर नाहीये. जैविक मानववंशशास्त्राचं वेगळं शिक्षण घेता येणार नव्हतं. त्यामुळं माझ्याकडं खूप कमी पर्याय होते. माझ्या ‘मास्टर्स’च्या सुपरवायझरनी पुढलं शिक्षण परदेशी घ्यायला सुचवलं. एम.ए.नंतर वर्षभराच्या ब्रेकमध्ये विविध परीक्षांची तयारी सुरू केली. ‘नेट’ पास झाले. दरम्यान, नॅशनल कॉलेजमध्ये इतिहासाची गेस्ट लेक्चर्सही घेतली. पुरातत्त्वशास्त्रातच पुढं करिअर करायचं ठरवलं असतं तर भारतातच केलं असतं. पण मला आवड होती एक्सप्लोर करायची. मी यूके, यूएस नि न्यूझीलंडला अर्ज केले होते. प्रवेशाचे टप्पे पूर्ण होऊन न्यूझीलंडमधल्या डय़ुनेडिनच्या ओटॅगो युनिव्हर्सिटीत तीन वर्षांच्या कालावधीसाठी पीएच.डी.ला प्रवेश घेतला. इतिहासपूर्व काळात शेतीचा वापर वाढल्यावर त्या काळातल्या ईशान्य थायलंडमध्ये अगदी तान्ह्य़ा बाळांपासून ते १२ वर्षांच्या मुलांच्या वाढीमधील बदलांचा बारकाईनं केलेला अभ्यास, हा माझ्या संशोधनाचा विषय आहे.
घरच्यांचा खंबीर पाठिंबा होता मला. त्यामुळं टिपिकल प्रॉब्लेम्स कधी आले नाहीत. हा विषय आवडता असला तरी पुढच्या गोष्टींविषयी प्रॅक्टिकल चर्चाही झाली होती. घरच्यांनाही माझ्या या निर्णयाचं कौतुक होतं. व्हिसा हाती पडल्यावर मला महिन्याभरातच निघावं लागणार होतं. न्यूझीलंडच्या सिस्टीमनुसार एक तारखेला जॉइन व्हायचं असतं. मला स्कॉलरशिप नि स्टायपेंड मिळतं. या सगळ्या कसोटय़ांमुळं जेमतेम दहा दिवस मिळाले तयारी करायला. त्या गडबडीत राहायची जागा ठरवली नाही. मग बॅगपॅकरमध्ये आठवडाभर राहिले. रजिस्ट्रेशन झाल्यावर समजूतदार सुपरवायझरमुळं मला स्थिरावायला वेळ मिळाला. इथलं हवामान फारच बेभरवशाचं. अजून आठवतंय की, पहिल्या दिवशी बफर जॅकेटविना थंडीनं कुडकुडायला झालं होतं.
मी साऊथ आयलंडला डय़ुनेडिनमध्ये राहते. इथले लोक स्टुडण्ट फ्रेण्डली आहेत. खूप छान परिसर आहे हा. सगळं चालत जाण्याच्या अंतरावर आहे. घर शोधायला युनिव्हर्सिटीनं मदतीचा हात दिला. खूप टेकडय़ा आहेत इथं. चालायला मजा येते. सुरुवातीचा काही काळ एकटी होते. राहायचे स्टुडिओ रुममध्ये, आता मैत्रिणीसोबत फ्लॅट शेअर करतेय. इथं जैविक मानववंशशास्त्र शरीरशास्त्र विभागात येतं. तिथले काही मित्र-मैत्रिणी झाले. माझ्या डिपार्टमेंटमधले काही जण यूएस आणि न्यूझीलंडचेच असून त्यांच्यासोबत छान मैत्री झाली. खूप शिकायला मिळालं. माझ्या विषयाच्या ग्रुपमध्ये मी एकटीच भारतीय आहे. एक-दोन महिन्यांनी फिजिओलॉजी डिपार्टमेंटमधल्या पीएच.डी. करणाऱ्या इंदौरमधल्या मैत्रिणीशी ओळख झाली. पुढं आणखीन ओळखी वाढत गेल्या. पहिले दोन महिने कठीण गेले, कारण अमेरिकेसारखं तुम्ही एकदम मोठय़ा ग्रुपमध्ये नाही जात. आता आमचा ४-५ जणांचा चांगला ग्रुप झालाय. इथं किवी इंडियन्सही असून त्यांच्या कल्चरल असोसिएशनमध्ये सणवार साजरे होतात.
7
परदेशात शिक्षण घ्यायचं तर पीएच.डी. आणि बॅचलर्स लेव्हलला जॉइन करणं, हे खूप वेगळं असतं. लॅबमध्ये माझ्या प्रोफेसर्सना ज्युनिअर्सना शिकवताना बघते आणि मीही ज्युनिअर्सना शिकवते. आपल्याकडं अनेकदा चौकटीबाहेर फारसं न जाण्याला प्राधान्य दिलं जातं. इथं संशोधनाच्या कामात अधिक स्वातंत्र्य आहे. लायब्ररीत हवी ती पुस्तकं ऑनलाइन नोंदवल्यावर पटकन उपलब्ध होतात. विद्यार्थ्यांना अभ्यासाच्या दृष्टीनं खूप सोयी दिल्या जातात. प्रोफेसर्स खूप रिस्पॉन्सिबल असतात. विद्यार्थ्यांनाही निर्णयस्वातंत्र्य दिलं जातं आणि विचार करायला उद्युक्त केलं जातं. कधी अडीअडचण आलीच तर प्रोफेसर्स कायम पाठीशी असतात. पीएच.डी. लेव्हलला फक्त सुपरवायझरच नव्हे तर तीन प्रोफेसर्सची कमिटी विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी असते. आपल्याकडं थोडं स्पूनफिडिंग जाणवतं. इथं अभ्यासाला महत्त्व दिलं जातं. कधी कधी कठीण जातं, कारण भाषेचा प्रश्न काही वेळा येतो. अ‍ॅकॅडमिक राइटिंग खूपच वेगळं असल्यामुळं सगळ्याच विद्यार्थ्यांना राइटिंगचे अ‍ॅकॅडमिक वर्कशॉप्स असतात. कारण शास्त्रीय भाषेवर प्रभुत्व यायला थोडा वेळ लागतो.
इथले ड्रायव्हिंगचे नियम कडक आहेत. टेकडय़ा खूप असल्यानं गाडी सांभाळून चालवावी लागते. ट्रॅफिक कमी आहे. लोकं खूप पर्यावरणस्नेही असल्यानं प्रदूषण कमी आहे. बीचवर सर्फिग खूप करतात. न्यूझीलंडला येऊन पोहता येत नसेल तर अनेक गोष्टी मिस करता. दरवर्षी इस्टरदरम्यान मिळणाऱ्या ब्रेकमध्ये आम्ही फिरतो. इथं ट्रॅव्हलिंग खूप छान आहे. बॅगपॅकिंगची सोय चांगली आहे. बाइकिंग आणि हाईक्स खूप फेमस आहेत. क्विनस्टनमध्ये अ‍ॅडव्हेन्चर टुरिझम खूप चालतं. तिथं जेट बोटिंग, व्हाईटवॉटर राफ्टिंग, माऊंटन बायकिंग, पॅराग्लायडिंग वगैरे करता येतं. तिथं आम्ही कायाकिंग आणि हायकिंग केलंय. इथं खूप सुरक्षित आहे. अनेकदा युनिव्हर्सिटीतून घरी यायला उशीर झाला तरी भीती वाटत नाही. हवी असल्यास कॅम्पस पोलिसांची सोबत मिळते.
मी संशोधनासाठी तीन महिने थायलंडला गेले होते. तिथली लोकं फार प्रेमळ होती. मी राहायचे त्या घरातल्या आज्जींनी मला थाई भाषा शिकवली. काम झाल्यावर आम्ही मस्त फिरायचो. त्या छोटय़ाशा गावात इंग्लिशचा फारसा गंध कुणाला नव्हता. काम आणि फिरण्याच्या निमित्तानं मी अनेक लोकांना भेटू शकले. त्या भेटींदरम्यान किंवा रोजच्या जेवणाची ऑर्डर देताना भाषेच्या प्रश्नामुळं गोंधळून जायला व्हायचं. पण भाषा शिकल्यावर अनेक गोष्टी सुकर झाल्या. हे सगळं करायला मला खूप आवडायचं. आज्जींच्या छोटय़ा नातीसोबत छान रॅपो झाला होता. थाई भाषा टोनल असल्यानं शब्दोच्चारात अनेक गमतीजमती व्हायच्या. फेसबुकवरून त्यांच्याशी अजूनही संपर्कात आहे.
आमचं संशोधनाचं काम हे थोडं नटशेलमध्ये जाण्यासारखं आहे. तुम्ही तुमच्याच कामात खूप वेळ असता, मग काही वेळा डिप्रेसिंग वाटतं. अशा वेळी घरचे आणि इथल्या मित्रमैत्रिणींचा आधार वाटतो. मला टेबलटेनिस खेळायला आवडतं. पण वेळेअभावी ते नेहमी खेळता येत नाही. कधी तरी बॅडमिंटनही खेळते. स्विमिंग खूप आवडतं. या काळात मिळालेल्या स्वातंत्र्यासोबत जबाबदारीही वाढलेय. थोडी सहनशीलही होतेय हळूहळू. निर्णय घ्यायला शिकलेय. कुटुंबाच्या रेशीममायेच्या परिघाखेरीज स्वत:च्या अस्तित्वाची जाणीव होतेय. पुण्यातही शिक्षणासाठी घरापासून दूर होते. ही स्पेस आवडतेय. न्यूझीलंडला आल्यापासून दोनदा घरी येऊन गेलेय. मागच्या वर्षीपासून मी कॉन्फरन्सना जाऊ लागलेय. इथं थोडं फार फंडिंग असतं किंवा ट्रॅव्हल अ‍ॅवार्ड्सना अप्लाय करता येतं. त्यामुळं कॉन्फरन्सना जाताना हा मदतीचा हात असतो आपल्याकडं. आमच्या युनिव्‍‌र्हसिटीतल्या छोटय़ा कॉन्फरन्सही मी अटेंड केल्यात. नुकतीच मी यूएसहून आलेय एका कॉन्फरन्सहून. त्याआधी ऑस्ट्रेलिया आणि फिलिपाइन्समधल्या माझ्या प्रेझेंटेशन्सना चांगला फिडबॅक मिळाला होता. यंदा माझ्या पीएच.डी.चं संशोधन संपेल. पुढं पोस्ट डॉक किंवा नोकरी करायचा विचार चालू आहे. विश मी लक..
क्वीन्सटाउनचा विलोभनीय निसर्ग आणि बाजूच्या छायाचित्रात युनिव्हर्सिटीचा क्लॉक टॉवर. चेरी ब्लॉसम सीझनमध्ये टिपलेलं छायाचित्रं.
तुम्ही स्वत: किंवा तुमच्या आसपासच्या १८ ते ३० वयोगटातल्या, वेगळ्या प्रांतात, नवख्या देशात, वेगळी वाट निवडून शिक्षण, नोकरीच्या निमित्तानं दुसऱ्या राज्यात किंवा परदेशात राहणाऱ्या मुलींची किमान बेसिक माहिती तिच्या संपर्क क्रमांकासह आम्हाला नक्की पाठवा. ‘विदेशिनी’ कॉलमसाठी असा उल्लेख जरूर करा. त्यासाठी आमचा ई-मेल आहे – viva.loksatta@gmail.com
(शब्दांकन- राधिका कुंटे)