एकेकाळी परदेश प्रवास हा केवळ स्वप्नांचा विषय मानला जात असे. साधारण मध्यमवर्गीय घरात आपले कोणी, आप्तेष्ट, नातेवाईक, मित्र-मैत्रिणी परदेशी फिरायला, शिकायला किंवा कामासाठी गेले की त्यांचा खूप हेवा वाटायचा. परदेशात राहणार्या आपल्या ओळखीच्या लोकांबद्दल तर आपल्याला विलक्षण उत्सुकताच असायची. मात्र, आजच्या डिजिटल युगात आंतरराष्ट्रीय पर्यटन सर्वसामान्यांच्या आवाक्यात आले आहे. स्वस्त विमानप्रवास, सुलभ व्हिसा प्रक्रिया, ऑनलाइन बुकिंग प्लॅटफॉर्म्स आणि सोशल मीडियाच्या प्रभावामुळे जगभरातील नवनवीन ठिकाणे भारतीय पर्यटकांना विशेषत: तरुणाईला खुणावू लागली आहेत. गेल्या काही वर्षांत आंतरराष्ट्रीय पर्यटनाच्या प्रवाहात मोठे बदल दिसून येत आहेत.
केवळ प्रसिद्ध शहरांना भेट देण्यापेक्षा आता तरुण पर्यटक स्थानिक संस्कृतीचा अनुभव घेण्यावर, निसर्गाशी जवळीक साधण्यावर आणि अनोख्या अनुभवांच्या शोधावर अधिक भर देत आहेत. ‘एक्सपिरियन्स ट्रॅव्हल’, ‘सस्टेनेबल टुरिझम’, ‘वर्केशन’, ‘सोलो ट्रॅव्हल’ आणि ‘लक्झरी ऑन अ बजेट’ यांसारख्या संकल्पना तरुणाईमध्ये वेगाने लोकप्रिय होत आहेत. भारतीय प्रवाशांमध्येही प्रवासाची मानसिकता बदलताना दिसते. पूर्वी खरेदी आणि पर्यटनस्थळांचे दर्शन यापुरता मर्यादित असलेला परदेश प्रवास आता वैयक्तिक विकास, सांस्कृतिक देवाणघेवाण आणि जीवनशैलीचा एक महत्त्वाचा भाग बनत आहे.
त्यामुळे पर्यटन उद्योग नव्या अपेक्षा, नव्या तंत्रज्ञान आणि नव्या अनुभवांच्या दिशेने वाटचाल करत आहे. या पार्श्वभूमीवर आंतरराष्ट्रीय पर्यटनातील सध्याचे ट्रेंड, लोकप्रिय ठरत असलेली पर्यटनस्थळे आणि भविष्यातील प्रवासाच्या बदलत्या दिशा यांचा वेध घेणे अत्यंत महत्त्वाचे ठरते.
सध्या तरुणाईकडून भ्रमंतीसाठी आशियाई देशांना अधिक पसंती मिळत आहे. जेन झीचे सोशल मीडिया फीड्स हे आशियाई देशांमध्ये केलेल्या प्रवासादरम्यानच्या छायाचित्रांनी भरलेले दिसते. त्यातही व्हिएतनाम, मलेशिया, सिंगापूरसारख्या देशांना तरुण पिढी भेट देताना दिसते.
आशियाई देशांत फिरताना एकच काळजी घ्यायची ती म्हणजे तिथलं वातावरण भारतासारखंच असतं. येत्या काही दिवसांत पावसाळ्यात फिरणार असाल तर योग्य ती काळजी घेतली पाहिजे. आपल्याकडे उन्हाळा, हिवाळा असतो तेव्हा तिथेही तसेच वातारण असते. बेटांसारख्या जागांवर क्षणाक्षणाला वातावरण बदलू शकते. बाहेरच्या देशांमध्ये फिरताना सुरक्षा हा महत्त्वाचा प्रश्न असतो जो आशियाई देशात फारसा नाही. इथले वातावरण बर्यापैकी सुरक्षित असते, पण आपणही थोडी माहिती घेऊन सावधगिरी बाळगायला हवी, कारण तर्हेतर्हेचे लोक, जगभरातून पर्यटक इथे येत असतात. आंतरराष्ट्रीय पर्यटनाच्या बदलत्या प्रवाहामुळे तरुण पर्यटकांची प्रवासाकडे पाहण्याची दृष्टीही बदलते आहे.
विशेषत: केवळ नवीन देश पाहणं इतकाच मर्यादित अनुभव त्यांना घ्यायचा नसतो, तर तिथली स्थानिक संस्कृती, अनोखे अनुभव आणि तिथे गेल्यावर मिळणारं समाधान याही गोष्टी त्यांना महत्त्वाच्या वाटतात. तंत्रज्ञान, सुलभ व्हिसा प्रक्रिया आणि वाढती जागतिक कनेक्टिव्हिटीमुळे जगभरातील प्रवास अधिक सुलभ झाला आहे. त्यामुळे आगामी काळात भारतीय तरुण पर्यटकांची जागतिक पर्यटन क्षेत्रातील भूमिका अधिक प्रभावी होणार असून, अनुभवकेंद्रित, शाश्वत आणि वैयक्तिकृत पर्यटन हेच आंतरराष्ट्रीय पर्यटनाचे नवे स्वरूप ठरणार आहे.
सिंगापूर
सिंगापूर हा स्वच्छता, आधुनिकता आणि उत्कृष्ट पर्यटन सुविधांसाठी जगभर प्रसिद्ध असलेला देश आहे. आकर्षक गार्डन्स बाय द बे, मरीना बे सँड्स, सेंटोसा आयलंड आणि युनिव्हर्सल स्टुडिओज यांसारखी पर्यटनस्थळे पर्यटकांना अविस्मरणीय अनुभव देतात. अत्याधुनिक सार्वजनिक वाहतूक व्यवस्था, सुरक्षित वातावरण, बहुसांस्कृतिक समाज आणि विविध खाद्यसंस्कृती यामुळे सिंगापूरचा प्रवास आरामदायी आणि आनंददायी ठरतो. आधुनिक शहरजीवन आणि हिरवळीचा सुंदर समतोल साधणारा सिंगापूर कुटुंब, मित्रमंडळी आणि हनिमूनसाठी एक आदर्श पर्यटनस्थळ मानले जाते.
जपान
केवळ पर्यटनासाठी नव्हे तर शिक्षणासाठीही भारतीय तरुणाई जपानला पसंती देते. पारंपरिक संस्कृती आणि आधुनिक तंत्रज्ञान यांचा अनोखा संगम जपानमध्ये आहे. टोकियोची आधुनिकता, क्योटोमधील प्राचीन मंदिरे, माउंट फुजीचे निसर्गसौंदर्य आणि प्रसिद्ध चेरी ब्लॉसमचा बहर पर्यटकांना मंत्रमुग्ध करतो. स्वच्छता, शिस्तबद्धता आणि उत्कृष्ट सार्वजनिक वाहतूक व्यवस्था यामुळे जपानचा प्रवास अतिशय सुखद ठरतो.
बाली (इंडोनेशिया)
बाली हे निसर्गसौंदर्य, शांतता आणि आलिशान रिसॉर्ट्ससाठी प्रसिद्ध पर्यटनस्थळ आहे. हिरवीगार भातशेती, सुंदर समुद्रकिनारे, प्राचीन मंदिरे आणि स्थानिक संस्कृती यांचा अनुभव पर्यटकांना एक वेगळाच आनंद देतो. हनिमून, कौटुंबिक सहल किंवा आरामदायी सुट्टीसाठी बाली हे जगातील सर्वात लोकप्रिय ठिकाणांपैकी एक मानले जाते.
श्रीलंका
भारताच्या सगळ्यात जवळ असलेल्या श्रीलंकेला तरुणांच्या पर्यटन डायरीत स्थान मिळू लागले आहे. रामायणातल्या बर्याच गूढ आणि पुरातन गोष्टींच्या खाणाखुणा अंगाखांद्यावर मिरवणार्या इथल्या खास जागांवर पर्यटकांना खरोखर विलक्षण अनुभूती मिळते. याउपर श्रीलंका हा निसर्ग, इतिहास आणि समुद्रकिनार्यांचा सुंदर मिलाफ असलेला देश आहे. हिरवेगार चहाचे मळे, वन्यजीव सफारी, प्राचीन बौद्ध स्थळे आणि रमणीय किनारे पर्यटकांना आकर्षित करतात. भारताच्या जवळ असल्याने आणि परवडणार्या खर्चामुळे श्रीलंकेकडे तरुण पर्यटकांचा ओढा अधिक वाढला आहे.
व्हिएतनाम
गेल्या काही वर्षांत भारतीय पर्यटकांसाठी व्हिएतनाम हे सर्वाधिक लोकप्रिय आंतरराष्ट्रीय पर्यटनस्थळांपैकी एक बनले आहे. नैसर्गिक सौंदर्य, समृद्ध इतिहास, आधुनिक शहरे आणि तुलनेने कमी खर्च यांचा अनोखा संगम येथे अनुभवायला मिळतो. त्यामुळे पहिल्यांदाच परदेश प्रवास करणार्यांपासून ते अनुभवी प्रवाशांपर्यंत सर्वांसाठी व्हिएतनाम आकर्षणाचे केंद्र ठरत आहे. व्हिएतनाममधील सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे येथे मिळणारा ‘व्हॅल्यू फॉर मनी’ अनुभव. विमानप्रवास, हॉटेल्स, स्थानिक वाहतूक आणि खाद्यपदार्थ यांचा खर्च युरोप किंवा अमेरिकेच्या तुलनेत खूपच कमी असल्याने तरुणाईला आरामदायी आणि दर्जेदार परदेश सहल परवडू शकते.
हॅनोई आणि हो ची मिन्ह सिटीसारख्या शहरांमध्ये आधुनिक विकास आणि ऐतिहासिक वारसा यांचा सुंदर संगम पाहायला मिळतो, तर रस्त्यांवरील उत्साही वातावरण, स्थानिक बाजारपेठा आणि पारंपरिक वास्तुकला पर्यटकांना वेगळाच अनुभव देतात. दुसरीकडे, हॅलाँग बेचे निसर्गरम्य समुद्रदृश्य जगभरातील पर्यटकांना भुरळ घालते. चुनखडीच्या टेकड्यांनी वेढलेले हे ठिकाण बोट क्रूझसाठी विशेष प्रसिद्ध आहे. समुद्रकिनार्यांचा आनंद घेऊ इच्छिणार्यांसाठी दा नांग आणि फु क्वॉक ही ठिकाणे आदर्श मानली जातात.
स्वच्छ किनारे, आलिशान रिसॉर्ट्स आणि शांत वातावरणामुळे अनेक भारतीय पर्यटक येथे निवांत काही दिवस घालवण्यास प्राधान्य देतात. साहसी पर्यटनाची आवड असलेल्यांसाठी डोंगराळ भाग, ट्रेकिंग आणि स्थानिक गावांचे अनुभवही उपलब्ध आहेत. व्हिएतनामी लोकांचा मैत्रीपूर्ण स्वभाव हा पर्यटकांच्या अनुभवातील आणखी एक सकारात्मक पैलू आहे. अनेक पर्यटनस्थळांवर इंग्रजीचा वापर वाढत असल्याने संवाद साधणे तुलनेने सोपे जाते. तसेच, भारतीय पर्यटकांची वाढती संख्या लक्षात घेऊन अनेक ठिकाणी शाकाहारी आणि भारतीय खाद्यपदार्थांची सुविधाही उपलब्ध होत आहे.
मलेशिया
मलेशिया हाही तरुणाईमध्ये अत्यंत लोकप्रिय असलेला पर्यटन देश आहे. आधुनिक शहरांची झगमग, हिरव्यागार वर्षावनांचे सौंदर्य, सुंदर समुद्रकिनारे, विविध संस्कृतींचा संगम आणि स्वादिष्ट खाद्यसंस्कृती यामुळे जगभरातील पर्यटक मलेशियाकडे आकर्षित होतात. भारतीय पर्यटकांसाठीही मलेशिया हा सहज पोहोचता येणारा आणि तुलनेने परवडणारा पर्यटन पर्याय आहे. मलेशियाची राजधानी क्वालालंपूर ही आधुनिकतेचे प्रतीक मानली जाते. जगप्रसिद्ध पेट्रोनास ट्विन टॉवर्स, आकर्षक शॉपिंग मॉल्स, रंगीबेरंगी नाईट मार्केट्स आणि उत्कृष्ट सार्वजनिक वाहतूक व्यवस्था पर्यटकांना एक वेगळाच अनुभव देतात.
शहरातील आधुनिक जीवनशैली आणि पारंपरिक संस्कृती यांचा सुंदर मेळ येथे पाहायला मिळतो. निसर्गप्रेमींसाठी मलेशिया म्हणजे एक स्वर्गच आहे. लंगकावीचे निळेशार समुद्रकिनारे, हिरव्यागार टेकड्या आणि प्रसिद्ध स्काय ब्रिज पर्यटकांना मंत्रमुग्ध करतात. बेटांवरील शांत वातावरण, जलक्रीडा आणि सूर्यास्ताचे मनमोहक दृश्य प्रवास अधिक संस्मरणीय बनवतात. याशिवाय, कॅमेरॉन हायलँड्समधील चहाचे मळे आणि थंड हवामान पर्यटकांना एक वेगळाच अनुभव देतात.
मलेशियाची बहुसांस्कृतिक ओळख हीदेखील पर्यटकांसाठी मोठे आकर्षण आहे. मलय, चिनी आणि भारतीय संस्कृतींचा प्रभाव देशभर जाणवतो. विविध सण, खाद्यपदार्थ, मंदिरे, मशिदी आणि सांस्कृतिक कार्यक्रम यामधून या वैविध्याचा अनुभव घेता येतो. भारतीय पर्यटकांना अनेक ठिकाणी भारतीय खाद्यपदार्थ आणि सांस्कृतिक साम्यही आढळते. मलेशियातील पर्यटन व्यवस्थेची आणखी एक जमेची बाजू म्हणजे स्वच्छता, सुरक्षितता आणि पर्यटकांसाठी उपलब्ध सुविधा. विमानतळ, हॉटेल्स, पर्यटनस्थळे आणि सार्वजनिक वाहतूक व्यवस्था चांगल्या दर्जाची असल्याने प्रवास अधिक आरामदायी होतो.
तरुणाईची इंटरनॅशनल टुरिझमची समीकरणं
डिजिटल माध्यमातून सहज करता येणारं प्रवासाचं नियोजन हा तरुण पर्यटकांसाठी खास जिव्हाळ्याचा विषय. व्हिसा अर्ज, प्रवास नियोजन, हॉटेल बुकिंग आणि पर्यटनविषयक माहिती मिळवण्यासाठी ते मोठ्या प्रमाणात डिजिटल प्लॅटफॉर्म आणि मोबाइल ॲप्सवर अवलंबून आहेत. कृत्रिम बुद्धिमत्ता ( अक) आधारित ट्रिप प्लॅनिंगची लोकप्रियताही वाढते आहे.
खर्चाबाबत जागरूकता वाढली
परदेश प्रवास हा तरुणांसाठी नेहमीच आवडीचा विषय. अनेकदा शिक्षणातून वा नोकरी-धंद्यातून ब्रेक घेऊन जगभर
फिरायची आवड जपणार्या तरुणांची संख्याही वाढती आहे. मात्र, परदेश प्रवास करतानाही ते खर्चाबाबत अधिक सजग असतात. विमानभाडे, चलन विनिमय दर आणि एकूण प्रवास खर्च लक्षात घेऊन अधिक मूल्यं देणार्या देशांना त्यांच्याकडून प्राधान्य दिले जाते.
लक्झरी पर्यटनाची वाढती मागणी
याशिवाय, एकीकडे कमीत कमी खर्चात परदेश दौरा करणारे तरुण-तरुणी आहेत.
तर दुसरीकडे लक्झरी रिसॉर्ट्स, आंतरराष्ट्रीय क्रूझ, प्रीमियम विमान प्रवास आणि वैयक्तिक गरजांनुसार आखलेल्या मल्टी-कंट्री टूरचा आग्रह धरणार्या तरुण पर्यटकांची संख्याही झपाट्याने वाढते आहे.
