तेजल चांदगुडे

व्यायाम, योगा, योग्य खाणं हे उत्तम आरोग्यासाठी महत्त्वाचे घटक आहेत. खरं तर सुदृढ शरीर आणि उत्तम आरोग्य राहण्यासाठी सगळ्यांनीच आपापल्या शरीरावर योग्य ती मेहनत घ्यायला हवी. साधारण ८०-९०च्या दशकात या ‘फिटनेस’चं महत्त्व स्वत:चं आरोग्य उत्तम राखण्यासाठी होतं, मात्र जसजसा वेळ जाऊ  लागला तसतसे फिटनेसचे अर्थ बदलू लागले. केवळ सुदृढ राहण्यासाठी नव्हे तर त्या पलीकडे जाऊन स्वत:च्या आयुष्याला आजच्या जीवनशैलीच्या साच्यात बसवण्यासाठी व्यायाम आणि जिम यांचा वापर होऊ  लागलाय. काळानुसार या व्यायाम संस्कृतीत अनेक बदल घडून येत आहेत आणि त्यातूनच फिटनेसचे नवनवे ‘आऊट ऑफ द बॉक्स’ प्रकार एकापाठोपाठ एक धडकताहेत. पारंपरिक योगा आणि व्यायाम प्रकारांसोबतच नव्या पिढीला आकर्षित करणारे आणि कदाचित आपणही कधी अजमावून न पाहिलेले ‘फिटनेस ट्रिक्स’ सध्या नावारूपाला येत आहेत.

tuberculosis marathi news, tuberculosis genetic sequencing marathi news
क्षयरोग उपचारामध्ये जनुकीय क्रमनिर्धारण महत्त्वपूर्ण, औषध प्रतिरोधकातील बदल समजण्यासाठी मदत
Bombay high court, verdict, Compensation, acid attack victims
अ‍ॅसिड हल्ल्यातील जुन्या पीडितांना नवीन योजनेचा लाभ मिळणार
wife
पत्नीने तक्रार दाखल करणे क्रुरता नाही…
Inheritance of girls and women Two main types of property ownership
मुली आणि महिलांचा वारसाहक्क

उत्तम आरोग्यासाठी सकाळी उठून व्यायाम करणं, दररोज वेळेत खाणं, घरचं जेवण ही सगळी पथ्यं आवश्यक असली तरी तरुणाईची आजची जीवनशैली पाहता यातल्या अनेक गोष्टी दररोज साध्य होणं अशक्य आहे. मग अशातच गरज पडते असं काही तरी ‘आऊट ऑफ द बॉक्स’ शोधण्याची जे आपल्या जीवनशैलीला साजेसंही असेल आणि त्यातून हेतू साध्य होतील. धावपळीच्या जीवनात सहज शक्य असणारा एक व्यायाम प्रकार म्हणजे ‘ट्रॅव्हल योगा’. खरं तर अनेक जण याचा अर्थ खूप प्रवास करणाऱ्यांसाठीचा योग असाही घेतात. पण हा ट्रॅव्हल योगा तुम्ही प्रवास करत असताना उभ्या उभ्या किंवा ऑफिसला येता जाता तुम्ही हे योगा प्रकार करू शकता. यामध्ये खूप साध्या पण फायदेशीर अशा छोटय़ा छोटय़ा कृती समाविष्ट असतात. ‘चेअर योगा’ हा यातच मोडणारा आणखी एक प्रकार. बसल्या जागी वॉर्म अप करणं, मान आणि पाठीचा व्यायाम करणं, दोन्ही बाजूंना आळीपाळीने झुकून कंबरेसाठी व्यायाम असे अनेक प्रकार यात मोडतात. खरं तर हे योगा आणि व्यायाम प्रकार अगदी साग्रसंगीत सगळी तयारी करून केले पाहिजेत या समजाच्या पुढे जाऊन योग्य प्रकारे आपली मदत करतात.

‘पॉटी डान्स’ म्हणून प्रसिद्ध असलेला डान्स प्रकार हा ऐकायला जरी विचित्र वाटत असला तरीसुद्धा कॅलरीज कमी करण्यासाठी याचा वापर होताना दिसतो आहे. मुळात आपण उठल्यावर ब्रश करण्यापासून ते रात्री झोपेपर्यंत अनेक कामांदरम्यान काही सोपे व्यायाम प्रकार करू शकतो. खरं तर या गोष्टी काही नवीन नाहीत मात्र आपण सहसा या अंगीकारत नाही. ‘पॉटी डान्स’ प्रमाणेच एक आगळावेगळा प्रकार म्हणजे ‘कांगु जम्प्स’. नावाप्रमाणेच कांगारूप्रमाणे उडय़ा मारणं हे या व्यायाम प्रकाराचं लक्षवेधी साधन. यामध्ये पायात स्प्रिंगसारखे वर खाली होणारे शूज घालून व्यायाम प्रकार केले जातात. यासोबतच पळणं, दोरी उडय़ा हे प्रकार याच्या जोडीने केले जातात. स्वित्र्झलडच्या एका अभियंत्याने या व्यायाम प्रकाराचा शोध लावला होता. गुडघ्यांच्या सांध्यांमधील दुखण्यावर हा व्यायाम प्रकार  एक उत्तम उपाय ठरतो असाही अनेकांचा दावा आहे.

नृत्य हा जगातील सगळ्यात उपायकारक व्यायाम प्रकारांपैकी एक आहे आणि आजच्या तरुण पिढीने पारंपरिक नृत्याला मागे सारत फिटनेससाठी एका ‘पार्टी राइड’ला जवळ केले आहे. या फिटनेस वर्गात मंद दिवे, लाऊ ड गाणी असा पार्टीचा माहोल तयार करून जिममधली उपकरणं वापरत व्यायामाची पार्टी केली जाते. हृदयाचे ठोके वाढवणाऱ्या गाण्यांच्या तालावर पाठीच्या कण्यासाठी उपयुक्त व्यायाम, फिटनेस डान्स असे बरेच प्रकार या पार्टी राइडमध्ये केले जातात.

आणखी एक जुना पण तरीही वेगळा योगा प्रकार म्हणजे ‘अँटिग्रॅव्हिटी योगा’. एका रेशमाच्या लांबलाचक कपडय़ाला लटकत आणि त्या कपडय़ाला स्वत:भोवती गुंडाळत गुरुत्वाकर्षण शक्तीच्या विरुद्ध हवेत पारंपरिक योगा प्रकार करणे हे याचं वैशिष्टय़. या योग प्रकारामुळे पाठीचा कणा, सांधेदुखी अशा अनेक गोष्टींना फायदा होतो. याचं सूत मलखांबाशी जुळत असलं तरी यामध्ये हवेत लटकत राहिल्यामुळे ताकद आणि बळ वाढीस लागतं. व्यायामादरम्यान जर तुम्ही बौद्धिक खेळ खेळालात तर शरीरासोबत मेंदूचाही विकास होण्यास मदत होते. यालाच अनुसरून एक प्रकार म्हणजे ‘ट्रिविया ट्रेनिंग’. यात तुम्हाला एका जोडीदाराची गरज असते, कारण हा व्यायाम प्रकार दोन जणांसाठी आहे. एक दुसऱ्याला बौद्धिक प्रश्न विचारत त्या प्रश्नाचं उत्तर ना मिळाल्यास शिक्षा म्हणून तुम्हाला हवा असलेला व्यायाम प्रकार समोरच्याकडून करून घेणं हा या व्यायाम प्रकाराचा नियम आहे. त्यामुळे बौद्धिक आणि शारीरिक व्यायाम अशा दोन्ही गोष्टी यात साध्य होतात.

खरं तर आज जगाच्या पाठीवर उत्तम आरोग्यासाठी नवनवीन व्यायाम आणि योग प्रकार केले जात आहेत. या ‘फिटनेस ट्रिक्स’ तरुण पिढी तितक्याच वेगाने आत्मसात करत आपल्या तब्येतीची काळजी घेते आहे. सुडौल शरीर, उत्तम खाणं आणि सुदृढ राहणं ही आजच्या तरुणाईसाठी काळाची गरज आहे, त्यामुळे गोष्टी कितीही ‘आऊ ट ऑफ द बॉक्स’ असल्या तरी तरुणाई त्यांना ‘इन’ करून घेते आहे.

viva@expressindia.com