अभिनयाचं जग मोठं अनोखं. लेखकाने चितारलेलं व्यक्तिमत्त्व जगायचं हेच काम. पण हे करताना मूळ माणसाचं काय होतं? त्याचे विचार, आवडनिवड, भूमिका तो मांडू शकतो का? पडद्यावरचा आणि वास्तवातला तो किंवा ती किती अंतर असतं? पुरस्कार ही दरी सांधतो का? तुम्हीच वाचा आणि ठरवा

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘जीवनगौरव पुरस्काराने मला सन्मानित केल्याबद्दल मी सर्वाची ऋणी आहे. हॉलीवूड फॉरेन प्रेसचे मनापासून आभार. सभागृहात उपस्थित सर्वचजण समाजातील जनाधार असलेला वर्ग आहे. आपल्यातील बहुतांश कामाच्या शोधात हॉलीवूडमध्ये दाखल झाले. कोणी आर्यलडमध्ये जन्मला आहे, कुणी इटलीतून कारकीर्दीची सुरुवात केली आहे, कुणी इथिओपियातून स्थलांतरित झालं आहे. प्रत्येकाची जन्मभूमी वेगळी पण कर्मभूमी एकच आहे. हे हॉलीवूड बाहेरच्या उपऱ्या माणसांनीच भरलंय असं म्हणावं लागेल. या सगळ्यांना बाहेरचा रस्ता दाखवला तर उरेल फुटबॉल आणि मिक्स्ड मार्शल आर्ट्स. त्यातही काही आर्ट नाही. अभिनेत्याचं काम हेच असतं की काल्पनिक व्यक्तिरेखा जगून ती प्रेक्षकांसमोर रसरशीतपणे सादर करणं. यंदाही असेच जिवंत परफॉर्मन्सेस सादर करणाऱ्या मंडळींना गौरवण्यात येतंय. मात्र यावर्षीच्या एका परफॉर्मन्सने मी अस्वस्थ झाले. मनाच्या सांदीकोपऱ्यात जपलेल्या तत्त्वांना धक्का बसला. तो परफॉर्मन्स अजिबातच चांगला नव्हता. देशातील सर्वोच्च पदावर विराजमान होणाऱ्या व्यक्तीने अपंग पत्रकाराची जाहीरपणे खिल्ली उडवली. पद, प्रतिष्ठा आणि अधिकार यांची पायमल्ली करणारी ती कृती होती. त्या प्रसंगाने मी आतून मोडून पडले. ते दृश्य मी विसरू शकत नाही. कारण तो चित्रपटातला प्रसंग नव्हता. खरंखुरं वास्तव होतं. सार्वजनिक व्यासपीठाचा दुरुपयोग वैयक्तिकपणे एखाद्याला अपमानित करण्यासाठी का व्हावा? सर्वोच्च पदावरील व्यक्तीनेच असे केल्याने समस्त प्रजेला असे बेताल वागण्यासाठी कुरण मोकळे झाले. अनादराने अनादरच मिळतो. हिंसेला हिंसेनेच प्रत्युत्तर मिळते. सर्वसत्ताधीश व्यक्ती पदाचा असा उपयोग करते तेव्हा तो नाही, आपण हरलेलो असतो. सत्ताधुंद झालेल्यांना वठणीवर आणण्यासाठी नैतिकतेचं अधिष्ठान असलेली प्रसारमाध्यमे अत्यावश्यक आहेत. म्हणूनच आपल्या घटनेत माध्यमांच्या स्वातंत्र्याचा आवर्जून उल्लेख आहे. हे स्वातंत्र्य अबाधित राखणं ही केवळ प्रसारमाध्यमांची नव्हे तर नागरिक म्हणून प्रत्येकाची जबाबदारी आहे. पत्रकारांच्या पाठीशी ठामपणे उभे राहायला हवे. आपल्याला समाज म्हणून यशस्वी वाटचाल करायची असेल तर सक्षम पत्रकारांची फौज आवश्यक आहे.’ अमेरिकेतील ‘गोल्डन ग्लोब’ या प्रतिष्ठित पुरस्कार सोहळ्यात जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित ६७ वर्षीय अभिनेत्री मेरील स्ट्रीप यांचं हे पुरस्कार स्वीकारल्यानंतरचं मनोगत.

हे झालं हॉलीवूडचं. आमच्यासारख्या बॉलीवूडप्रेमींसाठी रविवारचा दिवस फार महत्त्वाचा असतो. सोम. ते शनि. दैनिक साबण अर्थात ‘डेली सोप’च्या गुऱ्हाळातून बाहेर पडून मोकळा श्वास घेण्याचा क्षण म्हणजे रविवार. प्राचीनकाळी रविवारी आम्ही सर्कस पाहायला जायचो. कालौघात प्राण्यांना दिल्या जाणाऱ्या अमानुष वागणुकीमुळे सर्कस मागे पडली. पण या सर्कशीची उणीव भासत नाही आम्हाला. म्हणजे कसं ते सांगतो. मंगळवार-गणपतीचा, गुरुवार-दत्तांचा, शनिवार-मारुतीचा. तसं रविवार-पुरस्कार सोहळ्यांचा. आठवडा चांगला जाण्यासाठी रविवारची संध्याकाळ या पुरस्कार सोहळ्यांसाठी आम्ही मुक्रर केली आहे. पुरस्काराचं नाव वाचूनच जिभेचा व्यायाम होतो. ‘क’ अवॉर्ड स्पॉन्सर्ड बाय अमुक-पॉवर्ड बाय तमुक- इन असोसिएशन विथ ईफग असा आमचा ब्रँडिगचा अभ्यास होतो. सगळ्यात भावते ती स्वच्छता मोहीम. आयोजकांना साफसफाईसाठी वेगळा खर्च येऊ नये यासाठी सात किलोमीटर इतक्या परिघाची पायधूळ झाडू शकेल असा गाऊन घालणाऱ्या अभिनेत्री आम्हाला अत्यंत आदरणीय वाटतात. केरसुणीसदृश त्यांचा पोशाख फॅशन डिझायनिंगमधला चमत्कार वाटतो आम्हाला. एकाच वेळी दोन व्यक्तींना अभिवादनी चुंबन करण्याची पद्धतही किती भन्नाट आहे. गालाला गाल भिडवायचा एकाला आणि ओठांचा चंबू दिसतो मागच्या माणसाला. गर्दी किती असते अशा सोहळ्यांत. किती लोकांना भेटणार! एका दगडात म्हणजे एका फ्लाइंग किसात दोन व्यक्ती जोडल्या जातात.

आम्ही पडलो पाषाणहृदयी. रूड वगैरे म्हणतात आमच्या बोलण्याला. असं मधाळ, तुम्ही छान-आम्ही छान, गोड बोलण्याचा डेमो म्हणून पुरस्कार सोहळ्यांकडे पाहतो आम्ही. शिकणं, सुधारणं महत्त्वाचं. पाणउतारा करणे, व्यंगाला उद्देशून, वैयक्तिक गोष्टींवरून कसे टोचून बोलावे याचा क्लासच होतो आमचा. नृत्य म्हणजे तंग कपडय़ातले शारीरिक अंगविक्षेप अशी नवीनच व्याख्या पुरस्कार सोहळ्यांच्या निमित्ताने उमगली आम्हाला. इंड्रस्टीत महिला कलाकारांची अभूतपूर्व टंचाई निर्माण झाल्याचंही लक्षात आलंय आमच्या. का म्हणून काय विचारता- बीभत्स दिसत असूनही पुरुष कलाकार बायकांच्या वेशात स्किट सादर करतात. विनोद ही हसण्याची नव्हे तर केविलवाणं वाटण्याची प्रक्रिया आहे असा एक महत्त्वपूर्ण शोध आम्हाला लागला आहे. स्वत:वर किंवा सहकाऱ्याला उद्देशून कोटय़ा करणं, मध्येच थोडंसं लोळणं, वस्त्रहरण करून घेणं अशा गोष्टी विदूषकरूपी निवेदकांना कराव्या लागतात. तुम्हाला सांगतो ‘मार्केट प्रेशर’ हो!   (उर्वरित पान ४ वर) पुरस्कारानंतर सन्मानार्थी बोलण्यापेक्षा पुरस्कार देऊन त्याचं तोंड बंद करता येऊ शकतं हा समाजशास्त्रीय सिद्धांत अत्यंत मोलाचा. सन्मानार्थीना स्थानिक, राज्यस्तरिय किंवा देशातील राजकारण्यांविषयी काही बोलण्याची वेळ येत नाही. कारण अनेकदा पुरस्कार प्रदान करायला राजकारणीच असतात. त्यांच्या पायाला हात लावून वंदन करून पुरस्कार स्वीकारायचा असतो ही शिकवण मिळते आम्हाला. अभिनय, तंत्रकौशल्य या सगळ्याची दखल घेत पुरस्कार मिळणं फारसं महत्त्वाचं नसतंच. बाहुली, बाहुला, काष्ठशिल्प अशारूपी पुरस्कार काय हो-कुठल्याही रविवारी पदरात पाडून घेता येतो. नॉट अ बिग डील. एरव्ही सगळे आपापल्या कामात दंग असतात. पुरस्कार सोहळ्याच्या निमित्ताने गेटटूगेदर होतं. खाणं-पिणं होतं. ते महत्त्वाचं. प्रचंड जनाधार असूनही बॉलीवूडकरांना मनातलं सांगण्यासाठी ब्लॉग किंवा ट्विटचा आधार घ्यावा लागतो. कलाकारानं विविधांगी भूमिका कराव्यात पण भूमिका घेऊ नये ही दर रविवारची शिकवणी. मेरीलताईंसारखं आपणही बोलावं असं इथल्या अनेकांच्या मनी दाटून आलं पण पुरस्कार आडवा येतो..

(‘ऑस्करआणि आपले पुरस्कार, ‘गोल्डन ग्लोबआणि आपले पुरस्कार असा तौलनिक अभ्यास जिज्ञासूंनी अवश्य करून आम्हाला पाठवावा. मात्र सदरहू अभ्यासासाठी कोणताही पुरस्कार दिला जाणार नाही याची अभ्यासकांनी नोंद घ्यावी.)  

मराठीतील सर्व लेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Golden globe awards issue