फिनिक्स भरारी मारणाऱ्या जपानमधल्या भाषा, माणसं, संस्कृती आणि राहणीमानाबद्दल सांगतेय, जपानमध्ये टोकियोजवळच्या शहरात राहणारी अदिती.

विदेशिनी
आदिती गद्रे, योकोहामा

जपान.. उगवत्या सूर्याचा देश. भारतात जपानी शिकताना, पुस्तकं वाचून, जापनीज लोकांबद्दल माहिती करून घेताना मला कळलं, अगदी तसंच आहे जपान. या जपानी शिकण्याचीही आहे एक गोष्ट. मी मुलुंडच्या केळकर कॉलेजमधून बी.ए. इकॉनॉमिक्स केलं. फक्त इकॉनॉमिक्सखेरीज एखादी परदेशी भाषा शिकावीशी वाटली. अनेकांनी तसा सल्लाही दिला होता. जपानी शिकायचं ठरवल्यावर ‘जपानी कठीण आहे’, ‘तुला जमेल की नाही’ वगैरे वगैरे बागुलबुवाही दाखवला, पण मी ती भाषा शिकायचीच असं ठरवलं. बोरिवलीच्या प्रोफेशनल फॉरेन लँग्वेज सेंटरमध्ये जायला सुरुवात केली. डोंबिवली ते बोरिवली हा प्रवास खूप कठीण वाटत होता मला तेव्हा. मात्र जपानी शिकायला लागल्यावर त्याची गोडी लागली ती लागलीच. जपानी भाषेच्या लेव्हल्सना ‘जेएलपीटी’ म्हणतात. त्याच्या ‘एन ३’पर्यंत लेव्हल क्लिअर केल्यात नि ‘एन २’चा अभ्यास करतेय. जपानी भाषेमुळं मला एका मोठय़ा कंपनीत जॉब लागला. अकाऊंट्स पेपर डिपार्टमेंटमधल्या जपान डिपार्टमेंटमध्ये जपानी क्लाएंट्सशी ईमेल, फोन्स वगैरेंच्या माध्यमांतून कोऑर्डिनेशन करत असे. गेल्या वर्षी लग्न होऊन मीही जपानला आले. नवऱ्याला एका प्रोजेक्टसाठी तीन र्वष जपानला राहायचंय. गेले सात महिने आम्ही टोकियोजवळ योकोहामात राहतोय.
आता इथल्या जापनीज शिक्षिकेकडून जपानी शिकायला सुरुवात केली आहे. शिकणं नि संसार सांभाळून मी ट्रान्सलेशनची कामं करते आणि कम्युनिकेशन साधून देते. उदाहरणार्थ- कुणाला वॉर्ड ऑफिसमध्ये जायचंय नि तिथं इंग्लिशच्या ‘ई’चाही गंध नसल्यानं त्या दोघांमधला दुवा मी होते. मग ते भारतीय असोत किंवा चायनीज, व्हिएतनामी वगैरे अन्य देशांतले! त्यांना जपानी कळत नसेल तर त्यांच्यासोबत जाऊन थोडं कोऑर्डिनेशन करून त्यांच्या कामात मदत करते. आपल्या भाषिक ज्ञानाचा इतरांना उपयोग होतोय, हे पाहून बरं वाटतं. जापनीज लोकांना अगदी बेसिक इंग्लिश येत असल्यानं ते परदेशी माणसांशी फार संवाद साधायला जात नाहीत. पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे समोरच्याशी संवाद साधणं शक्य नसलं तरी जापनीज लोक त्यांच्या परीनं खाणाखुणा करून, ड्रॉइंग काढून समोरच्याला इतकं सांगण्याचा प्रयत्न करतात की, कधी कधी आपण समजून घेता घेता थकून जातो. जापनीज लोक खूप चांगले आहेत. ते खूप रिझव्‍‌र्हड वाटतात. इतरांशी कामापुरतंच बोलतात. आतापर्यंत माझे थोडेसेच जापनीज मित्रमैत्रिणी झालेत. आम्ही पूर्णपणं शाकाहारी आहोत. जपान्यांमध्ये सोशल ड्रिंकिंग अगदी समाजमान्य आहे. तेही आम्ही करत नाही. त्यामुळे जपानी मित्र-मैत्रिणींकडे पार्टीला जायचं म्हणजे पंचाईत असते. नॉनव्हेज नि ड्रिंक्स कुठेही असतातच.
जापनीज लोक मदतीला मात्र तत्पर असतात. त्यांच्याकडून शिकण्यासारखी गोष्ट म्हणजे आपल्याला चांगलं मिळतंय, पण माझ्यानंतर जे कुणी वापरणार आहे, त्यांनाही ते चांगलंच मिळावं, ही जाणीव त्यांच्या वावरण्यात सतत असते. हिरोशिमा नि नागासाकीच्या घटना असोत किंवा काही वर्षांपूर्वीच्या त्सुनामीतलं प्रचंड नुकसान.. त्यांनी अतिशय तत्परतेनं आणि थोडक्या वेळात व्यवस्थितपणं सगळं पुन्हा उभारलेलं दिसतं. आजदेखील इथे सारखे भूकंप होतात. आम्हालादेखील धक्के जाणवलेत. तेवढय़ापुरतं क्षणभर सगळं जणू पॉझ होतं.. पण क्षणार्धात पुन्हा सगळं सुरळीतपणं सुरू होतं.
जपानमध्ये हारू (स्प्रिंग), नात्सु (समर), आकी (ऑटम) आणि फुयु (विंटर) असे चार ऋतू आहेत. ध्वनिप्रदूषण अजिबात नाहीये. जो तो आपापल्या कामात व्यस्त असतो. आपल्याकडं म्हणतात तसंच ‘लवकर निजे, लवकर उठे..’ अमलात आणतात जपानी माणसं. कुटुंबसंस्था चांगली असली तरी अनेक वृद्ध नव्वदीपर्यंत सहज स्वतंत्रपणं राहतात. चांगल्या व्यायाम-आहार-विहारामुळं ते शक्य होतं. लग्नसंस्था, मूल जन्माला घालणं आदी विषयांवर टोकाच्या भूमिका आढळतात. वायूप्रदूषण नसल्यानं एनर्जी खूप टिकून राहते. जापनीज लोक कामाच्या वेळी कामातच लक्ष देतात, त्या वेळी त्यांच्याकडं मोबाइल अलाऊड नसतो. वायफळ गप्पा मारल्या जात नाहीत. तरीही मला आपलं वर्ककल्चर जास्त आवडतं. कारण मी त्यातून आलेय, म्हणूनही असेल कदाचित.. हे लोकं काम एवढं परफेक्ट करतात की, त्यात कुणी चूक काढूच शकत नाही. त्यांचा कामाचा उरक अगदी दांडगा आहे.
जपानी भाषा तीन लिप्यांमध्ये लिहिली जाते नि त्या तिन्ही एकत्र वापरल्या जातात. मूळ ‘कांजी’ ही चित्रलिपीसारखी दिसणारी, चीनमधून आलेली. ‘हिरागाना’ ही उच्चारानुसार लिहिली जाणारी आणि ‘कताकाना’ ही परदेशी शब्दांकरता वापरली जाणारी लिपी आहे. परवाच क्लासमध्ये मला सोडवायला दिलेला पेपर थोडा कठीण पातळीवरचा होता. पण मी तो नेटानं सोडवलाच. वेगवेगळ्या टप्प्यांवर वेगवेगळे अनुभव येताहेत जपानी शिकताना नि मजाही येतेय.. मी आतापर्यंत टोकियोसह बऱ्याच ठिकाणी फिरलेय. इथं सिग्नल क्रॉसिंगचे नियम आटोकाट पाळले जातात. गाडय़ांना आपल्यासारखीच गर्दी असली तरी ट्रेनमध्ये लायनीत चढायचं नि उतरायचं. सुरुवातीला ट्रेन्स समजणं खूप कठीण गेलं होतं मला. रोजच्या कामांसाठी नि आपत्तीच्या वेळीही सगळ्या गोष्टी कायदे आणि नियमांनुसारच होतात. वेळेच्या बाबतीत फारच काटेकोरपणा आहे.
एकदा योयोके पार्कमध्ये जायचं घाईत ठरवल्यामुळं आम्ही मॅप घरीच विसरलो होतो. तिथं मिळालेल्या मॅपवरून शोधणंही कठीण झालं होतं. आम्ही भेटायला जाणार होतो, त्या जापनीज माणसांना भेटल्यावर काही तरी सारवासारव केली, जी त्यांना फारशी पटली नव्हती. कारण मॅप असेल तर माणूस चुकणारच नाही, ही शंभर टक्के खात्री वाटते त्यांना. जपानी लोक अतिशय प्रामाणिक असतात. आम्ही धुऊन वाळत घातलेलं कारपेट रात्रभर बाहेरच राहिलं. सकाळी ते दिसलंच नाही. मला वाटलं की, ते चोरीला गेलं. नवऱ्याला मात्र ते चोरलं गेल्याचं पटतच नव्हतं. ऑफिसमधून येताना त्याला कारपेट पोस्टबॉक्सवर ठेवलेलं दिसलं नि त्याच्या म्हणण्याला दुजोरा मिळाला. इथं फळं सगळ्यात महाग आहेत. मी ऐकलंय की, गिफ्ट म्हणून लोक फळं देतात.. मग अनुभवलंही! आमच्याकडं आलेल्या जपानी पाहुण्यांनी आम्हाला गिफ्टसोबत फळंही दिली होती!
इथं आल्यापासून नेटवरून ओरिगामी शिकतेय. आवर्जून जिमला जातेय. चायनीज, व्हिएतनामी लोकांशी गप्पा मारून त्यांच्या देश-संस्कृती, वर्तमानाविषयी जाणून घेतेय. वाचनाची गोडी लागलेय. घराबाहेर पडताना व्यवस्थित तयार होऊन जायची चांगली सवय लागलेय. सगळ्यात मोठी गंमत व्हायची तिथल्या क्लासमध्ये. भारतात जापनीज शिकायचे, तेव्हा थोडासा मराठी-इंग्लिशचा वापर व्हायचा. इथं शिक्षिका जपानीच असल्यानं त्या समजावूनही जपानीतच सांगतात. सुरुवातीला मला ते समजायला फार त्रास झाला. मी जापनीज शिकले असले तरी त्यांचा स्पीड कॅच करता येत नव्हता. मग नवनवीन शब्द शिकणं, उच्चार समजून घेणं, संवाद साधणं आदी गोष्टी शिकले.
कुठलीही भाषा शिकायची असेल तर व्यवस्थित शिकायला हवी. ती मनापासून शिकायला हवी. कारण अनेक उच्चपदस्थ लोक म्हणतात की, ‘आम्ही जपानमध्ये एन्जॉय केलं, पण आम्ही भाषेपुढं हरलो.’ त्यामुळं बेसिक्स शिकून जाणं उत्तम. आम्ही भारतात परतलो तर जपानी शिकण्याचा खूप फायदा होईल. फक्त काय करायचं परतल्यावर ते ठरवणार.. जपानी भाषेत ‘मी केलं’ असं कधीच म्हणत नाहीत. तसा ग्रामर पॅटर्नच नाही. म्हणून ‘मी केलं’ याऐवजी ‘तुझ्यामुळं- तुमच्यामुळं माझ्याकडून घडलं’, असं म्हटलं जातं. त्यात ‘तुझ्या कृपेनं’ असा ‘फिल’ येतो. नेमकं तेच फिलिंग तुमच्याशी या गप्पा मारताना आलंय.. बा. भ. बोरकरांच्या कवितेचे शब्द आठवताहेत की, ‘जीवन त्यांना कळले हो, मीपण ज्यांचे पक्व फळापरी सहजपणाने गळले हो..’
(शब्दांकन – राधिका कुंटे)