पूर्वीच्या काळी कुटुंबातील सगळी माणसं एकत्र भेटायला काही सणांची किंवा उत्सवांची गरज पडायची. जी मोठी कुटुंबं असायची ती तर बारा महिने चोवीस तास एकत्रच असायची. मात्र गावची जत्रा, कोणाचं लग्न, कोणाची मुंज, कोणाची पंचाहत्तरी, कोणाच्या घराची वास्तुशांत अशा विविध प्रसंगी आनंदात आणि उत्साहात लांब-लांब असलेली सगळी नातेवाईक मंडळीही भेटायची. प्रत्येक कुटुंबाचे काही लाडके आणि परंपरागत सगळ्यांना आवडत असलेले असे खेळ असतात, काही आवडती ठिकाणं असतात जिथं संपूर्ण कुटुंब केवळ मजा करायला म्हणून जातं. असे खेळ, अशी ठिकाणं या सगळ्या गोष्टी शोधून एकत्रितपणे त्यांचा आनंद घेतला जायचा. फक्त तेव्हा या सगळ्या मौजमजेचं ‘फोटोशूट’ करून सोशल मीडियावर ‘पोस्टायचं’ वेड लोकांमध्ये पसरलेलं नव्हतं.

आता अशा सगळ्या कौटुंबिक स्नेहसोहळ्यांचे ‘इव्हेंट्स’ करून त्याच्यासाठी हॅशटॅग वगैरे तयार केले जातात. सोशल मीडियावर पोस्ट करताना ‘फॅम-जॅम’ हा हॅशटॅग वापरला जातो. म्युझिकल जॅमिंग सेशन्सचा संदर्भ कदाचित याला असावा. म्युझिकल जॅमिंग सेशन्स ही कोणतीही फॉर्मल मैफील नसते, तर आपल्या आवडीचं संगीत आपल्या वाद्यावर वाजवून, आपल्या गाण्यांतून व्यक्त करून ‘एन्जॉय’ करण्यासाठी आणि नवीन काही तयार करण्याच्या प्रयत्नात असलेले वादक- गायक- संगीतकार अशी सेशन्स करत असतात. कदाचित यातल्या अनौपचारिकतेचा संदर्भ घेऊन नातेवाईकांनी एकत्र येऊन मजा करण्यालाही या ‘जॅमिंग’ची जोड दिली असावी.

हल्ली लग्न समारंभ, मुंज वगैरे अशा सोहळ्यांनाही संपूर्ण कुटुंब भेटणं अवघड असतं. प्रत्येक जण आपापल्या व्यस्त दिनक्रमातून वेळ काढून आणि आपापली कामं सांभाळून अशा सगळ्या समारंभांना येऊ  शकण्याची शक्यता कमी असते. त्यामुळे मग जितके लोक भेटतील तितके आणि थोडय़ा थोडय़ा काळाने जिथे भेटतील तिथे लोक हा ‘फॅमिली टाइम’ साजरा करतात. एकत्र मिळून पत्ते खेळणं, आईस्क्रीम पार्टी करणं, छोटय़ाशा ट्रीपला जाणं अशा साध्या साध्या गोष्टींत लोकांना आजही आनंद मिळतो. मात्र आता ही गोष्ट केवळ आनंद घ्यायची राहिली नसून ‘सोशल’ करायचीही झाली आहे. त्यामुळे अशा फॅमिली टाइमचे फोटो आणि सेल्फीज ‘सोशल’ करण्यासाठी त्याला ‘फॅम-जॅम’ हे गोंडस नाव देण्यात आलं आहे.

फॅमिलीची व्याख्याही बदलते आहे बरं आजकाल! केवळ नातेवाईक नव्हे, तर वर्गातले मित्र-मैत्रिणी, ऑफिसमधले कलिग्ज, सेलेब्रिटींचे फॅन्स आणि लेखकांचे वाचक हेसुद्धा आता कुटुंबात सामील झाले आहेत. त्यामुळे या ‘फॅम-जॅम’मध्ये आता अनेक वेगवेगळ्या ‘सर्कल्स’चा समावेश होऊ  लागला आहे.