तेजल चांदगुडे

धावपळीच्या आणि धकाधकीच्या जीवनात जिथे स्वत:च्या खाण्याकडे लक्ष देता येत नाही तिथे ‘घरातील पाळीव प्राणी दोस्तांना दररोज गरमागरम अन्न शिजवून कसं खाऊ  घालायचं,’ हा अनेकांना पडणारा प्रश्न आहे. याच प्रश्नाचं उत्तर म्हणजे पाळीव प्राण्यांसाठी नव्याने नावारूपास येऊ  पाहणारी ‘डबा सेवा’. पाळीव प्राणी दोस्तांसाठी पर्वणी ठरलेल्या याच अनोख्या डबेवाल्यांची कहाणी आजच्या लेखात..

कुटुंब संस्कृती ही भारतीय संस्कृतीमधला एक महत्त्वाचा घटक आहे. माणसांनी भरलेलं घर, जपलेली नाती या गोष्टी तशा फार साधारण आहेत, मात्र हल्ली अनेक जण घरात पाळल्या जाणाऱ्या प्राण्यांना अगदी घरातील सदस्याचा दर्जा देतात. अलीकडे घरात प्राणी पाळणं हे बऱ्यापैकी सगळीकडेच दिसतं आहे. पण प्राणी पाळणं म्हणजे त्यांच्यावर केवळ माया करणं असं भासत असलं तरी हे प्रकरण वरकरणी दिसतं तितकं सोपं नाही. खरं तर एखाद्या बाळाप्रमाणे पाळीव प्राण्याची काळजी घ्यावी लागते आणि या काळजीत सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असतो तो म्हणजे त्यांचं ‘खाणं’.

शहरातील घरांमध्ये बघायला गेलं तर जवळजवळ सगळेच कामाला जात असल्याने घरातील पाळीव प्राण्यांची काळजी कोण घेणार, हा प्रश्न नेहमीच उद्भवतो. कित्येकदा घराबाहेर जाताना पाळीव प्राण्यांची खाण्यापिण्याची व्यवस्थित सोय करून ठेवली जाते. त्यांना त्या पद्धतीने व्यवस्थित शिकवले जाते, जेणेकरून घरात त्यांना एकटे सोडून गेल्यावर त्यांची गैरसोय होणार नाही. मात्र अशीही अनेक कुटुंबं आहेत ज्यांना आपल्या घरातील या सदस्यांना नेमकं खायला काय द्यावं हे कळत नाही किंवा कामाच्या गडबडीत त्यांच्यासाठी खाणं बनवणं शक्य होत नाही. मुंबईत किंवा शहरांमध्ये माणसांसाठी डबेवाले या अशा प्रश्नांची उत्तरं घेऊ न येतात, मात्र पाळीव प्राण्यांसाठी असे उपाय शोधणंही गरजेचं झालं आहे.

या समस्येचं उत्तर शोधलं आहे मुंबईतील वसिफ खान नावाच्या तरुणाने. साधारण २००२ साली ‘होम केअर’ नावाने त्याने पाळीव प्राण्यांसाठी घरपोच डबा पोहोचवण्याची सेवा सुरू केली. कुत्रा, मांजर किंवा तुमच्या घरात असलेल्या तत्सम पाळीव दोस्तांसाठी तुम्हाला हवं असलेलं, घरी शिजवलेलं अन्न घरपोच पोहोचवण्याचं काम वसिफने सुरू केलं. वसिफची ‘होम केअर डॉग फूड’ ही डबा सेवा मुंबईतील पहिली पाळीव प्राण्यांसाठीची सेवा मानली जाते. मुंबईतील अनेक सेलिब्रिटीजच्या घरीही इथून डबा सेवा पुरवली जाते. मात्र याच वर्षीपासून ही सेवा आता रिहान कुरेशी ‘पेट टिफिन सव्‍‌र्हिस’ नावाने पुरवत आहेत.

‘मी साधारण चार ते पाच वर्षांपासून वसिफसोबत पाळीव दोस्तांसाठी डबा सेवा देण्याचं काम करीत होतो. वसिफ परदेशात गेल्या कारणाने आता हे काम मी पाहतो. त्यासाठी आम्ही या सेवेचं नाव बदललं. खरं तर माणसं जे अन्न खातात त्यातच थोडेफार बदल करून आम्ही या प्राण्यांसाठी जेवण शिजवतो. दररोज सकाळी आम्ही अन्न तयार करून ते पॅकबंद पिशव्यांमधून घरोघरी पोहोचवतो. सूप, भात, शाकाहारी, मांसाहारी अशा सगळ्या स्वरूपातील अन्न आम्ही पुरवतो. कित्येकदा अनेक जण दोन ते तीन दिवसांचं जेवण घेतात. फ्रिजमध्ये हे अन्न उत्तम राहतं. त्यामुळे ज्यांना घरी अन्न शिजवता येत नाही त्यांच्या मदतीला आम्ही नेहमी सज्ज असतो’.

मुळात कुत्रा, मांजर किंवा दुसरा कोणताही प्राणी एकाच प्रजातीचा असेल असे नाही किंवा प्रत्येक प्रजातीला आणि वयोगटातील प्राण्यांना एकसारखं अन्न चालतं असंही नाही. त्यामुळे या गुणोत्तर प्रमाणाचा आणि विविधतेचा तिढा कसा सोडवता याबद्दल बोलताना रिहान सांगतात की, ‘आम्ही ज्यांना अन्न पुरवायचे आहे त्या प्राण्यांबद्दल माहिती विचारतो. प्राणी वयाने आणि आकारमानाने छोटे असतील तर जेवणाचं छोटं पॅकेट त्यांच्यासाठी पुरेसं होतं. आम्हाला त्या त्या पाळीव प्राण्यांचे मालकही त्यांना आपल्या प्राण्यांसाठी कोणत्या प्रकारचं अन्न हवं आहे याबद्दल सूचना देतात, मग आम्ही त्याप्रमाणे त्यांना जेवण पुरवतो’.

या डब्यांच्या किमती साधारण ५० ते १३० रुपयांपासून सुरू होतात. या सेवेची खासियत म्हणजे तुम्ही घरी नसतानाही तुमच्या लाडक्या पाळीव प्राण्यांना उत्तम गुणवत्तेचं घरगुती खाणं अगदी माफक दरात मिळतं.

पाळीव दोस्तांसाठीच्या या डबा सेवेचा सिलसिला खरं तर देशात अनेक ठिकाणी झाला आहे. शाकाहारी घरांमधून प्राण्यांना ताकद येण्यासाठी गरजेचा असणारा मांसाहार तितक्याशा प्रमाणात मिळत नाही. हाच विचार डोक्यात ठेवून भोपाळमधील प्रकाश वर्मा यांनी पाळीव दोस्तांना जेवण पुरवण्याची सेवा सुरू केली. मुळात ते स्वत: श्वानांची काळजी घेण्याचं काम करीत आणि तेव्हा ‘आमच्या प्राण्यांसाठी जर कोणी घरपोच डबा देत असेल तर कळवा’ या गरजेतून त्यांनी हे काम सुरू केलं आणि आज ते भोपाळमधील पाळीव दोस्तांना घरपोच घरगुती आणि उत्तम जेवण पुरवणारे एक ख्यातनाम हस्ती म्हणून प्रसिद्ध झाले आहेत.

पुण्यातही ‘पेट फिस्ट इंडिया’ या नावाने साधारण दोन वर्षांपूर्वी सोनल झलकीकर यांनी पाळीव दोस्तांसाठी घरपोच डबे देण्याची सेवा सुरू केली. त्यांच्या स्वत:च्या श्वानामुळे त्यांना ही प्रेरणा मिळाली. ‘मी माझ्या श्वानास कधी सुका खाऊ  तर कधी गरमागरम जेवण बनवून खाऊ  घालायचे, मात्र गरम गरम, घरात शिजवलेलं जेवण तो अधिक चवीने खायचा. मग याच विचारातून ज्यांना घरातील प्राण्यांना असंच घरगुती जेवण देण्याची इच्छा आहे, मात्र वेळ आणि त्याबद्दल पुरेशी माहिती नाही अशा अनेकांना मदत करण्यासाठी पेट फिस्ट इंडिया सुरू केलं’. पाळीव दोस्तांना नेमकं कशा प्रकारचं अन्न इथून पुरवलं जातं याबद्दल माहिती देताना सोनल यांनी सांगितलं की, ‘मी ही सेवा सुरू करण्यापूर्वी इंटरनेटवरून बरीच माहिती मिळवली आणि अनेक पाककृती शिकून घेतल्या. प्राण्यांच्या प्रजातीप्रमाणे त्यांच्या आहारात कोणत्या प्रमाणात किती अन्नघटक असले पाहिजेत याची शास्त्रशुद्ध माहिती डॉक्टरांकडून जाणून घेतली. आजही विविध प्रजातींसाठी अन्न पुरवताना त्यातील अन्नघटकांचे म्हणजेच प्रथिने, कबरेदके, जीवनसत्त्वे इत्यादींचे प्रमाण डॉक्टरांकडून संमती घेऊ न तयार केले जाते. श्वानांप्रमाणेच मांजरींसाठी मीठ, साखर नसलेले वेगवेगळ्या अन्नपदार्थाचे ‘केक’ जेवणासाठी पुरवले जातात. मांजर खाण्याच्या बाबतीत लहरी असल्याने मांजरींसाठी दररोज जेवण पुरवलंच जाईल असं निश्चित सांगता येत नाही, मात्र श्वानांसाठी दररोज मोठय़ा प्रमाणात जेवण पुरवलं जातं’.

या सेवांचा लाभ घेण्यासाठी सोशल मीडियाचा विशेषकरून फेसबुक आणि इन्स्टाग्रामचा वापर मोठय़ा प्रमाणात होतो आहे. एकंदरीत काय, तर आता तुम्हालाही जर तुमच्या घरातील प्राणी दोस्तांना घरगुती आणि त्यांच्या उत्तम तब्येतीसाठी पोषक अन्न अगदी घरपोच देणारे पाळीव दोस्तांचे डबेवाले मित्र सज्ज आहेत. मग, तुम्हीही आपल्या पाळीव दोस्तांसाठी या सेवांचा लाभ नक्की घेऊ न पाहा. बघा तुमच्या प्राणिमित्रांना हे डबे आवडतात का ते..!!