कधीकधी एखाद्या छोटय़ाशा हॉटेलमध्ये किंवा ठेल्यावर जिभेला रिझवणारा असा पदार्थ मिळतो की, दिवसाचं सोनं झाल्यासारखं वाटतं. ग्रँटरोडच्या नाना चौकातल्या हिंदू विश्रांतीगृहात मिळणारी पोळा मिसळ खाल्ल्यानंतर खाबू मोशायला नेमकं असंच वाटलं. १९४५पासून हे हिंदू विश्रांतीगृह पोळा उसळ व पोळा मिसळ यांच्या आधारावर नाना चौकात आपला तळ ठोकून भक्कम उभं आहे..
एकेकाळी मुंबईची स्वत:ची अशी खाद्यसंस्कृती होती. चौपाटीवरची भेळ आणि इराण्याकडला चहा याच्याही पलीकडे पोहोचणारी! त्या वेळी मुंबईदेखील कुलाब्याच्या दांडीला सुरू होऊन शिव-माहीम येथे संपणारी होती म्हणा. पण त्या मुंबईत वेगवेगळे पदार्थ हमखास त्या त्या भागातच मिळायचे. या काळात मुंबईच्या खवय्यांच्या पसंतीला उतरलेला पदार्थ म्हणजे पोळा उसळ! गिरगाव ते दादर फक्त एवढय़ाच भागात निवडक उपाहारगृहांमध्ये किंवा आरोग्यभुवनांमध्ये मिळणाऱ्या या पदार्थाने मुंबईच्या अठरापगड खाद्यसंस्कृतीतही आपली अशी वेगळी ओळख निर्माण केली होती. तो काळ होता दुसऱ्या महायुद्धाचा!
महायुद्धानंतर मुंबईतले जगण्याचे संदर्भ बदलले. या महानगरीनंही आपले हातपाय पसरायला सुरुवात केली आणि मुंबईची हद्द थेट ठाण्याच्या खाडीला जाऊन भिडली. या पसरापसरीत मुंबईतील ही खाद्यसंस्कृतीही नामशेष होण्याच्या वाटेवर आली. एकेकाळी इराणी हॉटेलांसाठी प्रसिद्ध असलेल्या मुंबईतली इराणी हॉटेलं एक एक करून बंद पडू लागली. आरोग्यभुवनांनी आपला आब सांभाळला, तरी त्यांनाही आपल्या पारंपरिक पदार्थामध्ये बदल करून पावभाजी, पिझ्झा वगैरे पदार्थाचा आधार घ्यावा लागला. या घसरणीत पोळा उसळ नावाचा पदार्थही या आरोग्यभुवनांतून आणि उपाहारगृहांतून हद्दपार झाला. पण प्रलयातील पिंपळपानावर तरलेल्या छोटय़ा विश्वाप्रमाणे ग्रँटरोडच्या नाना चौकातील हिंदू विश्रांतीगृह नावाच्या एका उपाहारगृहात हा पदार्थ अजूनही तरून असल्याचं खाबूमोशायला समजलं.
खरं तर खाबूमोशाय ‘हिंदू हॉटेल’, ‘आरोग्यभुवन’ वगैरेंपासून थोडं लांबच राहतो. पण पोळा उसळ या पदार्थाची मोहिनीच एवढी जबरदस्त होती की, खाबूमोशाय मुकाटय़ाने ग्रँटरोड स्टेशनवर उतरता झाला आणि नाना चौकाची वाट चालू लागला. नाना चौकात उभारलेल्या पादचारी पुलाखालीच एके ठिकाणी हिंदू विश्रांतीगृह ही पाटी दिसली आणि त्या छोटय़ा हॉटेलमध्ये खाबूमोशाय शिरला. या हॉटेलमध्ये शिरल्यानंतर फक्त पोळा उसळच नाही, तर पोळा मिसळ नावाचा अभूतपूर्व पदार्थही इथे मिळतो, ही माहिती मिळाली. खाबूमोशायने लगेच पोळा मिसळ मागवली.
वाटाण्याची झणझणीत उसळ, त्यावर खास तयार केलेलं मक्याचं फरसाण, बारीक चिरलेला कांदा आणि कोणत्याही पदार्थाला वेगळीच चव देणारं लिंबू या नेहमीच्या ऐवजासह मस्त त्रिकोणी घडी केलेला पोळा टेबलावर आला आणि त्याच्या नुसत्या वासानेच खाबूमोशायच्या चित्तवृत्ती प्रफुल्लित जाहल्या! हा पोळा फक्त तांदळाच्या पिठाचा करत नाहीत. तर तांदळाच्या पिठात थोडं बेसन, थोडासा रवा आणि अगदी किंचितसा मैदा टाकून पोळ्याचं मिश्रण तयार केलं जातं. हा पदार्थ शोधला तो १९४५च्या आसपास कर्नाटकातून मुंबईत आलेल्या शेषगिरी पै यांनी. हे त्यांचंच हॉटेल. सध्या त्यांची मुलं रामदास आणि गोपाळकृष्ण पै हॉटेल सांभाळतात.
इतर ठिकाणी मिसळ आणि पाव किंवा उसळ आणि पाव खाण्याची प्रथा आहे. पण एकेकाळी मुंबईत मिसळ आणि उसळ यांच्याबरोबर पोळा मिळायचा. आमचे वडील स्वत: तस्साच पोळा करायचे, असे गोपाळकृष्ण पै यांनी सांगितले. पूर्वी गॅस शेगडी पोहोचायच्या आधी साध्या शेगडीवर उसळ आणि पोळा तयार होत. त्याची लज्जत काही वेगळीच होती. पण १९८२-८३च्या सुमारास गॅस आला आणि तेव्हापासून हा पदार्थ गॅसवर तयार व्हायला लागला. शेगडीसमोर बसून पोळा तयार करताना आचाऱ्यांना धग लागायची. त्यामुळे आम्हालाही सकाळी ८ ते दुपारी १२ एवढाच वेळा हा पदार्थ देता यायचा. पण गॅस आल्यापासून हे बंधन दूर झाल्याचे ते म्हणाले.
पोळा मिसळ आणि पोळा उसळ हे दोन्ही प्रकार अद्भुत म्हणावे असेच आहेत. उसळीचा तिखटपणा पोळा थोडासा कमी करतो आणि या दोघांचं अद्वैत जिव्हेची तहान भागवतं. बरं, हे दोन पदार्थ फार महाग आहेत म्हणावेत, तर तसंही नाही. पोळा उसळ हा पदार्थ तर फक्त ३० रुपयांत खाता येतो. तर पोळा मिसळीसाठी ५५ रुपये मोजावे लागतात. पण या पदार्थाची लज्जत खरंच अवर्णनीय अशीच आहे.
हा पारंपरिक पदार्थ खाता खाता खाबूमोशायची नजर तिथे लावलेल्या मेन्यूकार्डावर गेली आणि खाबूमोशायच्या चाणाक्ष नजरेला अमेरिकन शेवपुरी अशी अक्षरे दिसली. हा काय बरे पदार्थ असावा, या कुतुहलापोटी लगेचच अमेरिकन शेवपुरी मागवली. ही शेवपुरी समोर आली आणि त्यात अमेरिकन ते काय, याचा शोध सुरू झाला. तेव्हा कळलं की, यातील पुरी ही एखाद्या चौकोनी बास्केटसारखी आहे. गोपाळकृष्ण पै यांना याबाबत विचारले असता, या पदार्थाचा उगम आपल्या घरात असल्याचे त्यांनी सांगितले. कॅनाबिसच्या छोटय़ा छोटय़ा बास्केट्समध्ये आपली मुलगी काहीबाही खाद्यपदार्थ कोंबून खाते. यावरूनच त्याच्याच पुऱ्या करण्याची संकल्पना सुचल्याचे ते म्हणाले. या पुऱ्या थोडय़ाशा तळून त्यात मस्त बुंदी, कांदा, बटाटा, चाट मसाला, सँडवीच मसाला, थोडं दही, चटण्या असं सगळं टाकून, त्यावर शेवेची पखरण करून हा पदार्थ आपल्यासमोर येतो. अमेरिकन असला, तरी हा पदार्थ फक्त ३५ रुपयांत मिळतो.
एका पारंपरिक पदार्थाच्या शोधात निघालेल्या खाबूमोशायला असा हटके पदार्थ खायला मिळाल्यावर खाबूमोशाय खूश झाला नसता तरच नवल आहे.



