पावसाळा यायच्या आतच छत्र्या, रेनकोट, चपला, कपडे अशी आपली सगळी जय्यत फॅशनेबल तयारी असते. त्यामुळे भर पावसात आपली फॅशन जपताना फारशी अडचण येत नाहीत. मात्र आजच्या ‘प्रेझेन्टेबल’ राहण्याच्या जमान्यात या यादीतली आणखी एक महत्त्वाची गोष्ट आपल्याला कायम सतावत असते ती म्हणजे मेकअप. पावसाळ्यात मेकअप नेमका कसा करावा? सौंदर्य प्रसाधनांच्या गर्दीतलं नेमकं काय आपल्या चेहऱ्यासाठी गरजेचं आहे? या अशा प्रश्नांची उत्तरं खास ‘व्हिवा’च्या वाचकांसाठी..

पावसाच्या सरी आणि आजूबाजूच्या हिरव्यागार वातावरणामध्ये आपलेही सौंदर्य खुलून दिसावे असे प्रत्येकालाच वाटते; परंतु मेकअप केला तर तो पावसाने निघून जाण्याची शक्यता असते. यामुळे अनेकांना विशेषत: स्त्रियांना हा प्रश्न पडतो की, आता मेकअप कसा करावा? मेकअप टिकून राहावा यासाठी सर्वाचेच प्रयत्न सुरू असतात. दिल्लीमध्ये आजपासून सुरू होणाऱ्या सहाव्या ‘वोग वेडिंग शो’मध्ये विशेष उपस्थिती असणाऱ्या मेकअपतज्ज्ञ नम्रता सोनी यांनी पावसाळ्यात करायचा मेकअप आणि त्यासाठी घ्यावी लागणारी काळजी यावर खास मार्गदर्शन केले आहे.

‘‘पावसाळ्यात टिन्टेड मॉइस्चरायझर वापरावे आणि शक्यतो मेकअपच्या खाली नेहमीप्रमाणे तीव्र क्रीम वापरू नये. हवेतील आद्र्रता या ऋतूत जास्त असल्याने मेकअप वितळून खाली येऊ  शकतो. त्यामुळे शक्य असल्यास हलका मेकअप करावा. जलप्रतिबंधक मस्करा, जेल लायनर्स, मॅट लिपस्टिकचा वापर या ऋतूत अगदी योग्य ठरेल, कारण त्यामुळे पावसात भिजल्यावरही अशा प्रकारचा मेकअप चेहऱ्यावरून निघून जात नाही,’’ असं नम्रता सोनी सांगतात.

मेकअप करताना आपली त्वचा कशी आहे, याचा विचार प्रामुख्याने करावा लागतो. प्रत्येकाची त्वचा वेगवेगळ्या स्वरूपाची असते. तेलकट आणि कोरडी त्वचा असेल तर तशी विशेष काळजी घेणं गरजेचं असतं. पावसाळ्यात त्वचा उत्तम दिसावी यासाठी कोणत्या प्रकारचा मेकअप करावा या संदर्भात बोलताना त्यांनी सांगितलं की, ‘‘कोरडय़ा त्वचेसाठी क्रीमच्या रूपात उपलब्ध मेकअप वापरावा, त्यामुळे फाऊंडेशन आणि त्वचा कोरडी आणि फुटलेली दिसणारी नाही. आयश्ॉडो लावतानादेखील कोरडय़ा त्वचेसाठी ते क्रीम स्वरूपात असतील तर उत्तम, कारण कोरडय़ा त्वचेवर त्या जास्त खुलून दिसतात. तेलकट त्वचेसाठी सीरम किंवा जेलवर आधारित उत्पादने वापरणं फायदेशीर ठरतं. पावडर स्वरूपातील आयश्ॉडो आणि मेकअप वापरावा. तसंच डोळे आणि पापण्यांसाठी लायनर वापरावं, जेणेकरून ते तेलकट पापण्यांवर खुलून दिसेल आणि जास्त वेळ टिकूनही राहील,’’ असं सांगतानाच त्वचा उत्तम ठेवण्यासाठीच्या उपायांची माहितीही त्यांनी दिली.

पावसाळ्यात आपण हवं तितकं पाणी पीत नाही, मात्र त्वचा उत्तम राहण्यासाठी सतत पाणी पीत राहणं गरजेचं आहे. चेहऱ्याला वेळोवेळी मॉइश्चरायझर लावत राहिलं पाहिजे. आपल्या त्वचेचा पोत ओळखून वेगवेगळ्या नैसर्गिक तेलाने त्वचेला मसाज केल्यास चेहरा आणखी खुलून दिसतो आणि अर्थातच त्वचा उत्तम राहते. विविध प्रकारचे सरबत आणि काकडीचं पाणी हे त्वचेची काळजी घेण्याबाबतचे सुयोग्य उपाय आहेत.

मेकअपमध्ये सगळ्यात मोठा प्रश्न असतो मस्कारा, लायनर आणि काजळ या तीन गोष्टींचा. पावसाच्या पाण्याप्रमाणे या तीन गोष्टीदेखील कधीही वाहून जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. यावर उपाय म्हणून जेल स्वरूपातील आयलाइनर्स या ऋतूत खूप उपयोगी पडतात. ते  पाण्याचा उत्तम प्रतिबंध करत असल्याने जास्त काळ टिकून राहतात आणि चेहऱ्यावर पसरत नाही. पाण्यासारखे पातळ स्वरूपात येणारे लायनर्स मात्र प्रकर्षांने टाळा, कारण ते पटकन पसरतात आणि त्यामुळे मेकअप खराब होऊ  शकतो, अशी माहिती सोनी यांनी दिली. बाजारात अनेक उत्तम ब्रँड्सचे मस्कारा उपलब्ध आहेत, मात्र जर तुम्ही कोणताही एक वापरत असलात तर तोच वापरणं सुरू ठेवण्याचा सल्लाही त्यांनी दिला.

दररोजच्या धावपळीच्या जीवनात खरं तर उत्तम दिसणं नेहमीच साध्य होईल याची हमी देता येत नाही. पर्यायाने मेकअपसाठी किती वेळ मिळतो हेदेखील एक मोठं गणित आहे. अशा वेळेस काही झटपट आणि प्रभावी उपाय म्हणून त्यांनी काही गोष्टी सुचवल्या. तुमच्या बॅगेत नेहमी एक कोहल पेन्सिल, मस्कारा आणि एक लीप टिंट असू द्या. या तीन गोष्टी एका मिनिटात तुमचा लुक पूर्णपणे बदलू शकतात, असं त्या सांगतात.

तुमची त्वचा सतत छान आणि नितळ दिसण्यासाठी अर्थातच एक उत्तम फाऊंडेशन वापरा. त्यावर निळा, हिरवा किंवा तुमच्या आवडीच्या रंगाचं आयलायनर आणि त्यावर उठून दिसेल अशी लिपस्टिक. या थोडय़ाच पण योग्य गोष्टींचा मेळ साधता आला तर तुमचं रूप खुलून दिसण्यास मदत होईल, असे नम्रता सोनी यांनी सांगितले. या दिवसांत लग्न सोहळे किंवा इतर समारंभांसाठी हजर राहताना मेकअप कसा करावा या संदर्भात बोलताना पावसाळ्याच्या दिवसांत अगदी नवरी असली तरी तिचा मेकअप जितका कमी तितकं तिचं रूप खुलून दिसतं, असं नम्रता सोनी यांनी सांगितलं. ‘‘तुम्हाला आवडणारा चेहऱ्यावरील एखादा भाग उदाहरणार्थ डोळे, ओठ किंवा कान यांना दागिने आणि मेकअपच्या आधारे जास्त सुशोभित करा.

बाकी चेहऱ्याला साधारण मेकअप करा, जेणेकरून तुमचा परफेक्ट लुक तयार होईल,’’ असं त्यांनी सांगितलं.

खरं तर मेकअप करणं, न करणं हा प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न असला तरी मेकअपमुळे चेहरा खुलून दिसतो. त्यामुळे तुम्हीही तुमचा चेहरा खुलवण्यासाठी हे मेकअप लुक्स नक्की करून पाहा. तुम्हालाही कदाचित यातून तुमचे मेकअप ट्रेंड्स सापडतील.

पावसाळ्यात त्वचा आणि मेकअपशी निगडित काही टिप्स:

उष्ण आणि दमट वातावरणामुळे त्वचेवर मुरुमं येण्याचा अधिक संभव असतो. त्यासाठी दिवसातून तीन-चार वेळा चेहरा थंड पाण्याने धुऊन वॉटरबेस्ड मॉइश्चराइजर लावा, जेणेकरून घाम येण्याचे प्रमाण कमी होईल. हेच प्रमाण अजून कमी करण्यासाठी बर्फाने चेहऱ्याला ५ ते १० मिनिटे मसाज करा. यामुळे त्वचा तजेलदारही होईल तसेच मेकअप जास्त काळ टिकून राहील.

ब्लशरची शेड निवडताना तुमच्या चेहऱ्याला व्यवस्थित ब्लेंड होईल असाच निवडा. क्रीमी किंवा स्पार्क ल असलेले ब्लशर वापरू नका.

ग्लॉसी लिपस्टिकपेक्षा मॅटला प्राधान्य द्या आणि ब्राऊनच्या विविध शेड्सची निवड तुम्ही करू शकता.

भुवया क्लिअर किंवा टिन्टेड जेलनी सेट कराव्यात. आय ब्रो पेन्सिलचा वापर करू नये.

पावसाळ्यात डोळ्यांचा मेकअप करत असताना विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. कोहलची पाण्याला प्रतिकार करण्याची क्षमता जास्त काळ असते. पावडर आय श्ॉडोमध्ये टरक्वाइस, राखाडी, निळा, हिरवा किंवा गुलाबी अशा शेड्सची निवड करा. तसंच वॉटरप्रूफ मस्काऱ्याचे एक किंवा दोन कोट्स द्या.

लिपस्टिक फार गडद करू नये. ओठांवर लिपस्टिकचा एकच कोट द्यावा. त्याने स्वाभाविक लालिमा दिसेल आणि पाण्यात विरघळणारही नाही.

झोपताना ओठांना हलकीशी कोल्ड क्रीम लावावी. त्याने ओठ मुलायम राहतील.

स्नानापूर्वी चेहरा, मान, हात यांना दुधाने मालिश करावे. याने त्वचा स्निग्ध राहील.

पावसाळ्यात ब्लोटिंग पेपर तुमच्यासोबत न विसरता ठेवा. बाजारात विविध कंपन्यांचे ब्लोटिंग पेपर उपलब्ध आहेत. हे पेपर्स तुमच्या चेहऱ्यावरील तेलकटपणा दूर करतात.

ल्ल पावसाळ्यात हवेत आद्र्रता आणि दमटपणा जास्त असतो. अशा वेळी आपल्या मेकअप बॉक्सची तसेच मेकअप ब्रशची विशेष काळजी घ्या. ब्रश नेहमी स्वच्छ ठेवा.

viva@expressindia.com