कोणतेही मोठे कार्य करण्यासाठी शिक्षण किंवा पदवी आवश्यक असतेच असे नाही. त्यासाठी लागते ती जिद्द, प्रामाणिक प्रयत्न आणि ध्येयाची तळमळ. अशाच एका ध्यासाने जवळजवळ दोन दशकं निसर्ग संरक्षणासाठी स्वतःला समर्पित करणारे नायक म्हणजे लालासाहेब माने. कोल्हापुरातील एका छोट्याशा खेड्यात जन्मलेले लालासाहेब माने लहानपणापासूनच जंगलात वाढले. लालासाहेबांचे वडील वन विभागात अल्प मजुरीवर काम करत होते, घरात तीन मुलं आणि आर्थिक परिस्थिती बेतास बात. त्यामुळे शाळा आणि अभ्यासात रमण्याच्या वयात जंगलात काम करणं त्यांच्या नशिबात आलं. शाळेत जाणं दूर राहिलंच, पण अगदी नकळत्या वयात शाळेशी असलेलं त्यांचं नातंही संपुष्टात आलं. शाळेत शिक्षकांचा मार बसला आणि तिथून ते कधीच शाळेत परतले नाहीत, असं त्यांनी सांगितलं. मात्र, त्या प्रसंगाने त्यांच्या आयुष्याला कलाटणी मिळाली, खडतर असा त्य़ांच्या आयुष्याचा प्रवास तिथून सुरू झाला.काही वर्षे उलटल्यानंतर गावाकडच्या छोट्या शेतीत कष्ट करीत असताना पुण्याजवळील पानशेत येथील एका फार्महाऊसची देखभाल करण्याची संधी त्यांना मिळाली. काही तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली लालासाहेबांनी फार्महाऊसमध्ये पन्नासहून अधिक वृक्षांचे रोपण करत तिथला सगळा परिसर हिरवागार केला. जंगलाबद्दलचं त्यांचं ज्ञान हे असं अनुभवातून विस्तारत गेलं. जंगलात कोणकोणती झाडं असतात, त्यांचं महत्त्व, त्यांचं बीजारोपण कशा पद्धतीने करायचं, रोपं कशी वाढवायची, त्यांची काळजी कशी घ्यायची या सगळ्याबद्दलचं ज्ञान त्यांनी प्रत्यक्ष कामातून आत्मसात केलं. त्यानंतर लालासाहेब ‘देवराई’ संस्थेत सामील झाले आणि या संस्थेच्या कामातूनच निसर्गरक्षणाच्या ध्येयाच्या दृष्टीने त्यांचा प्रवास सुरू झाला.
लालासाहेबांचं निसर्गाशी लहानपणापासून असलेलं नातं प्रत्यक्ष निसर्गसंवर्धनाच्या दृष्टीने त्यांनी सुरू केलेल्या कामातून अधिकाधिक दृढ होत गेलं. निगडीतील स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळाच्या ‘हरित घोरावडेश्वर’ प्रकल्पात सहभागी झाल्यावर लालासाहेबांनी शेकडो रोपं स्वतः लावली. डोंगरावर कावडीने पाणी वाहून नेणं, उन्हाळ्यात वणव्यांशी झुंज देणं, पाण्यासाठी पाइपलाइन टाकणं अशी कामे त्यांनी मनापासून केली. त्यांनी घेतलेल्या या अपार कष्टांनी ओसाड डोंगरावर सुमारे १० हजारहून अधिक झाडं डौलाने उभी राहिली. अवघा डोंगर हिरवागार झाला. एकीकडे झाडं लावत, झाडं वाढवत वनराई उभी करण्याचं काम सुरू असताना, सह्याद्रीभर फिरत लालासाहेबांनी दुर्मीळ होत चाललेल्या देशी वनस्पतींची बीजं गोळा केली. आज त्यांच्या रोपवाटिकेत शंभरहून अधिक वृक्षप्रजातींचे बी – बियाणे उपलब्ध आहेत. पन्नासपेक्षा अधिक दुर्मीळ रोपं त्यांच्या रोपवाटिकेत तयार केली जात आहेत. ही रोपं ते शेतकऱ्यांना मोफत उपलब्ध करून देतात आणि त्यांच्याच जमिनीवर लागवड करवून घेतात. साहजिकच वनसंवर्धनाचा हा वसा आपोआपच अनेक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचला आहे.
एकीकडे जंगल वाढवणं आणि राखणं हे महत्त्वाचं काम त्यांनी हाती घेतलं आणि ते वाढवतही नेलं. तर दुसरीकडे पवना नदीच्या उगमस्थानी गोमुख बांधण्याची त्यांची कल्पनाही त्यांनी प्रत्यक्षात उतरवली. आजही पवनामाई त्यांच्या हातांनी तयार केलेल्या गोमुखातूनच परिसराला जीवन देते आहे. लालासाहेब माने यांनी इतर उपक्रमातदेखील सक्रिय सहभाग घेतला. यामध्ये प्लास्टिकमुक्ती मोहीम, गृहसंकुलातील कचरा वर्गीकरण, खत प्रकल्प, रेनवॉटर हार्वेस्टिंग, जलदिंडी, नदी स्वच्छता अभियान, पाणी फाउंडेशन आणि नाम फाउंडेशन अशा संस्थांबरोबरही त्यांनी काम केले आहे. त्यांच्या या अथक परिश्रमातून उभ्या राहिलेल्या निसर्गसंवर्धनाच्या कार्यासाठी त्यांचा ‘पवनामाई जलमित्र’सह अनेक संस्थांनी सन्मान केला आहे. नाना पाटेकर, मकरंद अनासपुरे, सयाजी शिंदे यांसारख्या कलाकारांनीही त्यांच्या कामाचं कौतुक केलं आहे.
अत्यंत मितभाषी आणि कायम जमिनीशी जोडलेलं असं लालासाहेब माने यांचं व्यक्तिमत्त्व. त्यांना कुठलाही प्रश्न विचारला तर ते मनापासून उत्तर देतात आणि एखाद्या विषयावर त्यांना माहिती नसेल तर ते तसं स्पष्ट सांगतात. त्यांचं ज्ञान हे पुस्तकांतून आलेलं नाही, अभ्यास आणि शिक्षणातून आलेलं नाही. तर प्रत्यक्षात मातीत राबताना, जंगलाला लागणारे वणवे विझवताना मिळालेल्या अनुभवातून त्यांनी निसर्गाविषयीचं ज्ञान मिळवलं आहे. पाण्याच्या थेंबात वाढलेलं, झाडांच्या सावलीत विसावून पुढे जाणारं असं त्यांचं ज्ञान अनेकांना निसर्गसंवर्धनासाठी प्रत्यक्ष कार्य़ करण्याच्या दृष्टीने प्रेरणा देतं. कुठल्याही प्रकारे शिक्षण नाही, पदवी नाही म्हणून रडत बसण्यापेक्षा एका चांगल्या उद्देशाने, ध्येयाने झपाटून जाऊन काम करत राहिलं तर आयुष्य बदलता येतं. ते घडवता येतं आणि इतरांनाही निसर्गसंवर्धनाच्या चांगल्या कामात सहभागी करून घेत त्यांच्या मनातही निसर्गप्रेम जागवणं शक्य आहे, हे लालासाहेब माने यांनी त्यांच्या कामातून सिद्ध केलं आहे.
