भारतीय लग्नसोहळे हा परंपरेचा, अभिमानाचा आणि औत्सुक्याचा विषय खरा. पण त्याबरोबर लग्नघरासाठी वाढत्या खर्चाचादेखील विषय. साग्रसंगीत विवाह सोहळ्याचा अनुभव घेऊ इच्छिणाऱ्या पर्यटकांसाठी वधू-वरांनीच निमंत्रणासह तिकिटं लावली तर?  वेडिंग टुरिझमची ही कल्पना प्रत्यक्षात साकारली जातेय एका ऑस्ट्रेलियन स्टार्टअपच्या माध्यमातून आणि या स्टार्टअपची एक पार्टनर मुंबईची मराठमोळी तरुणी आहे.

लग्न.. आयुष्यातला एक महत्त्वाचा टप्पा. अनेकांसाठी स्वप्न, काहींच्याबाबतीत तर परिकथाच.. लग्न म्हणजे उत्सव, नव्या आयुष्याची चाहूल.. लग्न म्हणजे सेलिब्रेशन आणि लग्न म्हणजे या सगळ्या उत्सवी थाटासाठी होणारा भरमसाट खर्चही. लग्नाच्या खर्चाच्या रडगाण्याची एक अविरत कॅसेट प्रत्येक लग्नाच्या आधी-नंतर सुरू असते, तरी भारतीय लग्नाचा खर्च कमी काही होत नाही? कारण मुळात आपण भारतीय उत्सवांत रमणारे. म्हणूनच लग्नसमारंभाचा विषय काढला की, बऱ्याच जणांच्या मनात लग्नाचे लाडू, आनंदाच्या उकळ्या आणि सरतेशेवटी खर्चाच्या लवंगी माळासुद्धा फुटतात. त्यातही अमुकच साडी हवी आणि तमुकच ठिकाणी लग्न झाले पाहिजे असे अनेकांचे तऱ्हेवाईक आग्रह पूर्ण करता करता घरातल्या ‘ऑडिटर’ची सारी गणितंच चुकतात. इथे ‘ऑडिटर’ म्हणजे जवळपास सबंध लग्नसमारंभात खर्च आणि हिशेबाची तंतोतंत गोळाबेरीज करणारी एखादी व्यक्ती. सेलिब्रेशन किंवा उत्सवी परंपरांना कुठेही हात आखडता न घेता याचा खर्च थोडा हलका झाला तर? म्हणजे झोकात होणारे लग्नसमारंभ हाच आपला ‘यूएसपी’ आहे, तर लग्नाला येण्यासाठी तिकीट लावायला काय हरकत आहे? ही संकल्पना प्रत्यक्षात साकारलेली आहे. ‘जॉइन माय वेडिंग’ नावाने एक स्टार्टअप ऑलरेडी सुरू झालेला आहे. ऑस्ट्रेलिया आणि भारतातील तिघांनी मिळून हा उपक्रम सुरू केला असून मुंबईची मराठी मुलगी पल्लवी सावंत यातली एक पार्टनर आहे.

Who will be the Chief Minister Vidhan sabha election 2024
“कोण होणार मुख्यमंत्री?” शिंदे की फणडवीस? कोणाचा पक्ष मारणार बाजी? ज्योतिषतज्ज्ञांनी सांगितली भविष्यवाणी
CM Devendra Fadnavis on LOP
CM Devendra Fadnavis on LOP: विधानसभेत विरोधी पक्षनेतेपद…

‘जॉइन माय वेडिंग’च्या पोर्टलवर नवरा- नवरीनं आपल्या लग्नाची तारीख, ठिकाण आणि लग्न कुठल्या पद्धतीनं कसं करणार याची माहिती द्यायची. त्यासाठी किती तिकीट आकारणार हेदेखील सांगायचं. संपर्कासाठी एखाद्या व्यक्तीला नॉमिनेट करायचं. पोर्टलवर रजिस्टर केलेले ‘गेस्ट’ तुमचे डिटेल्स बघतात आणि इंटरेस्ट वाटला तर रीतसर ऑनलाइन तिकीट काढतात. लग्नसमारंभ झाल्यानंतर ‘जॉइन माय वेडिंग’ त्यांचे १५ टक्के कमिशन कापून या तिकिटाचे पैसे तुमच्या खात्यात जमा करतात, अशी एकंदर पद्धत आहे. एखाद्या कॅलिडोस्कोपप्रमाणे वाटणाऱ्या लग्नसमारंभामध्ये साखरपुडय़ापासून ते पाठवणीपर्यंतचे सारे क्षण निरखून पाहिले, तर लग्न म्हणजे घरगुती निर्मितीतून साकारलेला सिनेमाच वाटू लागतो. हा एक असा सिनेमा आहे ज्यासाठी तुम्ही तिकीटही आकारू शकता. लग्नसमारंभ अनुभवण्याचं तिकीट. अनेक परदेशी नागरिकांसाठी असं पारंपरिक भारतीय लग्नाला उपस्थित राहणं हा ‘लाइफटाइम एक्सपिरिअन्स’ असू शकतो. आमच्याकडे किनई हळदी समारंभ दणक्यात असतो.. आमच्याकडे ‘संगीत’च्या तयारीसाठी अमुक एक कोरिओग्राफर येणार आहे.. या अशा चर्चा रंगू लागल्या की, फड रंगतात ते लग्नबंबाळ गप्पांचे. हीच मानसिकता आणि लग्नसमारंभांमधील रंगत या विषयांचा अचूक ठाव घेत ‘जॉइन माय वेडिंग.कॉम’ची सुरुवात झाली. लग्नसंस्कृती आणि भटकंती याची सुरेख सांगड घालणारी एक नवी संकल्पना सध्या चर्चेत आहे – वेडिंग टुरिझम. या संकल्पनेला अनुसरूनच ‘जॉइन माय वेडिंग’चं काम चालतं. वेडिंग टुरिझम या संकल्पनेबद्दल आणि जॉइन माय वेडिंगच्या प्रवासाबद्दल या संकल्पनेची भारतातील प्रणेती पल्लवी सावंत हिच्याशी संवाद साधला.

‘जॉइन माय वेडिंग’चा हा प्रवास २०१२ला सुरू झाला. मार्टी मॅटीसा नावाची आमची एक पार्टनर चीनमध्ये शिकत होती. तिच्या एका सहकाऱ्याने तिला एका लग्नासाठी म्हणून भारतात येण्याचं निमंत्रण देत तमिळनाडूला बोलावलं होतं. त्या लग्नासाठी मार्टी फार उत्सुक होती. तिथे गेल्यावर तिला एक प्रश्न पडला. आपली ओळख होती म्हणून ती हे लग्न अनुभवू शकली, पण अशा अनेक विदेशी पर्यटकांना इतरांच्या लग्नसोहळ्यांबद्दल विशेषत: भारतीय संस्कृतीत होणाऱ्या लग्नसमारंभांबद्दल प्रचंड कुतूहल आणि औत्सुक्य असतं.. त्यांचं काय? अशा पर्यटकांना हे लग्नसोहळे अनुभवण्यासाठी कोणता पर्याय असावा? हा विचार डोक्यात ठेवत मार्टी परत आली. काही दिवस नुसते विचारातच गेले. दरम्यान मार्टीची भेट झाली ओर्सीशी.

‘ओर्सी पार्कान्यी ही स्टार्टअप बिझनेसमधली चांगलीच जाणकार आहे. त्या दोघींनीही या संकल्पनेवर काम केलं आणि मग या प्लॅनमध्ये माझा प्रवेश झाला आणि आमचं हे स्टार्टअपचं त्रिकुट पूर्ण झालं. ओर्सी आणि मार्टी यांच्याकडे प्लॅन तर तयार होताच. पण त्यांना भारतीय मानसिकता आणि एकंदर मार्केट ओळखणारी व्यक्ती हवी होती. त्यामुळे मग माझ्या कामाचा आलेख पाहता मीसुद्धा टीमचा एक भाग होऊन गेले आणि ‘जॉइन माय वेडिंग’ नावारूपास आलं,’ पल्लवी सांगत होती.

पल्लवी मूळची मुंबईची. दादरला राहणारी आणि पोदार कॉलेजची विद्यार्थिनी. व्यवस्थापन शास्त्रात उच्चशिक्षण घेऊन तिने काही मोठय़ा कंपन्यांसाठी काम केलं आणि लग्नानंतर ती ऑस्ट्रेलियाला स्थायिक झाली. ऑस्ट्रेलियात तिची ओर्सी आणि मार्टीशी ओळख झाली आणि या तिघींनी मिळून हा लग्नाचा घाट घातला. ‘जॉइन माय वेडिंगची आर्थिक आणि व्यावसायिक गणितं पाहिली तर आम्ही सर्वात आधी लक्ष दिलं दोन बेसिक घटकांवर – ‘डिमान्ड अ‍ॅन्ड सप्लाय’. इथे डिमान्ड म्हणजे पर्यटक आणि सप्लाय म्हणजे म्हणजे लग्न असं काहीसं सूत्र आम्ही तयार केलं आणि यांच्यातली गॅप भरून काढण्यासाठी व्यवसाय सुरू केला’, असं पल्लवी सांगते.

ही संकल्पना रुजवायला, ती अनेकांपर्यंत पोचवायला या तिघींना थोडा वेळ लागला हे नाकारता येणार नाही. लग्नाची तिकिटं..बऱ्याच जणांना आता यावर कसं व्यक्त व्हावं हेच समजत नसे. पण आता ही संकल्पना काही ठरावीक वर्गात चांगली रुजली आहे, असं पल्लवी सांगते. लग्नसमारंभामध्ये आयोजित केलेल्या विविध कार्यक्रमांनुसार, तुम्ही पर्यटकांना कोणकोणत्या सुविधा पुरवू शकता त्यानुसार लग्नाच्या तिकिटांचे दर लग्नाळू दाम्पत्यच ठरवू शकतं, असंही तिनं सांगितलं.

पद्धतशीर आणि साग्रसंगीत लग्नसोहळ्याचा घाट अनुभवायला अनेक विदेशी पर्यटक कमालीचे उत्सुक असतात. आतापर्यंतचा प्रतिसाद पाहता आमच्या या आगळ्यावेगळ्या संकल्पनेला सकारात्मकच प्रतिसाद मिळत आहे. उत्तर भारतीय आणि दाक्षिणात्य लग्नांसाठीदेखील परदेशी पर्यटक उत्सुक असतात. तसंच पूर्वेकडूनही जॉइन माय वेडिंगला चांगलाच प्रतिसाद मिळत आहे, असंही पल्लवीनं सांगितलं.

या स्टार्टअपचा भाग होण्याच्या पल्लवीच्या निर्णयावर त्या वेळी अनेकांनी भुवया उंचावल्या होत्या. ‘अगदी काहीतरी करायला जाऊ  नकोस, यातून काय साधणार, कोण प्रतिसाद देणार, काय करशील ते सांभाळूनच कर’ असे सल्लेही तिला मिळाले. पण ‘जॉइन माय वेडिंग’सोबतचा अनुभव सांगताना पल्लवी सांगते, ‘संकल्पना विकायची आणि सव्‍‌र्हिसही द्यायची असं डबल चॅलेंज यात होतं. कुतूहल म्हणून सुरुवात झाली आणि त्याला कुटुंबाची साथ लाभली. ही नवी आव्हानं स्वीकारताना यातून बरंच काही शिकायलाही मिळालं. आपल्या रोजच्या आयुष्यात बोलता बोलता अशा अनेक कल्पनांचा जन्म होत असतो, पण त्या कल्पना सत्यात उतरवल्या गेल्या पाहिजेत. तरच त्याचा खरा उपयोग होईल’, असंही पल्लवी म्हणते.

मार्टी आणि ओर्सी या दोघींपैकी मार्टीने भारतीय लग्नांची मजा, धम्माल पाहिली आहे. ओर्सीने हा अनुभव घेतलेला नाही. तरीही त्या दोघींच्याही वाचनात भारतीय परंपरा, लग्नसमारंभ याविषयी बऱ्याच गोष्टी नियमित असतात. भारतीय संस्कृतीबद्दल बरंच काही ऐकल्यामुळे त्या भारतीय लग्नांबद्दल उत्साही असतात, असंही पल्लवी सांगते.

बाहेरच्या देशांमध्ये सहसा संस्कृती, लग्नपरंपरा, पेहराव, पद्धती आणि खानपान यामध्ये एवढं वैविध्य आढळून येत नाही. याउलट आपल्या देशात दर पन्नास किलोमीटरनंतर एका वेगळ्या संस्कृतीचं दर्शन होतं. म्हणजे पंजाबी लग्नातला ‘चक दे फट्टे’ वाला हैदोस असो किंवा मग मराठी लग्नांतला हळदी समारंभ किंवा कानपिळी असो.. प्रत्येक सोहळ्यात वेगळी धमाल असते. वेगळी पक्वान्नं असतात. याचा अनुभव जगभरच्या पर्यटकांना देण्यासाठी थेट ऑस्ट्रेलियाहून भारतात लग्नाचे वारे वाहत ठेवणाऱ्या ‘जॉईन माय वेडिंग’च्या या नव्या संकल्पनेला मिळणारा प्रतिसाद वाढला तर वेडिंग टुरिझमचा परीघ आणखी रुंदावणार यात शंका नाही. (लग्नाच्या तिकिटांसाठी, या उपक्रमाच्या कार्यपद्धतीसाठी आणि या बाबतच्या अधिक माहितीसाठी ख्रल्लट८ही्िरल्लॠ.ूे या संकेतस्थळाला भेट देता येईल.)

जॉइन माय वेडिंगचं व्यावसायिक गणित सोपं आहे.. डिमांड अ‍ॅण्ड सप्लायमधली गॅप भरून काढण्याचं. इथे डिमांड म्हणजे पर्यटक आणि सप्लाय म्हणजे आपली पारंपरिक लग्न. भारतीय संस्कृतीच्या लग्नसमारंभाबद्दल पर्यटकांना प्रचंड ्र कुतूहल असतं. आम्ही अशा पर्यटकांना लग्नघराशी जोडून द्यायचं काम करतो. यामध्ये लग्न करणाऱ्या जोडप्याला त्यांचे गेस्ट निवडायचे, तिकीटदर ठरवण्याचे अधिकार असतात. लग्नसमारंभानंतर आम्ही आमचं कमिशन कापून तिकिटाचे पैसे जोडप्याकडे सुपूर्द करतो.

– पल्लवी सावंत, पार्टनर, जॉइन माय वेडिंग

– सायली पाटील

Story img Loader