सलोनी लिमये

तरुण वाचकांच्या मनात शिरून त्यांना आवडलेलं पुस्तक आणि त्यातला त्यांना भावलेला विचार तुमच्यापर्यंत पोहोचवणारं हे नवं सदर..

आपल्या आयुष्यातही काही सस्पेन्स असावा असं प्रत्येकाला बऱ्याचदा वाटत असतं. ‘द गर्ल ऑफ माय ड्रीम्स’ या दुजरेय दत्ता लिखित कादंबरीत अशी बरीच वाक्यं आहेत जी आपल्याला एका विशिष्ट दुनियेत रमायला भाग पाडतात. ही वरची ओळ समजून घेताना त्यामागची कथा लक्षात घ्यावी लागते. या कादंबरीत दमन हा अपघातामुळे गेली अनेक वर्ष कोमात राहिलेला मुलगा. अवनी ही दमनची प्रेयसी आहे. दोघेही आपल्या आयुष्यात खूश होते. परंतु अपघातानंतर कोमात असलेल्या दमनच्या मनातून सत्य काय ते पुसलं गेलं आहे. या मानसिक स्थितीत त्याला हजारोजण फसवू शकतात. एक सर्वसामान्य मुलगा तोही आपल्यासारखा, अचानक त्याच्यावर असा प्रसंग ओढवतो. दमनची कथा वाचताना आपोआप आपणही त्याला त्याचं पूर्वीचं आयुष्य परत कधी मिळणार, या विचारात गुंतून जातो. वरच्या ओळीत आकस्मिकपणे सगळं काही घेऊन जाणाऱ्या क्षणातील भावावस्था लक्षात येते. आयुष्यात आपण काही गोष्टी मिळवण्यासाठी अथक प्रयत्न करत असतो, पण एक वेळ अशी येते की असं काहीतरी घडून जातं ज्यात आपण सगळंच एका क्षणात गमावून बसतो. ते परत मिळवताना त्यासाठी वाट्टेल ते सहन करावं लागतं. गोष्टी जशा अचानक गेल्या तशाच त्या अचानक परत याव्यात हा विचार मनात घुमत राहतो. एका क्षणी आपल्याला जे हवं होतं, गमावलं होतं ते परत मिळतं मात्र तोवर वेळ खूप पुढे निघून गेलेली असते. त्या आनंदातही आपण आयुष्यभर या गोष्टीची वाट पाहिली हा सल किनारीसारखा पकडून राहतो. तरुण वयात ही ओळ वाचताना आपण आयुष्यात किती सतर्क राहायला हवं, याची जाणीव होते. आपल्याकडे असणाऱ्या कित्येक गोष्टींना, माणसांना आपण तारुण्याच्या भरात कमी लेखतो आणि मग त्या गोष्टी हातून निसटल्या की त्यांना शोधण्यात आयुष्य पणाला लावतो. म्हणून आपल्याकडे जे आहे त्याचा नेहमीच आदर केला पाहिजे, सांभाळ केला पाहिजे.