गेल्या दशकात भारतीय सौंदर्यविश्वात एक शांत पण ठळक बदल जाणवू लागला आहे, तो म्हणजे कोरियन स्किनकेअरचा वाढता प्रभाव. एकेकाळी केवळ कोरियन ड्रामा, पॉप म्युझिक किंवा फॅशनपुरतं मर्यादित असलेलं के-कल्चर आज भारतीय मेकअप शेल्फपर्यंत पोहोचलं आहे. कोरियन स्किनकेअर भारतात लोकप्रिय होण्यामागे सोशल मीडिया, सेलिब्रिटी ट्रेंड, भारतीय ग्राहकांच्या सौंदर्याकडे पाहण्याच्या दृष्टिकोनात झालेला बदल अशी अनेक कारणं आहेत. मेकअप विश्वातला कोरियन स्किनकेअर म्हणजे एक जेन झी ट्रेंड आहे. त्वचेच्या समस्यांवर तात्काळ उपाय शोधणारी भारतीय मानसिकता हळूहळू दीर्घकालीन उपायांकडे वळू लागली. प्रदूषण, तणावपूर्ण जीवनशैली आणि अनियमित दिनचर्येमुळे वाढणाऱ्या त्वचेच्या समस्या यामुळे ‘त्वचा दुरुस्त करणे’ यापेक्षा ‘त्वचा जपणे’ अधिक महत्त्वाचे वाटू लागले. याच टप्प्यावर कोरियन स्किनकेअरचे तत्त्वज्ञान भारतीय बाजारात ठळकपणे रुजले, जिथे स्किनकेअर म्हणजे केवळ सौंदर्यप्रसाधनांचा वापर नसून, शिस्तबद्ध सवयींचा आणि संयमाचा प्रवास आहे.

भारतात कोरियन स्किनकेअरने पाय रोवले सुमारे २०१३ मध्ये. आता तो प्रभाव फक्त सोशल मीडिया ट्रेंडपुरता मर्यादित नाही, तर तो आकडेवारीने सिद्ध होत जाणारा बाजाराचा बदल आहे. आज भारतात ६० पेक्षा अधिक कोरियन सौंदर्यप्रसाधन ब्रँड्स उपलब्ध आहेत. कोरियन स्किनकेअरच्या प्रभावाचा अभ्यास करण्यासाठी आकडेवारी, सर्व्हे या गोष्टींचा अभ्यास करणे गरजेचे ठरते. २०२१ मध्ये के-ब्युटी उत्पादनांचा जागतिक बाजारहिस्सा सुमारे १० अब्ज अमेरिकन डॉलर्स इतका होता. २०२१ ते २०२५ या कालावधीत सुमारे ११.३ टक्के वार्षिक संमिश्र वाढ दराने (CAGR) हा बाजार वाढत असून, २०२७ पर्यंत तो १४ अब्ज डॉलर्सपेक्षा अधिक वाढण्याचा अंदाज आहे. कोरियन उत्पादनांकडे ग्राहकांचा वाढता ओघ असण्यामागे एक महत्त्वाचे कारण म्हणजे, या स्किनकेअर उत्पादनांचा भर ग्राहकांच्या त्वचेच्या आरोग्यावर असतो, असा विश्वास. ही उत्पादने प्रामुख्याने नैसर्गिक घटकांपासून तयार केलेली असतात. यासोबतच, परवडणारी किंमत आणि आकर्षक डिझाइन यामुळे के-ब्युटी उत्पादने ग्राहकांसाठी अधिकच मोहक ठरली आहेत. के-ब्युटी उत्पादनांचे फायदे, सोशल मीडियाचा प्रभाव आणि उत्पादनांच्या वेगळेपणाची ओळख याबाबत वाढलेली जागरूकता यामुळे ग्राहक या उत्पादनांमध्ये गुंतवणूक करण्याकडे अधिक झुकू लागले आहेत. त्यामुळेच के-ब्युटी उद्योगातील प्रमुख ब्रँड्ससाठी हा काळ विस्ताराच्या दृष्टीने मोठी संधी म्हणून पाहिला जात आहे.

भारतीय आणि कोरियन सौंदर्यशास्त्र असे समीकरण होण्यामागचे मुख्य कारण म्हणजे, प्रामुख्याने १०-स्टेप स्किनकेअर रुटीन. भारतीयांप्रमाणेच कोरियन लोकांनाही नैसर्गिक तेजस्वी आणि उजळ त्वचा आवडते; मात्र कोरियन स्किनकेअरची संकल्पना इतक्यावरच थांबत नाही. पारंपरिक भारतीय स्किनकेअर रुटीन साधारणपणे क्लीन्झिंग, टोनिंग आणि मॉइश्चरायझिंगपुरती मर्यादित असताना, कोरियन स्किनकेअरमध्ये अपेक्षित त्वचा परिणाम साधण्यासाठी अनेक अतिरिक्त उत्पादनांचा समावेश केला जातो. सुंदर आणि निरोगी दिसणारी त्वचा मिळवण्याच्या या इच्छेमुळेच BB क्रीम, CC क्रीम, शीट मास्क, पिंपल पॅचेस, सिरम्स, इमल्शन्स, अँप्युल्स यांसारख्या विविध स्किनकेअर उत्पादनांचा उदय झाला, तसेच यामध्ये सातत्याने नवनवीन उत्पादनांची भर पडत गेली.

कोरियन सौंदर्यपद्धती भारतीय त्वचेसाठी खरंच चांगली आहे का? तर याचे उत्तर पूर्णपणे ‘हो’ असू शकत नाही, पण त्यामुळे आपल्या त्वचेला कुठलीही मोठी हानी होत नाही. क्लाउड स्किन आणि ग्लास स्किन अशा दोन पद्धती त्यात असतात. क्लाउड स्किनचा अर्थ मऊसूत त्वचा आणि ग्लास स्किनचा अर्थ तजेलदार त्वचा. दोन्ही प्रकारांचा हायड्रेशनवर जास्तीत जास्त भर असतो आणि त्यापद्धतीने ट्रीटमेन्ट केली जाते. डर्मेटॉलॉजीच्या पार्श्वभूमीवर आज ‘स्किन बॅरियर हेल्थ’ हा महत्त्वाचा विषय मानला जातो आणि याच मुद्द्यावर के-ब्युटी भर देते. सौम्य क्लीन्झर्स, लो-पीएच फॉर्म्युलेशन्स, सेरामाइड्स, सिका (Centella Asiatica), नायसिनामाइड यांसारखे घटक त्वचेचा संरक्षणात्मक थर मजबूत करण्यास मदत करतात. भारतीय त्वचा प्रदूषण, सूर्यप्रकाश आणि आर्द्र हवामानामुळे सतत तणावाखाली असते; अशा वेळी त्वचेची झीज कमी करण्यावर भर देणारी ही पद्धत डर्मेटॉलॉजिकलदृष्ट्या योग्य ठरते.

के-ब्युटीमधल्या कोणकोणत्या टेक्निक्स भारतीय स्किनसाठी किंवा आपल्या मेकअप ट्रेंडमध्ये विस्तारू शकतात याबद्दल सेलिब्रिटी मेकअप आर्टिस्ट निशी गोडबोले सांगतात, ‘आपल्या सलोन्स आणि ब्युटिशिअन्सनी जर काही गोष्टींकडे जास्त लक्ष दिलं तर के-ब्युटी ट्रेंड्स आपल्याला बराच फायदा देऊ शकतात. प्लांट बेस्ड कोलॅजिन, प्लांट बेस्ड सी विटॅमिन, ⁠तिशीनंतर बायकांना रेटिनॉल, ग्लुटाथिओन इत्यादी असलेल्या ट्रीटमेंट्स याचा वापर आपल्याकडे आता बऱ्यापैकी होताना दिसतो आहे. ग्लास स्किन ही त्यांची संकल्पना असली तरीही स्किन केअर बरोबर आहार आणि समतोल दिनचर्येलाही ते तेवढेच महत्त्व देतात. ग्लास स्किन ही ८० टक्के स्किन केअर आणि २० टक्के मेकअपने साधता येते. प्रदीर्घ काळासाठी ग्लास स्किन हवी असेल, तर समतोल आणि सात्विक आहारावर जास्त भर देणे गरजेचे आहे’.

तसेच, भारतीय हवामान हे इतर देशांपेक्षा प्रदूषण, सूर्यप्रकाश आणि दमट हवेचे असते, अशा वातावरणात के-ब्युटीच्या कुठल्या पद्धती आपण वापरल्या पाहिजेत? याबदद्लही त्यांनी सविस्तर माहिती दिली. ‘रोज सकाळ – संध्याकाळ मॉइश्चुरायझर आणि सनस्क्रीन लावणे हा त्यांचाचकडून आलेला ट्रेंड आहे. तुम्ही अगदी रोज घरी असलात, तरी हे रुटीन सध्या फॉलो करणं खूप गरजेचं झालं आहे. बहुतांश कोरियन प्रॉडक्ट्स हे भरपूर चाचण्यांमधून पुढे आलेले असतात. आपल्या मार्केटमध्ये एखादं नवीन कॉस्मॅटिक येतं, तेव्हा नियामक अनुपालनानंतर ते बाजारात येतात. म्हणूनच भारतीय स्किनसाठी, मुरुमं किंवा सेंसेटिव्ह स्किनसाठी बरेचसे कोरियन प्रॉडक्ट्स योग्य ठरतात. अशा स्किनसाठी कोरियन ब्युटी मार्केटमध्ये खास प्रॉडक्ट तयार केले आहेत. ते स्किन बॅरियर्ससाठी एक वरदानच असल्याचं त्यांनी सांगितलं.

महत्त्वाचे म्हणजे के-ब्युटी हे ‘त्वचा बदलून टाकण्याचे’ नव्हे, तर ‘त्वचा समजून घेण्याचे’ विज्ञान शिकवते. डर्मेटॉलॉजिकल दृष्टिकोनातून पाहता, कोणतीही स्किनकेअर पद्धत यशस्वी ठरते ती सातत्य, संयम आणि योग्य निवड यावर. त्यामुळे के-ब्युटी भारतीय त्वचेसाठी निषिद्ध नाही, पण ती डर्मेटॉलॉजिस्टच्या मार्गदर्शनासह, वैयक्तिक त्वचा प्रकारानुसार वापरली गेली पाहिजे.

ज्या देशाने दीर्घकाळ रंगभेदाच्या समस्येशी झुंज दिली आहे, त्या देशासाठी कोरियन ब्युटीचे तत्त्वज्ञान एक महत्त्वाचा बदल दर्शवते. ‘परफेक्ट’ त्वचेपेक्षा ‘निरोगी’ त्वचेला त्यात प्राधान्य दिले जाते. गोरेपणापेक्षा त्वचेचा संरक्षणात्मक थर मजबूत करणे, पुरेसे हायड्रेशन, सन प्रोटेक्शन आणि एकूण त्वचा आरोग्य यांवर के-ब्युटीचा भर असतो. हा दृष्टिकोन सौंदर्याची व्याख्या काळजी, सातत्य आणि आरोग्याशी जोडतो. पूर्वीच्या पिढीवर वर्चस्व गाजवणाऱ्या गोरेपणाच्या मोहापासून आजची तरुणाई हळूहळू दूर जाते आहे. त्याऐवजी ती नैसर्गिक ग्लो आणि त्वचेच्या आरोग्यावर भर देणाऱ्या कोरियन तत्त्वज्ञानाचा स्वीकार करताना दिसते. आणि म्हणूनच के-ब्युटीचा स्वीकार हा दशकानुदशके रुजलेल्या समस्यात्मक सौंदर्य संदेशांविरुद्ध ही एक मृदू पण ठाम बंडखोरी आहे.