कोकण म्हटलं की डोळ्यांसमोर हिरव्यागार डोंगररांगा, समुद्रकिनारे, आंबा-काजूच्या बागा आणि पावसामुळे बहरलेली धरती उभी राहते. मात्र, या भूमीत अशाही आणखी काही निसर्गसंपन्न गोष्टी दडलेल्या आहेत, ज्याकडे आजवर फारसे कोणाचे लक्ष गेलेले नाही. त्यापैकीच एक म्हणजे ‘कातळसडे’. काळ्या दगडांच्या विस्तीर्ण पृष्ठभागावर पावसाळ्यात उमलणारी रानफुले, सूक्ष्म जैवविविधता, पाण्याचे नैसर्गिक साठे आणि हजारो वर्षांच्या भूगर्भीय इतिहासाची साक्ष देणारे हे कातळसडे म्हणजे निसर्गाचे एक वैभव आहे. मात्र, वाढते शहरीकरण, बेकायदेशीर उत्खनन आणि अज्ञान यामुळे या नैसर्गिक संपदेला धोका निर्माण होतो आहे. अशा वेळी काही पर्यावरणप्रेमी आणि पर्यावरण संवर्धनाची इच्छाशक्ती मनी बाळगलेल्या तरुणांनी पुढाकार घेत या कातळसड्यांच्या संवर्धनाची जबाबदारी स्वत:च्या खांद्यावर घेतली आहे. निसर्ग केवळ अनुभवण्याची गोष्ट नसून तो जपण्याची जबाबदारीही आपलीच आहे, हा संदेश ही तरुणाई आपल्या कृतीतून देते आहे.
कातळसडे म्हणजे सपाट दगडी पठार. कोकणातील अनेक गावांमध्ये पावसाळ्यात या कातळांवर नैसर्गिकरीत्या विविध प्रकारची रानफुले उमलतात. काही ठिकाणी लहान जलाशय तयार होतात, तर काही ठिकाणी दुर्मीळ वनस्पती आणि सूक्ष्म जीवसृष्टी आढळते. जैवविविधतेच्या दृष्टीने हे प्रदेश अत्यंत महत्त्वाचे मानले जातात. विशेष म्हणजे, या कातळसड्यांवर आढळणार्या अनेक वनस्पती या स्थानिक स्वरुपाच्या असतात. म्हणजे त्या जगात इतरत्र फारशा आढळत नाहीत. त्यामुळे या भागांचे संवर्धन करणे ही केवळ पर्यावरणीय नव्हे, तर वैज्ञानिक गरजही आहे. अनेकदा सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ प्रसारित झाल्यानंतर अनेक ठिकाणी पर्यटकांची गर्दी वाढू लागली. दुर्दैवाने अनेक जण निसर्गाचा आनंद घेण्याऐवजी तेथे प्लास्टिक, कचरा टाकणे, फुले तोडणे, वाहनांनी कातळांवर जाणे अशा घटना वाढताना दिसत आहेत. काही भागांत विकासकामे आणि खाणकामामुळे कातळांचे नैसर्गिक स्वरूपही बदलते आहे. एकदा ही परिसंस्था नष्ट झाली तर ती पुन्हा पूर्ववत होण्यासाठी अनेक वर्षे लागू शकतात. त्यामुळे संवर्धनाची गरज आज अधिक तीव्र झाली आहे.
कोकणातील याचबरोबर मुंबईत स्थायिक असलेले तरुण मुलांचे गट स्वयंस्फूर्तीने अनेक गावांमध्ये आज कातळसड्यांच्या संवर्धनासाठी काम करत आहेत. पावसाळ्यात फुलांच्या गालिच्यांनी नटणारे हे सडे उन्हाळ्यात रुक्ष दिसत असले, तरी तिथे अनेक दुर्मीळ प्रजातींचे अस्तित्व असते. याच दुर्लक्षित निसर्गवैभवाच्या संवर्धनासाठी रत्नागिरीमधील दापोली, मंडणगड आणि गुहागर परिसरात एका विशेष प्रकल्पाची सुरुवात करण्यात आली आहे. या मोहिमेत तज्ज्ञ तसेच स्थानिक तरुण निसर्गप्रेमींची अनुभवी टीम प्रत्यक्ष मैदानावर (फिल्ड वर्क) काम करते आहे.
या प्रकल्पाचा पाया अत्यंत भक्कम आहे. ‘कोकण दिपकाडी’ (दिपकाडी कोंकणेस) या अति-दुर्मीळ वनस्पतीचे यापूर्वी १७ वेगवेगळ्या सड्यांवर यशस्वीरित्या पुनरुज्जीवन (रिस्टोरेशन) करण्यात आले आहे. हे या संवर्धन पद्धतीचे यश दर्शवते. याच अनुभवाच्या जोरावर आता इतर दुर्मीळ प्रजातींच्या संरक्षणाचे काम मोठ्या स्तरावर हाती घेण्यात आले आहे.
खाणकाम, रस्ते विकास आणि वाढत्या नागरीकरणामुळे ६० टक्के सडे नष्ट झाले आहेत. हे नुकसान भरून काढण्यासाठी शास्त्रीय पद्धतीने संवर्धन क्षेत्रे तयार करणे, जमिनीची धूप थांबवणे आणि दुर्मीळ वनस्पतींचे त्यांच्या मूळ अधिवासात पुनरुज्जीवन करणे हा या टीमचा मुख्य उद्देश आहे. या कामात रत्नागिरी वनविभागाची मोलाची साथ आणि सहकार्य लाभत असून, प्रशासन व तज्ज्ञ यांच्या एकत्रित प्रयत्नांमुळे या मोहिमेला मोठे बळ मिळते आहे.
संवर्धनाचे कोणतेही कार्य स्थानिक समुदायाच्या सहभागाशिवाय यशस्वी होऊ शकणार नाही. मागच्या वर्षी आयोजित केलेल्या ‘दिपकाडी महोत्सवा’ला स्थानिकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला असून, आगामी काळात स्थानिक समुदायाला जोडण्यासाठी असे अधिक कार्यक्रम राबवले जाणार आहेत. सड्यांचे आरोग्य सुधारल्यास त्याचा थेट फायदा परिसराला होतो. जल पुनर्भरणासाठी सडे नैसर्गिक स्पंजसारखे कार्य करतात, ज्यामुळे पावसाचे पाणी जमिनीत मुरून विहिरींच्या पाणीपातळीत वाढ होते. नैसर्गिक सुरक्षा कवच असल्याने वनस्पती आणि मातीचे थर जमिनीची धूप रोखतात, ज्यामुळे सखल भागातील शेतजमिनींचे संरक्षण होते. सड्यावरील दुर्मीळ फुले किटकांना आश्रय देतात, ज्याचा फायदा शेजारील आंबा-काजू बागायतींच्या फळधारणेसाठी होतो.
कोकणातील बहुतांश कातळसडे खासगी मालकीचे आहेत. आज विकासाच्या नावाखाली खाणकाम किंवा बांधकामासाठी या जमिनींची विक्री होते आहे. या प्रकल्पाचा भाग असलेले तज्ज्ञ सांगतात की, केवळ अल्पकालीन आर्थिक फायद्यासाठी आपले हे नैसर्गिक वैभव विकू नका. खाणकाम किंवा बांधकामामुळे एकदा का हा कातळ नष्ट झाला, तर तो पुन्हा कधीही निर्माण करता येणार नाही. हे सडे आपल्या भविष्यातील पिढ्यांसाठी पाण्याचे आणि शुद्ध हवेचे स्रोत आहेत. याचबरोबर आपली जमीन, आपले वैभव आणि आपल्या मुलांचे भविष्य सुरक्षित ठेवण्यासाठी या संवर्धन मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहनही यावेळी करण्यात आले.
निसर्ग हा केवळ पर्यटनाचा विषय नाही; तो आपल्या अस्तित्वाचा आधार आहे. कातळसडे, जंगल, नद्या आणि जैवविविधता जपली तरच भविष्यातील पिढ्यांना समृद्ध पर्यावरण मिळेल. आज कोकणातील तसेच मुंबईतील काही तरुणांनी दाखवून दिले आहे की, इच्छाशक्ती असेल तर बदल घडवता येतो. मोबाईल आणि सोशल मीडियाच्या पलीकडे जाऊन त्यांनी मातीशी नातं जपलं आहे. त्यांच्या या कामातून इतर तरुणांनीही प्रेरणा घेण्याची गरज आहे. प्रत्येक गावात, शहरात असे युवक तयार झाले, तर पर्यावरण संवर्धन ही केवळ मोहीम न राहता जनचळवळ बनेल. निसर्गाचे हे दुर्लक्षित वैभव पुढील पिढ्यांसाठी टिकवून ठेवायचे असेल, तर आजच संवर्धनाची पावले उचलावी लागतील.
कातळसडे हे केवळ सौंदर्य नाही, तर यात पर्यावरणीय समृद्धी दडलेली आहे. या संपत्तीचे जतन करणे ही काळाची गरज आहे. महत्त्वाची बाब म्हणजे आजची तरुणाई ही जबाबदारी ओळखून पुढे येते आहे. निसर्ग वाचवायचा असेल तर फक्त चर्चा करून चालणार नाही, कृती आवश्यक आहे. ही कृती आज तरुणाई करताना दिसते आहे.
