फॉलो मी

‘रोडीज’ फेम रणविजय सिंघाची मुलगी कायनात सिंघादेखील तिच्या अकाऊंटवरून लोकांपर्यंत पोहोचते आहे.

Follow me on Instagram
प्रसिद्धीचं नवं तंत्र आपल्या पदरात पाडून घेण्याचा इन्स्टा पायंडा भलताच ‘फेमस’ होतो आहे.

लहान बाळांच्या, प्राणीमित्रांच्या गोष्टीही आपणच सांगून मोकळं व्हायचं आणि मग ‘फॉलो मी..’ म्हणायचं, हे प्रसिद्धीचं नवं तंत्र आपल्या पदरात पाडून घेण्याचा इन्स्टा पायंडा भलताच ‘फेमस’ होतो आहे.

आजच्या जमान्यात कोणाचं काय चाललं आहे हे जाणून घेण्यासाठी सगळ्यात उत्तम मार्ग म्हणजे इन्स्टाग्राम नि ट्विटर अकाऊंट्स. हल्ली सगळेच या लाटेवर स्वार झालेले असल्याने एखाद्या व्यक्तीच्या किंवा सेलेब्रिटीजच्या जवळ पोहोचण्याचा हा सोपा मार्ग झाला आहे. हॅशटॅग, कॅप्शन हे तर एखाद्याची मानसिकता समजून घेण्याचा उत्तम मार्ग. एखाद्याच्या मनात शिरण्याचा मार्ग पोटातून जातो असं म्हटलं जायचं. नव्या समीकरणांनुसार हा ‘इन्स्टा’ मार्गच महामार्ग ठरतोय. आत्तापर्यंत आपल्या मनातल्या गोष्टी सांगण्यासाठी या माध्यमांचा वापर केला जायचा. मात्र सध्या पाळण्यातल्या बाळापासून, घरातील पेट्सनाही या माध्यमांनी एकटं सोडलेलं नाही. त्यांच्या स्टोरीजही आपणच सांगून मोकळं व्हायचं आणि मग ‘फॉलो मी..’ म्हणत प्रसिद्धीचं हे नवं तंत्र आपल्या पदरात पाडून घेण्याचा नवा पायंडा भलताच ‘फेमस’ होतो आहे.

हल्ली ‘मॉमी सेज आय अ‍ॅम क्युट’, ‘गोइंग आऊट विथ मॉमी अँड डॅडी’, ‘माय नेम इज’, ‘आय अ‍ॅम’, ‘मंथ्स ओल्ड अँड आय अ‍ॅम न्यू टू इन्स्टाग्राम’ अशा आशयाची कॅप्शन असणारी इन्स्टाग्राम अकाऊंट सध्या तुमच्या नजरेस पडत असतील. बरं इन्स्टाग्राम न वापरणाऱ्या मंडळींना यात काय विशेष आहे, असं जर वाटत असेल तर थांबा. निव्वळ वयात आलेल्या आणि कळायला लागलेल्या मुलामुलींनी अशी कॅप्शन्स दिली तर त्याचं इतकं काय कौतुक करायचं, असं जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही सपशेल चुकताय. खरं तर ही  सगळी अकाऊंट्स आहेत व्यवस्थित बोलायलाही न येणाऱ्या किंवा बोबडय़ा बोलीनं, दुडक्या चालीनं आजूबाजूचं जग समजून घेण्याचा प्रयत्न करणाऱ्या चिमुरडय़ांचा.. क्वचितप्रसंगी या अकाऊंट्सची मालकी घरातल्या मुक्या प्राणिमित्रांकडेही असलेली तुम्हाला पाहायला मिळेल.

पूर्वी आपल्या घरात नवीन सदस्य, बाळ किंवा पाळीव प्राणी आला किंवा आली, की समाजाला त्यांच्याशी ओळख करून द्यायची असल्यास एखादा छोटेखानी कार्यक्रम केला जायचा. मग नवीन बाळाचे शेजाऱ्यापाजाऱ्यांकडून कोडकौतुक आणि लाड व्हायचे. अगदी ‘थोडा वेळ घेऊन जाते गं! मग थोडं खेळला की आणून देते’, अशा विश्वासावर एका घरातलं बाळ चार घरी खेळून, खाऊन वाढायचं. मग शहरात चाळी जाऊन फ्लॅट आले आणि दारं लावून ‘ए, बी, सी, डी लिहून काढ’ असं म्हणत मुलं मोठी होऊ  लागली. आता तर डिजिटलचा जमाना आहे. हल्ली शेजाऱ्यांचीच काय, पण सेलेब्रिटीजची मुलं कुठे जातात, काय खातात, कसे राहतात अशी सगळी माहिती एका क्लिकवर मिळायला लागली आहे.उदाहरणच द्यायचं झालं तर गेल्याच वर्षी अभिनेता करणवीर बोहरा आणि त्याची पत्नी यांना दोन जुळ्या मुली झाल्या. ओघानेच मीडियाने ही बातमी उचलून धरली. मग या दोघी कशा आहेत, कशा दिसतात याची उत्सुकता असतानाच ‘ट्विन बेबी डायरीज’ अशा नावाचं इन्स्टाग्राम अकाऊं ट दाखल झालं आणि जणू काय बेला आणि व्हिएन्नाचं बोलत आहेत असं कॅप्शनमधून भासवत त्यांचा इन्स्टाग्राम प्रवास सुरू करण्यात आला. अर्थात, हे अकाऊंट त्यांची आई सांभाळते आहे. मात्र या आभासीच काय अजून वास्तव जगात काय सुरू आहे हेही पुरतं समजत नसलेल्या या दोघींच्या ‘इन्स्टा’ स्टोरीजने अक्षरश: सगळ्यांच्या मनावर गारूड घातलं आहे. हे झालं आपल्या परिचयाच्या एका अभिनेत्याचं उदाहरण. मात्र असे अनेक अकाऊं ट्स सध्या इन्स्टाग्रामवर पाहायला मिळतात आणि तुमच्या ओळखीचं असो वा नसो कुतूहलापोटी त्या फॉलो केल्या जातात.

‘रोडीज’ फेम रणविजय सिंघाची मुलगी कायनात सिंघादेखील तिच्या अकाऊंटवरून लोकांपर्यंत पोहोचते आहे. लहान मुलांचे स्वतंत्र इन्स्टाग्राम अकाऊंट्स तयार करून त्यावर त्यांचे गोंडस फोटो पोस्ट करून त्यावर जणू तेच बोलत आहेत, अशा आशयाच्या कॅ प्शन पाहणाऱ्यांनाही बऱ्याच प्रमाणात आवडतात. म्हणूनच अशा अकाऊं ट्सवर फॉलोअर्सचा आकडा बराच मोठा असतो. केवळ भारतातच नाही तर जगाच्या पाठीवर असणाऱ्या सगळ्याच देशांमध्ये हा ट्रेंड दिसून येतोय. सेलेब्रिटीजच नाही तर अगदी सामान्य माणसंदेखील आपापल्या मुलांचे असे अकाऊं ट्स तयार करून फेमस होत आहेत. सिंगापूरच्या ‘लिया-लॉरेन’, अमेरिकेची ‘मिला’, इंग्लंडचा ‘हर्लेन बोधी व्हाइट’, ‘द एस’ फॅमिली फेम ऑस्टिन मॅकब्रूम नि कॅथरीन पाईझ यांची मुलगी ‘एल’ ही मंडळी सध्या या माध्यमातील स्टार मंडळी ठरली आहेत.

एरव्ही आपली जिमपासून एअरपोर्टपर्यंतची प्रत्येक ‘मुव्ह’ चाहत्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी धडपडणारी आपली बॉलीवूड किंवा मराठी सिनेयुगातील मंडळी सध्या तरी हा ट्रेंड फॉलो करताना दिसत नाहीत. मात्र हॉलीवूड सेलेब्रिटीज काही प्रमाणात या गोष्टींकडे वळताना दिसत आहेत. ऑलिम्पिक जलतरणपटू मायकल फेल्प्सचा मुलगा बुमर फेल्प्स हादेखील त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटच्या माध्यमातून लोकांचं प्रेम मिळवत आहे.

माणसं तर माणसं, पण आपल्या प्राणिमित्रांनाही त्यांच्या मालकांनी या माध्यमापासून लांब ठेवलेलं नाही. हे पाळीव सदस्य जणू काही स्वत: अकाऊंट तयार करून आपल्या भाषेत बोलत आहेत असं भासवण्याची एकच चढाओढ सध्या सुरू आहे. ही अकाऊं ट्स लाइक्स आणि फॉलोअर्स मिळवत असल्याने त्यांचं प्रमाण सध्या वाढतंच राहिलेलं आहे. या ट्रेंडमध्ये सगळ्यात मोठं नाव म्हणजे आपल्या ‘देसी गर्ल’ प्रियांका चोप्राचं आहे. प्रियांकाने आपल्या ‘डायना चोप्रा’ या श्वानाच्या नावाने हे अकाऊंट सुरू केलं आहे. या अकाऊंटवर जणू डायनाच सगळ्यांशी बोलते आहे अशा स्वरूपात कॅप्शन्स तिचे प्रियांका टाकत असते. प्रत्यक्षात हे अकाऊंट प्रियांका किंवा तिच्या वतीने कोणी तरी सांभाळत असावं; पण बघणाऱ्याला दोन मिनिटं का होईना हे अकाऊंट खिळवून ठेवतं हे नक्की. किश्वर र्मचट आणि सुयश राय यांचा बेगल कुत्रा ‘बटुकनाथ राय’देखील त्याच्या अकाऊंटवरच्या कॅप्शन आणि फोटोजमुळे बराच प्रसिद्ध झाला आहे.

मुळात हे अकाऊंट्स बनवताना त्यांच्या परिचयामध्ये ‘हॅण्डल्ड बाय अमुक अमुक’ असं बऱ्याचदा लिहिलेलं आढळतं, मात्र बघताना तत्सम बाळं आणि प्राणी बोलत आहेत असं भासवणारी ही अकाऊं ट्स सध्या लोकांसाठी चर्चेचा विषय ठरली आहेत. हा ट्रेंड सध्या आवडीचा आणि मनाला भुरळ पाडणारा असला तरी यामागची मानसिकता जाणून घेणं महत्त्वाचं आहे. केवळ प्रसिद्धी मिळावी आणि नाव व्हावं हा हेतू ध्यानात घेऊन जर हे होत असेल तर मग सेलेब्रिटीजना याची काय गरज? असा प्रश्न उद्भवतो. मात्र केवळ मनोरंजन किंवा लोकांपर्यंत पोहोचण्याचा एक सोपा मार्ग म्हणून याकडे पाहिलं तर ही गोष्ट केवळ लोकांना आकर्षित करण्यासाठी, सोशल मीडियाचा खऱ्या अर्थाने केवळ सोशिअली अपडेट राहण्यासाठी केली जाते असं लक्षात येतं. कारण काहीही असो, पण आपलं प्रेम, भावना, प्रवास दाखवण्याचा हा उत्तम मार्ग आहे हे सर्वमान्य आहे. त्यामुळे ज्यांना मुळातच या सगळ्यांची जाणीवही नाही अशा बाळांना आणि प्राण्यांना यात सामील केलं जातं आहे. केवळ मनोरंजन किंवा लोकप्रियता यासाठी वापरला जाणारा इन्स्टाग्राम अकाऊं टचा पर्याय हा प्रत्येकाचा खासगी प्रश्न आहे. त्यामुळे हे किती चूक, किती बरोबर यापेक्षा या सगळ्यात त्या मुलाच्या किंवा प्राण्यांच्या मानसिकतेवर त्यांचे फोटोज, व्हिडीओ काढताना किती परिणाम होतो याचा अभ्यास करणं महत्त्वाचं आहे.

शेवटी एक गोष्ट नक्कीच कबूल करावी लागेल की, या गोष्टी आपल्याला नकळत आनंद देतात. काही काळासाठी का होईना, पण यांचे अकाऊंट्स बघत स्वत:चे त्रास, दु:ख विसरायलाही लावतात. त्यामुळे तुम्हीसुद्धा थोडा वेळ काढून यांना तुमच्या अकाऊंटवरून नक्की भेट द्या आणि तुम्हाला किती आनंद झाला ते आम्हाला नक्की कळवा. तोपर्यंत ‘जस्ट गो, फॉलो देम अँड लाइक..’

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Follow me on instagram