मराठी चित्रपट फॅशन ट्रेण्ड सेट करणार का? हा प्रश्न काही वर्षांपूर्वी सुचलाही नसता. मराठी चित्रपटातील फॅशन हा विषय कधीच मोठा नव्हता. कॉस्च्युम डिपार्टमेंट सगळ्यात कमी महत्त्वाचं मानलं जायचं. पण गेल्या काही वर्षांत चित्र पालटतंय. चित्रपटाच्या नावानं फॅशन कलेक्शन लाँच होतंय.
हिंदी चित्रपटसृष्टीत नवीन चित्रपट प्रदर्शित होण्याआधीपासूनच त्यातल्या अभिनेत्यांचा लुक, त्यांच्यासाठी डिझाइन केलेले कपडे, त्यातली स्टाइल याची चर्चा होऊ लागते. ती प्रथाच पडली आहे, असं म्हणता येईल. सध्या ‘शानदार’ चित्रपटातील आलिया भट्ट आणि शाहीद कपूरच्या लुक आणि स्टाइलिंगची बरीच चर्चा होत आहे. सिनेमातची फॅशन फॉलो करणारेही अनेकजण असतात. हे हेरून अनेक वेळा त्या सिनेमातील ‘लुक’नुसार तसे कपडे, अ‍ॅक्सेसरीज त्याच नावाने बाजारात येतात. ‘पिकू’च्या वेळी दीपिका पदुकोणनी घातलेल्या कुर्ता आणि स्ट्रेट पॅरलल फिटिंगचे बॉटम्स चर्चेत होते आणि त्याचं कलेक्शनही एका मोठय़ा रिटेलरनं लाँच केलं होतं. मराठी सिनेमांच्या वाटय़ाला मात्र अशी प्रसिद्धी कमी प्रमाणात वाटय़ाला येते. त्यातील कपडे, लुक, स्टाइल ह्य़ाची चर्चा होत नाही. नुकत्याच रिलीज झालेल्या ‘राजवाडे अ‍ॅण्ड सन्स’ या सिनेमाच्या लुक आणि स्टाइलविषयी मात्र हळूहळू चर्चा होताना दिसत आहे. ‘शॉपर्स स्टॉप’ने ‘राजवाडे अ‍ॅण्ड सन्स’चं फॅशन कलेक्शनही लाँच केलं आहे. हे मराठी चित्रपटाच्या बाबतीत पहिल्यांदाच होतंय. दिवाळीत प्रसिद्ध होणाऱ्या ‘मुंबई-पुणे-मुंबई २’ या चित्रपटाचीही चर्चा सुरू झालीय. ‘कटय़ार काळजात घुसली’मधील पारंपरिक मराठमोळा ‘लुक’ लोकांच्या पसंतीस येतोय.
‘राजवाडे अ‍ॅण्ड सन्स’ चित्रपटाचे दिग्दर्शक सचिन कुंडलकर यांच्याशी बातचीत केली. ते म्हणाले, ‘‘चित्रपटातील पात्रांची फॅशन, त्यांचं कॅरॅक्टर डिफाइन करते. पटकथा लिहिताना मी पात्रांना पाहात असतो. माझ्या या चित्रपटातील पात्र शहरी उच्चभ्रू समाजातली, चांगला फॅशन सेन्स असलेली अशी आहेत, त्यानुसार त्याची फॅशन ठरवली आहे. फॅशन डिझायनर अमित दिवेकरबरोबर आम्ही लक्षपूर्वक काम केलंय. जोपर्यंत माझं पात्रांच्या ‘लुक’बाबत समाधान होत नाही तोपर्यंत आम्ही काम करत राहतो. मराठीतील पटकथाच ‘लुक’बाबतचा ट्रेंड बदलू शकतील. आपल्याकडील कलाकार खूप सुंदर काम करणारे आणि त्याचबरोबर आजच्या काळाबरोबर चालणारे आहेत. त्यामुळे येत्या काही काळात ट्रेंड नक्कीच बदललेला असेल. दिग्दर्शिका झोया अख्तर यांचा माझ्यावर बराच प्रभाव आहे. केवळ ‘लुक’बाबत बोलायचं झालं, तर मला त्यांच्यासारख्या फिल्म्स बनवायला आवडतील.’’

फॅशन डिझायनर अमित दिवेकर म्हणाले, ‘‘मराठी सिनेमांमध्ये जनरली कॉस्च्युम डिपार्टमेंट खूपच कमी महत्त्वाचं असतं. प्रॉडक्शन, कलाकार आणि इतर अनेक गोष्टी सगळं चांगलं असूनही कॉस्च्युम डिपार्टमेंटसाठी खूपच कमी बजेट ठेवलं जातं. पण ‘राजवाडे अ‍ॅण्ड सन्स’मध्ये आम्ही खूपच चांगल्या पद्धतीनं काम केलंय. एकूण १३ पात्र आहेत. प्रत्येकाचा अभ्यास करून त्यांच्यासाठी कपडे डिझाइन करण्यात आले आहेत. कलर कॉम्बिनेशन्सवर काम केलंय. ‘डे आणि नाइट लुक’वर काम केलंय. केसांपासून ते फूटवेअपर्यंत यात डिटेलिंग केलं गेलं आहे. बहुतेक मराठी चित्रपटांचे विषयदेखील बऱ्याचदा गावं, देवळं किंवा ग्रामीण जीवनावर आधारित असतात. त्यामुळे अर्थातच फॅशनवर फार लक्ष दिलं जात नाही. ट्रेण्ड सेट होण्याचा प्रश्नच नाही. सध्या थोडय़ा ग्लॅमरस, मॉडर्न विषयांवर चित्रपट बघायला मिळताहेत. मराठीतील अनेक डिझायनर्ससुद्धा ही बाब विचारात घेतायत आणि हळूहळू मराठी फिल्म्ससुद्धा ट्रेंड सेट करू शकतील असं मला वाटतं.’’
‘मुंबई-पुणे-मुंबई’ या सतीश राजवाडे दिग्दर्शित चित्रपटाचा दुसरा भाग दिवाळीत प्रदर्शित होतोय. मुक्ता बर्वे आणि स्वप्निल जोशीची हिट जोडी यामध्ये असेल. या चित्रपटाच्या ‘लुक’वरही बरीच मेहनत घेतली आहे, असं दिग्दर्शक सतीश राजवाडे यांनी सांगितलं. ‘‘कॉस्च्युम डिझायनिंग करताना कॅरॅक्टरचा विचार होता तसा लाइट, कलर कॉम्बिनेशन्स यांचाही होता,’’ असं सतीश म्हणाले. या चित्रपटाच्या पहिल्या भागात मुक्ता लाल घेरदार लाँग स्कर्ट आणि व्हाइट टॉप या एकाच वेशात दिसली होती. आता पुढच्या भागाची कथा वेगळ्या वळणावरची असल्यानं एकच कॉस्च्युम नाही. तर सिच्युएशननुसार तो बदलला आहे.’’

‘‘मुळातच माझं चित्रपटातलं कॅरॅक्टर फॅशन डिझायनर आहे. ही मुंबईत राहणारे, इण्डिपेण्डंट विचारांची फॅशन डिझायनर आहे. त्यामुळे त्याला साजेसे माझे कपडे आहेत. पल्लवी राजवाडेनी कॅरॅक्टरचा विचार करून फॅशन डिझायनिंग केलंय. कुठल्या सीनला कसे कपडे सूट होतील हे महत्त्वाचं. त्यामुळे माझ्या चित्रपटातील लुकमध्ये सध्याचे ट्रेण्डी वेस्टर्न आऊटफिट्सही दिसतील, तसे सिच्युएशनप्रमाणे पारंपरिक इंडियन लुकही दिसेल. मराठी चित्रपटातली फॅशन या विषयावर खूप विचार होतोय. पण माझ्या मते, आपण काय घालतो, यापेक्षा ते कॅरी कसं करतो याला महत्त्व आहे आणि आजच्या मराठी नायिकांना याची पूर्ण जाणीव आहे. त्यामुळे हा बदल दिसतोय.’’
प्राची परांजपे, वैष्णवी वैद्य – viva.loksatta@gmail.com