आपल्या आवडत्या खाद्यपदार्थाचं कूळ आणि मूळ शोधायचा प्रयत्न.

आयुष्यात काही माणसांशी आपली भेट सहजच होत राहते. फार आटापिटा न करता आपल्या वेळेला, गरजेला काही मंडळी अगदी पटकन उपलब्ध होत असतात. अशा सदैव तत्पर, नेहमी मदतीला धावून येणाऱ्या आणि खूप सहज वावरणाऱ्या मंडळींना एखाद्या पदार्थाची उपमा द्यावीशी वाटली तर एकच पदार्थ मनात येतो, इडली. इडली भारतातल्या छोटय़ाशा गावापासून परदेशातल्या भारतीय उपाहारगृहांपर्यंत सर्वसंचारी आहे. तिचं हे सर्वत्र उपलब्ध असणं अतिपरिचयात अवज्ञा ठरत नाही हे विशेष. अनेक दशकं उपाहारगृहात इडली खाऊनही ‘काय परत तेच तेच’ असं न वाटता आपण पुन:पुन्हा तिच्याकडे वळतो यातच इडलीच्या यशाचं सार सामावलं आहे.

तामिळ शब्द इट्टू आणि अवी यापासून या शब्दाची निर्मिती झाली आहे. पसरवून वाफवणे अशा अर्थाने हा शब्द निर्माण झाला. इडलीच्या उत्पत्तीबद्दल आपल्याला डोळे मिटून खात्री असते. इडली दक्षिण भारताशिवाय कोणाची असूच शकत नाही असा आपल्याला ठाम विश्वास असतो, पण संशोधकांना मात्र तसे वाटत नाही. इडलीची निर्मिती सर्वप्रथम कुठे झाली याबद्दल अनेक प्रांतांचा विचार अभ्यासकांनी केलेला आहे. काही संशोधकांच्या मते अरबांमार्फत तांदळापासून बनवलेला गोलाकार असा आवडता एक पदार्थ होता. प्रत्यक्ष खाताना हे राइस बॉल थोडेसे दपटून नारळाच्या चटणीसोबत ते खात असा उल्लेख आहे. त्यामुळे अरबांकडील या पदार्थावर अधिक चांगले संस्कार करत इडली आकाराला आली, असे काहींचे म्हणणे आहे. तर अभ्यासक के.टी. आचार्य यांच्या मते इंडोनेशिया हे इडलीचं मूळ असावं. इंडोनेशियामध्ये आंबवून तयार केल्या जाणाऱ्या पदार्थाची दीर्घ परंपरा आहे. इंडोनेशियातील हिंदू राजांच्या राजवटीत अनेक आचारी भारतातून इंडोनेशियात गेले. त्यांच्यामार्फत इसवीसन ८०० ते १२००च्या दरम्यान इडली भारतात आली, असे आचार्याचे मत आहे. मात्र अन्य संशोधक हे म्हणणे फेटाळून लावतात.

इडलीशी आपले नाते जोडू पाहणारा अन्य प्रांत म्हणजे गुजरात. गुजराती इड्रा अर्थात वाफवलेला पांढरा ढोकळा. इडलीमधल्याच घटक पदार्थानी बनवला जातो. दहाव्या- अकराव्या शतकात अनेक रेशीम कारागीर गुजरातमधून दक्षिण भारतात गेले. तिथे त्यांनी आपली ही पाककृती नेली, असे काही संशोधकांना वाटते; पण चौकोनी इड्रा दक्षिण भारतात इडली म्हणून गोल झाला याचे ठाम पुरावे नाहीत.

आधुनिक काळात कन्नड साहित्यात इसवीसन ९२० मध्ये इडलीचा पहिला उल्लेख ‘इड्डलिगे’ असा आढळतो. चामुंडराय दुसरा याने ‘लोकोपकारा’ या ग्रंथात उडीद डाळ ताकात बुडवून, वाटून त्यात दहय़ाचे पाणी मिसळून करायच्या पदार्थाचा उल्लेख केला आहे. बाराव्या शतकातील मानसोल्लास ग्रंथात दिलेली पाककृती पाहा. उडीद डाळ स्वच्छ धुऊन उत्तम वाटून परातीत घ्यावी. चांगली मळून (फेसून) घ्यावी. तिला नंतर हात न लावता तशीच ठेवून द्यावी. हे पीठ आंबल्यावर वाटय़ांत घालून या वाटय़ा टोपलीत किंवा चाळणीत ठेवून वस्त्राच्या मध्याने झाकून उकडावे. खाली उतरल्यावर मिरपूड घालून हिंग व जिरे घातलेले गरम तूप घालावे. थंडगार व मऊसूत अशा या पदार्थाला सोमेश्वर राजाने ‘इडरिका’ म्हटले आहे.

एकूणच इडलीच्या कुळाचा शोध खूप व्यापक आहे. इडली मूळ कुठून आली या शोधात हाती नेमके काही गवसत नसले तरी इंडोनेशिया, अरब प्रांत वा गुजरात अशा सर्वच वाटा दक्षिण भारताकडे जातात हे नक्की. ती कोणत्याही प्रांतात तयार झाली असली तरी ती दक्षिण भारतात वाढली, मोठी झाली. आज भारतातल्या जवळपास सगळ्या उपाहारगृहांत इडली अनिवार्य आहे या अर्थाने पाहायचे झाल्यास इडली सर्व भारताची आहे.

दक्षिण भारतात खूप सारे वैविध्य दाखवत ही इडली मिरवते. इडलीच्या ४० हून अधिक पारंपरिक पाककृतींना शेजवान इडली, फ्राइड इडली, इडलीचिली अशा आधुनिक कृतींचीही साथ मिळालेली आहे. दाक्षिणात्य उपाहारगृहातून केळीच्या हिरव्यागार पानावर विराजमान होत येणारी इडली भारताच्या खाद्यसंस्कृतीशी नाळ जोडून ठेवते, तर सायकलच्या स्टँडवर भल्यामोठय़ा स्टीलच्या पातेल्यात इडली आणि चटणी घेऊन सायकलचा भोपू वाजवत इडली चटणी विकणारा लुंगीधारी अण्णा सर्वसामान्यांना अगदी स्वस्तात मस्त पोटभरीचा आनंद देतो.

रविवारची सकाळ उडिपी हॉटेलात गरमागरम इडली आणि कॉफीच्या संगतीत गप्पांचा फड जमवत व्यतीत करणारे अनेक दोस्तांचे कट्टे आपल्या डोळ्यांसमोर उभे असतात. सकाळचा परिपूर्ण नाश्ता, दुपारचे जेवण चुकल्यास खायचा पदार्थ आणि संध्याकाळच्या भुकेला शांत करणारा सात्त्विक पदार्थ अशा सर्वच रूपांत इडली शोभून दिसते. चटणी किंवा सांबार दोघांबरोबरचा तिचा घरोबा आपल्याला पसंत पडलेला आहे.

काही पदार्थ खाण्यासाठी बेत जमवावे लागतात. इडलीचे तसे नाही. घरच्या गृहिणीही अगदी सहज सकाळचा नाश्ता इडलीवर विसंबून ठेवू शकतात. हॉटेलमध्ये गेल्यावर आज काही तरी वेगळं खायचं हं! असे म्हणणारे आपण, पोटपण भरलं पाहिजे, खिशाला कात्रीही नको, तेलकट तर बिलकूल नको, अशा मनातल्या शंका आणि मेन्यू कार्डवरचे असंख्य पदार्थ चाचपडत शेवटी अगदी हक्काच्या स्टॉपवर येऊन थांबतो आणि हा स्टॉप बऱ्याचदा इडली चटणी सांबारचाच असतो.

इडली ही कुटुंबातली अशी आत्या, मावशी, काकू, मामी आहे जी नेहमी सगळ्यांच्या भल्याचा विचार करत आपल्या सगळ्या प्रसंगांत सोबत असते. त्यामुळेच हिरव्यागार केळीच्या पानावर आपला शुभ्र पांढरा रंग मिरवत, वाफाळत ती जेव्हा समोर येते तेव्हा मनात एकच विचार येतो.. जे जे सुंदर आणि शुभंकर पूर्णत्वाते नेणारी अशी ही शुभ्रा.