जे न देखे रवि – २

जगभरातले शास्त्रज्ञ आणि तंत्रज्ञ ‘स्टार ट्रेक’चे फॅन होते. त्यामुळे ट्रान्सपोर्टरवर आधारित अनेक संशोधनं केली गेली.

नवं दशक नव्या दिशा

सौरभ करंदीकर

जगभरातले शास्त्रज्ञ आणि तंत्रज्ञ ‘स्टार ट्रेक’चे फॅन होते. त्यामुळे ट्रान्सपोर्टरवर आधारित अनेक संशोधनं केली गेली. ‘हायझेनबर्ग प्रिन्सिपल’सारख्या अतिसूक्ष्म पदार्थाच्या मोजमापावर बंधन घालणाऱ्या सिद्धांतांची चर्चा झाली. २०१५ साली जर्मनीतील काही तंत्रज्ञांनी एक वस्तू एका ठिकाणी तुकडय़ा तुकडय़ांनी स्कॅन करून, त्याची नोंद इंटरनेटद्वारा दुसऱ्या ठिकाणी पाठवून थ्री-डी प्रिंटरच्या साहाय्याने ती पुन्हा रचण्याचा खटाटोप केला. मात्र जिवंत माणसाला असं ‘बीम’ करणं सध्या तरी शक्य नाही.

‘स्पेस, द फायनल फ्रंटियर..’ हे शब्द लहानपणी कानावर पडले की अंगावर रोमांच उभे राहायचे. कॅप्टन कर्क, स्पॉक, मॅकॉय यांच्या साहसकथा, त्यांचं ‘स्टारशिप एंटरप्राइज’ नावाचं तबकडीवजा अवकाशयान, चित्रविचित्र परग्रहवासी आणि अद्भुत तांत्रिक अवजारं या आणि अशा अनेक गोष्टी भुरळ घालायच्या. १९६० च्या दशकात प्रसिद्ध झालेली आणि आपल्याकडे १९८० च्या दशकात दूरदर्शनवर आलेली ‘स्टार ट्रेक’ नावाची मालिका अनेकांना आठवत असेल. मागील लेखात आपण पाहिलंत की या मालिकेच्या नायकाची ‘कॅप्टन कर्क’ची भूमिका साकारणारा अभिनेता विल्यम शॅटनर (९०) गेल्या महिन्यात खरोखरच अवकाशात जाऊन आला. त्यानिमित्ताने ‘स्टार ट्रेक’मधील कुठले तांत्रिक आविष्कार वास्तवात आलेले आहेत आणि कुठले अजूनही कल्पनाविश्वात रेंगाळले आहेत, त्याचा आढावा घेऊया.

लेखक आणि निर्माता जीन रॉडनबेरी यांनी १९६४ मध्ये ‘स्टार ट्रेक’ची संहिता लिहिली. ‘स्टार ट्रेक’च्या पहिल्या भागाचं चित्रीकरण करताना जीनच्या लक्षात आलं की संहितेमध्ये अवकाशयान तीन-चार वेळा एका ग्रहावर उतरतं. असं दाखवायचं तर अवकाशयानाचं मोठं मॉडेल करणं भाग होतं. त्याशिवाय त्याचं ‘लँडिंग’ दाखवायचं, त्यातून कॅप्टन आणि इतर लोकं बाहेर पडतात असं दाखवायचं तर अफाट खर्च होणार होता. काहीतरी शक्कल काढणं भाग होतं. त्यातूनच ‘ट्रान्सपोर्टर बीम’ ही कल्पना सुचली. कथा तेविसाव्या शतकात घडते, त्या काळात एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जायचं तर माणसाला प्रवास करायला लागत नाही. एका यंत्रात उभं राहायचं. ते यंत्र आपल्या शरीरातील प्रत्येक अणुरेणूचं परिवर्तन प्रकाशाच्या झोतात करतं. तो प्रकाशकिरणांचा झोत इच्छितस्थळी पोहोचला की तिथे प्रकाशाचं रूपांतर पुन्हा शरीरात होतं. अशा पद्धतीने अवकाशयानातील माणसं चुटकीसरशी परग्रहावर अवतरतात, असं दाखवण्यात आलं.

हा प्रकार कमालीचा लोकप्रिय झाला. खरंच असं झालं तर काय बहार येईल! आपल्या घरात असं यंत्र बसवायचं, ऑफिसची वेळ झाली की त्यात जाऊन उभं राहायचं. क्षणार्धात हव्या त्या ठिकाणी, अगदी ऑफिसमधल्या आपल्या टेबलाजवळ प्रकट व्हायचं, बस्स! ट्रेन, बस, गाडय़ा नकोत, ट्रॅफिक नको, उशीर झाल्याबद्दल बॉसची कटकट नको. इतकंच काय, विमानं आणि बोटी नकोत. गरम होऊ लागलं तर थोडा वेळ थंड हवेच्या ठिकाणी फेरफटका मारून यायचं. (अर्थात ज्यांना प्रवास आवडतो ते यावर नाकं मुरडतील इतकंच). गेल्या साठ वर्षांत तरी ही कल्पना वास्तवात आलेली नाही. कारण या प्रक्रियेला तसा शास्त्रीय आधार नाही. मानवी शरीरातील प्रत्येक अणू आणि रेणू यांची स्थिती काय आहे याची नोंद क्षणार्धात एखाद्या यंत्रात करणं शक्य नाही. जगभरातले शास्त्रज्ञ आणि तंत्रज्ञ ‘स्टार ट्रेक’चे फॅन होते. त्यामुळे ट्रान्सपोर्टरवर आधारित अनेक संशोधनं केली गेली. ‘हायझेनबर्ग प्रिन्सिपल’सारख्या अतिसूक्ष्म पदार्थाच्या मोजमापावर बंधन घालणाऱ्या सिद्धांतांची चर्चा झाली. २०१५ साली जर्मनीतील काही तंत्रज्ञांनी एक वस्तू एका ठिकाणी तुकडय़ा तुकडय़ांनी स्कॅन करून, त्याची नोंद इंटरनेटद्वारा दुसऱ्या ठिकाणी पाठवून थ्री-डी प्रिंटरच्या साहाय्याने ती पुन्हा रचण्याचा खटाटोप केला. मात्र जिवंत माणसाला असं ‘बीम’ करणं सध्या तरी शक्य नाही.

‘स्टार ट्रेक’मध्ये प्रत्येकाकडे एक ‘कम्युनिकेटर’ असायचा. तो त्या काळचा मोबाइल फोन होता म्हटलं तरी चालेल. १९६० च्या दशकात बिनतारी ध्वनी संदेश पाठवणारी यंत्रणा नव्हती असं नाही. पहिल्या महायुद्धापासून बहुतांश सैन्याकडे अशा रेडिओ यंत्रणा असत. परंतु खिशात राहू शकेल असा ‘फ्लिप ओपन’ फोन मात्र नव्हता. मोटोरोलाने आपला पहिला मोबाइल फोन ‘डायना टॅक’ १९७३ मध्ये प्रदर्शित केला, आणि १९८३ साली बाजारात आणला. पण तो अवजड आणि खिशात राहील असा नव्हता. कालांतराने त्यांनीदेखील ‘स्टार ट्रेक’मध्ये शोभेल असा ‘स्टार टॅक’ नावाचा फोन आणलाच.

‘स्टारशिप एंटरप्राईज’वरील डॉक्टर मॅकॉय आपल्या पेशंटला तपासताना विविध उपकरणं वापरत. पेशंटला ‘ट्रायकॉर्डर’ नावाच्या हॅन्ड स्कॅनरने (हल्ली जागोजागी शरीराचं तपमान पाहतात तसं) स्कॅन केलं की त्याला काय झालंय, ते क्षणार्धात समजत असे, इतकंच नाही तर कुठलं औषध हवंय तेदेखील कळत असे. आधुनिक वैद्यकशास्त्र अशाच ट्रायकॉर्डरच्या प्रतीक्षेत आहेत. रक्तदाब, हृदयाचं कार्य, रक्तातील ऑक्सिजन आणि साखरेचं प्रमाण मोजणारी छोटी उपकरणं आता उपलब्ध आहेत, परंतु रोगाचं निदान आणि उपाययोजना क्षणार्धात सांगणारा ट्रायकॉर्डर येण्यासाठी आपल्याला काही र्वष थांबावं लागेल.

‘स्टार ट्रेक’मधली पात्रं अवकाशयानातील क ॉम्प्युटरशी आपण एकमेकांशी बोलतो तसा संवाद साधत. त्या काळी आज उपलब्ध असलेले सिरी, अ‍ॅलेक्सा, आणि गूगल असिस्टंट नव्हते. आज व्हॉइस असिस्टंट आपल्या प्रत्येक हाकेला ‘ओ’ देत आहेत. ‘हे सिरी’ असं म्हटलं की आपल्याला हवी ती माहिती आणि उत्तरं मिळत आहेत (आपण देवाधिदेवाला जसं संबोधतो तसं सिरीलाही ‘हे’ म्हणतो याची चाणाक्ष वाचकांनी नोंद घ्यावी).

‘स्टार ट्रेक’च्या दुसऱ्या मालिकेत – ‘नेक्स्ट जनरेशन’ (१९८७) मध्ये – बटणांच्या ऐवजी ‘टच-स्क्रीन’ आले. कम्युनिकेटरच्या जागी युनिफॉर्मवर लटकावलेला ‘बॅज’ हाताने दाबून एकमेकांशी संवाद साधला जात असे – वेअरेबल कम्प्युटिंग – परिधान करता येणारी संगणकीय प्रणाली – या तंत्रज्ञानाची ही नांदी होती. अवकाशयानाची महिला डॉक्टर पेशंटच्या अंतरंगात पाहण्यासाठी चष्म्यासारखं उपकरणं वापरू लागली. प्रत्येकाच्या हातात माहिती दर्शवणारं ‘पॅड’ म्हणजेच ‘पी.ए.डी.डी.’ ‘पर्सनल अ‍ॅक्सेस डिस्प्ले डिव्हाइस’ आलं. अवकाश प्रवाशांचा शीण घालवण्यासाठी आपल्या सभोवताली हवी ती दुनिया निर्माण करण्याची व्यवस्था ‘हॉलोडेक’मध्ये दर्शवली गेली. गूगल ग्लास, आयफोन, आयपॅड, व्हच्र्युअल रिअ‍ॅलिटी या साऱ्यांची प्रेरणा कुठून आली हे वेगळं सांगायला नको.

‘जे न देखे रवि, ते देखे कवि’ असं म्हणतात. जे सूर्यालाही दिसत नाही ते कविमनाला दिसतं. कल्पनेची पोहोच वास्तवाच्या पलीकडे असते. ‘स्टार ट्रेक’चं कल्पनाविश्व आपल्या वर्तमानाचं आणि भविष्याचं चित्रण ठरतंय ही लक्षणीय बाब आहे. कॅप्टन कर्क अवकाशात भ्रमण करून आला. आपणही एक दिवस ‘स्टार ट्रेक’सारखी विश्वभ्रमंती करू हे नक्की.

viva@expressindia.com

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व व्हिवा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Je na dekhe ravi ysh

Next Story
स्टे-फिट : दी आर्ट ऑफ इटिंग
ताज्या बातम्या