scorecardresearch

स्टार ब्रॅण्ड

भारतीय क्रिकेट टीमचा कर्णधार विराट कोहलीनेही एका क्लोदिंग कंपनीसोबत स्वत:चा ब्रॅण्ड सुरू केला.

स्टार ब्रॅण्ड
(संग्रहित छायाचित्र)

तरुणांच्या प्रत्येक गोष्टीवर अनेकदा त्यांच्या आवडत्या अभिनेता-अभिनेत्री किंवा कोणत्याही सेलिब्रिटीचा प्रभाव असतो. तो प्रभाव त्यांच्या रोजच्या जीवनात सहज दिसतो. त्याचप्रमाणे त्यांच्या स्टाईलवर, कपडय़ांवर तर तो प्रभाव प्रामुख्याने दिसतो. फॅशनच्या बाबतीत सेलिब्रिटींना अगदी डोळे झाकून फॉलो केलं जातं. म्हणूनच अनेक मोठे ब्रॅण्ड त्यांचा बिझनेस वाढावा, प्रसिद्धी मिळावी म्हणून सेलिब्रिटींना त्यांच्या ब्रॅण्डचे प्रमुख बनवतात. पण तरुणाईवरचा आपला प्रभाव आणि मार्केटची गणितं पाहता खुद्द सेलिब्रिटींनीच स्वत:चे ब्रॅण्ड सुरू केले आहेत. आणि ऑनलाइन बाजारातून त्यांच्या ब्रॅण्ड्सचे कपडे सहज सामान्यांपर्यंत पोहोचतायेत. त्यामुळे कधी काळी मोठमोठय़ा अभिनेत्री कार्यक्रमांमधून, पुरस्कार सोहळ्यांमधून किंवा एरवीही जे ड्रेस घालून मिरवतात ते ड्रेस अगदी परवडतील अशा किमतीत या सेलिब्रिटी ब्रॅण्ड बाजारात उपलब्ध होऊ लागले आहेत.

एक तर सेलिब्रिटींचा स्वत:चा ब्रॅण्ड असला की ऑनलाइन कंपन्यांनाही त्यांच्या जाहिरातीसाठी, मार्केटिंगसाठी जास्त मेहनत घ्यावी लागत नाही. फेसबुक, इन्स्टाग्राम अशा सोशल साईटचा वापर करून सेलिब्रिटी स्वत: ग्राहकांशी कनेक्ट होतात. साहजिकच जास्तीत जास्त लोक कमीत कमी वेळात ब्रॅण्डशी जोडले जातात आणि त्यामुळेच सेलिब्रिटींनी सुरू केलेले हे ब्रॅण्ड्स बाजारात चांगलेच यशस्वी ठरले आहेत. अनेकदा आपण सेलिब्रिटींनी अमुक अमुक डिझायनरचे कपडे घातले आहेत अशा पोस्ट करताना बघतो, पण हल्ली ते अनेकदा स्वत:च्याच ब्रॅण्ड्सचे कपडे वापरताना दिसतात. बॉलीवूडच्या कलाकारांनी सुरू केलेले आणि सध्या तरुणाईत चांगलेच लोकप्रिय ठरलेल्या ब्रॅण्ड्सवर थोडी नजर टाकूयात..

कपूर बहिणींचा ‘रीझन’

सोनम कपूर म्हणजे स्टाईल, फॅशनची नॅशनल-इंटरनॅशनल दिवा आहे. तिने काही घातलं आणि त्याची चर्चा झाली नाही असं कधीही होत नाही. तिने तिच्या बहिणीच्या साथीने ‘रीझन’ या ब्रॅण्डची सुरुवात केली. हा ब्रॅण्ड म्हणजे हाय स्ट्रीट फॅशनचं उत्तम उदाहरण आहे आणि याच्या किमतीही सर्वसामान्यांना परवडतील अशा आहेत. या कलेक्शनमध्ये तुम्हाला ८०च्या दशकातील फॅशनपासून ते आताच्या ट्रेंडपर्यंत सगळे कपडे उपलब्ध आहेत. या ब्रॅण्डअंतर्गत तुम्हाला फक्त क्लोदिंगचेच नाही तर ट्रेंडी अ‍ॅक्सेसरीजचे पर्यायही बघायला मिळतात. कपूर बहिणींचा हा ब्रॅण्ड अनेक मोठय़ा ऑनलाइन शॉपिंग साईटवरती लोकप्रिय आहे.

विराटचा ‘रॉंग’

भारतीय क्रिकेट टीमचा कर्णधार विराट कोहलीनेही एका क्लोदिंग कंपनीसोबत स्वत:चा ब्रॅण्ड सुरू केला. विराट हा अनेकांसाठी फॅशन आयकॉन आहे. त्याच्यासारखी स्टाईल, कपडे घालावे असं अनेक तरुणांच्या मनात असतं. त्याच्यासारखे फॅशनेबल, ट्रेंडी कपडे त्याच्या ब्रॅण्डअंतर्गत उपलब्ध आहेत. ज्यात ग्राफिक टी-शर्ट, बॅन्ड कॉलर शर्ट, डेनिम जॅकेट्स, चीनोज आणि जीन्स असं सगळंच आहे आणि हे कलेक्शन अनेक फॅशन शॉपिंग साईटवर सहज उपलब्ध आहे.

अनुष्का शर्माचा ‘नुश’

मॉडेल, अभिनेत्री, निर्माती अशी ओळख असणारी अभिनेत्री म्हणजे अनुष्का शर्मा. अनुष्काने घातलेल्या कपडय़ांना अनेकजण फॉलो करतात. सिम्पल, कम्फर्ट अशी तिची ड्रेसिंग स्टाईल तिच्या ब्रॅण्डमध्येही दिसून येते. वनपीस, वेस्टर्न टॉप, टी-शर्ट, जम्पसूट, जीन्स, स्कर्ट, जॅकेट्स असे सगळे रोजच्या वापरात येतील असे कपडे या ब्रॅण्डअंतर्गत उपलब्ध आहेत.

‘ऑल अबाउट यू’ दीपिका पदुकोण

दीपिकाने घातलेल्या ड्रेसची चर्चा तर नेहमीच होते. तिची ऑन आणि ऑफस्क्रीन स्टाईल सगळ्यांनाच आवडते. म्हणूनच दीपिकाने एका फ्रेंच डिझाइन एजन्सीबरोबर हातमिळवणी करत स्वत:चा ‘ऑल अबाउट यू’ नावाचा ब्रॅण्ड सुरू केला आहे. या ब्रॅण्डच्या कलेक्शनमध्ये असणारे कपडे हे कित्येकदा दीपिका पार्टी-सोहळ्यांमधून परिधान करताना दिसते. त्यामुळे दीपिकाची फॅशन फॉलो करण्याचा तेही अगदी दोन हजारांपासून पुढे इतक्या स्वस्त दरात करण्याचा भलताच आनंद तिच्या चाहत्यांना मिळतो आहे. या कलेक्शनमध्ये तुम्हाला इंडियन ड्रेस, वेस्टर्न टॉप, जीन्स, वनपीस, गाऊ न असे सगळेच प्रकार उपलब्ध आहेत.

‘एचआरएक्स’ बाय हृतिक रोशन

बॉलीवूडचा जादू, नंबर वन डान्सर हृतिक रोशननेही साधारणपणे २०१२ साली त्याचा स्वत:चा ‘एचआरएक्स’ नावाचा क्लोदिंग ब्रॅण्ड सुरू केला. फिटनेस आणि स्पोर्ट्ससाठी सुरू केलेला हा ब्रॅण्ड २०१३ साली पहिल्यांदा ऑनलाइन शॉपिंग साईट ‘मिन्त्रा’वरती आला. आणि त्यानंतर अनेक मोठय़ा ऑनलाइन शॉपिंग साईटवर हा ब्रॅण्ड झळकू लागला. हा ब्रॅण्ड फक्त क्लोदिंगपुरता मर्यादित राहिलेला नाही. तर या ब्रॅण्डअंतर्गत अ‍ॅक्सेसरीज, परफ्युम्स, बॅग्ज अशा अनेक गोष्टी उपलब्ध आहेत. लाईट वेट कपडे, फ्रेश रंग ही या ब्रॅण्डच्या क्लोदिंग लाइनची खासियत आहे. हृतिकने स्वत: या ब्रॅण्डसाठी निर्मितीपासून जाहिरातीत लक्ष घातलेच, मात्र तरुणाईचा कल कुठे आहे याचा अंदाज घेत मार्केटिंगचे धोरण बदलण्यावरही त्याचा भर राहिला आहे. दोन-तीन वर्षांपूर्वी त्याने खास तरुणांना टार्गेट करण्यासाठी फिटनेस फ्रिक असणाऱ्या टायगर श्रॉफला एचआरएक्सचा ब्रॅण्ड अ‍ॅम्बेसेडर बनवले होते.

क्रिती सननची ‘मिस टेकन’ स्टाईल

क्रिती सनन ही त्यामानाने नव्याने आलेल्या अभिनेत्रींमधली असली तरी फॅशनच्या बाबतीत तिने फार लवकर पुढचे पाऊल उचलले आहे. दीपिकाप्रमाणेच उंची असलेल्या क्रितीची स्टाईल स्टेटमेंट वेगळी आहे. त्यामुळे नुकताच आलेला तिचा ‘मिस टेकन’ हा ब्रॅण्डही हळूहळू लोकप्रिय होतो आहे.

शाहीदचा स्कल्ट (SKULT)

बॉलीवूडचा चॉकलेट हिरो शाहीद अनेकदा ट्रेंडिंग फॅशन फॉलो करताना दिसतो. त्याची स्टाईल नेहमीच फॅशनेबल असते. अनेक मुलांचा तो फॅशन रोल मॉडेलसुद्धा आहे. म्हणूनच त्याने दोन वर्षांपूर्वी त्याचा ‘स्कल्ट’ नावाचा क्लोदिंग ब्रॅण्ड सुरू केला. हा ब्रॅण्ड म्हणजे हाय स्ट्रीट फॅशन, रोजच्या वापरासाठी, जिममध्ये किंवा व्यायाम करताना वापरण्यासाठीच्या कपडय़ांचा उत्तम पर्याय आहे. या ब्रॅण्डअंतर्गत तुम्हाला हुडी, ट्रक पॅन्टस, ओवर साईज टी-शर्ट, बॉम्बेर जॅकेट्स असं सगळं उपलब्ध आहे. शाहीदचा हा ब्रॅण्ड वेगवेगळ्या ऑनलाइन शॉपिंग साईट्सवरती सहज उपलब्ध आहे.

सचिनचा ‘ट्रू ब्लू’ 

क्रिकेटचा देव म्हणून ज्याची ओळख आहे अशा सचिन तेंडुलकरने दोन वर्षांपूर्वी त्याचा ‘ट्रू ब्लू’ नावाचा ब्रॅण्ड सुरू केला. टी-शर्ट, शर्ट, वेगवेगळ्या ओकेजननुसार कपडे, जीन्स, ट्राउजर, ब्लेझर, वेगवेगळ्या प्रकारचे टाय असं सगळं या ब्रॅण्डअंतर्गत उपलब्ध आहे.

‘वायडब्ल्यूसी फॅशन’ बाय युवराज सिंग

क्रिकेटच्या मैदानावर आणि खासगी जीवनातही फायटर म्हणून ओळखला जाणारा तरुण क्रिकेटर युवराज सिंगने ‘वायडब्ल्यूसी फॅशन’ नावाचा ब्रॅण्ड सुरू केला. शंतनू आणि निखिल या नामांकित फॅशन डिझायनरच्या सोबतीने त्याने २००६ साली हा ब्रॅण्ड सुरू केला. ‘वायडब्ल्यूसी’चा फुल फॉम म्हणजे यू वी कॅन असा आहे. या ब्रॅण्डअंतर्गत मेन्स, वूमन्स आणि किड्स अशा तिन्ही कॅटेगरीमध्ये कपडे आणि अ‍ॅक्सेसरीज उपलब्ध आहेत. ऑनलाइन आणि प्रत्यक्ष स्टोर अशा दोन्ही ठिकाणी तुम्ही हे कलेक्शन खरेदी करू शकता.

जॉन अब्राहम आणि ‘रँग्लर’

जॉन अब्राहमने ‘रँग्लर’ नावाच्या कंपनीबरोबर हातमिळवणी करून २०१६ साली स्वत:चा ब्रॅण्ड सुरू केला. रँग्लर हा जीन्सचा ब्रॅण्ड आहे; जो मेन्स आणि वुमेन्स अशा दोन्हीसाठी उपलब्ध आहे. जॉन अब्राहमकडे नेहमीच युथ आयकॉन, फिटनेस फ्रिक अभिनेता, मॉडेल म्हणून बघितलं जातं. अजूनही त्याचे अनेक चाहते आहेत, जे त्याला पदोपदी फॉलो करतात. आजच्या तरुणांना आवडतील असे जीन्सचे रंग, त्याला दिलेले डेनिम वॉश, स्टाईल ही या ब्रॅण्डची खासियत आहे.

शिल्पा शेट्टीच्या साडय़ा

शिल्पा शेट्टीसारख्या फिट अभिनेत्रीने २०१४ साली ‘एस.एस.के.’ साडी नावाचा स्वत:चा साडय़ांच्या ब्रॅण्ड सुरू केला. हा ब्रॅण्ड ‘होम शॉप १८’ या चॅनेलसोबत हातमिळवणी करत सुरू झाला. सध्या जास्त भरीव काम नसलेल्या, नक्षीकाम आणि ब्राईट रंग असलेल्या या साडय़ा प्रत्येक स्त्रीला नक्की आवडतील अशा आहेत.

याशिवाय, सलमान खानच्या ‘बीइंग ह्य़ुमन’ला विसरून कसं चालेल? सर्वसाधारण दुकानांमध्येही आता ‘बीइंग ह्युमन’ची नक्कल मिळू लागली आहे इतका हा ब्रॅण्ड  प्रसिद्ध झाला आहे.

मराठीतील सर्व लेख ( Lekhaa ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

संबंधित बातम्या