तेजल चांदगुडे

वाढदिवस आणि केक यांचं नातं अतूट आहे. वाढदिवस अगदी साधेपणाने साजरा करण्याचं ठरवलं तरी त्या साधेपणातही केक हवाच असतो. केक कापल्याशिवाय आणि तो खिलवल्याशिवाय खरंतर अनेकांना वाढदिवस पूर्ण झाल्यासारखं वाटतच नाही. मग अगदी मधुमेह असणारी व्यक्ती देखील वाढदिवशी केकसाठी नाही म्हणत नाही. तसेच हल्ली आपले प्राणीदोस्तही केकला अजिबात नाही म्हणत नाहीत. खास त्यांच्यासाठी म्हणून वेगळे केक बनवणारी बेकरी शॉप्स हल्ली सगळीकडे पाहायला मिळतायेत..

मित्रमंडळी, नातेवाईक, घरातील सदस्य या सगळ्यांचा वाढदिवस आपण नेहमी उत्साहात साजरा करतोच मात्र काही जण तर पाळीव दोस्तांचे वाढदिवसही तितक्याच उत्साहात साजरे करण्यासाठी धडपडत असतात. सोशल मीडियाच्या या काळात आयुष्य व्हायरल करण्याच्या शर्यतीत घरातील लाडक्या प्राण्यांनाही सामील केले जाते. त्यामुळे या छोटय़ा दोस्तांचे वाढदिवसही दणक्यात साजरे केले जातात. त्यांनाही कपडे घालून नटवतात, त्यांच्या वाढदिवसासाठी म्हणून अख्खं घर सजतं. फुगे फुगवले जातात आणि हा आनंद द्विगुणित करण्यासाठी म्हणून खास केक हवाच. मग सुंदर पद्धतीने बनवलेला, रंगीबेरंगी केकही त्यांच्यासमोर हजर होतो.

या पाळीव दोस्तांसाठी आपल्या वाढदिवसाला आपण खात असलेला केकच आणत असतील किंवा त्यांच्यासाठीही केक आणायचा आहे मग त्यात विशेष काय आहे इतकं?, असा विचार जर तुम्ही करत असाल तर जरा थांबा, कारण इथे त्यांच्या केक चं गणित थोडं वेगळं आहे. पाळीव दोस्तांच्या वाढदिवसात आपण खात असलेला मैदा, फ्रेश क्रीम असे पदार्थ वापरून तयार केला जाणारा केक आणला जात नाही तर त्यासाठी वेगळ्या जिनसांचा वापर केला जातो. आपल्या पाळीव दोस्तांनाही आपल्याप्रमाणेच बेकरीत मिळणाऱ्या केक, पफ्स, पेस्ट्रीजचा आस्वाद घेता यावा या विचारातून पेट बेकरीजची सुरुवात झाली. ‘पेट बेकरीज’ नावाचं हे प्रस्थ तसं अनेकांना आजही परिचित नाही. आता अनेक ठिकाणी या बेकरीजचं स्तोम पसरतं आहे.

मुंबईमध्येदेखील साधारणत: सात ते आठ वर्षांपासून ‘गॉरमट’, पाळीव दोस्तांसाठी विशेष करून श्वानांसाठी ही वेगळ्या प्रकारची केक सेवा पुरवत आहेत. गॉरमटच्या सर्वेसर्वा – संस्थापक भाविनी बंगेरा यांनी या केक आणि त्यांच्या जिनसांबद्दल विशेष माहिती पुरवली. पाळीव दोस्तांसाठी साजेशा असणाऱ्या या केकच्या जिनसांबद्दल विचारले असता भाविनी यांनी सांगितले की, ‘आम्ही प्रामुख्याने श्वानांसाठी योग्य असतील असे केक बनवतो. साखर, बटर, किंवा कोणत्याही प्रकारचं क्रीम श्वानांना दिल्या जाणाऱ्या केकमध्ये वापरलं जात नाही. आम्ही गव्हाचं पीठ आणि त्याच्यामध्ये साधारण पन्नास टक्के ओट्स मिसळून त्यापासून केक बनवतो. तसंच केकवर ‘आयसिंग’ म्हणजेच सजावटीसाठी दही आणि क्रीम चीज यांना एकत्रित करून बनवलेलं क्रीमसारखं दिसणारं मिश्रण वापरतो. मुळात श्वानांना क्रीम चीजचं प्रमाण जास्त असेल तर त्रास होऊ  शकतो त्यामुळे ते योग्य त्या प्रमाणात घेऊनच हे क्रीम बनवलं जातं. ओट्समुळे श्वानांना सुदृढ राहण्यास मदत होते त्यामुळे केकमध्ये ओट्स वापरणं त्यांच्या दृष्टीने फायद्याचं ठरतं,’ असं त्या सांगतात.

श्वानांसाठी मांसाहार आणि शाकाहार दोन्ही महत्त्वाचे असतात त्यामुळे त्यांच्या आवडीप्रमाणे भाज्या, फळं, मटण, मासे हे ओट्स आणि गव्हाच्या पिठासोबत एकत्र करून हे केक तयार केले जातात. आहाराचा विचार करता विविध जातीच्या श्वानांचा आहार वेगवेगळ्या स्वरूपाचा असतो. केक बनवताना या गोष्टींचा विचार केला जातो का?, असं विचारलं असता भाविनी म्हणाल्या की, ‘केकमध्ये या गोष्टींची काळजी घेण्याची तितकीशी गरज भासत नाही. केकसाठी लागणारा बेस हा सगळ्या श्वानांसाठी योग्य असाच असतो त्यामुळे त्यासाठी वेगळी काळजी घ्यावी लागत नाही. मात्र अनेकदा आम्ही श्वानांच्या आवडीप्रमाणे चवींमध्ये आणि मिश्रणाच्या जिनसात बदल करतो. काही श्वानांना गव्हाच्या पिठात असणाऱ्या ‘ग्लुटेन’चा त्रास होत असतो, अशा वेळेस गव्हाचं पीठ न वापरता केक संपूर्णत: ओट्सचे बनवले जातात किंवा पर्यायी दुसरे पदार्थ त्यासाठी वापरले जातात.’

हे तर झाले केक बनवण्यासाठी होणारे सोपस्कार. मात्र तुमच्या वाढदिवसाला जसं तुम्ही पार्टी करता तसंच तुमच्या श्वानांच्या वाढदिवसाच्या पार्टीसाठीदेखील त्यांना साजेसा ‘पार्टी मेन्यू’ या पेट बेकरीजमध्ये उपलब्ध असतो. श्वानांच्या वाढदिवसाच्या पार्टीसाठी आम्ही पफ्स, पिझ्झा, पेस्ट्रीज असे अगदी माणसांच्या पार्टीत असतात तसे पदार्थ बनवून देतो. अर्थात या गोष्टी श्वानांसाठी असल्याने वापरल्या जाणाऱ्या अन्नपदार्थाबद्दल विशेष काळजी घेतली जाते. उदाहरणार्थ पिझ्झासाठी वाफवून घातलेल्या टोमॅटोचा सॉस बनवला जातो मात्र तो ही अगदी कमी प्रमाणात गहू/ओट्सच्या पिझ्झाच्या आकाराच्या बेसवर लावला जातो. भाज्या किंवा मांसदेखील योग्य त्या प्रमाणात वापरून हे विशेष पिझ्झा बनवले जातात. पफ्स बनवतानादेखील वापरल्या जाणाऱ्या जिनसांच्या प्रमाणावर विशेष लक्ष दिले जाते. रिटर्न गिफ्ट म्हणून तर श्वानांसाठी योग्य अशा बिस्किटांचे डबे देण्याची पद्धतही आता रुजू लागलीये, असं त्या सांगतात.

केकचे आकार आणि त्यांच्या चवीबद्दल बोलताना भविनी यांनी सांगितले की, ‘या पदार्थाची चव काही प्रमाणात माणसांना न आवडणारी असते मात्र श्वानांसाठी लक्ष वेधून घेणारी गोष्ट म्हणजे अन्नपदार्थाचा आकार. श्वानांचा पंजा, बोन, श्वानांच्या चेहऱ्याचा आकार असे विविध आकार तयार करणं हे मोठं आव्हान असतं. मात्र श्वानांना या गोष्टी बघाताक्षणी आवडतात. त्यामुळे आकर्षक आकार देणं ही या व्यवसायातील एक महत्त्वाची गोष्ट आहे. त्यामुळे विशेष म्हणजे पदार्थाची किंमत वजनापेक्षा त्यांच्या आकारावर ठरवली जाते.’

एकंदरीतच काय तर आता तुमच्या वाढदिवसाप्रमाणे तुमच्या पाळीव दोस्तांच्या वाढदिवसाच्या पार्टीचा जर तुम्ही विचार करत असाल तर हे सहज शक्य आहे. अनेक शहरांमध्ये आता पाळीव दोस्तांना त्यांच्या आवडीचं ‘बेकरी फूड’ उपलब्ध करून देणाऱ्या ‘पेट बेकरीज’चं जाळं पसरू लागलं आहे. मग तुम्हीही आता बिनधास्त तुमच्या दोस्तांच्या पार्टीचं आयोजन करा आणि त्यांना या पेट बेकरीतील पदार्थाचं सरप्राईज द्या. त्यांची चव तुमच्या पाळीव प्राण्यांना भुरळ पाडेल यात शंकाच नाही.