वैज्ञानिक दृष्टिकोन, संशोधक वृत्ती, खिलाडूपणा, शिकण्याची आस, संयमीपणा, संधीचं सोनं करण्याची हातोटी, बेहद्द जिद्द आणि
विनयशीलता असं अष्टपैलुत्व असणारी अमेरिकन विद्यापीठातली ऋचा जोशी तामस्कर सांगतेय तिच्या करिअरची गोष्ट.
हाय फ्रेण्ड्स! मी मूळची नांदेडची. माझं सहावीपर्यंतचं शिक्षण मराठी माध्यमाच्या प्रतिभा निकेतन आणि नेहरू इंग्लिश स्कूलमध्ये झालं. दिल्ली आयआयटीमध्ये बाबांच्या पीएच.डी.साठी आम्हीही सोबत गेल्यानं आठवीपर्यंतचं शिक्षण केंद्रीय विद्यालयात इंग्रजी माध्यमात झालं. तिथ ‘रेड रोव्हर गोज् टू मार्स’ या ‘नासा’तर्फे आयोजित निबंध स्पर्धेत दिल्ली विभागातर्फे माझ्या निबंधाची निवड झाली होती. सुरुवातीला ‘सीबीएसई’ अभ्यासक्रम इंग्रजीत शिकताना वाटलेल्या भीतीवर नेटानं मात केल्यानं माझा पहिल्या तीनात नंबर असायचा. शाळेतले थिएटर वर्कशॉप्सही मी आवडीनं केले. नांदेडमध्ये राज्य नाटय़ स्पर्धेतल्या स्त्री भूमिकेसाठी पुरस्कार मिळाला होता. बाबांची ‘पीएच.डी.’ संपल्यावर नांदेडला परतलो. नववीत जिल्हास्तरीय बालविज्ञान परिषदेतर्फे आयोजलेल्या ‘विज्ञान मेळाव्या’ची नोटीस वाचून त्यात सहभागी व्हायचं ठरलं.

आमच्या टीमनं भरपूर चर्चेअंती विषय ठरवला ‘स्टडी ऑफ मायोपिया अॅण्ड हायपरमेट्रोपिया इन स्कूल गोइंग चिल्ड्रन ऑफ नांदेड’ (वयोगट १२-१४ वर्ष). त्यासाठी अष्टपुत्रेबाई, सोमणसर यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं. या प्रोजेक्टमुळं एखाद्या गोष्टीकडं किती दृष्टिकोनांतून, किती बाजूंनी पाहावं लागतं हे लक्षात आलं. मी ग्रुपलीडर असल्यानं या प्रोजेक्टचं पुढील स्तरांवर प्रतिनिधित्व केलं. आम्ही राष्ट्रीय बालविज्ञान परिषदेस पुण्याला गेलो असताना, तिथं डॉ. जयंत नारळीकर, प्रा. यशपाल, डॉ. अब्दुल कलाम आदी दिग्गजांची भाषणं-चर्चा ऐकायची संधी मिळाली. डॉ. नारळीकरांच्या भाषणामुळं प्रेरणा मिळाल्यानं शास्त्रज्ञ व्हायचा निश्चय मनाशी केला. पुढं दहावी महत्त्वाची असली, तरी फावल्या वेळात प्रोजेक्ट करावं, या माझ्या मताला आई-बाबांनी नेहमीप्रमाणं पाठिंबा दिला. या वेळी थीम होती ‘फूड सिस्टीम इन इंडिया’. वर्गातल्या मैत्रिणींनी दहावीचं कारण देत प्रोजेक्टमध्ये सहभाग घेतला नाही. मग मी नववीच्या विद्यार्थ्यांना सोबत घेतलं. नांदेडमधल्या इतवारा मार्केटमधल्या केळीच्या साली पाहून त्यावर प्रोजेक्ट करता येईल असं वाटलं. वाचनात आलं की, पूर्वी सालींची भाजी केली जायची, म्हणजे त्या खाण्यायोग्य आहेत. सगळ्यांना आवडेल असा पदार्थ ठरला- केळीच्या सालींचं बिस्किट. प्रोजेक्टचं बारसं झालं- ‘लो कॅरलीज बिस्किट्स फ्रॉम बनाना पील पल्प’. विविध अडीअडचणींना तोंड देत आम्ही प्रयोग करत राहिलो नि यशस्वी ठरलो. हा माझ्या आयुष्यातला टर्निग पॉइंट! हे प्रोजेक्टही आम्ही विविध पातळ्यांवर सादर केलं. एकीकडं या प्रयोगाचं पेटंट घेण्याविषयी मी चाचपणी करत होते. चौकशीत कळलं की, त्यासाठी खूप खर्च येतो. त्याच सुमारास राष्ट्रीय बालविज्ञान परिषदेसाठी म्हैसूरला गेले होते. आम्हांला ‘सी.एफ.टी.आर.आय.’मध्ये नेण्यात आलं. तिथलं केळीच्या रसाचं प्रॉडक्ट पाहून सुचलं की, सालींचंही पेटंट होऊ शकेल.. संस्थेचे संचालक डॉ. व्ही. प्रकाश यांना मी पेटंटविषयी प्रश्न विचारलं. त्यांना माझं कौतुक वाटून त्यांच्या अधिकाऱ्यांना त्याविषयी सूचना दिल्या. कालांतरानं अधिकाऱ्यांनी हे प्रोजेक्ट पेटंटेबल असल्याचं सांगितलं. पुढं ‘सी.एस.आय.आर.’ संस्थेच्या ‘व्दितीय डायमंड ज्युबिली इन्व्हेंशन अॅवॉर्ड्स फॉर स्कूल चिल्ड्रन’मध्ये या प्रोजेक्टला देशभरातून चौथं पारितोषिक मिळालं. पुढं सी.एस.आय.आर.नं हे पेटंट करून दिलं.

5बारावीत असताना ‘सी.एस.आय.आर.’तर्फे काही जणांची निवड झाली. दहा दिवसांसाठी एका आंतरराष्ट्रीय प्रदर्शनात भाग घ्यायला जपानला गेलो. परतल्यावर तत्कालीन राष्ट्रपती डॉ. कलाम यांच्यासोबत ब्रेकफास्ट करायची संधी आम्हांला मिळाली. इट वॉज ऑल माइंड ब्लोइंग. पुढं मी केआयटी- कोल्हापूर इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या कॉलेज ऑफ इंजिनीअरिंगमध्ये बायोटेक इंजिनीअिरगला अॅडमिशन घेतली. दरम्यान, पुन्हा एका परिषदेदरम्यान डॉ. व्ही. प्रकाश यांची भेट झाल्यावर त्यांच्या कानावर केळीच्या सालीची पुढची गोष्ट सांगितली. त्यांनी मला ‘सी.एफ.टी.आर.आय’मध्ये दहा दिवसांच्या ट्रेनिंगसाठी बोलावलं. दरम्यानच्या काळात केळ्याच्या सालीपासून बिस्किट तयार केल्याच्या प्रयोगांवर आणि त्यामुळं मिळालेल्या अनुभवांवर मी ‘भारतीय बालवैज्ञानिकाची गरुडझेप’ हे पुस्तक लिहिलं. त्याला महाराष्ट्र शासनाचा साहित्य पुरस्कार मिळाला.

अभ्यासाखेरीज राष्ट्रीय पातळीवर शाळा आणि कॉलेजतर्फे मी बॅडमिंटनही खेळलेय. ‘केआयटीमध्ये असताना ‘कॉल फॉर पेपर्स’च्या वेबसाइटवर बिस्किटांवर केलेल्या कामाचा पाठवलेला शोधनिबंध, फिलाडेल्फिया येथील बाविसाव्या ‘सॉलिड वेस्ट टेक्नॉलॉजी अॅण्ड मॅनेजमेंट’वरील आंतरराष्ट्रीय परिषदेसाठी निवडला गेला. तिथं जाऊन तो सादर करण्यासाठी फंडिंगचा प्रश्न उभा राहिला. कॉलेजचं व्यवस्थापन आणि कॉलेजचे माजी विद्यार्थी गिरीश पर्वते-पाटील यांनी मिळून पुढल्या खर्चाचा भार उचलला. सेकंड इयरला असताना मी एकटी फिलाडेल्फियाला गेले.

पुढील शिक्षणाला अमेरिकेत जायचा निर्णय झाला.
कोल्हापूरमधल्या दोन फेसबुक फ्रेण्ड्ससोबत कोलोरॅडो युनिव्र्हसिटीत गेले. अमेरिकन फॅमिली होस्टिंगच्या संकल्पनेनुसार पाच दिवस अमेरिकन कुटुंबासोबत राहता येतं. त्यानुसार आमच्या होस्ट चेरिल यांनी तिथल्या दैनंदिन जीवनातल्या गरजेच्या गोष्टींची सविस्तर माहिती देत खूप मदत केली. त्यानंतर कॅम्पसमधल्या इंटरनॅशनल हाउसिंग अपार्टमेंटमध्ये अन्य देशांतील विद्यार्थ्यांसोबत राहायला गेलो. सुरुवातीचे दोन महिने सगळं अॅडजस्ट होण्यात गेले. तिथंच पहिल्यांदा स्वयंपाकाची नि माझी गाठ पडली. इथल्या कल्चरल शॉकमधून जितक्या लवकर आपण त्यातून बाहेर येऊ तितकं चांगलं. पहिल्या सहा महिन्यांत फंडिंग नव्हतं, मग जॉब मिळाला बायोलॉजी टय़ूटरचा.
कोलोरॅडोमध्ये तीन महिने लागले मला ओव्हरकम करायला आणि लक्षात आलं की, फंडिंगसाठी प्रयत्न करायला पाहिजेत. मग दोन जॉब मिळाले. सहा महिन्यांनी व्हॅण्डरबिल्टला हा कोर्स ट्रान्सफर करून घेतला. तिथलं सुरुवातीचं घर कॅम्पसपासून लांब पडू लागल्यानं कॅम्पसवरच घर घेतलं. व्हॅण्डरबिल्टमध्ये मी शिकले स्कूबा डायव्हिंग. त्याचं चेक आऊट डाइव्ह आम्ही मेक्सिकोमध्ये जाऊन केलं.
व्हॅण्डरबिल्टमध्ये मास्टर्स केलं बायोमेडिकल इंजिनीअिरगमध्ये. पुढं पीएच.डी.साठी माझी परडय़ूच्या रॉस फेलोशिपसाठी निवड झाली. गेल्या चार वर्षांत मी एवढं काही शिकलेय, जे शब्दांत सांगणं कठीण आहे.. याचं बरंचसं श्रेय माझी अॅडव्हायजर डॉ. शेरी हर्बिन यांचं आहे. मी एखादी गोष्ट आळशीपणामुळं टाळत असेन, तर ती गोष्ट ती माझ्याकडून करून घेतेच. सुरुवातीला मला हायर लेव्हल मॅथ्सचे कोर्सेस नकोसे वाटायचे. पण त्यांनी ते माझ्या भल्यासाठी करायला लावले. ते केल्यावर मला खूप आवडलं. त्याचे प्रोफेसर स्टिव्ह बेल यांची शिकवण्याची फार पद्धत अनोखी आहे. मी थोडं तायक्वांदोही शिकले होते. इथं मी सेल्फ डिफेन्सचा कोर्सही केला. आपण सतत अलर्ट नि अवेअर राहिलं पाहिजे, असं त्यातून शिकायला मिळालं.

माझी पीएच.डी. एकूण चार वर्षांची आहे. आपल्या शरीरात पेशींना जिवंत राहण्यासाठी दोन अत्यंत निकडीच्या गोष्टी म्हणजे ऑक्सिजन आणि पोषण. या दोन्हींचा पुरवठा छोटय़ा छोटय़ा रक्तवाहिन्यांमार्फत होतो. अशा बहुमूल्य गरजेच्या रक्तवाहिन्यांशिवाय प्रयोगशाळेत टिश्यू जिवंत राहू शकत नाही. या बहुमूल्य रक्तवाहिन्या थ्री डायमेन्शनल टिश्यूमध्ये निर्माण करणं आणि त्या समर्थरीत्या कार्यरत ठेवणं हे विज्ञानासमोर आजही फार मोठं आव्हान आहे. या आव्हानाला पेलण्यासाठी आमच्या लॅबमध्ये कोलॅजन या आपल्या शरीरात मोठय़ा प्रमाणात असलेल्या रेणूपासून एक थ्री डायमेन्शनल मॅट्रिक्स विकसित करण्यात आलंय. माझं संशोधन आता या कोलॅजन मॅट्रिक्सचा वापर करून एक मल्टिफन्क्शनल सॉफ्ट टिश्यू बायोग्राफ्ट निर्माण करण्यावर चालू आहे. नियंत्रित ड्रग डिलिव्हरी आणि मॅट्रिक्स इंजिनीअिरगमार्फत सक्षम रक्तवाहिन्यांची निर्मिती या सॉफ्ट टिश्यू बायोग्राफ्टमध्ये होईल आणि विज्ञानातील प्रगतीला हातभार लागेल.
मार्केटिंग युवर सेल्फ या संकल्पनेत अजूनही आपण भारतीय विद्यार्थी भिडस्तपणामुळं कमी पडतोय, असं वाटतं. असो. इथल्या ‘एलिव्हेटर स्पीच कॉम्पिटिशन’मध्ये पुन्हा केळीच्या सालाची बिस्किटं कामी आली. ती तयार करून घेऊन गेल्यावर कळलं की, या स्पर्धेत दोन मिनिटांच्या अवधीत लिफ्टमध्ये भेटलेल्या समोरच्या व्यक्तीला त्या कंपनीच्या सीईओ आहेत, असं मानून आपल्या प्रॉडक्टविषयी इंटरेस्ट निर्माण करायचा होता. मग तिथल्या एका भारतीय मुलासोबत बोलण्याची प्रॅक्टिस केली. माझं सादरीकरण छान झाल्यानं Most Entertaining Pitch Award मिळालं. पुढं त्यामुळं माझी १२जणांत निवड होऊन Burton D. Morgan Fellowship मिळाली. परडय़ू युनिव्र्हसिटीचे प्रेसिडंट डॅनियल्स यांच्यासोबत डिनरचा मान आम्हांला मिळाला. ही पाच हजार डॉलर्सची फेलोशिप मिळाली. त्याचा वापर करून स्वत:ची प्रोफेशनल डेव्हलपमेंट किंवा प्रोजेक्ट करू शकतो. त्यातला काही फंड वापरून अलीकडं मी भारतात आले असताना टेलिस्कोप वर्कशॉप केलं. पीएच.डी. संपल्यावर मेडिकल डिव्हाइस इंडस्ट्रीमध्ये काम करण्यात इंटरेस्ट आहे. अभ्यासाव्यतिरिक्तचा वेळ मी छंदांना देते. पेपर कटिंगच्या क्लासला जायचे. गेल्या वर्षी परडय़ू मराठी मंडळाची मी अध्यक्ष होते. संस्थेच्या नाटकात काम केलं होतं. आपले सणवार आम्ही साजरे करायचो. त्यातून को-ऑर्डिनेशन आणि टीमवर्क शिकायला मिळालं. लॅबमधला रिसर्च संपून आल्यावर एरवी उरलेल्या वेळात अर्धा-एक तास काढल्यानं फ्रेश वाटतं. नेटवर्किंग होऊन नवीन कॉन्टॅक्ट्स तयार होतात.

मध्यंतरी मी भारतात आले होते, घरच्यांनी लग्नासाठी सुचवून स्थळ नोंदवलं. काहींनी माझ्या प्रोफाइलमध्ये इंटरेस्ट दाखवला होता. भारतातून परतल्यावर एका वर्कशॉपला मैत्रिणीसोबत गेले होते. तिथं योगायोगानं शशांकशी भेट झाली. त्याचा फोटो त्या स्थळांमध्ये पाहिला होता. मग आम्ही भेटलो नि वर्षभरापूर्वी लग्न झालं. माझा नवरा शशांक तामस्करनं एरोस्पेस इंजिनीअिरगमध्ये पीएच.डी. केलंय. त्याचाही मला भक्कम पाठिंबा आहे. सध्या मी एकटी राहत असून पीएच.डी. संपेपर्यंत आम्ही वीकएण्डना भेटतो. पीएच.डी.नंतर दोन-तीन र्वष इथल्या बायोमेडिकल इंडस्ट्रीचा अनुभव घ्यायचाय. माझ्या मनातल्या विचारांना भारतात किंवा इथं साकारायच्या दृष्टीनं थोडा इंडस्ट्रीचा अनुभव गाठीशी असलेला बरा. शिवाय इथं जे जे शिकायला मिळतंय, ते दुसऱ्या पुस्तकाच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवायचंय.. इथं मी स्वत:च्या पायावर उभं राहायला शिकले. मी यूटय़ुबवर चांगली शिकवण देणाऱ्या मालिका बघते. व्याख्यानं ऐकते. सकारात्मक विचार करत समोरच्या मोकळ्या आकाशात ताकदीनं झेप घेऊन विहार करणं प्रत्येकानं शिकायला हवं. शुभं भवतु..

ऋचा जोशी तामस्कर
परडय़ू, अमेरिका
(शब्दांकन – राधिका कुंटे.)

तुम्ही स्वत: किंवा तुमच्या आसपासच्या १८ ते ३० वयोगटातल्या, वेगळ्या प्रांतात, नवख्या देशात, वेगळी वाट निवडून शिक्षण, नोकरीच्या निमित्तानं दुसऱ्या राज्यात किंवा परदेशात राहणाऱ्या मुलींची किमान बेसिक माहिती तिच्या संपर्क क्रमांकासह आम्हाला नक्की पाठवा. ‘विदेशिनी’ कॉलमसाठी असा उल्लेख जरूर करा. त्यासाठी आमचा ई-मेल आहे – ५्र५ं.’‘२ं३३ं@ॠें्र’.ूे