फॅशन विश्वात सतत काही ना काही बदल होत असतात. सतत नवनवीन डिझायनर येत असतात, त्यांचे ब्रँडस येत असतात. कित्येक नवीन मुलं – मुली स्वत:च्या ब्रँडचं स्वप्न घेऊन या फॅशन क्षेत्रात उतरण्याचा पुरेपूर प्रयत्न करतात. त्यातले काहीजण लवकर मागे पडतात, त्यांना बॅकफूटवर यावं लागतं, मात्र काहीजण पुढे स्वत:च्या नावाला वलय मिळवून देतात, स्वत:चा ब्रँड तयार करतात. असेच काही डिझायनर्स हे कधी काळी लॅक्मे फॅशन वीकसारख्या स्टेजवरुन ‘जेन नेक्स्ट’ म्हणून पुढे आले आणि हळूहळू ब्रँड म्हणून ओळखले जायला लागले. या आठवड्यात पुन्हा एकदा लॅक्मे फॅशन वीक दणक्यात सुरू झाला आहे. त्या पार्श्वभूमीवर याच लॅक्मे फॅशन वीकच्या प्लॅटफॉर्मवर आपली ओळख निर्माण करणार्या जेन नेक्स्टमधील काही फॅशन डिझायनर्सविषयी जाणून घेण्याचा हा प्रयत्न…
२००९ मध्ये पहिल्यांदा रॅम्पवर मॉडेल्सनी हा ब्रँड आणला तो म्हणजे श्रुती संचेती. ब्रँड सुरू केल्यापासून एकाच वर्षात तिला लॅक्मे फॅशन वीकच्या रॅम्पवर डिझाईन्स सादर करण्याची संधी मिळाली. त्या संधीनंतर तिने पुन्हा मागे वळून पाहिलं नाही. एका फॅशन इ्स्टिटट्यूटमध्ये डिझाईन फॅकल्टी म्हणून काम करत असलेली श्रुती नागपूरसारख्या फॅशन विश्वातल्या घडामोडींपासून लांब असणार्या शहरात होती. स्वत:चा फॅशन ब्रँड सुरू करून त्याला एवढं मोठं करण्याचा विचारसुध्दा तिने स्वप्नात कधी आणला नव्हता. मात्र, लॅक्मे फॅशन वीकच्या रॅम्पवर आल्यानंतर तिने आपल्या कलेक्शनला अजून जास्त मोठं करायला सुरुवात केली. तिच्याच नावाचा असलेला ‘श्रुती संचेती’ हा ब्रँड तिने २००९ ते आता २०२६ इतक्या काळात मोठा केला आहे. तिच्या ब्रँडने भारतीय ट्रॅडिशनल कपड्यांच्या ठरावीक चौकटी मोडून नव्याने त्याला ओळख द्यायला सुरुवात केली. आता तिचा ब्रँड हा एक बेंचमार्क म्हणून ओळखला जातो. कधीकाळी या भविष्याची कल्पनाही न केलेली मुलगी आता झगमगत्या फॅशन विश्वात पाय रोवून उभी आहे.
यावर्षी लॅक्मे फॅशन वीकमध्ये आपली डिझाईन्स प्रेझेंट करणारी आयशा राव ही सुद्धा अगदी नव्या फळीतली डिझायनर आहे. २०१८ मध्ये तिने स्वत:च्या नावाचं लेबल सुरू केलं. लक्झरी वेअरला नव्या दृष्टिकोनातून बघण्यासाठी सुरू केलेलं हे लेबल आता जगभर प्रवास करतं आहे. फॅब्रिक वेस्टपासून ते ॲप्लिक वर्कला घेऊन तिची डिझाईन्स सादर करण्यात स्पेशालिटी आहे. मुळात कायद्याचं शिक्षण घेऊन लॉमध्ये करियर करू पाहणार्या आयशाने न्यू यॉर्क मधून ‘स्यूईंग अँड गारमेन्ट कन्स्ट्रक्शन’मध्ये डिग्री घेतली. निव्वळ आवड म्हणून मोठा करियर स्विच करून फॅशन क्षेत्रात आलेल्या आयशा राव हिच्या लेबलने त्याच फॅशन जगतावर आपली छाप सोडायला सुरुवात केली आहे.
२०१० मध्ये आणखी एक लेबल नावारुपाला आलं ते होतं ‘रितिका मिरचंदानी’ हिचं… ती सुद्धा लॅक्मे फॅशन वीकमध्ये वारंवार आपलं कलेक्शन सादर करणारी डिझायनर आहे. लेबल सुरू केल्यानंतर २०१३ आणि २०१४ मध्ये पहिल्यांदा तिला तिचं कलेक्शन लॅक्मे फॅशन वीकच्या रॅम्पवर आणण्याची संधी मिळाली. त्या संधी नंतर तिचं नाव मोठ्या प्रकाशझोतात आलं. कॅलिफोर्नियामध्ये फॅशनचं शिक्षण घेतलेल्या रितिकाने मोठमोठ्या ब्रँडसमध्ये इंटर्नशिप करून नंतर भारतात स्वत:चा ब्रँड सुरू केला. तिच्या ब्रँडची खासियत म्हणजे भारतीय कपड्यांना तिने नवीन अँगल दिला, नवीन वेअरेबिलिटी दिली. बेल्टेड जॅकेट्स, लहंगा, शरारा, प्री – प्लीटेड साड्या हे तिच्या ब्रँडचं मुख्य वैशिष्ट्य ठरलं आहे. भारतीय असणार्या टिपिकल आऊटफिट्सनाच तिने नवीन आयाम दिला आहे.
अंजली मेहताने सुरू केलेलं ५ी१ंल्लिंँ हे लेबल लॅक्मे फॅशन वीकच्या शोजमध्ये पहिल्यांदा २०१७ मध्ये दिसलं आणि त्यानंतर सस्टेनेबल लक्झरी फॅशनमध्ये या ब्रँडने आपली ओळख निर्माण करायला सुरुवात केली. इतर अनेक जेन जेक्स्ट डिझायनर्स हे वेगवेगळे प्रयोग आपल्या कलेक्शन्समध्ये करत राहिले, मात्र अंजलीच्या लेबलने प्रयोगापेक्षा सस्टेनेबिलिटीकडे अधिक लक्ष दिलं. रिसॉर्ट वेअर ज्यात कोणी सस्टेनेबिलिटीचा विचारच केला नव्हता, अशा सेगमेन्टमध्ये त्यांनी आपली डिझाईन्स करायला सुरुवात केली.
असे अनेक ब्रँडस आणि लेबल्स आहेत, ज्यांना लॅक्मे फॅशन वीकच्या रॅम्पवर पहिल्यांदा संधी मिळाली आणि त्यातून त्यांनी आपलं नाव निर्माण केलं, मोठं केलं आणि आज त्या नावाला फॅशन विश्वात मोठं वलय लाभलं आहे. एक छोटीशी संधी जी प्रत्येकालाच हवी असते ती या आणि अशा अनेक डिझायनर्सना लॅक्मे फॅशन वीकने दिली.
viva@expressindia.com
