scorecardresearch

Premium

कल्लाकार : ‘चल’नी नाणं..

चप्पल कशी तयार करायची याचं प्राथमिक ज्ञानच हर्षवर्धनला नसल्यामुळे या तक्रारी येणं साहजिकच होतं.

कल्लाकार : ‘चल’नी नाणं..

कॉलेजमध्ये असताना ट्रॅडिशनल डेच्या दिवशी पारंपरिक वस्त्रांसह त्याने पायात कोल्हापुरी जोडे घातले होते. त्याच वेळी महाराष्ट्राची शान असलेल्या पायातील या जोडय़ांची मोहिनी त्याच्यावर पडली. तळपायाला जड असणाऱ्या या चप्पलांचं लेदर मऊ करून देशभरात त्याला एक आगळंवेगळं स्थान देता येईल, हा विचार त्याच्या मनात डोकावला आणि तो नेटाने कामाला लागला. आज आपल्या देशाबरोबरच फ्रान्स, अमेरिका, युरोप येथेही कोल्हापुरी चपलांसाठी बाजारपेठ निर्माण करणारा हा आधुनिक चर्मकार हर्षवर्धन पटवर्धन आहे आपला आजचा कल्लाकार..

हर्षवर्धन मूळचा पुण्याचा. त्याचं शालेय व महाविद्यालयीन शिक्षण पुण्यातच झालं. हर्षवर्धन कॉलेजमध्ये शिकत असताना एक दिवस ट्रॅडिशनल डेच्या निमित्ताने त्याने मराठमोळ्या कपडय़ांवर खास पारंपरिक कोल्हापुरी चप्पल घातली. वजनाने जरा हलकी व दिसायलाही सुंदर असलेली ही चप्पल हर्षवर्धनला भलतीच आवडली. त्या दिवसापासून आजपर्यंत तो फक्त आणि फक्त कोल्हापुरी चपलाच पायात घालतो आहे. पुढे मास्टर्स पदवी प्राप्त करण्यासाठी त्याने ‘नॉर्थ इंग्लंड युनिव्हर्सिटी’मध्ये प्रवेश घेतला. इंग्लंडमध्ये शिकत असतानासुद्धा तो कोल्हापुरी चपलाच घालायचा. त्याच्या वडिलांचा पुण्यात ट्रान्सपोर्टचा उद्योग आहे. मास्टर्स पूर्ण करून भारतात परतल्यावर हर्षवर्धनने वडिलांच्या व्यवसायात हातभार लावायला सुरुवात केली. व्यवस्थापन विषयात मास्टर केलेल्या हर्षवर्धनला त्याच्या वडिलांनी ‘तू आता बॉस हो आणि मला रिटायर कर’ अशी गळ घालायला सुरुवात केली. ज्यांच्यासमोर आपण लहानाचे मोठे झालो, गेली २० र्वष जे आपल्या वडिलांसोबत काम करत आहेत, अशा वयाने मोठय़ा असलेल्या लोकांचा एका क्षणात बॉस होणं त्याला उचित वाटलं नाही. म्हणून काही महिने तो वडिलांसोबतच काम करू लागला. हर्षवर्धनला नेहमीच काही तरी वेगळं करण्याची आवड होती. त्याची सर्जनशील दृष्टी ट्रान्सपोर्ट व्यवसायातही काही वेगळं करू पाहत होती, मात्र तिथे त्याच्या पदरी निराशा पडली. वडिलांच्या या उद्योगात आपल्याला काही गोडी लागत नाही, हे त्याच्या लक्षात आलं. तेव्हा त्याने काम सांभाळत नवनवीन हटके व्यवसाय काय करता येईल याच्या कल्पना लिहून काढल्या व त्यावर काम करायला सुरुवात केली. साधारण दोनशे व्यवसाय कल्पनांना हर्षवर्धनने त्या वेळी जन्म दिला.. पण एकाही कल्पनेला यश आले नाही. या कारणामुळे हर्षवर्धनला हळूहळू नैराश्य येऊ  लागले.

Cozy Cardio
‘रोज गाणी ऐकत ४५ मिनिटे घरातच चाला’ असे सांगणारा Cozy Cardio व्यायाम नक्की आहे तरी काय? जाणून घ्या सर्वकाही
pune young girl raped, young girl cheated for 26 lakhs, matrimonial site
तरुणीवर बलात्कार, २६ लाखांची फसवणूक; विवाहनोंदणी संकेतस्थळावरून ओळख
srikanth kulkarni article on his teacher sadashiv martand garge
मला घडवणारा शिक्षक : ऋषितुल्य व्यक्तिमत्त्वाचे गर्गे सर
traditional methods prevents specs early age
आयुर्वेदाच्या स्मृतीतून: लहान मुलांचा चष्मा

मे २०१४ मधली ही गोष्ट.. एवढय़ा दोनशे गोष्टींमधून एकही यशस्वी ठरत नाही आहे.. याच निराशेने विचार करत घरी एकटाच शांत बसलेल्या हर्षवर्धनचं लक्ष समोर पडलेल्या त्याच्याच रोजच्या वापरातल्या कोल्हापुरी चपलेकडे व लेदर जॅकेटकडे गेलं. तेव्हा त्याच्या मनात विचार चमकून गेला की कोल्हापुरी चपलेला आजपर्यंत कोणी सॉफ्ट लेदरमध्ये का आणलं नाही? कोल्हापुरी चपलेचं लेदर जाड असतं. कोल्हापुरी चपल ही पायाला चावते, ती घातल्यावर घसरून पडण्याची भीती असते, तिला सुरक्षिततेचं वलय नाही, अशा तक्रारी नेहमीच येत असतात. मग कोणीच कसं या विषयाकडे लक्ष देत नाही? या प्रश्नाबरोबरच आपणच यात लक्ष घालायचं आणि कोल्हापुरी चपलेला नवीन आकार द्यायचा त्याचा निर्णय ठाम झाला. त्याच उत्साहात तो उठला आणि कोल्हापुरी चपलांच्या अभ्यासासाठी कोल्हापुरात येऊन थडकला. जर कोल्हापूरला गेल्यावर मला माझ्या निर्णयाला अपेक्षित कौल मिळाला नाही तर मी कोल्हापुरी चपला जशा आहेत तशा जगभर पोहोचवीन, असा निर्णय त्याने पुणे-कोल्हापूर प्रवासातच घेतला.

कोल्हापूरमधील सुभाष नगर या परिसरात कोल्हापुरी चपला बनवणाऱ्या कारागिरांची मोठय़ा प्रमाणावर वस्ती आहे. तिथे हर्षवर्धन पोहोचला. प्राथमिक माहिती मिळवून, काही युनिक चपला त्याने कारागिरांकडून विकत घेतल्या. विकत घेतलेल्या चपला हर्षवर्धनने पुण्यात आल्यावर त्याच्या मित्रांना दाखवल्या. माझे मित्र मला म्हणाले, ‘‘या चपलांमध्ये तू म्हणतो आहेस तसं काही नावीन्यपूर्ण कलाकुसर आम्हाला दिसत नाही आहे. तू तुझ्या कल्पनाशक्तीला ताण देऊन तुझी कलाकुसर या चपलांमध्ये उतरव.’’ त्यांच्या या सल्ल्याने मला थोडी ऊर्जा मिळाली, असं हर्षवर्धन सांगतो. त्याने मुंबईत धारावीमधून लेदरच्या चपलांचे काही नमुने गोळा केले आणि ते नमुने घेऊन तो पुन्हा कोल्हापूरला गेला. कोल्हापूरला आल्यावर त्याने ते नमुने कारागिरांना दिले आणि त्यांची मदत घेऊन कल्पनाशक्तीच्या बळावर निळी कोल्हापुरी चप्पल, हिरवी कोल्हापुरी चप्पल तयार केली. साधारण अशा दहा वेगवेगळ्या चपला तयार करून तो पुण्यात परतला. त्याने मित्रांना तयार केलेल्या या चपला दाखवल्या. नावीन्यपूर्ण अशा कोल्हापुरी चपला बघून मित्रदेखील हुरळून गेले; पण चपलांमध्ये काही त्रुटी आढळून आल्या. चपलेचा दोरा तुटतो आहे, अंगठा तुटतो आहे, या प्राथमिक तक्रारी समोर आल्या.

चप्पल कशी तयार करायची याचं प्राथमिक ज्ञानच हर्षवर्धनला नसल्यामुळे या तक्रारी येणं साहजिकच होतं. या त्रुटी भरून काढण्यासाठी तसंच चपला आणि लेदरबद्दल अधिक माहितीसाठी त्याने इंटरनेटचा आधार घेतला. हळूहळू तो इंटरनेटवरून नवनवीन गोष्टी शिक ला. प्रात्यक्षिक ज्ञानासाठी मात्र त्याने ऑगस्ट २०१४ मध्ये चेन्नईतील १० लेदर टॅनरिजला (जेथे लेदर तयार होतं) भेट दिली. कोणतं केमिकल वापरून चपलेत काय फरक घडतो, चपलेचं लेदर पायांना मऊ  वाटावं यासाठी आयुर्वेदिक तेलांचा वापर करायचा का? अशा अनेक गोष्टींवर त्याने स्थानिकांची मदत घेऊन संशोधन केलं आणि पूर्ण माहितीनिशी तो पुण्यात आला.

‘‘रिसर्चच्या धावपळीत वडिलांच्या व्यवसायाकडेही लक्ष द्यावं लागत होतं, कारण दर महिन्याला एक विशिष्ट रक्कम त्यातूनच माझ्या हातात येत होती. माझ्या स्वप्नपूर्तीसाठी ती आवश्यक होती,’’ हर्षवर्धन सांगतो. चेन्नईच्या संशोधनानंतरही त्याचे चपलांवर नवनवीन आविष्कार कारागिरांच्या साहाय्याने चालूच होते. त्यामुळे त्याच्या अनुभवांचं गाठोडं पक्कं होत होतं. आता पूर्वीपेक्षा अधिक सुंदर चपला जन्माला येत होत्या. आता वेळ आली होती ब्रँडच्या नामकरणाची. ‘‘साधारण तीनशे नावं शोधून काढल्यावर मला ‘चॅपर्स’ हे नाव आवडलं. ब्रँडच्या नामकरणानंतर त्याचा लोगो डिझाइन केला आणि मग खरा प्रवास सुरू झाला,’’ असं सांगणाऱ्या हर्षवर्धनने ऑक्टोबर २०१४ मध्येच पुण्यात एका दोनदिवसीय प्रदर्शनामध्ये आपला स्टॉल लावला. ‘‘त्या दोन दिवसांच्या प्रदर्शनात माझ्या शंभरपैकी नव्वद चपला विकल्या गेल्या. त्यानंतर माझा आत्मविश्वास दुपटीने वाढला. काही दिवसांनी मग मी समाजमाध्यमांवर प्रसिद्धी करायला सुरुवात केली. शनिवार पेठेत एक छोटं ऑफिसवजा दुकान थाटलं ज्यात ग्राहक स्वत: त्यांच्या मनातलं डिझाइन आणि रंगसंगती सांगत आणि मग आम्ही त्या पद्धतीने चपला तयार करून देत असू..’’ हर्षवर्धनने आपल्या व्यवसायाचा हा प्रवास सांगितला.

एकदा व्यवसाय थाटला म्हणजे संपलं असं होत नाही. ती एक नवी सुरुवात असते याचा अनुभव तो घेत गेला. त्याने कानपूर आणि आग्रा येथेसुद्धा चपलांवर संशोधन केलं. एकीकडे समाजमाध्यमांवर त्याच्या ब्रँडला जोरदार प्रतिसाद मिळू लागला. महाराष्ट्र व महाराष्ट्राच्या बाहेरील लोक ऑनलाइन चपला मागवू लागले. मराठी सेलेब्रिटींमध्येही हर्षवर्धनच्या कोल्हापुरी चपलांची हवा पसरू लागली. सुयश टिळक, शरद पोंक्षे, शशांक केतकर या कलाकार मंडळींनी सुरुवातीला त्याच्याकडून चपला घेतल्या. मग त्यांचं कौतुक बॉलीवूडपर्यंत पोहोचलं. अभिनेता शर्मन जोशी आणि त्याची पत्नी दोघेही हर्षवर्धनकडे आले. त्यांनी त्याला कौतुकाची थापही दिली. आज शर्मन फक्त ‘चॅपर्सच’ वापरतो, असं हर्षवर्धन अभिमानाने सांगतो. ‘मेक इन इंडिया’शी संलग्न असलेलं हर्षवर्धनचं काम सध्या देशभरात वाऱ्यासारखं फिरतं आहे. त्याला भारतरत्न सचिन तेंडुलकरकडूनही शाबासकी मिळाली आहे.

नक्की, तुझ्या चपलांमध्ये काय वेगळेपण दडलंय? असा प्रश्न हर्षवर्धनला विचारला असता तो म्हणतो, ‘‘कोल्हापुरात मिळणारी कोल्हापुरी चप्पल ही पायाच्या तळव्याला जाड असते, कारण चपलेचं लेदर हे भाज्यांच्या टॅनिंगपासून तयार केलेलं असतं. तुम्हाला सलग काही दिवस वापरून ती मऊ  करावी लागते. चप्पल मऊ  करण्याच्या काळात चप्पल चावणं, पायाला जडत्व येणं, वळ येणं, पाय सुजणं अशा गोष्टी घडतात; पण ‘चॅपर्स’च्या चपलांमध्ये तुम्हाला अशा कोणत्याही तक्रारी जाणवणार नाहीत. चपलेचं लेदर हे विशिष्ट प्रकारच्या प्रक्रियेने तयार केलेलं असल्याने ते अतिशय मऊ  असतं. त्यामुळे चप्पल पायाला चावत नाही किंवा कसलाच त्रास होत नाही. शिवाय, कोल्हापुरात मिळणाऱ्या चपलेला मोजकेच रंग व आकार आहेत; पण ‘चॅपर्स’मध्ये आज ७० प्रकारच्या विविध रंगछटांनी युक्त चपला ग्राहकांना पाहायला मिळतात. ग्राहक हवे ते रंग, हवा तो आकार निवडूनही चप्पल तयार करून घेऊ  शकतो,’’ असं हर्षवर्धन आवर्जून सांगतो.

चपलेच्या कारागिरीबरोबरच त्याच्या मार्केटिंगचीही कला त्याने उत्तम साधली आहे. १२ रिटेलर्सशी हातमिळवणी केल्यामुळे हर्षवर्धनचे हे कोल्हापुरी जोडे अहमदाबाद, मुंबई, सोलापूर, कानपूर येथेही उपलब्ध झालेले आहेत. ‘चॅपर्स’मध्ये सध्या १६ कारागीर काम करत आहेत. आधुनिक जगाशी त्यांची ओळख करून दिली असल्याने त्यांच्या मानसिकतेत, वागण्या-बोलण्यात खूप बदल झाल्याचे हर्षवर्धन सांगतो. अनेक फॅशन शोज, फॅशन वीकमध्ये फॅशन डिझायनर ‘चॅपर्स’ला प्राधान्य देतात. समाजमाध्यमांमुळे हर्षवर्धनच्या चपला फ्रान्स, स्पेन, इस्रायल, लंडनपर्यंत जाऊन पोहोचल्या आहेत. इस्रायलमधील आमचा एक ग्राहक केवळ ‘चॅपर्स’च वापरतो. त्याच्याकडे आमचे १० कोल्हापुरी जोडे आहेत.

मूळचा फ्रान्सचा रहिवासी असलेला एक जण जेव्हा कामानिमित्त इथे येतो तेव्हा आवर्जून २-३ जोड विकत घेतो, असं तो सांगतो. पक्का पुणेकर असलेल्या हर्षवर्धनला पुणेरी बाणाही अनुभवायला मिळतो. ‘‘काय हो पटवर्धन, तुमचं दुकान १ ते ४ बंद असतं का?’’ असे गमतीशीर प्रश्नही त्याच्या कानावर सतत पडत असतात. त्याच त्याच कोल्हापुरी चपलांना मागे सारून आपल्या कल्पनाशक्तीच्या बळावर नव्या रंगात व नव्या ढंगात कोल्हापुरी चपलांना संजीवनी देणाऱ्या हर्षवर्धनला त्याच्या पुढील वाटचालीसाठी ‘व्हिवा परिवारा’कडून खूप खूप शुभेच्छा!!!

ज्याप्रमाणे इटलीमध्ये शूज हे हाताने तयार केले जातात आणि भारतीय मंडळी हँडमेड इटालियन शूज म्हणून त्यांचा टेंभा मिरवतात. त्याचप्रमाणे कोल्हापुरी चप्पलही हातानेच तयार केली जाते. शूजपेक्षाही अधिक मेहनत घेऊन, हातोडय़ाचे घाव बोटावर झेलून, कलाकुसर करूनही तिला कोणीच न्याय देत नाही. मला हेच चित्र बदलायचं आहे. चपलांच्या दुनियेत कोल्हापुरी जोडय़ांना एक वेगळं स्थान मिळालेलं पाहायचं आहे.’’

हर्षवर्धन पटवर्धन

viva@expressindia.com

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व लेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Harshvardhan patwardhan making indian footwear traditional footwear

First published on: 08-12-2017 at 00:37 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×