‘कट्टा’पालट

वैचारिक आणि सामाजिक बांधिलकी जपू पाहतेय, आसपासच्या संवेदनशील विषयांवर विचार करू पाहतेय

प्रतिनिधिक छायाचित्र

डिस्को, पब, महागडे रेस्टॉरंट किंवा मॉलमध्ये खरेदी म्हणजे आयुष्य असं समजणारी तरुणाई समाजाच्या बदलत्या स्वरूपानुसार बदलू पाहतेय. वैचारिक आणि सामाजिक बांधिलकी जपू पाहतेय, आसपासच्या संवेदनशील विषयांवर विचार करू पाहतेय. त्यामुळे या नव्या विचारधारेला अनुसरून त्यांची बाहेर जाण्याची, फिरण्याची ठिकाणंही कमालीची बदलत चालली आहेत.

कोणत्याही देशाचं भविष्य हे त्या देशातील तरुणांवर अवलंबून असतं. काळानुसार तरुणाईच्या वागण्या-बोलण्यात फरक दिसून आले आहेत मात्र देशाच्या भविष्याची दोरी त्यांच्या हातात असते हा ‘विचार’ आजही कायम आहे. त्यामुळे प्रत्येक देशातील तरुण मंडळी काय विचार करतात यावर देश किती पुढे जाईल, याचे आडाखे बांधले जातात. तरुणांच्या करिअरच्या वाटा जशा महत्त्वाच्या ठरतात तसंच सांस्कृतिक भूक भागवण्याची त्यांची माध्यमंही तितकीच मोलाची भूमिका बजावत असतात. संगीत, नाटक, सिनेमे, बाहेर जाण्याची ठिकाणे या सगळ्याच गोष्टीतून आजची तरुण पिढी कशा प्रकारे विचार करते यावरून त्यांच्या आवडीचा कल कुठे आहे याचा अभ्यास करता येतो. आणि आनंदाची बाब म्हणजे आतापर्यंत केवळ ‘मजा’, ‘दंगा’ या शब्दांभोवती घुटमळणारी तरुण पिढी आता त्यातून बाहेर पडू पाहते आहे. वैचारिक आणि सामाजिक गोष्टींकडे त्यांचा कल वाढला असून कट्टा म्हणजे केवळ टाइमपास यापलीकडे जात त्याला वेगवेगळ्या प्रकारे वैचारिक आणि सामाजिक अधिष्ठान देत तरुणाई आपली अभिव्यक्तीही उच्च अभिरुचीची असावी, याकडे क टाक्षाने लक्ष देते आहे.

साठ आणि सत्तरच्या दशकातील तरुणाईला संगीत नाटक , कृष्णधवल अभिजात चित्रपट, शास्त्रीय संगीत मैफल म्हणजे पर्वणी वाटायची.  आता नवे-जुने असा भेद न करता एड शिरन किंवा जस्टिन बिबरच्या कॉन्सर्ट्सना घोळक्याने जाणारी तरुण मंडळी आत्ताच्या अरिजीत सिंगच्या कॉन्सर्टलाही तितकीच गर्दी करते आणि सवाई गंधर्व संगीत महोत्सव कुठे आहे, याचीही चौकशी करत तिथेही हजेरी लावते. फक्त चित्रपट, संगीत महोत्सव, नाटक एवढय़ापुरतीच सामाजिक अभिव्यक्तीची माध्यमं मर्यादित राहिलेली नाहीत. गाणं आवडणारी, कविता आवडणारी किंवा समान धारणा, आवड असणारी मंडळी एकत्र येऊन आपल्याला आवडणाऱ्या गोष्टींचा प्रचार, प्रसार करताना दिसत आहेत. ‘नातवंडांच्या कविता’ हा असाच तरुणांचा एक ग्रुप. या ग्रुपमधली तरुण मंडळी एकत्र येऊन ठिकठिकाणी कविता वाचनाचे कार्यक्रम करतात. एखादे ठिकाण निवडून तिथे रसिकांना आमंत्रण देत कवितांचा हा मेळा भरवला जातो. ‘द पोएट्री क्लब’ आणखी एक ग्रुप. या ग्रुपच्या वतीने सगळ्या भाषांमधील कवितांचा कार्यक्रम आबालवृद्धांसाठी भरवला जातो. म्हणजे या क्लबचा कवितांचा कार्यक्रम ऐकणारे श्रोते भले वेगवेगळ्या वयाचे असतील   मात्र सादरकर्ती मंडळी तरुण असतात. ‘द कुक्कु क्लब’ हा असाच आणखी एक मुंबईतील प्रसिध्द क्लब जो तरुणांमध्ये प्रचंड लोकप्रिय ठरला आहे.

‘ओपन माईक’ हा नव्याने प्रचलित होत चाललेला प्रकार तर तरुणाईला विशेष भावतो. एखाद्या क्लबमध्ये, हॉटेल्स आणि रेस्टॉरंटमध्ये केले जाणारे पद्य किंवा कविता लोकांसमोर सादर करणं आणि ते ऐकून दाद देणं, त्यावर अंमल करण्याचं प्रमाण तरुण वर्गामध्ये मोठय़ा प्रमाणावर दिसून येत आहेत. नाटय़ अभिवाचनाचे कार्यक्रम किंवा आठवडय़ातील-महिन्यातील एक दिवस ठरवून केवळ आपल्या आवडीच्या पुस्तकाचे वाचन करणारे कट्टे मुंबईपासून सुदूर उपनगरांमध्येही ठिकठिकाणी वाढत चालले आहेत. अगदी पुण्यातही असे तरुणांचे वेगवेगळे कट्टे आहेत. कटटय़ावरच्या नुसत्या वाचाळ गप्पा जाऊन तिथे एकांकिका, नाटक, साहित्य अशा विषयांवरच्या दर्जेदार गप्पा रंगवणारे ग्रुप दिसू लागले आहेत. याशिवाय, आपला नोकरी-व्यवसाय सांभाळून कधी तरी शोभायात्रेत वाजवायला मिळेल म्हणून ढोलकी वाजवण्यासाठी एकत्र येणारे, लेझीम शिकणारे-शिकवणारेही ग्रुप ठिकठिकाणी पाहायला मिळतात. पूर्वी कॉलेज कट्टय़ावर ‘चल रे कुठे तरी फिरायला जाऊ ’ असं म्हटलं की एखादं रिसॉर्ट किंवा छानसं फिरण्याचं ठिकाण निवडलं जायचं पण आता परिस्थिती बदलताना दिसतेय. गड, किल्ले, दूरवरची गावं निवडून तिथे साफसफाईसाठी एकत्र येणारी तरुण मंडळी आहेत.

किल्ल्यांसाठी काम करणं, जनमानसांत त्यासाठी जागरूकता निर्माण करणं यासाठी आठवडाभर काम करूनही शनिवार रविवार आळसात फुकट न घालवता काम केलं जात आहे. मुंबईसारख्या ठिकाणी समुद्र किनाऱ्यांवरचा कचरा उचलणारी, वेगवेगळ्या झोपडपट्टय़ा, रेल्वेस्थानके रंगवून सुशोभीकरण करणारी मंडळी वाढत चालली आहेत. ‘फे मिनिझम’ हा शब्द आज उच्चारला तर याविरुद्ध बोलणाऱ्या तोंडांना उत्तर देताना ‘मुलांचं’ प्रमाण मुलींइतकंच आहे. याचं कारण हेच की आजची तरुण मंडळी तारुण्याचा आणि आयुष्याचा कुठे तरी गंभीरपणे विचार करू लागली आहेत. सुट्टीच्या दिवशी आवर्जून गुगलवर समाजकारणासाठी उपयोगी ‘इव्हेंट्स’ शोधले जात आहेत आणि त्या पद्धतीने कामंदेखील केली जात आहेत.

याचा अर्थ तरुण वर्ग शंभर टक्के सालस झाला आहे, असं अजिबात नाही मात्र निव्वळ ‘उडाणटप्पू’ म्हणून गणला जाणारा हा वर्ग स्वत:ला बदलताना दिसतोय. आसपासच्या परिस्थिला अनुसरून त्याच्या सांस्कृतिक अवडीनिवडींमध्ये बदल करताना आणि त्यानुसार विविध ठिकाणी उपस्थिती लावताना दिसतोय. हे चित्र नव्या बदलाचे संकेत आहेत यात शंका नाही.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व लेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Changing lifestyle in indian youth

ताज्या बातम्या