फ्रान्समध्ये राष्ट्राध्यक्षपदासाठी निवडणुका झाल्या आणि इमॅन्युअल मॅक्रॉन निवडून आले. मॅक्रॉन यांच्या विजयात भारतातल्या काही जणांचा वाटा आहे. कसं ते पुढचं वाचल्याशिवाय कसं कळणार!

हॉलीवूड चित्रपटात नायक म्हणून काम करू शकतील असे मध्यममार्गी विचारांचे (मध्यमवर्गी नव्हे) इमॅन्युअल मॅक्रॉन आता फ्रान्सचे नवे राष्ट्राध्यक्ष असणार आहेत. आपल्याकडे नेते ज्या वयात ग्रामपंचायतीची निवडणूक लढवण्याचा विचार करतात, अशा ३९व्या वर्षी मॅक्रॉन फ्रान्सचे सगळ्यात युवा अध्यक्ष झाले आहे. फ्रान्स म्हटलं की पॅरिसचा आयफेल टॉवर, रंगीबेरंगी फॅशन सप्ताह डोळ्यांसमोर तरळतात. मात्र त्याच वेळी हा देश सातत्याने दहशतवादी हल्ल्यांचे केंद्रस्थान झाला आहे. विविध पातळ्यांवर विस्कळीत झालेल्या देशाचे सुकाणू आता मॅक्रॉन यांच्या हाती आहेत. आपल्याकडे नेते म्हटलं की रेती, वाळू, डंपर व्यावसायिक असणं स्वाभाविक असतं. पण फ्रान्समध्ये अशी काही व्यवस्था नाही. मॅक्रॉन यांनी फिलॉसॉफीचं शिक्षण घेतलंय. लेखनाचंही काम केलंय. पब्लिक अफेअर्समध्ये मास्टर्स डिग्री मिळवली आहे. उच्चविद्याविभूषित म्हणता येईल असे ते माजी बँक अधिकारी आहेत. राजकारणाचा वारसा नसतानाही त्यांनी राष्ट्राध्यक्षाची निवडणूक कशी जिंकली हे जाणून घेणं रंजक आहे. पण सोशल मीडियावर चर्चा कसली तर मॅक्रॉन यांच्या पत्नी ब्रिगेट त्रोगुनस यांची. फर्स्ट लेडी झालेल्या ब्रिगेट मॅक्रॉन यांच्यापेक्षा तब्बल २४ वर्षांनी मोठय़ा आहेत. आता हा अगदीच वैैयक्तिक विषय झाला. पण लोकांच्या पर्सनल गोष्टी पब्लिक प्लॅटफॉर्मवर चघळणं हाच अनेकांचा वेळ घालवण्याचा उद्योग असल्याने आमची पंचाईत होते. परवाच आपल्या एका सेलिब्रेटीचं तिसरं लग्न होतं. वधुवरांस शुभेच्छा देण्यास त्या सेलिब्रेटीची मुलंही उपस्थित होती. बायॉलॉजीलाही कोडय़ात टाकणारं हे इक्वेशन आहे आपल्याकडे. व्यक्तिस्वातंत्र्याचे पुरस्कर्ते असल्याने मॅक्रॉनजी आणि ब्रिगेट मॅडम यांच्यातील अंतराचा मुद्दा आम्ही निकाली काढला. दृष्टी निकोप राहण्यासाठी पॉप्युलर कल्चरविरुद्धची पावलं उचलावी लागतात आम्हाला. मॅक्रॉन यांच्या विजयात भारतातल्या काही व्यक्तींचा वाटा असल्याचं आमच्या कानी आलं. पाँडिचेरी ही फ्रेंच वसाहत होती. स्वातंत्र्यानंतर अर्थातच हे सगळं भारतात विलीन झालं. मात्र आजही पाँडिचेरी केंद्रशासित प्रदेशात साधारणत: चार हजारहून जास्त फ्रेंच नागरिक आहेत. या मंडळींनी २४ एप्रिलला मतदानाचा हक्क बजावला. कराईकल (तामिळनाडू), माहे (केरळ) आणि यानम (आंध्र प्रदेश) अशा ठिकाणी फ्रेंच मंडळी विखुरली आहेत. तांत्रिकदृष्टय़ा आज हा भाग भारतात आहे. मात्र वातावरण फ्रेंचबहुल आहे. पाँडिचेरीत फ्रान्सच्या काऊन्सिलेट जनरलचं ऑफिस आहे. भरपूर लोकसंख्या आणि क्षेत्रफळ असूनही राष्ट्राध्यक्षासाठीच्या निवडणुकीत तिथली व्यवस्था ७८७६ किलोमीटर अंतरावर असलेल्या आपल्या बांधवांना विसरलेली नाही. २४ तारखेला सकाळी ८ ते रात्री ७ अशी मतदानाची वेळ होती. ‘मतदान कमी झालं किंवा नागरिकांनी अविचारी मतदान केलं तर काय होतं हे आपण अमेरिकेत पाहतोय. फ्रान्सला चांगलं नेतृत्व मिळावं अशी आमची इच्छा आहे असं एका आजोबांनी मतदान केल्यानंतर सांगितलं.  फ्रान्सबाहेर राहणाऱ्या नागरिकांसाठीची पेन्शनची रक्कम वाढवून देण्याचं आश्वासन मॅक्रॉन यांनी दिलं होतं. म्हणून त्यांनाच मत दिलं’, असं आजोबांनी स्पष्ट केलं. भारतीय आणि फ्रान्सच्या मंडळीत रोटीबेटीचे व्यवहार झालेत. फ्रेंचमध्ये जन्मलेली, भारतात स्थायिक झालेली माणसं आहेत. अर्ध कुटुंब भारतात आणि बाकीचा गोतावळा फ्रान्समध्ये असंही आहे.भारत-फ्रान्स असं येणं जाणं सुरु असतं. दर पाच वर्षांनी राष्ट्राध्यक्ष पदाची निवडणूक होते. न चुकता ही मंडळी भारतातून मतदान करतात. फ्रान्समध्ये आशिया, आफ्रिका तसेच मध्यपूर्वेतून असंख्यजण स्थलांतरित झाले आहेत. फ्रान्स सरकारने देशात आलेल्या प्रत्येकाला मदत केली आहे. मात्र आता या मंडळींमुळे भूमिपुत्रांचं नुकसान झालं आहे अशी टीका तीव्र झाली आहे. टोकाची भूमिका घेऊन काही साध्य होत नाही. मॅक्रॉन या प्रश्नी सुवर्णमध्य काढतील अशी आशा आहे. म्हणून त्यांना मतदान केलं रंजन बाबूंनी सांगितलं. निसर्गरम्य यानम शहरातल्या मंडळींना मतदानासाठी चार ते सहा तासांचा प्रवास करावा लागतो. मात्र तरीही त्यांनी मतदानाचा हक्क सोडलेला नाही. निकोलस सारकोझी यांना पदावरून बाजू करण्यातही त्यांचा वाटा होता. निवडणूक फ्रान्समध्ये होत असली तरी भारतात राहणाऱ्या फ्रान्सच्या नागरिकांपर्यंत उमेदवारांची माहिती पोहचवली जाते. मतदान करणाऱ्यांचा रेकॉर्ड अपडेट केला जातो. निवडणूक होते तेव्हा फ्रान्समधून काही अधिकारी मंडळी जातीने हजर असतात. सगळं सुरळीत झाल्यानंतरच ते मायदेशी परतात. आपण ज्याला मतदान केलं तोच माणूस राष्ट्राध्यक्ष म्हणून निवडून आल्याने सोमवारी या परिसरात जल्लोषाचं वातावरण होतं. भारतीय भूमीत असले तरी त्यांची नाळ फ्रान्सशी जोडली गेली आहे. ट्रॅफिक अडवून रोड शो नाही, उसनी गर्दी आणून टाळीबाज सभा नाहीत, आश्वासनांची खैरात नाही, पेड न्यूजरूपी जाहिराती नाहीत, शहर विद्रूप करणारी होर्डिग नाहीत आणि तरीही मॅक्रॉन यांना भारतातून मतं मिळाली आहेत.

viva@expressindia.com