नव्या पिढीचा गायक, संगीतकार, रिअ‍ॅलिटी शोचं व्यासपीठ गाजवणारा, रॉक म्युझिक बॅण्डमध्ये झोकून देऊन गाणारा आणि शास्त्रीय संगीताच्या तानाही तितक्याच नजाकतीनं घेणारा हरहुन्नरी कलाकार जसराज जोशी सांगतोय ‘ऐकावंच असं काही’.. अर्थात आठवडय़ाची प्ले लिस्ट!
३० एप्रिल ही खळेकाकांची म्हणजेच संगीतकार श्रीनिवास खळे यांची जयंती. खळेकाकांच्या चालीव म्हणजे ऐकताना अतिशय गोड वाटणाऱ्या, लक्षात राहतील अशा; पण गायला.. गायलाच काय नुसते गुणगुणायला जरी गेलो तरी घाम फुटेल अशा चाली. मराठी संगीताचे प्रतिनिधित्व करणारे असे हे आपले खळेकाका.
खळेकाकांची आणि माझी पहिली भेट झाली ती वसंतरावांमुळे! हो.. ‘बगळ्यांची माळ फुले अजुनी अंबरात’मुळे. एकतर तोपर्यंत मी वसंतराव देशपांडे यांची फक्त नाटय़गीते, शास्त्रीय मफिली, ठुमरी-दादरा असेच ऐकले होते. त्यांच्याकडून असे एक भावगीत ऐकायला मिळणे हा एक सुखद धक्का होता. ते भावगीतही प्रचलित चालींपासून हटके असे. मग त्यांनी अजून एक बाण काढला भात्यातून. ‘राहिले ओठातल्या ओठात वेडे शब्द माझे..’ बापरे! या गाण्याबद्दल असा प्रश्न पडतो की आधी काय? म्हणजे हे गाणे बनताना सर्वात आधी काय ठरले असावे? गायक? चाल? की शब्द? कारण वसंतरावांच्या आवाजातल्या नसíगक कंपनांचा या गाण्यात असा काही वापर झालेला आहे की असे वाटून जाते की, त्या कंपनांना न्याय देण्यासाठी चाल झाली असावी आणि चालीला न्याय देण्यासाठी गीत आले असावे. असा उलटा प्रवास झालाय की काय, असे वाटून जाते.
एकूणच खळेकाकांची सगळीच गाणी अशी आहेत की ती त्या म्हणजे त्याच गायक/गायिकेने गावे.. जसे लतादीदींचे ‘जाहल्या काही चुका..’ अंगावर काटा श्रेणीतले गाणे! ‘काही’ची किंवा ‘गायिले’ची जागा फक्त दीदीच घेऊ जाणे! चाल बांधतानाच अशी जागा त्यात आणणे एखाद्या संगीतकाराला कसे काय जमू शकते? लता मंगेशकर हे नाव डोक्यात ठेवूनच हे गाणे तयार झाले असणार यात शंका नाही. लतादीदी आणि खळेकाका यांची सगळीच गाणी एकेका गाण्यावर पीएचडी करावी अशी आहेत. काही उदाहरणे म्हणजे – ‘या चिमण्यांनो.’ त्यात विशेष करून कडव्याची चाल.. कडव्याच्या शेवटी परत मूळ ध्रुवपदाच्या चालीकडे येणे.. अफाट!
‘नीज माझ्या नंदलाला’ – आपण मोठे का झालो? लहानच राहिलो असतो तर काय बिघडले असते? काय तो मातृत्वाचा भाव, काय ती आर्तता.. हे गाणे एकदा ऐकून मन भरतच नाही.
‘श्रावणात घन निळा बरसला’- या गीताच्या ओळी नुसत्या वाचल्या तर याचे गाणे बनू शकते यावर विश्वासच बसणार नाही! या गीताला छंद किंवा वृत्त नाही. यातले शब्द ज्या पद्धतीने छोटय़ा छोटय़ा पॉझेसचा वापर करून बसवण्यात आले आहेत त्याची गंमत ते गाणे गुणगुणायला घेतल्यावरच लक्षात येते आणि परत ती ‘पसारा’ची जागा.. न सुटणारे कोडे!
‘सुंदर ते ध्यान’, ‘वृक्षवल्ली आम्हा सोयरी’, ‘खेळ मांडियेला’, ‘भेटी लागे जीवा’ हे अभंग तितकेच तन्मयतेने ऐकावे. ‘भेटी लागे जीवा’मध्ये लयीत जे शब्द ओढून मोठे केलेत, त्यामुळे ती भेटीची उत्कंठा शिगेला पोहोचल्याचा, ती आस लागली असल्याचा भाव फारच प्रभावीरीत्या आपल्यासमोर येतो.
बाळासाहेबांनी म्हणजे पंडित हृदयनाथ मंगेशकरांनी दुसऱ्या संगीतकाराकडे तशी अभावानेच गाणी गायली आहेत. त्यातलीच दोन गाणी म्हणजे ‘लाजून हासणे’ आणि ‘गेले ते दिन गेले.’ बाळासाहेबांमधला त्यांनाही न सापडलेला गायक खळेकाकांना नक्कीच सापडलाय, असे वाटते.
बाबूजी म्हणजे सुधीर फडके यांनी गायलेले काकांचे ‘लळा जिव्हाळा शब्दच खोटे’ हे गाणेही बाबूजींनी गायलेल्या इतर गाण्यांपेक्षा वेगळे वाटते. सुरेश वाडकरांची गायकीसुद्धा काकांनी आपल्या काही गाण्यांत फार सुंदररीत्या वापरली आहे. जसे- ‘काळ देहासी आला काउ’- त्यात ‘का’ आणि ‘दे’ला लांबवण्याची पद्धत आणि ‘जेव्हा तुझ्या बटांना’मधली ‘वारा’ची जागा किंवा ‘धरीला वृथा छंद’ हे झपतालातले गाणे वाडकरजींच्या उपशास्त्रीय गायकीला न्याय देणारे असेच आहे.
अण्णा.. अर्थात भीमसेन जोशी यांनी गायलेले तुकोबांचे अभंग तर विचारायलाच नकोत! रागदारीचा आधार आणि  भावोत्कटता याचा संगम या सगळ्या चालींमध्ये दिसतो. ‘याजसाठी केला होता अट्टहास’, ‘राजस सुकुमार’, ‘सावळे सुंदर रूप मनोहर’ हे अभंग परत परत ऐकावेत, ऐकतच राहावेत असेच.
खळेकाकांनी लहान मुलांसाठीही काही कमालीची भारी गाणी केली आहेत. त्याविषयी पुढे कधीतरी बोलणे होईलच.
                                
हे  ऐकाच.. :
शंकरजींची बगळ्यांची माळ
vr20खळेकाका हे शंकर महादेवन यांचे गुरू आहेत. शंकर महादेवन यांच्या गायकीतून, चाल लावण्याच्या पद्धतीतून क्वचितप्रसंगी काकांची आठवणही येते. शंकरजींनी ‘नक्षत्रांचे देणे’च्या खळेकाकांवरील कार्यक्रमात आणि इतरही काही कार्यक्रमांमध्ये ‘बगळ्यांची माळ फुले’, ‘राहिले ओठातल्या ओठात’, ‘उगवला चंद्र पुनवेचा’, ‘लाजून हासणे’ ही गाणी गायलेली आहेत. ती यूटय़ूबवर उपलब्ध आहेत. शंकरजींच्या गायकीत ही गाणी ऐकणे म्हणजे एक वेगळाच अनुभव आहे. हे व्हिडीओ न चुकता आवर्जून अनुभवावे असेच.

जसराज जोशी -viva.loksatta@gmail.com    

Watch waiter’s priceless reaction to sketch artist's sweet surprise
न मिळालेल्या कौतुकाची पोचपावती! कलाकारानं हॉटेलच्या बिलवर रेखाटलं वेटरचं सुरेख चित्र; चेहऱ्यावर उमटलं सुंदर हास्य, Video Viral
amruta khanvilkar
‘नवनव्या भूमिकांचे आव्हान स्वीकारण्यात आनंद’
friend request natak review
नाटयरंग : ‘फ्रेंड रिक्वेस्ट’ – घटस्फोटित बाप-मुलीच्या नात्यातील उत्कट तेढ
dr jane goodall, dr jane goodall marathi article,
संशोधकाची नव्वदी!