scorecardresearch

‘बुक’ वॉल

शिक्षण ही आयुष्यातली किती महत्त्वाची बाब आहे याची प्रचीती येते.

‘बुक’ वॉल
(संग्रहित छायाचित्र)

हर्षदा गवंडर

तरुण वाचकांच्या मनात शिरून त्यांना आवडलेलं पुस्तक आणि त्यातला त्यांना भावलेला विचार तुमच्यापर्यंत पोहोचवणारं हे नवं सदर..

ज्याला खरं ज्ञान मिळवायचं असतं तो ते कठीण परिस्थितीतही मिळवू शकतो. ‘द स्टोरी ऑफ माय लाइफ’ हेलन केलर या अपंग महिलेने आपल्या वयाच्या २२ व्या वर्षीच लिहिलेल्या या पुस्तकातलं हे वाक्य आमच्यासारख्या तरुणांसाठी एक आदर्शच. हेलन अंध, कर्णबधिर व मुकी होती. मात्र स्वत:च्या कमतरतांमुळे ती कधी खचली नाही. तिच्यात असणाऱ्या गुणांची तिला पूर्ण जाणीव होती. खरंतर गुण सगळ्यांकडेच असतात, ते ओळखले की माणसाचं आयुष्य कशा पद्धतीने पुढे जाईल हे ठरतं. हेलनने हार न मारता आपले शिक्षण पूर्ण केलेच. शिकताना आपल्याला आपले गुणही कळतात. मग शिक्षण ही आयुष्यातली किती महत्त्वाची बाब आहे याची प्रचीती येते.

डोळे असतील तरच वाचन होतं किंवा कान असतील तरच विचार आपल्यापर्यंत पोहोचतात किंवा बोलता येतं म्हणून आपले विचार इतरांपर्यंत पोहोचवता येतात, या गैरसमजांची कडीही तिने मोडून काढली. आपल्याकडे तर सगळं आहे पण आपण बऱ्याच गोष्टींमध्ये कमी पडतो. आपली स्वप्नं तुटतात, आपण यशाला भीतो. नैसर्गिकरीत्या सर्व आपल्या मिळालंय. आवाज, दृष्टी, बुद्धिमत्ता सगळं असूनही मग तरुणपणांची ऊर्जा नक्की कुठे कमी पडते?

आज तरुणांचे आदर्श बदलत चालले आहेत, कारण आज तरुण गुणच पाहतात, सौंदर्य पाहतात, व्यक्तिमत्त्व पाहतात; पण कधीच असे आदर्श ठेवत नाहीत जे कमतरतेतून वर आले आहेत. यशस्वी झाले आहेत. जितक्या कमतरता असतील त्यावर मात करायचा प्रयत्न केला तर अधिक चांगले गुण मिळतातच आणि आपण आपले गुण वाढवूही शकतो. आजच्या तरुणांना आपले चांगले गुण शोधायला वेळही नाही? नकारात्मकता आज तरुणांमध्ये वाढलिये. मुलं आत्महत्या करतात का? तर त्यांच्यातले गुण ते ओळखू शकत नाहीत, त्यांच्यातली कमतरताच दिसते म्हणून थोडय़ा स्वत:च्या क्षमता ओळखून हेलनसारखे आदर्श समोर ठेवून तरुणांनी या नकारात्मक विचाराच्या जाळ्यातून बाहेर निघायलाचं हवं.

viva@expressindia.com

संकलन : गायत्री हसबनीस

मराठीतील सर्व लेख ( Lekhaa ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 06-07-2018 at 01:17 IST

संबंधित बातम्या