‘मिसळ’ संस्कृती!

फॅशन इंडस्ट्री ही जगातली दररोज काहीना काही तरी बदल घडवून आणणारी इंडस्ट्री मानली जाते.

लोकल ते ग्लोबल ही सीमारेषाच जणू पुसून गेली आहे इतक्या वेगाने सातासमुद्रापारची फॅशन, तिथलं संगीत, तिथले ब्रँड्स आपण आपलंसं केलं आहे. आणि त्याच सहजतेने आपली फॅशन, आपलं कापड, दागिने, संस्कृती, कला तिथल्या संस्कृतीवर परिणाम करणारी ठरली आहे. दोन वेगवेगळ्या देशांमध्येच ही देवाणघेवाण होते आहे असेही नाही. आपल्या भोवतालचं जगही तितक्याच झपाटय़ाने मूळच्या गोष्टींना सामावून घेत पुढे जातंय. त्यामुळे कपडय़ांच्या फॅशनमध्ये पूर्वाचलमधील कपडे रॅम्पवर आलेत, आदिवासींचा पेहराव, त्यांच्या प्रिंट्स ‘फॅशने’बल झाल्यात. परश्या आणि आर्चीची प्रेमकथा हिंदीत ‘धडक’ देतेय. ‘स्वॅग’च्या तालावर जग नाचतंय तर ‘शेप ऑफ यू’ची टय़ून आपल्याकडे मोबाइलगणिक ऐकू येतेय. ग्लोबलचा ‘ग्लो’ कधीच ‘लोकल’ संस्कृतीला चिकटला आहे आता पाहायला मिळतेय ती ‘ग्लोकल’ संस्कृती..

फॅशन इंडस्ट्री ही जगातली दररोज काहीना काही तरी बदल घडवून आणणारी इंडस्ट्री मानली जाते. आज चालत असलेला ट्रेंड उद्या काहीतरी नवीन रूप घेऊ न आपल्यासमोर येतो आणि यात मोठय़ा प्रमाणात वाटा असतो आपल्याकडे ‘लोकल’ वाटत असलेल्या पण ‘ग्लोबली’ पसंतीस पडणाऱ्या पारंपरिक कापड आणि वेशभूषेचा.

इंटरनेटचा परिस स्पर्श होण्यापूर्वी दुसरा देश म्हटलं की अगदी सातासमुद्रापार वगैरे आहे असं वाटायचं. देश कशाला, दक्षिणेत राहणाऱ्या माणसाला काश्मीरसुद्धा दुसऱ्या देशाच्या जवळ असल्यासारखं वाटत असेल. पण इंटरनेटचा शोध लागला आणि जग पालटलं. दूर दूर वाटणारे देश एका क्लिकसरशी जवळ आले आणि त्या देशाच्या भौगोलिक स्थानासोबत त्या देशाची संस्कृती परंपरा समजून घेणं सोपं झालं.

महाराष्ट्रासाठी म्हणायचं तर आपली नऊ वारी परदेशात जाऊ न पोहोचली आहे. कानात बाळी, नाकाला नथ असे दागिने परदेशात गणेशोत्सवात सर्रास पाहायला मिळतात. नवरात्रीत परदेशात भारतीयांसोबत पाश्चिमात्य लोकही चनिया चोळी घालून नाचताना दिसतात. पण या झाल्या आपल्याला पटकन दिसून येणाऱ्या वरवरच्या गोष्टी. भारत म्हटलं की कपडय़ांमध्ये सगळ्यात पहिलं नाव येतं ते म्हणजे खादी. गांधीजींनी खादीचा आग्रह धरला आणि काही दशकांपूर्वी आपल्याला कालबाह्य़ वाटलेली खादी परदेशात सध्या आवडीने घातली जाते आहे. भारत हातामागात पूर्वीपासूनच अग्रेसर होता मात्र आता हातमागावर विणलेलं कापड आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर वापरलं जाणारं तंत्रज्ञान वापरून कपडे बनवले जात आहेत आणि विशेष म्हणजे ‘मिलान’, ‘न्यूयॉर्क’ अशा नामवंत फॅशन शोमधून ते वापरले जात आहेत. महाराष्ट्राची पैठणी, पंजाबची फुलकारी, आंध्र प्रदेश, ओरिसा आणि हैद्राबादचं इकत, गुजरातची बांधणी, राजस्थानचा घागरा, ईशान्य भारताचं हातमाग, काश्मिरी शाली, तलम हे सगळं आता आंतरराष्ट्रीय स्तरावर पसंत केलं जात आहे.

मुळात फॅशन ही फक्त आपल्याकडून बाहेर जातेय असं नाही कारण आपल्याकडच्या फॅशनवर सध्या पाश्चिमात्य ब्रँड्सचा जास्त प्रभाव आहे. आपल्याकडे सर्रास घातला जाणारा आंतरराष्ट्रीय प्रकार म्हणजे ‘जीन’ची पँट. आपल्याला लक्षातही येत नाही की जे आपलं नव्हतं ते आता ‘लोकल ते ग्लोबल : ग्लोकल’ या संकल्पनेमुळे आपलं झालं आहे. भारतात होणाऱ्या फॅशन  शोमध्येही रॅम्पवर केवळ साडय़ा, भरजरी दागिने घालून भारतीय कपडे घालणाऱ्या मॉडेल्स आता आंतरराष्ट्रीय स्तरावर चलती असलेल्या फॅशनला अनुसरून कपडे घालत आहेत.

मोठे प्रिंट्स, कोल्ड शोल्डर, क्रॅप टॉप्स, तोकडय़ा आणि फाटलेल्या जीन, लेदर जॅकेट्स हे सगळं बाहेरून आलेलं आपण किती आपलंसं केलंय. हे फॅशन ट्रेंड्सच कशाला, हे कपडे विकणारे ब्रँड्ससुद्धा आपले लाडके झाले आहेत. परदेशातल्या मॉल्समध्ये दिसणारी ‘फॉरेव्हर २१’, ‘गुची’, ‘एच अँड एम’ इत्यादी ब्रँड स्टोअर्स आता आपल्याकडच्या मॉल्समध्ये दिसू लागली आहेत. आणि तो काळही दूर नाही जेव्हा परदेशातल्या ‘इंडियन स्टोअर्स’मधून बाहेर निघून भारतीय फॅशन तिथल्या मॉल्समध्ये दिसू लागेल.  ग्लोबलाइज्ड फॅशनला रॅम्पवरून जगासमोर आणणाऱ्या मॉडेल्सची संकल्पनाही मुळातून बदलली आहे की.. पूर्वी दिल्ली-मुंबईतील मुलामुलींना या फॅशन इंडस्ट्रीत पटकन संधी मिळायची पण आता मात्र राज्यांच्या सीमा आणि ‘मॉडेल म्हणजे निव्वळ गोरा वर्ण, सडसडीत बांधा’ हे समीकरण मागे पडत चाललं आहे. बरेलीची प्रियांका आणि हरियाणाची मानुषी जेव्हा ‘मिस वर्ल्ड’सारखा किताब मिळवतात तेव्हा याची प्रचीती येतेच. एकूणच काय फॅशन, मॉडेल्स, अ‍ॅक्सेसरीज या तुमच्या गोष्टी चांगल्या असतील तर त्या तुमच्याच राहणार नाहीत हे नक्की! गेल्या वर्षभरात हा ग्लोकल फॅशनचा ट्रेंड चांगलाच रुळला असून येत्या वर्षांत त्याचे आणखी काही पैलू आपल्यासमोर नवनवं आश्चर्य घेऊन अवतरणार आहे यात शंका नाही.

viva@expressindia.com

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व लेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Fashion industry global fashion

ताज्या बातम्या