‘प्रँक’गिरी

प्रँक्सचं जाळं फार मोठं आणि विस्तारलेल्या स्वरूपात पाहायला मिळतं.

१ एप्रिल अगदी दोन दिवसांवर येऊन ठेपला आहे आणि त्या निमित्तानेच सगळ्यांनी या वर्षी आपल्या जवळच्यांना कशा प्रकारे एप्रिल फूलबनवायचं याचा विचार सुरू केला असेल. पण एप्रिल फूलचं हे गणित एका दिवसांत संपणारं राहिलेलं नाही, कारण सबंध र्वष एप्रिल फूल साजरं होईल याचे बेत आखणारी अशी एप्रिल फूलच्या यशस्वी उद्योगातूनच जन्माला आलेली एक संस्कृती आहे, तिचं नाव आहे प्रँक्स’. येत्या एप्रिल फूल डेच्या निमित्ताने जगभर धुमाकूळ घालत असलेल्या या प्रँक्सनावाच्या प्रकरणावर टाकलेला प्रकाशझोत..

लहान असताना १ एप्रिलच्या दिवशी ‘ते बघा मागे पाल आहे’, ‘ए, बघ तुझ्या मागे ‘अमुक अमुक’ प्राणी आलाय’, ‘तुझे केस कुठे आहेत’ इत्यादी गोष्टी सांगून किंवा काही तरी खोटं आणि मजेशीर सांगून लोकांना फसवण्यात आणि ‘एप्रिल फूल’ बनवण्यात आपल्याला गंमत वाटायची. मग आपण मोठे होत गेलो आणि ‘एप्रिल फूल’ नावाचं प्रकरण फक्त लहानपणीच्या आठवणींमध्ये रेंगाळत राहिलं. ३१ मार्च म्हणजे अनेक चाकरमानी मंडळींसाठी युद्धाचा दिवस आणि त्यानंतर लगोलग येणारा १ एप्रिल म्हणजे या ना त्या प्रकारे काही तरी टवाळक्या आणि गंमत करून लोकांना ‘एप्रिल फूल’ बनवून हसवण्याचा दिवस. खरं तर ‘एप्रिल फूल’ हा दिवस कधी आणि का सुरू झाला याचा इतिहास जगाच्या पाठीवर असणाऱ्या अनेक खंडांमध्ये वेगवेगळा ऐकू येतो, पण हा दिवस सगळ्यांच्याच चेहऱ्यावर ‘एप्रिल फूल’ म्हणत हसू उमटवतो हे नक्की. बरं या मजेमागचं महत्त्वाचं कारण म्हणजे लोकांना फसवण्यासाठी आणि गंमत करण्यासाठी अमलात आणल्या जाणाऱ्या पद्धती. या पद्धतींना नावं बरीच पण आजच्या पिढीमध्ये प्रचलित नाव म्हणजे ‘प्रँक’. आता हे प्रँक्सचं जाळं फार मोठं आणि विस्तारलेल्या स्वरूपात पाहायला मिळतं.

१ एप्रिलला आपण लोकांना ‘एप्रिल फूल’ बनवत असलो तरी लोकांवर प्रँक्सचा प्रयोग करण्यासाठी काळ वेळ गरजेची नाही. ते कुठेही, कधीही आणि कसेही करता येतात. कारण एखाद्याची गंमत करायला वेळेची नाही तर शकलेची गरज असते हे इतकं सोपं आहे. तर एखाद्यावर ‘प्रँक’ करण्याचे अनेक प्रकार आहेत. काही तरी नुस्के वापरून समोरच्याला आपल्या गोष्टीवर विश्वास ठेवायला लावायचा आणि मग समोरची व्यक्ती आपल्या या फसव्या खेळात गुंतत जाताना त्याची मजा घ्यायची, लक्ष नसताना एखाद्याच्या काळजाचा ठोका चुकेल अशा पद्धतीने घाबरवायचं किंवा आजूबाजूची चार माणसं त्याच्याकडे बघून हसतील अशा रीतीने त्याला गोत्यात आणायचं असे नानाविध प्रकार या संस्कृतीत मोडतात. दूरदर्शन प्रचलित नसताना आसपासच्या आणि कुटुंबातल्या लोकांबरोबर छोटय़ा-मोठय़ा प्रमाणात १ एप्रिलच्या दिवशी या प्रँकचा वापर होऊन धकाधकीच्या जीवनात आनंद लुटला जाई. मात्र लोकांची होणारी फजिती आणि त्यामुळे आसपासच्या लोकांमध्ये पिकणारं हसं लक्षात घेऊन याचा वापर दूरदर्शनवरच्या कार्यक्रमांमधून केला जाऊ  लागला. पाश्चिमात्य देशांनी जगात हे जाळं त्यांच्या टीव्हीवरच्या कार्यक्रमांतून आणखी पसरावण्याचं काम केलं.  ‘द टॉम ग्रीन शो’, ‘इमप्रॅक्टिकल जोकर्स’, ‘जस्ट फॉर लाफ्स : गॅग्स’ असे कार्यक्रम त्यामध्ये दाखवल्या जाणाऱ्या प्रँक्समुळे लोकांनी डोक्यावर उचलून धरले आणि केवळ पश्चिमेतच नाही तर भारतातही हे असे कार्यक्रम बघणारा एक वेगळा प्रेक्षकवर्ग निर्माण करण्यात यशस्वी ठरले. भारतात खऱ्या अर्थाने लोकांना हा प्रकार आवडायला लागला जेव्हा सायरस ब्रोचा रस्त्यावरच्या लोकांना ‘एम.टी.व्ही. बकरा’ बनवत फिरू लागला.

रस्त्यावर चालता चालता अचानक कोणी तरी मधे यावं आणि काही तरी गमतीदाररीत्या वेडंवाकडं करून आपल्याला बुचकळ्यात पाडावं आणि हे असं झाल्यावर आपली होणारी परिस्थिती किती विलक्षण आणि मजेशीर असेल ही कल्पनाच गमतीदार आहे. आणि हे असं सगळं जेव्हा कॅमेऱ्यात टिपून टीव्हीवर दाखवलं जातं तेव्हा अनेकांना हसू आवरत नाही आणि यातूनच प्रँक्सची लोकप्रियता वाढीस लागली.

चार्ली चॅप्लिन, लॉरेन अ‍ॅण्ड हर्डी किंवा आजच्या काळातला मिस्टर बीन म्हणजे मूक अभिनय करून सगळ्यांना हसवणारे पण त्यांच्या कार्यक्रमातसुद्धा या ना त्या प्रकारे ते समोरच्या एखाद्या व्यक्तीला मजेशीर छोटा-मोठा त्रास देत, शारीरिक हालाचालींद्वारे विनोद करताना दिसतात. हे सगळं अगदी शब्दश: प्रँक्समध्ये मोडत नसलं तरी त्याच्या जोडीला ‘गॅग’ म्हणजे छोटे छोटे विनोदी आणि हसू फूलवणारे किस्से गाजू लागले आणि त्याचा वापर प्रँक्स करण्यासाठी होऊ  लागला.

आता तर सोशल मीडिया आणि यूटय़ूबच्या जमान्यात हे जाळं अधिकच फोफावत चाललं आहे. भारताबाहेरचे अनेक यूटय़ूब व्लॉगर्स आपल्या यूटय़ूब चॅनल्सवर असंच मित्रपरिवार आणि परिवारातल्या मंडळींवर प्रँक्स करीत फॉलोअर्स आणि लाइक मिळवताना दिसतात. ‘द एस फॅमिली’, ‘दिस इज एल अ‍ॅण्ड एस’, ‘फेझ रग’ असे अनेक यूटय़ूब चॅनल्स या प्रँक्स आणि मजा मस्तीमुळे प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतात दिसत आहेत. ‘एस फॅमिली’च्या ऑस्टिनने तर त्याची वर्षभराची मुलगी एल हरवली असं भासवत कॅथरिनला प्रँकच्या नावाखाली अक्षरश: सळो की पळो करून सोडलं होतं. अशा या व्लॉगर्सना विशेष पसंती मिळण्याचं कारणदेखील असं की हे प्रँकस्टर व्लॉगर्स एखादय़ाची टर खेचून गप्प बसत नाहीत कारण मग त्यांच्यात सुरू असतं एकमेकांवर असे प्रँक्स करण्याचं एखादं लडिवाळ युद्ध. कोण कोणाची किती फजिती करतो आणि कोण कोणाला किती फसवतो हे बघण्याची मजाच काही और असते. त्यामुळे दररोजच्या आयुष्यातसुद्धा त्यांना फॉलो करणारे अनेक जण त्याचं अनुकरण करताना दिसतात. त्यामुळे टीव्हीवरून यूटय़ूबवर आलेलं हे प्रकरण मग खऱ्या आयुष्यातही अनुभवताना दिसून येतं.

हे प्रँक्स जितके बघताना मजेशीर आणि आनंद देतात तितकेच आपल्यासोबत घडले तर मात्र राग आणि तिटकारा देऊन जातात. म्हणतात ना ज्या गोष्टी आपण सहन करू शकतो त्याच आपण समोरच्या व्यक्तीसोबत कराव्यात तसंच आपण जर या प्रँक्सच्या नादात एखाद्याची टर उडवत असू तर ते आपल्यालाही हसत हसत घेता आलं पाहिजे. नाही का?

एकंदरीतच काय तर जसं १ एप्रिलचा दिवस म्हणजे लोकांना एप्रिल फूल बनवण्याचा दिवस तसं त्याच्यातून निर्माण झालेलं हे ‘प्रँक्स कल्चर’ म्हणजे धकाधकीच्या आयुष्यात कोणत्याही सणावाराची वाट न बघता समोरच्याला अगदी वाट्टेल तेव्हा एप्रिल फूल नाही पण फूल बनवणं. याचं प्रयोजन एकच आणि तो म्हणजे आनंद मिळवणं आणि देणंसुद्धा. मग तो समोरच्याला निरुपद्रवी थोडासा त्रास देऊन असेल किंवा त्याची पंचाईत करून असेल पण त्यातला आनंद महत्त्वाचा. बरं मंडळी तुम्ही सावध राहा. कारण १ एप्रिलला तुम्हालाही कोणी तरी फूल बनवू शकतंआणि त्यापेक्षाही महत्त्वाचं म्हणजे ‘प्रँक्स’पासून सावधान कारण ते अगदी आजही होऊ शकतं.. !!

viva@expressindia.com

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व लेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Article on april fool day

ताज्या बातम्या