‘जिंजर मेन’

देशाबाहेर या गोटींचा विचार करता अमेरिकेतील वर्णक्रांती सगळ्यांच्याच लक्षात राहणारी आहे

वर्ण म्हटलं की आपल्याला गोरा, गव्हाळ, सावळा असे आपल्या वर्णाच्या शब्दकोशातले नानाविध वर्ण डोळ्यासमोर येतात. आपल्याकडे ‘खूप खूप वर्षांपूर्वीची गोष्ट आहे’ अशा काळी वर्णद्वेष आस्तित्वात होता. आता तो तितक्या प्रमाणात दिसून येत नाही पण समूळ नष्ट झाला आहे असं म्हणणंही धाडसाचेच ठरेल. देशाबाहेर या गोटींचा विचार करता अमेरिकेतील वर्णक्रांती सगळ्यांच्याच लक्षात राहणारी आहे, पण आपल्याला माहीत असणाऱ्या वर्णापेक्षाही वेगळा प्रकार तिथे आहे जो आजवर दुर्लक्षित होता. मात्र अचानकपणे जिंजर मेन नावाने एक यादी तिथे जाहीर झाली आहे. या यादीतल्या माणसांची नावं शोधत ही जिंजर मेन नामक भानगड समजून घेणं जरा गंमतीचं आहे.

‘रेड हेडेड’ किंवा ‘जिंजर मेन’ अशा नावाने ओळखल्या जाणाऱ्या व्यक्ती तुम्ही पाहिल्या किंवा ऐकल्या आहेत का? कदाचित आता हे वाचून तुमचं उत्तर नाही असेल पण आपण सगळ्यांनी त्यांना पाहिलंय. बरं हा प्रकार काय आहे हे जर शब्दात सांगायचं तर अशी माणसं ज्यांचे केस आणि त्वचा कांती पांढरा आणि सोनेरीच्या मध्ये कुठे तरी असतो. त्यांच्या डोळ्यांच्या पापण्यांचे आणि भुवयांच्या केसांचा रंगही तसाच. हा काही आजार नाही किंवा कोणत्या रोगामुळे त्वचेचा रंग बदलत नाही तर ही एक जन्मत: मिळणारी कांती आहे जी बदलता येत नाही. मात्र गेली अनेक र्वष रेड हेडेड किंवा अशी कांती असलेल्या व्यक्तींना पाश्चात्त्य देशांमध्ये विशेषत: इंग्लंडमध्ये कमी महत्त्व दिलं जात होतं. त्यांच्यावर विनोद केले जात. त्यांची वर्णकांती आणि कधीच सावळे (टॅन) न होण्याच्या गुणधर्मामुळे त्यांना वेगळं गणलं जात होतं. पण ही झाली काही वर्षांपूर्वीची गोष्ट. आता यात झपाटय़ाने बदल झाला असून चक्क रेड हेडेड किंवा जिंजर मेन म्हणून प्रसिद्ध असलेल्या अशा व्यक्तींना शोधून शोधून त्यांची लोकप्रियतेची यादीच सादर केली जाते आहे. आणि हा सगळा चमत्कार घडला तो ‘एड शिरन’ नावाच्या इंग्लंडच्या पॉप गायकामुळे.. एड शिरीनने आपण जसे आहोत तसेच जगासमोर येत आपल्या गाण्यांनी जगाला वेड लावलं. त्याच्या शेप ऑफ यू या गाण्याने तर जगभर धुमाकूळ घातला आहे. एड शिरीनची लोकप्रियता जशी वाढली तशी या रेड हेडेड व्यक्तींभोवती असलेले समज-गैरसमज सगळे वेगाने तोडून ही मंडळी आणि त्यांचा लुक ट्रेंडिंग झाले आहेत.

पूर्वी ज्यांना या जन्मत: मिळालेल्या ‘रेड हेड’मुळे कधीकाळी वाईट वागणूक दिली गेली होती ते मात्र आज ‘कूल डुड’ म्हणवले जात आहेत. एड शिरनच्या वाढत्या चाहत्यांमुळे या वर्णाच्या लोकांना जनमानसाने स्वीकारायला सुरुवात केली आहे. मुळात वर्ण हा लोकांमध्ये भेदभावाचं प्रमाण मानणं हे अत्यंत चुकीचं आहे पण स्वत: या ‘रेड हेडेड’ प्रकारात मोडणाऱ्या एड शिरनची प्रगती नि चाहता वर्ग पाहता हा भेद लोकांनी मनातून काढून टाकला आहे, याची प्रचीती येतेच. हे सगळे भेदभाव पूर्वीपासून समाजात प्रकर्षांने दिसून येत नसले तरी ‘फुसफुसणाऱ्या’ जमावात नक्कीच होते. अगदी राजेरजवाडय़ांच्या काळात किंग हेन्री आणि राणी एलिझाबेथ यांनादेखील या ‘रेड हेड’मुळे होणाऱ्या दुष्परिणामांना सामोरं जावं लागलं होतं असं ऐकिवात आहे. पण आज या बदलत्या काळात अनेक हॉलीवूड अभिनेते या लुकचा स्वत:वर प्रयोग करताना दिसत आहेत. तर अनेक रेड हेडेड अभिनेत्यांनी लोकांच्या मनात घर केलं आहे. हॅरी पॉटर फेम ‘रॉनल्ड विजली’ तर आपल्या डोळ्यासमोर येणारं ठळक उदाहरण म्हणता येईल.

लोकांनी स्वीकारणं, त्यांच्या कामासाठी पसंती दर्शवणं असे अनेक बदल होत असतानाच एका गोष्टीने विशेष लक्ष वेधून घेतलं आणि ते म्हणजे पूर्वी अशा पुरुषांसोबत स्त्रिया जास्त सलगी करत नसत. त्यांच्याबरोबर वैवाहिक आणि शारीरिक संबंध तर फार लांबची गोष्ट होती, मात्र आता या नव्या बदलामुळे जिंजर मेन म्हणून प्रसिद्ध असलेल्या या पुरुषांकडे स्त्रियांचं आकर्षित होण्याचं प्रमाणही झपाटय़ाने वाढलं आहे.

निमित्त काहीही असो प्रत्येक वर्णाच्या लोकांना समाजात समान स्थान मिळणं हा मानवाधिकार आहे आणि इंग्लड किंवा तत्सम प्रगत देशातही या गोष्टी घडतात हे पाहून वाईट वाटतं. पण चांगली गोष्ट अशी की हे चित्र बदलतंय. कधीकाळी ‘आपले’ नसणारे आता त्यांच्या कामामुळे वर्णभेदाची बंधनं सहज झुगारून देत रोल मॉडेल’ ठरलेत आणि चक्क फॅ शन विश्वातही त्यांनी क्रांती केली आहे. आता त्यांच्यामुळे अनेक जणांनी केस लाल करून घेतले तर त्यात नवल वाटू नये..

viva@expressindia.com

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व लेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Characters revolution ginger man

ताज्या बातम्या