जीजीविषा काळे, युवा दिग्दर्शक
जीजीविषा काळे ही आताच्या नव्या पिढीतील दिग्दर्शक ! तिने दिग्दर्शित केलेला ‘तिघी’ हा चित्रपट काही महिन्यांपूर्वी प्रदर्शित झाला. या चित्रपटाची मांडणी, विषयाची निवड यातून तिने आपले वेगळेपण दाखवून दिले. कलाकाराचं प्रयोगशील असणं तिच्याकडे आहेच, मात्र ती एक उत्तम वाचक आहे. तिच्या भाषेत सांगायचं तर तिला वाचनाचं भयंकर वेड आहे. लहानपणी तिचं वाचनाचं वेड इतकं होतं की, अक्षरश: तिच्या हातून पुस्तकं हिसकावून घ्यावी लागत असत, असं तिने सांगितलं. पुस्तकाविषयी तिच्या मनात श्रद्धा आहे असं म्हटलं तर ते वावगं होणार नाही. त्याविषयी सांगताना ती म्हणाली, ‘पुस्तक वाचनामुळे आपल्याला दैनंदिन जीवनातून थोडा ब्रेक मिळतो, आपल्याला कितीतरी नवीन गोष्टींची माहिती होते आणि महत्त्वाचं म्हणजे वेगळी मतं कळतात.
याचबरोबर पुस्तकं कल्पनाशक्ती वाढवण्यासाठी अत्यंत महत्त्वाचं साधन आहे असं मला वाटतं. पुस्तकांमुळे आपण आपल्या छोट्याशा घरात बसून जगभर भ्रमंती करू शकतो. मी लहानपणी अशी भ्रमंती अनेकदा केली आहे.’ जीजीविषाचं बालपण ते अगदी विशीत प्रवेश करेपर्यंतचं आयुष्य पुण्यात गेलं. तिच्या लहाणपणीच्या आठवणीत पुस्तकं हा सगळ्यात अविभाज्य भाग आहे. घरी सगळेच वाचणारे आणि मुख्य म्हणजे घरातच पुस्तकांचा भला मोठा संग्रह. त्यामुळे लहानपणापासून पुस्तकं वाचनाची गोडी तिला लागली. आणि तिने अगदी वेगवेगळी पुस्तकं वाचायला सुरुवात केली. वाचनाच्या सवयीकडे मागे वळून पाहताना लहानपणी वाचलेल्या अनेक पुस्तकांनी तिची वैचारिक जडणघडण केली, असं तिचं मत आहे.
ती म्हणते, ‘मला लहानपणी माझ्या वडिलांनी काही पुस्तकं भेट म्हणून दिली होती. ‘चिंगी’, ‘काठावरची अंकुरे’ आणि ‘सुरईतला राक्षस’ ही त्यातील काही पुस्तकं. ‘सुरईतला राक्षस’ या पुस्तकाचं वेगळेपण म्हणजे हे पुस्तक माझ्या वडिलांच्या लहानपणीचे होते. त्यांनी त्याची प्रत काढून मला दिली होती. त्यामुळे या सगळ्या पुस्तकांना माझ्या आठवणीत विशेष स्थान आहे. शाळेत असताना तर मी माझ्याकडे असणारी कितीतरी पुस्तकं शाळेच्या ग्रंथालयाला भेट म्हणून दिली होती. कारण, आपल्याकडे इतकी पुस्तकं आहेत ती सगळ्यांकडेच असतीलच असं नाही, ती इतरांनीही वाचावीत म्हणून मी भेट दिली होती’, अशी आठवण तिनं सांगितली.
मनोरंजन हे जीजीविषाचं क्षेत्र ! त्यामुळे तिचं साहजिकच चित्रपट आणि नाट्यविषयक पुस्तकांचं वाचन होतंच, मात्र तिला अशा विषयांवरील पुस्तकांपेक्षा पटकथा (स्क्रीनप्ले) फार आवडतात, असं तिने सांगितलं. ‘द एव्हिएटर’ हा मार्टिन स्कॉर्सेसी यांनी दिग्दर्शित केलेल्या चित्रपटाची पटकथा तर तिने तिच्या लॅपटॉपमध्ये सेव्ह करून ठेवली आहे. तिची पुस्तकं वाचनाची सवय म्हणजे ती एका वेळी दोन पुस्तकं वाचते. ज्यातील एक भल मोठं असतं तर दुसरं तुलनेने छोटं असतं. ती म्हणते, दोन प्रकारची पुस्तकं एकत्र वाचल्यामुळे मला हवा तसा ब्रेक मिळतो आणि माझं वाचनातलं सातत्यही टिकून राहते. नुकतंच तिनं ‘घाचर घोचर’ हे विवेक शानभाग यांचं पुस्तक वाचलं. तर पुढे काय वाचायचं हेदेखील तिचं ठरलेलं आहे. त्यात तिला नुकतंच भेट म्हणून मिळालेलं नरहर कुरुंदकर यांचं ‘मागोवा’ आणि ‘ॲन्क्शस पीपल’ या फ्रेड्रिक बॅकमन यांच्या पुस्तकांचा समावेश आहे.
चित्रपटक्षेत्रातील काही मंडळीही जीजीविषाला काही पुस्तकं सुचवत असतात किंवा भेट म्हणून देत असतात. याबाबत सांगताना ती म्हणाली, मला सखी गोखले ‘द व्हेजिटेरियन’ हे पुस्तक भेट दिलं होतं. कवितेच्या जगात मला विनोद कुमार शुक्ल हे कवी विशेष आवडतात. त्यांची ओळख मला गिरिजा ओकने करून दिली होती. शुक्ल यांच्या कविता मला सुरुवातीपासूनच भावल्या आहेत. अतिशय सोप्या शब्दांत मोठं तत्त्वज्ञान मांडणं हे त्यांच्या काव्यशैलीचं वैशिष्ट्य आहे, असं म्हणता येईल. त्यांच्या एका कवितेतील ओळ आहे, ‘सबसे गरीब आदमी के लिये सबसे सस्ता डॉक्टर भी बहुत महंगा है.’ अतिशय कमी शब्दांत त्यांनी समाजातील विषमतेचं चित्रण केलं आहे.
आपल्यासाठी सहज उपलब्ध असलेली एखादी सुविधा इतरांसाठी किती दूरची आणि अवघड असू शकते, याचं भान या ओळींमधून येतं. हे आपल्याला माहिती असतंच, पण एखादा कवी जेव्हा ते इतक्या प्रभावीपणे मांडतो तेव्हा जणू कुणीतरी जोरदार चपराक मारली आहे असं वाटतं. ‘धूप आने दो’- अंबरीश मिश्र, ‘कोसला’ – भालचंद्र नेमाडे, ‘श्वासपाने’- राही अनिल बर्वे तसंच, नारायण धारपांचं साहित्य ही तिची काही आवडती पुस्तकं.
सि्व्हिहया प्लाथ या अमेरिकन कवयित्री आणि लेखिकेची ओळख तिला बहुधा शालेय वयात झाली असावी. ती म्हणते, त्यावेळी त्यांची ‘मिरर’ ही कविता वाचली आणि त्यातूनच या कवयित्रीशी माझी गट्टी जमली.
पुढे असं झालं की त्यांच्या लेखनाचा माझ्यावर इतका प्रभाव पडला की त्याने माझ्या आयुष्याला एक वेगळी दिशा दिली असं आता वाटतं. तिने वाचलेल्या अनेक पुस्तकांमध्ये स्त्री लेखिकांची पुस्तकं अधिक आहेत. याबाबत सांगताना ती म्हणते, ‘माझ्या वाचनप्रवासात अनेक स्त्री लेखिकांचा सहभाग आहे. अर्थात, प्रत्येक लेखिकेचा स्वत:चा स्वतंत्र प्रवास आहे. तो वाचताना माझ्या जाणिवा अधिक प्रगल्भ झाल्या. त्या पुस्तकांमुळे जगाविषयीची माझी स्वत:ची मतं आणि दृष्टी तयार झाली.’ एनिड ब्लायटन, रोआल्ड डाल, अगाथा ख्रिस्ती ही काही तिची आवडती लेखक मंडळी. एखादा लेखक आवडला किंवा त्याची लेखनशैली विशेष भावली की त्या लेखकाने लिहिलेल्या पुस्तकांचा संच गोळा करणं हा माझा आवडता छंद आहे, असं तिनं सांगितलं. आर्ची कॉमिक्सच्या मासिकांचा संग्रहही तिच्याकडे आहे. तिची आणखी एक आवड म्हणजे प्रसिद्ध कलाकारांच्या पत्रांचा संग्रह किंवा त्यांच्या डायरीवर आधारित पुस्तक गोळा करणं.
ती म्हणते, ‘एखादा कलाकार जसा त्याच्या कलाकृतींतून आपल्याला कळतो, तसाच तो त्याच्या पत्रव्यवहारातून आणि वैयक्तिक लेखनातूनही उलगडत जातो. अशा अनेक कलाकारांच्या पत्रांचे संच माझ्याकडे आहेत. यात व्हिन्सेंट व्हॅन गॉग या जगप्रसिद्ध चित्रकारासह अनेक कलाकारांचा समावेश आहे.’ चित्रकलेविषयी पुस्तकं गोळा करणंही तिला मनापासून आवडतं. अशा पुस्तकांचा तिच्याकडे मोठा संग्रह आहे, असं तिने सांगितलं. तिच्या वाचनाची आवड तिच्या घरातही सहज दिसून येते. तिच्या घरातील प्रत्येक खोलीत पुस्तकं आहेत. तसंच, घरातील काही ठिकाणी पुस्तकं अगदी विषयानुरूप रचून ठेवलेली आहेत. पुस्तकं, कलात्मक वस्तू आणि झाडं अशी तिच्या पुस्तक सहवासाची रचना पाहिली की तिच्यातील वाचकासोबतच कलात्मक दृष्टीचीही आपल्याला ओळख होते.
पुस्तक वाचनाविषयी व्यक्त होताना ती म्हणाली, ‘एखाद्याने खूप कष्ट करून पुस्तकात काहीतरी मांडलेलं असतं. जसा एखादा उत्तम चित्रपट पाहिल्यावर किंवा एखादी सुंदर संगीत रचना ऐकल्यावर मनाला भिडते तशीच भावनिक प्रतिक्रिया मला पुस्तक वाचतानाही येते. मला वाटतं, प्रत्येक व्यक्तीला आवडतील अशी अनेक पुस्तकं जगात आहेत. त्यामुळे ‘मला एकही पुस्तक आवडत नाही’ असं कोणी म्हणू शकत नाही. फक्त प्रत्येकालाच योग्य पुस्तक सापडेल असं नाही. पुस्तक वाचनामुळे आपली भावनिक समज वाढते. जगाकडे पाहण्याचा दृष्टीकोन विकसित करण्यात त्यांची महत्त्वाची भूमिका असते.’
viva@expressindia.com
