गाइज अ‍ॅण्ड अदरवाइज : ‘त्यांचं’ वेगळंय!

कट्टय़ावरच्या प्रेमाच्या गोष्टी कट्टे की जबानी! शॉर्ट आणि स्वीट चार अंकी लेखमालिकेचा भाग चौथा आणि शेवटचा. बऱ्याच दिवसांपासून आळसावल्यासारखा, नाखूश दिसणारा कॉलेजचा रस्ता ‘युफोरिक’ वगैरे म्हणतात तसलाच काहीतरी झाला होता. बऱ्याच दिवसांची मरगळ त्या दिवशीच्या कूल वातावरणाने चांगलीच झोडपून काढलेली. खूप दिवसांची प्रतीक्षा संपत आल्यानंतरचा सावरून बसलेला भवताल.. आणि सावरून बसलेली तरीही काहीशी बावचळल्यासारखी ती. म्हणजे […]

कट्टय़ावरच्या प्रेमाच्या गोष्टी कट्टे की जबानी! शॉर्ट आणि स्वीट चार अंकी लेखमालिकेचा भाग चौथा आणि शेवटचा.

बऱ्याच दिवसांपासून आळसावल्यासारखा, नाखूश दिसणारा कॉलेजचा रस्ता ‘युफोरिक’ वगैरे म्हणतात तसलाच काहीतरी झाला होता. बऱ्याच दिवसांची मरगळ त्या दिवशीच्या कूल वातावरणाने चांगलीच झोडपून काढलेली. खूप दिवसांची प्रतीक्षा संपत आल्यानंतरचा सावरून बसलेला भवताल.. आणि सावरून बसलेली तरीही काहीशी बावचळल्यासारखी ती. म्हणजे नेहा. वेगळ्याच धुंदीत. स्वत:शीच गुणगुणत. एका पॉइंटला ट्रान्समध्ये हरवत जाणारी. आणि कुणीतरी असंच. त्याच उत्कटतेने, आवेशाने तिच्यापाशी पोहोचू पाहणारं. मनाला लागलेली धाप तशीच रोखून धरणारं.. एक फक्त घडय़ाळात आणि सूर्याच्या मुखडय़ावरच वाजला होता त्या दिवशी. बाकी तनामनात अगदी चुस्त आणि सगळंच तंदुरुस्त करून टाकणारी थंडाई. ती मात्र आतून सुखावत गेलेली. तिच्या नजरेत फक्त त्याचं.. सागरचं येणं दाटून आलं होतं.

तिकडे तसली थंडाई आणि इथे मात्र अनन्याचं पत्र वाचून अन्याची हवा कम्प्लीट टाइट! पठ्ठय़ा काय रिप्लाय द्यावा या विचारात कितीतरी वेळ गढलेला. त्याला मग पुन्हा पुन्हा आदल्या दिवशीचं सगळंच आठवत राहिलं. रिजेक्शनचं खरं तर जबरी दु:ख झालेलं, पण स्वत:शी उघडपणे मान्य करेल तो अन्या कसला! इगोचा मामला होता शेवटी. ‘कोण एवढी मोठी लागून गेलीये ही रिद्धी ! हिला मी कळलोच नाही’, असं काहीबाही उगीच मनात घोळवत राहिला. रिद्धी काही डोक्यातून जात नव्हती. मग ‘यू टय़ूब’वर कुठलातरी टुकार मूव्ही लावून काहीतरी तोंडात टाकत खुर्चीवर जीव गेल्यासारखा बसला. अधूनमधून त्याचं लक्ष उगीच रिद्धीसाठी आणलेल्या गिफ्ट्सकडे जात होतं. अर्थात आता त्याकडे लक्ष जाऊन काय उपयोग होता म्हणा. त्याने गिफ्ट्सकडे कितीही दुर्लक्ष केलं तरी, त्याचा प्रयत्न निष्फळ ठरत होता. या अशा सगळ्यात, एकीकडे कुठेतरी अनन्याचं पत्रं. तिचं इतकं सॉर्टेड असणं त्याच्या मनात रुंजी घालत राहिलं. तिच्याविषयी कौतुक आणि कुतूहल असं संमिश्र काहीतरी वाटत राहिलं.

इकडे निशा आणि सागऱ्या भेटल्यावर कॉलेजजवळच्या गार्डनमध्ये एका बाकडावर एकमेकांशी काहीही न बोलता नुसतेच बसून राहिलेले. माझ्यापासून, मित्रमैत्रिणींपासून, रोजच्या रामरगाडय़ापासून. सगळ्यापासून खूप दूर निघून गेलेले ते दोघेजण. ‘खाल्लंयस ना काहीतरी? नाहीतर माझी वाट पाहण्यात तुला खाण्याचंही भान राहात नाही. काही भरवसा नसतो तुझा’ सागऱ्याने नेहाला विचारलं. ‘इतक्या दिवसांनी भेटल्यावरही हा इतका फालतू प्रश्न कसा काय विचारू शकतो मला?’ मनात उचंबळलेला हा संतापयुक्त प्रश्न तसाच गिळून तिने काहीसं हसल्यासारखं केलं. तिचं अधीर होणं समजल्यासारखं करून त्याने केवळ तिचा हात हातात घेतला. क्षणभर तिच्या डोळ्यात पाहिलं. ती बाकी मुलींसारखी नव्हतीच. जरा वेडीच होती. अतीच मनस्वी. या स्वभावाचा त्रास व्हायचा तिला. पण तरीही तशीच . त्यामुळेच ती त्याला फार आवडून गेली आणि कदाचित हाच मुलगा आपल्याला इतकं व्यवस्थित समजून घेऊ शकतो अशी धारणा असलेल्या तिच्याही मनभर त्याचं अस्तित्व व्यापून राहिलेलं. ग्रूपमधल्या प्रत्येकाची विशिष्ट तऱ्हा होती वगण्याची. पण हिचं मात्र सगळंच वेगळं होतं. कुणाला कळायचं नाही ते.

तिच्या मनस्वी असण्यामुळे, वेगळ्याच ‘हाय’वरच्या उत्कट असण्यामुळे बऱ्याचदा तिच्या वागण्याचे अर्थ कुणाला कळायचे नाहीत. तिच्या काही काळानंतर स्वत:च्या कोषात शिरण्याला सगळेच मूडीपणाचं लेबल चिटकवून मोकळे झालेले. पण तिला तशी स्पेस का लागते याचा विचार करणारं कुणी नव्हतं. याला अपवाद फक्त सागऱ्या होता. सागऱ्या बाकीबाबतीत तिच्या अगदीच विरुद्ध होता. तरी तिला काय वाटतंय हे त्याला न सांगता कळायचं.

एकमेकांविषयीच्या सुप्त आकर्षणाचा केंद्रबिंदू त्यांच्यातली उत्कटता होता. त्यांचं नातं तसं कॉम्प्लेक्स होतं. ग्रूपमधल्यांसाठी अन्झेपेबल. पण त्यांच्यासाठी मात्र अगदी नितळ, स्पष्ट. धुसर काहीही नव्हतं त्यात. ही एक वेगळीच भावनिक गरज आहे हे ती दोघंही मनोमन जाणून होती. त्यांचं नातं सो कॉल्ड प्रेमाचंही नव्हतं आणि त्यांच्यात नुसतीच मैत्री आहे असंही नव्हतं. नंतरनंतर ते ग्रुपमध्ये उगीच गॉसिपचा विषय ठरत गेले.. मग त्यांनी ग्रूपबरोबर असणंही कमी केलं. रादर, ते दोघं एकत्र असले की ग्रूपमध्ये जाणं टाळायचेच. आज असेच दोघे एकांतात खूप दिवसांनी भेटलेले. आपलं डोकं त्याच्या खांद्यावर विसावताना ‘असं कुठवर?’ हा प्रश्न नेहमीप्रमाणे तिच्या मनात डोकावून गेला. आणि सवयीने तिने तो बाहेर पडू दिला नाही. काही गोष्टी त्यांनी वेळेच्या, काळाच्या मर्जीवर स्वाहा केल्या होत्या. त्याच्यापाशी असण्यातली शांतता तिच्यासाठी त्या क्षणाला सगळ्यात जास्त महत्त्वाची होती.

या सगळ्याला आता जवळपास वर्ष उलटून गेलंय. गेल्या वर्षीच्या ‘व्ही.डे.’नंतर रिद्धीसमोर आली, स्वत:हून अन्याकडे पाहून हसली की, अन्या फक्त ओळखीचं माणूस दिसल्यावर हसण्याची जी औपचारिकता दाखवली जाते तसं हसतो. त्यापलीकडे बोलण्यासारखं काहीच नसतं. रिद्धीच्या मनातही त्याला नकार दिल्याचं गिल्ट घर करून राहिलंय. अनन्या आणि अन्या सामोरासमोर आले की अगदीच जुजबी बोलतात. अन्या सेम सिचुएशनमधून गेल्यामुळे अनन्याला वन साइडेड फीलिंग्जचा किती त्रास होऊ शकतो हे त्याला कळत होतं. पण तरीही त्यांच्यात एक ऑकवर्डनेस यायचाच! अनन्याला कदाचित अन्या अजूनही आवडतोय. अन्या रिद्धीला विसरू शकत नाहीये. नेहा आणि सागऱ्या ग्रूपमध्ये क्वचितच असतात. असले की असून नसल्यासारखे असतात. सगळंच जरा विस्कटलंय. बऱ्याच दिवसात माझ्यापाशी यांच्यातलं कुणीच फिरकलं नाहीये. मी खूप जिव्हाळ्याने वाट बघतोय त्यांची. येतील माझ्यापाशी सगळे? पाहिल्यासारखे? सगळे एकत्र? तुम्हाला जर यांच्यातलं कुणी भेटलं तर त्यांना मला काय काय वाटतंय ते सांगाल ना गाइज? ‘अदरवाइज’ काय म्हणू?

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Love stories talk on katta

ताज्या बातम्या