७०-८०च्या दशकातील दुकानातून केली जाणारी खरेदी मागे पडून त्याची जागा ऑनलाईन शॉपिंगने घेतली. मात्र आता हळूहळू तेसुद्धा मागे पडत चाललं आहे. हौस म्हणून आपली छायाचित्रे काढून एकमेकांसोबत शेअर करण्याची संधी देणारं इन्स्टाग्राम हे आता खरेदी-विक्रीचं नवं केंद्र बनू पाहतंय. इन्स्टाग्रामवर विशिष्ट अकाउंटवरून नानाविध गोष्टी विकू पाहणाऱ्या नव्या दमाच्या व्यापाऱ्यांचं पेव फु टलं आहे. खरेदी-विक्रीचा हा इन्स्टा फंडा काहींच्या पचनी पडला आहे तर काहींच्या वाटय़ाला फसवणूकही येते आहे. समाजमाध्यमांचा वापर क रत सगळ्यांच्या ऑनलाईन खिडक्यांमध्ये घुसून शॉपिंगसाठी उद्युक्त करणाऱ्या या बाजाराविषयी..

कितीही नाही म्हटलं तरी खरेदी हा मुलं-मुली किंवा स्री-पुरूष असो सगळ्यांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. वेगाने बदलणाऱ्या जगात अपडेटेड ज्ञानासोबत अप-टू-डेट राहणं पसंत केलं जात आहे. सोशल मिडिया आणि ऑनलाइन शॉपिंग अस्तित्वात येण्यापूर्वी दुकान किंवा मॉलमध्ये जाऊ न साग्रसंगीत खरेदी केली जात होती, मात्र ‘ऑनलाइन’चं जाळं पसरू लागल्यावर सर्वच क्षेत्रात वेगाने बदल झाल्यानंतर ‘बाजार’ आणि ‘खरेदी’ या संकल्पना तरी यातून कशा निसटणार?

‘फ्लिपकार्ट’, ‘मिंत्रा’, ‘अमेझॉन’ इत्यादी ऑनलाईन वेबसाईट्सनी तर या खरेदी नावाच्या प्रकरणात एक नवीच क्रांती केली आहे. मुलींसाठी चप्पलांपासून केसात लावायच्या चापापर्यंत, मुलांसाठी शूजपासून ते डोक्यावरच्या टोपीपर्यंत, इतकंच कशाला तर मेकअप, अंतर्वस्त्रं, घरातलं सामान, पुस्तकं असं सगळंच या ऑनलाईन साईट्स वर उपलब्ध आहे. आपलं ऑनलाईन मार्केट विस्तारण्याच्या नादात हळूहळू हा स्वतंत्र साईट्सचा मोर्चा फेसबुक पेजकडे वळवला. तिथे स्थिरस्थावर झाल्यानंतर आता मोठमोठय़ा ब्रँडपासून लघुउद्योजकांपर्यंत सगळ्यांनीच आपले लक्ष ‘इन्स्टाग्राम’वर व्यग्र असणाऱ्या आणि सातत्याने दिसणाऱ्या तरूणाईकडे वळवलं आहे. ‘इन्स्टाग्राम’ म्हणजे नुसती छायाचित्रे टाकणं ही संकल्पना मागे पडून त्याचा वापर आता ‘स्टार्टअप’ बिझनेस आणि ऑनलाईन गोष्टी विकण्यासाठी केला जातो आहे. आपल्याला हव्या असणाऱ्या वस्तूपर्यंत झटपट पोहोचणं, विविध अकाऊं ट्सवर उपलब्ध असणाऱ्या वस्तूंसोबत तुलना करून आपल्याला हवी असणारी वस्तू विकत घेणं आता सोपं झालं आहे.

केवळ कपडे आणि दागिनेच नाही तर तुमच्या आवडत्या परदेशी ब्रँड्सचे शूज, घडय़ाळं, गॉगल्स, फोन कव्हर्स इत्यादींची पहिली नक्कल असलेल्या वस्तूंना या इन्स्टाग्राम शॉप्सवर प्रचंड मागणी आहे. अगदी तंतोतंत दिसणाऱ्या या अ‍ॅक्सेसरीज तरुणाई या इन्स्टाग्राम दुकानांवरून खरेदी करतेच. बरं या शॉप्सचा अजून एक फायदा असा की इथे ते विशिष्ट इन्स्टाग्राम अकाउंट हँडल करणाऱ्या व्यक्तीशी प्रत्यक्ष बोलता येतं. त्यामुळे एक वैयक्तिक संवाद साधला जातो आणि आपण विकत घेत असलेल्या वस्तूची शहानिशाही करता येते. त्या अकाऊंट्सच्या फॉलोअर्सचा आकडा हा त्यांना मिळणारा प्रतिसाद दर्शवत असल्याने आपण निवड केलेल्या शॉपला मिळणारी पसंती, मार्केटमध्ये  नेमका काय ट्रेंड आहे याची नोंद घेणं सोपं जातं.

‘कस्टमाईज्ड’ म्हणजेच आपल्याला हवी तशी वस्तूही या शॉप्समध्ये बनवून मिळते. कपडय़ांमध्ये अमूक एक रंग, एखादी प्रिंट, कपडय़ांवर किंवा कॉफीच्या मगवर एखादं छायाचित्र, मोबाइलला कव्हरवर तमूक चित्र असे सगळे लाड या इन्स्टाग्राम हँडल्सतर्फे बऱ्याच प्रमाणात पुरावले जात असल्याने साहजिकच त्यांच्याकडे कल वाढतो आहे. एका सर्चवर देशभरातूनच काय तर जगभरातून तुम्हाला हव्या असणाऱ्या गोष्टींचे पर्याय या अकाऊंट्सवरून उपलब्ध होत असल्याने त्याचं जाळं विस्तारत चाललं आहे. यातून अनेक ब्रँड्सही वेगाने विकसित होत आहेत.

कोणतीही गोष्ट विकत घेताना त्याची गुणवत्ता महत्वाची असते. मात्र ऑनलाईन शॉपिंग करताना अनेकदा कपडय़ांच्या, दागिन्यांच्या बाबतीत ‘दिसतं तसं नसतं’ असा अनुभव येतो. ही नेमकी मेख लक्षात घेऊन साधारण दीड वर्षांपूर्वी ‘मांझा’ या ब्रँडची कहाणी सुरू झाली. ‘मांझा’ची संस्थापक निकी सेठ सांगते की, ‘मला स्वत:ला ऑनलाईन शॉपिंग करणं आवडायचं, मात्र अनेकदा हवी ती गोष्ट विशेषत: कपडे मनासारखे मिळाले नाही की हिरमोड व्हायचा. मग मॉलकडे कपडे खरेदीचा मोर्चा वळवला पण मग तिथे हलक्या प्रतीच्या कपडय़ांसाठी भरमसाट पैसे मोजणं नकोसं वाटू लागलं. म्हणून मग स्वत:च काहीतरी सुरू करू या विचारातून ‘मांझा’ सुरू केलं’. उत्तम गुणवत्ता आणि दररोज वापरता येणारे सहज सोपे कपडे असं ‘मांझा’चं समीकरण आहे. ‘आमचे डिझाईन्स वापरायला सोपे आणि विविधलक्षी आहेत. हँड पॉकेट्स, पायघोळ कुर्ती, पलाजो अशा विविध ढंगाचे, रंगाचे कपडे आम्ही तयार करतो’, असं निकी सांगते. महागडे कपडे हे अनेकदा सणासाठी किंवा फारतर कुठल्यातरी सोहळ्यासाठी म्हणून वापरले जातात. मग ते पडून राहतात हे लक्षात घेऊन सणात खुलून दिसतील आणि रोज वापरता येतील असे कपडे, त्यातही फॅ शनच्या बाबतीत सगळेच जागरूक झाल्याने स्वत:च्या वर्णाला साजेसे दिसतील असे कपडे खरेदी केले जातात, या गोष्टी लक्षात घेऊन त्यांनी ‘मांझा’ विकसित केला. यासाठी लागणारे इकत, कॉटन, सिल्क आम्ही स्वत: जाऊ न त्या त्या प्रदेशातून विकत घेतो त्यामुळे गुणवत्ता तर अबाधित राहतेच, पण ग्राहकही त्यांना मनासारखी गोष्ट मिळाली म्हणून समाधानाने पैसे देतात, असं निकी म्हणते. खरंतर कपडे खरेदी सर्रास होत असल्याने ‘मांझा’ सारखे अनेक इन्स्टाग्राम शॉप्स उदयाला आले आहेत. कपडय़ांप्रमाणेच दागिन्यांचेही इन्स्टाग्राम शॉप्स खूप चालतात. या शॉप्सवर विकल्या जाणारम्य़ा दागिन्यांचं गणित समजून घेण्यासाठी ‘शुभम पर्ल्स’ नावाने प्रसिद्ध असणाऱ्या इन्स्टाग्राम हँडलशी संपर्क केला. ‘शुभम पर्ल्स’चे हर्षित अग्रवाल यांना दागिन्यांची गुणवत्ता आणि त्याचा खरेपणा याविषयी विचारले असता दागिन्यांमध्ये कोणत्याही प्रकारचं बहुमूल्य रत्न वापरत नाही, असं त्यांनी स्पष्ट केलं. ‘माझे बाबा स्वत: बहुमूल्य रत्नांचा आणि सोन्याचा व्यापार करत असत. असा एक दागिना खेरदी करायचा तर किती पैसे लागतात हे आम्ही पाहिलंय. आम्ही तंतोतंत सोन्याच्या दागिन्यांसारखे दिसणारे दागिने केवळ दोन ते तीन ग्रॅम चांदी वापरून बनवतो. याचा फायदा असा की ग्राहकांना स्वस्तात सोन्यासारखे दिसणारे सगळ्याच कपडय़ांवर खुलून येतील असे दागिने खरेदी करता येतात’.

दागिन्यांच्या बाबतीत ट्रेंड्सकडेही विशेष लक्ष दिले जाते. ‘इन्स्टाग्राम’वर हल्ली सगळ्याच भागातून आपापल्या प्रांतांच्या संस्कृतीप्रमाणे गोष्टी बनवून विकल्या जातात. हल्ली काहीतरी हटके घालण्याचा जमाना असल्याने अगदी उत्तर भारतातून किंवा इतर भागातूनही पारंपरिक पेहरावावर दाक्षिणात्य धाटणीच्या दागिन्यांना जास्त पसंती मिळते आहे. टेम्पल डिझाईन्स, ‘बाहुबली’ चित्रपटात राणी शिवागामीने घातलेली नथ, हिऱ्यांचे दागिने अशा विविध दागिन्यांना जास्त मागणी असल्याचे अग्रवाल यांनी स्पष्ट केले.

कपडे-दागिनेच नव्हे तर अगदी मोबाईलचं कव्हर आपल्या आवडीनुसार घेणं हेही युध्द जिंकण्यापेक्षा कमी राहिलेलं नाही. महाग मोबाईल आणि त्याला ‘चट्टेरी पट्टेरी’ कव्हर हे अनेकांच्या पचनी पडत नाही. मोबाईलची सुरक्षितताही तेवढीच महत्वाची असते. त्यामुळे दोन्हींचा मेळ असणारं आपल्या आवडीनुसार कव्हर बनवून देणारं कोणीतरी मिळालं तर ‘गंगा नहा आये’ असं वाटतं. असंच इन्स्टाग्रामवर ‘कव्हर लेगा क्या’ असं विचारात हार्दिक गडा आणि जुगल बरोत मोबाईल कॅव्हर्सचं शॉप चालवतायेत. या कव्हर कथेविषयी सांगताना हार्दिक म्हणाला की, ‘आम्ही असंच एकदा कव्हर घ्यायला गेलो असता मनासारखं कव्हर मिळालं नाही आणि प्रचंड हिरमोड झाला. तेव्हाच आपल्याला आज जसं वाटलं तसं अनेकांना वाटलं असेल हा विचार मनात चमकला. त्यातून मग ‘कव्हर लेगा क्या’चा जन्म झाला. हार्ड मॅट फिनिशिंग असणारे कव्हर्स ही आमची खासियत आहे. आम्ही आमचे स्वत:चे डिझाईन्स तर विकतोच मात्र ग्राहकांना हव्या त्या प्रकारचे कव्हर्स बनवून देणं आम्हाला विशेष आवडतं. ग्राहक जेव्हा आमचे कव्हर्स त्यांच्या अकाऊंटवर आम्हाला टॅग करून छायाचित्रं टाकतात तेव्हा आम्हाला पसंती तर मिळतेच आणि व्यवसायही वाढतो. मौखिक प्रसिद्धीपेक्षा इन्स्टाग्रामच्या सगळीकडे पसरणाऱ्या या प्रसिद्धीचा आम्हाला जास्त फायदा होतो’, असं तो सांगतो.

मोठमोठय़ा परदेशी ब्रँड्सचे कपडे, वस्तू, अ‍ॅक्सेसरीज घालून आपण सगळीकडे मिरवत असतो मात्र या इन्स्टाग्राम शॉप्सच्या चळवळीमुळे देशभरात अगदी छोटय़ा-मोठय़ा शहरांमधून काहीतरी हटके गोष्टी बनवून विकणाऱ्या स्थानिक उद्योजकांनी आता स्वत:चे ब्रँड विकसित केले असून तेही आता ग्लोबल होतायेत. ‘इन्स्टाग्राम’सारखं माध्यम त्यांना एका क्लिकसरशी त्यांची सर्जनशीलता जगापर्यंत नेण्यासाठी आणि त्यातून आर्थिक नफा, प्रसिध्दी मिळवण्यासाठीही फायदेशीर ठरलं आहे. या ‘इन्स्टा’ बाजारामुळे अशा अनेक ब्रँडकथा जन्माला येत असून खरेदीदार आणि विक्रे ता यांना एकत्र जोडणारा हा दुवा येत्या काळात विकासाच्या काही नवीन वाटा खुल्या करणारा ठरेल!

परदेशातील अनेक भारतीय सणासमारंभांसाठी त्याच्या आवडीचे दागिने या इन्स्टा शॉप्सकडून बनवून घेतात. सातासमुद्रापार राहणाऱ्या केवळ भारतीयांपर्यंतच नाही तर भारतीय संस्कृतीची आवड असणाऱ्या सगळ्यांपर्यंत इन्स्टाग्राममुळे पोहोचणं शक्य झालं आहे. शिवाय, या दागिन्यांमध्ये सोन्याचा शून्य वापर असल्याने ते भारताबाहेर पाठवणं देखील सजह शक्य होतं त्यामुळे शॉप्स आणि खरेदीदार दोघांसाठीही हा ऑनलाईन बाजार भरवशाचा आणि तुलनेने सोपी प्रक्रिया असलेला ठरतो आहे.