टीव्हीची जागा घेणाऱ्या स्मार्ट फोनवर उपलब्ध असणारं फास्ट इंटरनेट क्षणात हवं ते, हवं तेव्हा बघायचं स्वातंत्र्य देतंच. त्यावर रिअ‍ॅक्ट होण्याचंही स्वातंत्र्य मिळतं.  कार्यक्रम, विचार, कला, लेखन या सगळ्याचा ‘ऑनलाइन कण्टेण्ट’ होतो तेव्हाच त्यातली साचेबद्धता संपते. आज हा ‘कण्टेण्ट’ अधिकच बोल्ड होतोय. त्याला विषयाचं, फॉर्मचं, वेळेचं बंधन राहिलेलं नाहीये. नवतरुणाईच्या स्वातंत्र्याचं हे प्रतीक बनतंय.

आजची नवतरुणाई म्हणजे स्वातंत्र्यानंतर जन्माला आलेली तिसरी- चौथी पिढी. पारतंत्र्यातली घुसमट, स्वराज्याची आस, मुक्त विचारांची किंमत, स्वराज्यासाठीचा संघर्ष, स्वातंत्र्याची नवता यातलं काहीच या पिढीनं आणि त्यांना घडवणाऱ्या पिढीनंही अनुभवलेलं नाही. असं असलं तरी, स्वातंत्र्यदिनाचं महत्त्व त्यांना आहे. पारतंत्र्याचा इतिहास अनुभवला नसला, तरी ऐकलेला-वाचलेला आहे. त्यामुळे स्वातंत्र्याचं मूल्य ते ओळखून आहेत. त्यांची स्वातंत्र्याची भावना अधिक ‘मुक्त’ होऊ पाहातेय. नवी क्षितिजं त्यांना खुणावताहेत आणि नवी आव्हानं पार करायला ही पिढी सज्ज आहे. १९९० नंतर जन्माला आलेल्या पिढीला ‘जनरेशन झेड’ म्हणायची पद्धत रूढ झाली आहे. भारताच्या बाबतीत ही जेन झेड वाढली तीच मुक्त वातावरणात. त्यांच्या आधीच्या पिढीनं या पिढीला अधिक मोकळेपणानं वाढवलं.

भारताच्या बाबतीत बोलायचं तर, मुक्त अर्थव्यवस्थेची पंचविशी साजरी होतेय. याच मुक्त अर्थव्यवस्थेमुळे इथलं समाजकारणही बदललं. अनेक भारतीयांच्या आयुष्यात ‘लाइफस्टाइल’ हा शब्द पंचवीस वर्षांपूर्वी आला. आता पंचविशीच्या आत-बाहेर असलेल्या पिढीने मात्र तो जन्मतच अनुभवला. अर्थातच या पिढीनं समृद्धी जन्मापासूनच पाहिली. टेलिफोनसाठी वेटिंग लिस्ट, स्कूटरसाठी नंबर, दारं असलेला ब्लॅक अँड व्हाइट टीव्ही, हे त्यांनी अनुभवलंच नाही. लॅपटॉप आणि मोबाइल त्यांच्या हातात खेळण्याच्या वयातच आले. आता तर हातातले फोनही या पिढीसारखे स्मार्ट झालेत. अर्थातच त्यांच्या मुक्तपणे जगण्याच्या संकल्पना बदलल्या आहेत. जगण्यातली गंमत बदलली आहे आणि म्हणून मनोरंजनाची व्याख्याही बदलते आहे. ‘फॅमिली एंटरटेन्मेंट’ घरातल्या सगळ्यांनी एकत्र बसून बघायच्या मालिका पूर्वी बनवल्या जात. तोच त्यांचा ‘यूएसपी’ होता. आता मनोरंजनात प्रायव्हसी येतेय तशी ही पिढी पारंपरिक टीव्हीलाही बाद करायला निघाली आहे. टीव्हीची जागा घेतोय स्मार्ट झालेला फोन. स्मार्ट फोनवर उपलब्ध असणारं फास्ट इंटरनेट क्षणात हवं ते, हवं तेव्हा बघायचं स्वातंत्र्य देतंच पण त्याबरोबर त्यावर रिअ‍ॅक्ट होण्याचंही स्वातंत्र्य मिळतं. कुठलाही ऑनलाइन कार्यक्रम हिट करण्यात प्रेक्षकांचा असा सक्रिय सहभाग असतो. तुम्ही स्वत कण्टेण्ट निर्माण करू शकता. कुठलाही एखादा कलात्मक व्हिडीओ अपलोड केलात की, तुम्ही झटकन क्रिएटर होऊन जाता. कलाकार आणि प्रेक्षक यांच्यातला पडदा हे माध्यम पारदर्शी करतंय. म्हणूनच कदाचित त्यावरचा कण्टेण्ट अधिकच बोल्ड होतोय. त्याला विषयाचं, फॉर्मचं, वेळेचं बंधन राहिलेलं नाहीये.

यू-टय़ूबसारख्या नवीन मनोरंजक इंटरॅक्टिव्ह माध्यमापासून दूर असणाऱ्यांना या माध्यमातील नवे चेहरे कदाचित माहिती नसतील. पण तरुण पिढींसाठी यू-टय़ूब स्टार हे खरे सेलेब्रिटी बनले आहेत. त्यांच्या फॉलोअर्सची संख्या दिवसेंदिवस वाढते आहे. यू-टय़ूब चॅनेल्सवरचे हे बोल्ड विषय बहुचर्चित ‘एआयबी’पुरते आणि त्यातल्या शिव्यांपुरते मर्यादित नाहीत. विषयांचं वैविध्य त्यात आहेच, त्याबरोबर वास्तवाचं भानही आहे. मेक-अप कसा करावापासून वेगवेगळ्या पाककृतींचे व्हिडीओ व्हायरल होतात, तसे ‘मॅरिटल रेप’सारखा विषय ब्लॅक कॉमेडीच्या अंगाने ‘गर्लियप्पा’नावाच्या यूटय़ूब चॅनेलवर येऊ शकतो.  ‘अनब्लश्ड’ नावाच्या चॅनेलवरच्या ‘फाइंड युवर ब्युटिफुल’ नावाचा व्हिडीओ असेल किंवा ‘हाइड युवर बम्प’सारखी एखादी गरोदर स्त्रियांच्या समान हक्कांचा जागर करणारी कपडय़ाची जाहिरात असेल.. हे विषयही व्हायरल होतात.

सौंदर्याचे ठोकताळे मोडून काढा, आतलं सौंदर्य महत्त्वाचं हे सांगणारे कितीतरी व्हिडीओ गेल्या दोन वर्षांत सोशल मीडियावर येऊन गेले. ते नुसते व्हायरल झाले, असं नाही तर त्यातून या विषयांवर बोललं गेलं, लिहिलं गेलं आणि त्यातून अनेकींना एक वेगळा विचार आणि आत्मविश्वास नक्कीच मिळाला असेल. यंदाच्या लॅक्मे फॅशन वीकमध्ये प्रथमच ‘प्लस साइझ’ मॉडेल्सचा फॅशन शो होणार आहे. त्यांच्या ऑडिशनच्या वेळी प्रसिद्ध फॅशन डिझायनर लिटिल शिल्पा हेच म्हणाली. ‘इंटरनेटवरच्या प्रभावी कँपेनिंगमुळे सौंदर्याची परिभाषा बदलायला मदत होतेय’, असं ती म्हणाली. ठरावीक उंची, बांधा, फिगर म्हणजे सौंदर्य नाही, हे लोकांच्या मनावर बिंबवलं जातंय या नवीन सोशल मीडियाच्या माध्यमातून.

या माध्यमाची लोकप्रियता वाढतेय तशा मोठय़ा, प्रस्थापित कंपन्याही यावर प्रयोग करू लागल्या आहेत. ‘सेक्स चॅट विथ पप्पू अ‍ॅण्ड पापा’ हे त्याचं उदाहरण. ‘यशराज’च्या बॅनरखाली असणाऱ्या ‘वाय फिल्म्स’नं ही वेबसीरिज निर्माण केलीय. सचिन पिळगांवकरसारखे अभिनेते यामध्ये काम करताहेत. ज्या देशात ‘सेक्स’ हा शब्द उच्चारायची भीती, तिथे सेक्स एज्युकेशनसंदर्भातली मनोरंजक वेबसीरिज सुरू करणं धाडसाचं. आशीष पाटील यांनी दिग्दर्शित केलेल्या या वेबसीरिजचे तीन भाग प्रदर्शित झाले असून त्याचा प्रतिसाद वाढतोय. म्हणजे कुठलाही विषय या नवमाध्यमांना आता निषिद्ध राहिलेला नाही. असं मुक्तपणे व्यक्त होणं, विषयाचं बंधन नसणं ही या माध्यमातून मिळणाऱ्या स्वातंत्र्याची ताकद आहे.

म्हणूनच सोशल मीडियावरच्या मनोरंजनाला नव्या पिढीनं झटकन आपलंसं केलंय. नवीन पिढीला कुठलीही बंधनं आवडत नाहीत. म्हणूनच ही पिढी ऑनलाइन कण्टेण्टच्या प्रेमात आहे. ‘कार्यक्रमा’चा ‘कण्टेण्ट’ झाल्यानंतर त्यामध्ये उत्स्फूर्तता आली आणि साचेबद्धता गेली. हे माध्यम या नव्या पिढीसारखंच आहे. प्रयोगशील, उत्साही आणि बंधमुक्त. म्हणूनच या नवमाध्यमातील स्टार कलाकारांना या माध्यमाविषयी आणि त्यातल्या स्वातंत्र्याविषयी त्यांचे विचार मांडायचं आवाहन केलं. खऱ्या अर्थाने पहिली मराठी यू-टय़ूब स्टार मिथिला पालकर म्हणते तसं.. ही माध्यमं काहीच लादत नाहीत, हेच त्यांचं बलस्थान आहे. या माध्यमाची ताकद आणि नव्या पिढीतली लोकप्रियता ओळखून अनेक ‘प्रस्थापित’ याकडे वळत आहेत. टीव्हीसारखी माध्यमं जशी प्रस्थापितांच्या ताब्यात गेली, तशी हीदेखील एकाधिकारशाहीकडे वळली तर मात्र याच्या स्वातंत्र्यावर, मुक्तपणे व्यक्त होण्यावर आणि सर्वसमावेशकतेवर बंधनं येऊ शकतात. पण सध्यातरी नवतरुणाईची ही नवमाध्यमं त्यांच्या स्वच्छंद, मुक्त आणि स्वतंत्रपणे जगण्याची प्रतीकं म्हणून ओळखली जात आहेत, हे निश्चित.

अरुंधती जोशी