गणेशाला निरोप देऊन मन स्थिरस्थावर होत नाही तोवर ठिकठिकाणी गरबा नृत्याचे प्रशिक्षण देणाऱ्या छोटय़ा-मोठय़ा डान्स क्लासेसच्या जाहिराती लक्ष वेधून घेतात. किंबहुना, त्यामुळे का होईना नवरात्रीची पहिली चाहूल लागते. नवरात्री आणि गरबा दोन्हीचे उत्सवी स्वरूप कायमच बदलते राहिले आहे. मात्र काळानुरूप गरबा या नृत्यप्रकाराला चढत चाललेला कधी सालसा नाही तर झुम्बाचा साज दर वर्षी तरुणाईचा उत्साह वाढवतो यात शंका नाही..

नवरात्रीच्या पहिल्या दिवशी देवीची पूजा करून घटस्थापना होते आणि प्रारंभ होतो तो नवरात्रीच्या जागरणाला.. हीच सुरुवात असते ती गरबा-दांडियाच्या जल्लोषाची. साधारणत: पंधरा-वीस वर्षांपूर्वी खेळला जाणारा रासगरबा हा धार्मिक स्वरूपाचा होता, तसेच त्याचे स्वरूपही छोटेखानीच असायचे. वस्ती अधिक असलेल्या वसाहतीत, त्या त्या क्षेत्रापुरते मर्यादित असे रासगरब्याचे स्वरूप असायचे आणि हा रासगरबा रात्र-रात्रभर सतत चालायचा. देवीच्या देवळासमोर मधोमध (पूजा करण्यात आलेले छोटे मडके) ठेवून आदिमाता अंबेची आरती, आराधना वगैरे करून चप्पल न घालता एकमेकांना चला रे (ए हालो) अशी हाळी घालत त्याभोवती स्त्री-पुरुष गरबा नृत्य करायचे. पूर्वीचा हा धार्मिक स्वरूप असलेला रासगरबा, दांडिया आता इतिहासजमा झाला आहे. दांडिया मंदिरातून मैदानात आला व त्यात झालेले बदलही लोकांनी अर्थातच उत्साहाने स्वीकारले आहेत. आता नृत्याचा एक प्रकार म्हणून त्याचे रीतसर प्रशिक्षण घेऊन नवरात्रीत गरबा-दांडिया खेळणारी तरुणाई ठिकठिकाणी पाहायला मिळते.

गरबा किंवा दांडिया नृत्याची मुळे हडप्पा मोहंजोदडो काळातदेखील दिसून येतात. मूळचा गुजरातचा मानला जाणार हा नृत्यप्रकारच हल्लीच्या पिढीसाठी नवरात्रीतलं प्रमुख आकर्षण असतं असं म्हटलं तर खोटं ठरणार नाही. रासगरबा आणि दांडिया या दोन्ही नृत्याच्या आधारे नवरात्रींचा जागर केला जातो. या दोन्ही प्रकारांत पूर्वीपेक्षा अनेक बदल झाले आहेत. केवळ टाळ्या वाजवून तालात देवीसमोर भक्तिभावाने नाचणं मागे पडून त्यात अनेक बदल घडत गेले आहेत. इतर सणांप्रमाणेच इथेही पारंपरिक वाद्ये-गाणी जाऊन डीजेच्या बिट्सची साथ देत पारंपरिक ‘गरब्या’ला सालसासारख्या पाश्चिमात्य नृत्याचा रंग चढला आहे. गरबा सालसा हा नवा नृत्यप्रकार सध्या शिकवला जातो आहे. मात्र एरवीही ‘हम दिल दे चुके सनम’मधल्या ‘ढोल बाजे’पासून ‘रईस’मधल्या ‘उडी उडी जाये’पर्यंत बॉलीवूडपटांच्या गाण्यांवर गरब्याचा ठेका धरणाऱ्यांनी त्यात कधी बॉलीवूडच्या स्टेप्स तर कधी चक्क भांगडाची सुद्धा सरमिसळ केली आहे. त्यामुळे आता गरब्याला सालसा किंवा हिप-हॉपची दिली गेलेली जोड ही साहजिकच आहे. आणि त्याला तरुणाईचा उदंड प्रतिसादही मिळतो आहे. भारतीय नृत्यप्रकारांसोबतच अनेक आंतरराष्ट्रीय प्रकारदेखील गरब्याच्या जोडीने नवरात्रीत दिमाखात सादर करणारी तरुण पिढी जागोजागी दिसते. यातला सगळ्यात चर्चिला गेलेला प्रकार म्हणजे ‘सालसा गरबा’. जोडीजोडीने सालसा करीत रिंगणात गरब्याच्या तालावर हा गरबा प्रकार सादर केला जातो. मग कधी त्यात हिप-हॉप, बॉलीवूड, ब्रेकडान्स असे अनेक नृत्य प्रकारदेखील सादर केले जातात. मात्र हे प्रकार सादर करण्यासाठी त्याचे प्रशिक्षण घेणे आवश्यक ठरते. नवरात्रीच्या महिनाभर आधीपासून या गरबा आणि दांडियाचे प्रशिक्षण सुरू होते. मात्र अनेक प्रशिक्षण वर्गामध्ये अजूनही पारंपरिक गरबा शिकवण्यावरच प्राधान्य दिले जाते. तर काही ठिकाणी अनेक नृत्यप्रकार नि गरबा यांच्या मिश्रणाने तयार होणारा फ्यूजन गरबादेखील शिकवला जातो.

‘रासलीला- मास्टर द आर्ट ऑफ गरबा’चे संस्थापक हार्दिक मेहता सांगतात की, ‘एकीकडे गरबा-दांडियामध्ये नव्या काळानुसार आधुनिकीकरण होत असताना आम्हाला गरब्यातील खरेपणा आणि परंपरा टिकवून ठेवायला जास्त आवडते. फाल्गुनी पाठकसारख्या गायिका जेव्हा बॉलीवूड गाणं गातात तेव्हा केवळ बॉलीवूडच्या हिंदी गाण्यांसाठी आम्ही गरब्याची पद्धत थोडी बदलून बॉलीवूड स्टेप्स त्यात जोडतो, मात्र एरवी आम्ही पारंपरिक गरब्यात कोणताही बदल करीत नाही. अर्थात, अनेक नवीन नवीन स्टेप्स, पवित्रा, गोल फिरण्याच्या पद्धती यामध्ये दर वर्षी अनेक बदल केले जातात. मात्र यातून गरबा नृत्याच्या मूळ संस्कृतीला धक्का लागणार नाही याची आम्ही काटेकोर काळजी घेतो.’

गेल्या काही वर्षांत योगा आणि जिमच्या साथीने नृत्य हे फिटनेसचे नवीन समीकरण ठरले आहे. नवरात्रीतला गरबाही याला अपवाद राहिलेला नाही. नवरात्रीत खास गरबा फीवरमुळे गरब्याचा वापर वजन कमी करण्यासाठी आणि फिटनेससाठीदेखील मोठय़ा प्रमाणात केला जातो. गरब्याच्या गाण्याचा ताल आणि ठेका वापरून अनेक व्यायामप्रकार, वॉर्मप प्रकार अनेक ठिकाणी शिकवले जातात. महाराष्ट्रात तेही मुख्यत्वे मुंबईत खेळला जाणारा गरबा आणि गुजरातचा गरबा यातही फरक आहे.

गुजरात, सुरत इथे खेळल्या जाणाऱ्या गरब्यात एकसंधपणा दिसून येतो. तसेच रिंगणात पुढे जाण्याची आणि गिरकी घेण्याची दिशादेखील अपसव्य (अँटीक्लॉकवाईज) असते, तर मुंबईत तेच घडाळ्याच्या काटय़ांच्या दिशेने फिरत गरबा केला जातो. मुंबईत खेळल्या जाणाऱ्या गरब्यात स्टेप्समध्येदेखील बरीच विविधता दिसून येते. केवळ पोपट, तीन टाळी आता बरेच मागे पडले असून त्यांची जागा टाळीरहित नृत्य करीत लयीत पुढे जाणे आणि गिरक्या घेणे इत्यादी प्रकारांनी घेतली आहे.

एकंदरीतच काय, तर गरबा-दांडिया पारंपरिक पद्धतीचा असो किंवा मग सालसा, बॉलीवूड किंवा तत्सम नृत्य प्रकारांच्या साथीने तयार झालेला फ्यूजन गरबा असो, जर तुम्हाला गरबा आवडत असेल तर हीच ती वेळ आणि हेच ते नऊ  दिवस. तुम्हीही तयार व्हा नि म्हणा, ‘ए हालो..’

viva@expressindia.com