पल्लवी चेंबूरकर, पाया लेबार, सिंगापूर

सिंगापूर ही अतिशय शिस्तबद्ध आणि सुयोग्य शहर आहे. ते सुपरसेफ आहे. कायदा आणि सुव्यवस्थेचा करडा धाक आहे. आपल्याकडे मुलींबाबत घडणाऱ्या दुर्दैवी घटनांचा विचार करताना मुलींचा पेहराव हा अनेकदा चर्चेतला एक मुद्दा असतो. इथं पेहराव करताना मुलींना फारसा विचार करायला लागत नाही. कारण कोणीही त्यांच्याकडे वाईट नजरेने बघत नाही. त्यामुळे सुरक्षिततेचा मुद्दा तिथूनच सुरू होतो. दुसरं म्हणजे इथले लोक आपल्याला फसवत नाहीत. टॅक्सीवाले किंवा दुकानदार वगैरे मंडळी व्यवहारात कोणतीही फसवणूक करीत नाहीत. एखाद्या फूड कोर्टमध्ये आपण टेबलवर पर्स ठेवून ऑर्डर द्यायला गेलो तर परतल्यावर आपली पर्स किंवा अन्य वस्तू त्या टेबलावर तशीच असते. प्रसंगी आपण ती विसरलो आणि दुसऱ्या दिवशी जाऊन विचारणा केली तर सुरक्षारक्षक ती परत करतात. ट्रेनमधून प्रवास करताना कोणत्याही प्रवाशाला काहीही संशयास्पद वाटल्यास प्रत्येक डब्यात मदतीसाठी बटण दाबल्यावर तात्काळ मदत मिळते. काही वेळा सुरक्षाव्यवस्थेचा अतिबाऊ  केला जात नाही. उदाहरणार्थ – मॉलमध्ये बॅग आत नेऊ देतात, कारण चोरी करताना कुणी पकडलं गेल्यास त्वरित त्याच्यावर कडक कारवाई होते.

इथली मुलं २०-२२ व्या वर्षांनंतर स्वत:च्या पायावर उभी असतात. बहुतेक जण पालकांसोबत राहात नाहीत, म्हणून ती पालकांचा मान राखत नाहीत, असे विचार कोणाच्याही डोक्यात येत नाहीत. हे खरंच घडतं, कारण ते स्वतंत्र आहेत. इथे एकूणच स्वातंत्र्य, स्वावलंबन आणि आत्मविश्वास या तीन घटकांचं अस्तित्व प्रकर्षांने जाणवतं. एका ठरावीक वयानंतर गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड असणं ही सर्वसाधारण गोष्ट आहे. चिनी संस्कृती आणि भारतीय संस्कृती यामध्ये चटकन साम्य वाटत असलं तरी चिनी संस्कृती खूप लवकर पुढारलेली दिसते.

इथले ऐंशी ते नव्वद टक्के लोक बाहेरच खातात. घरी जेवण रांधण्यासाठी आपल्याकडच्या गृहिणी असोत किंवा नोकरदार स्त्रियांची बहुतांशी वेळा धावपळ चालते. पण ही संकल्पना इथे जवळपास नाहीच. कारण इथली फूडकोर्ट्स खूप लोकप्रिय आहेत. प्रत्येक उपनगरात ‘गव्हर्मेन्ट हाऊसिंग’ ही संकल्पना आहे. त्याच्या आजूबाजूला फूडकोर्ट आहेत. फूडकोर्टमधले पदार्थ खाणं खूप स्वस्त पडतं. या रेस्तराँ आणि फूडकोर्टमध्ये आरोग्यदृष्टय़ा आवश्यक असणारे स्वच्छतेचे सगळे नियम आणि अटी कटाक्षाने पाळल्या जातात. स्ट्रीट फूड फारसं मिळतच नाही. ‘ए’ ग्रेडिंग सगळ्यात वरची श्रेणी मानली जाते. सिंगापूर खूप कॉस्मोपॉलिटिन आहे. त्यामुळे इथे सगळ्या प्रकारचे खाद्यपदार्थ मिळतात. लोकल फूड हे चायनीज फूड असून ते आपल्या भारतीय चायनीजपेक्षा वेगळ्या चवीचं असतं. शिवाय जपानी आणि कोरियन फूडलाही पसंती दिली जाते. इथे तमिळ लोकांची संख्या अधिक असल्याने इडली, डोसा आदी पदार्थ पटकन उपलब्ध होतात. इथल्या अनेकांना भारतीय पदार्थ आवडतात. चिकन राइस, चिली क्रॅ ब्ज या इथल्या खूप आवडत्या डिश आहेत. फास्टफूड आवडत असलं तरी त्यात शाकाहारी पर्याय कमी असतात आणि मांसाहारच अधिक मिळतो. डम्पलिंग्ज खूप प्रसिद्ध असून आवडीने खाल्ले जातात. एकूणच इथलं चायनीज फूड हेल्दी असतं.

सिंगापूरमध्ये पार्टी कल्चर मोठय़ा प्रमाणात रुजलेलं आहे. शुक्रवार-शनिवारी रात्री हमखास पार्टी केली जाते. क्लार्क के, बोट के , क्लब स्ट्रीट आदी ठिकाणी पार्टी केली जाते. इथे क्लब्ज, रेस्तराँ, बार खूप आहेत. हाऊस पार्टीजही खूप होतात. तरुणाई खूप पार्टी करीत असली तरी पार्टी कल्चरमुळे अनेकदा ओढवू शकणारे मारामारीचे प्रसंग इथे घडत नसल्याने सुरक्षित वातावरण असतं. तरुणांची सर्जनशीलता ग्राफिटी वॉल्स, नृत्यकला, संगीतातून दिसते. इथे एकूणच कलेला खूप प्रोत्साहन दिलं जातं. शालेय जीवनापासूनच क्रीडा आणि कलाविषयांना मुख्य अभ्यासक्रमाइतकंच महत्त्व देत त्यांची जोपासना केली जाते. त्यामुळे मुलांमध्ये आपोआपच कलादृष्टी विकसित होते. बॅले, झुम्बा, साल्सा वगैरे नृत्यप्रकारांचे खूप क्लासेस चालतात. काही ठिकाणी फ्री डान्स क्लासेसही चालतात. ओपन कॉन्सर्ट्स चालतात. इथली ग्राफिटी केलेली भिंत कोणीही खराब करत नाही. प्रत्येक स्टेशनवर एक मॉल आहे आणि त्यापैकी जवळपास प्रत्येकात थिएटर असल्याने चित्रपटसंस्कृती चांगलीच रुजलेली आहे. रात्री उशिरापर्यंत चित्रपटांचे खेळ सुरू असतात. भारतीय चित्रपट पाहायला भारतीय प्रेक्षकांची संख्या अधिक असते. शिवाय हॉलीवूड, चिनी, जपानी, कोरियन आदी चित्रपटही लागतात.

इथले लोक खूप चांगले आहेत. त्यांचं वागणं सौहार्दपूर्ण आहे. थोडासा भाषेचा प्रश्न कधी कधी उभा राहतो. तरुणाईचं इंग्लिश व्यवस्थित असल्याने फारसा प्रश्न येत नाही. पण आपल्याला इंग्लिश नीट येत नसेल तर थोडंसं कठीण जातं, कारण आपली भाषा त्यांना माहिती असेल असं नाही. सिंगापूरमध्ये तमिळ लोकांची संख्या खूप आहे. त्यामुळे आपल्याला तमिळ भाषा येत असेल तर निभाव लागू शकतो. शाळेत तमिळ हा भाषेसाठी तिसरा पर्याय आहे. मराठी लोक आणि भारतीयांचं प्रमाण लक्षणीय असलं तरी हिंदी किंवा मराठी तितकं बोललं जात नाही. एकूणच सिंगापोरियन लोक फार चांगले आहेत. खूप सौजन्यशील, संवादी, मदतीस तत्पर असणारे आहेत. आपण तिथे नवखे असलो तरी परकेपणा जाणवू दिला जात नाही. एकजुटीने राहण्याची संकल्पना प्रत्यक्षात जगली जाते.

सरकारतर्फे शालेय जीवनापासूनच स्वयंसेवेला खूप प्रोत्साहन दिलं जातं. सिंगापूरच्या नागरिक आणि कायमस्वरूपी नागरिकांच्या मुलांना वयाची अठरा र्वष पूर्ण झाल्यानंतर नॅशनल सव्‍‌र्हिस हा दोन वर्षांचा अभ्यासक्रम पूर्ण करावाच लागतो. त्यानंतर चाळिशीपर्यंत त्यांना दोन आठवडे नॅशनल सव्‍‌र्हिससाठी द्यावे लागतात. मला एक घटना आठवतेय, सिंगापूरचे परिवर्तन प्रत्यक्षात साकारणारे ली कुआन यू यांचं निधन झालं तेव्हाची.. त्यांच्या निधनाच्या वेळी सिंगापूरकरांना त्यांच्याविषयी वाटणारं प्रेम, आदर आणि आत्मीयता प्रकर्षांने जाणवली. त्यांची एकजूट, शिस्तबद्धपणा दिसत होता. त्यांच्या अंत्यदर्शनासाठी मोठाल्या रांगा लागल्या होत्या. केवळ सिंगापूरकरच नव्हे तर जगभरातल्या लोकांनी त्यांच्याबद्दलचा आदरभाव व्यक्त केला होता.

सिंगापूरमधली वयोवृद्ध माणसं आपल्याकडच्या वयस्कारांपेक्षा खूपच फिट आणि अ‍ॅक्टिव्ह आहेत. सगळ्या गोष्टी स्वत:च्या स्वत:च करतात. फारसे कोणावर अवलंबून राहात नाहीत. होता होईल तोवर लोक कष्ट आणि काम करतात. इथे फिटनेसला खूप प्राधान्य दिलं जातं. शैक्षणिक संस्था असोत किंवा कार्यालयं असोत आरोग्याला खूप महत्त्व दिलं जातं. सगळे जिम, जॉगिंग, तायची वगैरे व्यायाम प्रकार करतातच. क्रीडा प्रकारांना शालेय वयापासूनच प्रोत्साहन दिलं जातं. ऑलिम्पिकमध्ये सिंगापूरला पदकं मिळतात. गेल्या ऑलिम्पिकमध्ये सिंगापूरला स्विमिंगचं सुवर्णपदक मिळाल्याने स्विमिंग सध्या अधिक लोकप्रिय आहे. शिवाय बॅडमिंटन, टेबल टेनिस, हॅण्डबॉल हे खेळ आवडीने खेळले जातात. क्रिकेटचं वेड इथे अजिबात नाही. फक्त भारतीयांच्या काही ग्रुपमध्ये मर्यादित प्रमाणात क्रिकेट खेळलं जातं. तरुणाई प्रवास खूप करते. वीकएण्डला सिंगापूरमधल्याच रिसॉर्ट किंवा हॉटेलमध्ये एक-दोन दिवस राहणं खूप कॉमन आहे. सिंगापूरजवळ इंडोनेशिया, थायलंड, फिलिपाइन्स, हाँगकाँग, श्रीलंका वगैरे देश एक ते तीन तासांच्या हवाई अंतरावर असल्याने सिंगापूरचा मध्यवर्ती ठिकाण म्हणून विचार केला जातो आणि ते उत्तम पर्यटनस्थळ आहे. सिंगापूर हे नियोजनबद्ध पद्धतीने वसलेलं असून त्याचा विस्तार फार झपाटय़ाने होतो आहे. केवळ परिसराचा चेहरामोहरा बदलतो आहे, असं नव्हे तर त्यासाठी भविष्याचा विचार करून त्या दृष्टीने नियोजन करून त्याचा अवलंबही केला जातो आहे. प्रत्येक गोष्टीत आणि एकूणच सोयीसुविधा पुरवताना वृद्ध-बालक-अपंगांसह सगळ्यांचाच विचार केला जातो.

viva@expressindia.com