वाढत्या आयुर्मानाच्या युगात ‘लाइफस्पॅन’ वाढवण्याचं काम वैद्यकशास्त्र करत आहे, पण ‘हेल्थस्पॅन’ वाढवण्याची संधी आपल्या दैनंदिन निवडींमध्ये दडलेली आहे. योग ही त्या निवडींपैकी एक महत्त्वाची निवड ठरू शकते, याची आठवण करून देण्यासाठी २१ जून – जागतिक योग दिन हे एक निमित्त आहे.
२०२६ हे असं वर्ष आहे की, एका टोकाला रांगणारी जनरेशन बीटा आहे, तर दुसर्या टोकाला साठीपारचे बेबी बूमर्स. या दरम्यान जनरेशन अल्फाचं बालपण बहरत आहे; जनरेशन झेडने नुकतंच तारुण्यात पदार्पण केलं आहे; तिशी ओलांडलेले मिलेनियल्स आयुष्याच्या मधल्या टप्प्यातली धावपळ अनुभवत आहेत; आणि जनरेशन एक्स निवांत वार्धक्याच्या दिशेने आपली वाटचाल सुरू करतायेत.
प्रगत वैद्यकशास्त्र, आरोग्यसेवांचा वाढलेला आवाका आणि जीवनमानातील सुधारणांमुळे माणसाचं सरासरी आयुर्मान गेल्या काही दशकांत लक्षणीयरीत्या वाढलं आहे. मात्र, याच बदललेल्या जीवनशैलीने काही नव्या आरोग्यविषयक समस्यांनी डोकं वर काढण्यास सुरुवात केली आहे. बैठं काम, कमी होत चाललेली शारीरिक हालचाल, वाढता ताणतणाव, अनियमित झोप आणि अयोग्य आहार-कारणांची यादी मोठी आहे. माणसाच्या आयुष्यात वर्षे वाढली आहेत; पण त्या वर्षांतील आरोग्य वाढलं आहे का? अनुत्तरित प्रश्न. ‘बाबू मोशाय, जिंदगी लंबी तो हुई है, पर सेहतमंद भी तो होनी चाहिये।’ आयुष्याची धावपळ, वाढतं वय आणि तन-मनाची निरामयता यांचा बॅलन्स साधायचा तरी कसा?
‘समत्वं योग उच्यते’ – गीतेत केलेली योगाची ही व्याख्या. शरीर बदलतं, क्षमता बदलतात, भूमिका बदलतात; नाती, जबाबदार्या आणि परिस्थितीही बदलत राहते. या बदलांना न घाबरता, न कुरकुरता, सजगपणे आणि समत्वाने स्वीकारण्याची क्षमता विकसित करणे म्हणजे योग. पण, योग म्हणजे फक्त योगासने करणं नाही. योग ही आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर निरोगी, सक्रिय आणि संतुलित राहण्याची जीवनकला आहे. हीच जीवनकला यंदाच्या आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या Yoga for Healthy Ageing या संकल्पनेच्या केंद्रस्थानी आहे.
‘निरोगी वार्धक्यासाठी योग’ असं म्हटलं की, साठी-पासष्टी ओलांडलेल्या ज्येष्ठांनी वयोमानाप्रमाणे येणार्या आरोग्याच्या कुरबुरी कमी करण्यासाठी जमेल तितकी योगासनं करावीत, असं काहीसं वाटू शकतं खरं. पण, प्रत्यक्षात ही संकल्पना सर्वाधिक महत्त्वाची आहे ती तरुणांसाठी. निवृत्तीचं वय साधारण साठ वर्षे असलं, तरी आपण निवृत्तीनंतर आर्थिक सुरक्षितता मिळावी म्हणून पहिल्या पगारापासूनच भविष्य निर्वाह निधी, विमा किंवा इतर गुंतवणुकीला सुरुवात करतो. निरोगी वार्धक्याचंही अगदी तसंच आहे. पन्नाशी-साठीनंतर शरीर स्वस्थ, मन उत्साही आणि जीवन स्वावलंबी राहावं, असं वाटत असेल तर त्यासाठीची गुंतवणूकही तरुणपणातच सुरू करावी लागेल. योग म्हणजे अशाच दीर्घकालीन आरोग्य गुंतवणुकीची एक परिणामकारक पद्धत.
‘शीर्यते इति शरीरम’ जे सतत झिजतं, बदलतं, क्षीण होत जातं, त्याला शरीर म्हणतात. भारतीय तत्त्वज्ञानातील ही व्याख्या शरीराच्या एका मूलभूत सत्याची जाणीव करून देते. आपल्या शरीरातील पेशी सतत निर्माण होतात, काम करतात आणि नष्ट होतात. तरुणपणी नवीन पेशींची निर्मिती आणि जुन्या पेशींची झीज यांच्यात समतोल असतो. मात्र, वय वाढू लागलं की हा समतोल हळूहळू ढासळू लागतो. हाडांची झीज होऊन त्यांची घनता कमी होऊ लागते; स्नायूंचं वस्तुमान आणि ताकद घटू लागते; त्वचेतील कोलॅजन कमी झाल्याने सुरकुत्या पडू लागतात; विविध अवयवांची कार्यक्षमता मंदावू लागते; रोगप्रतिकारक शक्ती आणि चयापचयातही बदल घडू लागतात. परिणामी, शरीर पूर्वीसारखं चपळ, लवचीक आणि कार्यक्षम राहात नाही.
हे सगळं व्हायला अजून बरीच वर्षं आहेत, ‘अभी तो मैं जवान हूँ’ असं वाटत असेल तर सावधान. २०२५ मध्ये ऑक्सफर्ड पॉप्युलेशन हेल्थच्या संशोधकांनी केलेल्या आणि नेचर मेडिसिनमध्ये प्रकाशित झालेल्या एका मोठ्या अभ्यासाने असे दाखवून दिले की, आपली चुकीची जीवनशैली शरीराच्या पेशींना त्यांच्या निर्धारित वेळेआधीच वेगाने वृद्ध करू शकते. विशेषत: आजच्या तरुणांमध्ये सर्रास आढळणार्या बैठ्या जीवनशैली, अतिरिक्त ताणतणाव, अपुरी झोप, अति-प्रक्रिया केलेले
(ultra- processed)अन्न, धूम्रपान आणि शारीरिक नि्क्रिरयता या सवयी शरीराच्या जैविक घड्याळाचा वेग वाढवतात. संशोधकांच्या मते, अशा सवयींमुळे पेशींमध्ये दाह (inflammation)वाढतो, दुरुस्ती यंत्रणा मंदावते आणि शरीराची झीज अपेक्षेपेक्षा लवकर सुरू होते. परिणामी, एखादी व्यक्ती जन्मतारखेने तरुण असली तरी त्याचं जैविक वय (biological age)मात्र अधिक वेगाने पुढे सरकू शकतं.
त्यामुळे आजच्या तरुणांमध्ये अकाली वार्धक्याचा वेग कमी करण्याची आणि पुढे अटळपणे येणारे जैविक वार्धक्य अधिक निरामय, कार्यक्षम आणि स्वावलंबी बनवण्याची गरज पूर्वीपेक्षा अधिक तीव्र झाली आहे. याच ठिकाणी योग महत्त्वाची भूमिका बजावू शकतो. योग प्रशिक्षक आणि वेलनेस कोच मल्हार जोशी म्हणतात, ‘वृद्धत्व ही एक नैसर्गिक जैविक प्रक्रिया आहे. योग त्याला थांबवू शकत नाही, परंतु अनेक संशोधनांनुसार योग जैविक वृद्धत्वाचा वेग (rate of biological aging) कमी करण्यास मदत करू शकतो. शरीरात निर्माण होणारे मुक्त रेणू (Free Radicals)पेशींवर ऑक्सिडेटिव्ह ताण निर्माण करून त्यांची झीज वाढवतात.
नियमित योगाभ्यासामुळे हा ताण आणि परिणामी पेशींची झीज कमी होत असल्याचे संशोधनात आढळून आले आहे. सततचा ताण शरीरात कॉर्टिसॉलसारख्या ताण-संप्रेरकांची पातळी वाढवतो. ज्यामुळे पेशींमध्ये दाह (inflammation) आणि झीज वाढते. योग, प्राणायाम आणि ध्यान यांमुळे हा ताण कमी होतो. योगामुळे होणार्या चांगली झोप, नियंत्रित रक्तदाब, सुधारलेली इन्सुलिन संवेदनशीलता आणि नियमित शारीरिक हालचाल या सर्व गोष्टी जैविक वृद्धत्वाचा वेग कमी करण्यास मदत करतात.’ पण, म्हणून फक्त दिवसभरात काही तास योगासने करून भागणार नाही. योग अभ्यासक आणि आहारशास्त्रतज्ज्ञ डॉ. स्नेहल दंताळे सांगतात, ‘योग ही फक्त व्यायामपद्धती नसून एक जीवनशैली आहे. त्यामुळे नियमित योगासनांइतकंच आहार आणि विहाराशी संबंधित यम-नियमही महत्त्वाचे ठरतात’. आपण योगासनं करून उरलेला वेळ ताणतणाव, अपुरी झोप, अयोग्य आहार आणि निष्क्रिय जीवनशैलीत घालवला, तर त्याचा अपेक्षित लाभ मिळणं कठीण आहे. त्यामुळे खाणं-पिणं, उठणं-झोपणं, काम करणं, विश्रांती घेणं आणि अगदी विचार करण्याच्या पद्धतीतही शिस्त, संयम आणि संतुलन आणणं हे योगात अभिप्रेत आहे, असं त्या म्हणतात.
योग निरोगी वार्धक्याला अनेक स्तरांवर हातभार लावतो. नियमित आसनांमुळे शरीराची लवचीकता, स्नायूंची ताकद आणि संतुलन टिकून राहण्यास मदत होते. वय वाढल्यानंतर पडणं आणि दुखापती होणं ही मोठी समस्या असते; शरीराचा तोल आणि हालचालींवरील नियंत्रण सुधारल्याने हा धोका कमी होऊ शकतो. प्राणायामामुळे श्वसनक्षमता आणि फुप्फुसांची कार्यक्षमता सुधारण्यास मदत होते. नियमित योगाभ्यासामुळे शरीरातील विविध जैविक प्रक्रियांमध्ये संतुलन राखण्यास मदत होते. संप्रेरकांचं संतुलन, चयापचयातील सुधारणा आणि मज्जासंस्थेचं नियमन यामुळे उतारवयात दिसून येणार्या मधुमेह, उच्च रक्तदाब, लठ्ठपणा, हृदयविकार यांसारख्या जीवनशैलीजन्य आजारांचा धोका कमी करण्यास योग उपयुक्त ठरू शकतो. त्यामुळे आज केलेला नियमित योगाभ्यास म्हणजे उद्याच्या निरोगी वार्धक्यासाठी केलेली आरोग्याची बचत.
आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर उद्भवू शकणार्या मानसिक समस्यांना तोंड देण्यातही योग उपयुक्त ठरतो. मानसशास्त्र समुपदेशक आणि योगअभ्यासक प्रतिमा वाघ सांगतात की, ‘वयानुसार शरीराची क्षमता बदलते, कौटुंबिक आणि सामाजिक भूमिका बदलतात. या बदलांमुळे अनेकदा नैराश्य, चिंता, एकाकीपणा, चिडचिडेपणा किंवा न्यूनगंड निर्माण होऊ शकतो. इथे योगाचं वेगळेपण अधोरेखित होतं. योग फक्त शरीर नाही तर मानससुद्धा लवचीक करतो. योगतत्त्वज्ञान मनाला स्वीकार, सजगता आणि समत्वही शिकवते. तरुणपणापासून नियमित केलेल्या योगाभ्यासामुळे अल्झायमर, स्मृतिभ्रंश आणि इतर संज्ञानात्मक समस्यांचा धोका कमी होण्यास मदत होऊ शकते.’
वाढत्या आयुर्मानाच्या युगात ‘लाइफस्पॅन’ वाढवण्याचं काम वैद्यकशास्त्र करत आहे, पण ‘हेल्थस्पॅन’ वाढवण्याची संधी आपल्या दैनंदिन निवडींमध्ये दडलेली आहे. योग ही त्या निवडींपैकी एक महत्त्वाची निवड ठरू शकते, याची आठवण करून देण्यासाठी २१ जून-जागतिक योग दिन हे एक निमित्त आहे.
