scorecardresearch

नया है यह : खरेदीचे नववर्ष

या वर्षी लग्नसराईचा मोसम होता, त्यामुळे ट्रॅडिशनल कपडे व दागिने यांना मोठय़ा प्रमाणात मागणी होती.

गायत्री हसबनीस

२०१८ मध्ये सोशल मीडियाने ई-मार्केट्सना बरीच चालना दिली. इन्स्टाग्रामवर मोठय़ा प्रमाणात वेगवेगळ्या ब्रॅण्ड्सनी आपल्या बिझनेस अकाऊं टद्वारे आपले प्रॉडक्ट्स विविध डिस्काउंट्ससह आणले होते. यंदा मुलांसाठीही भरपूर पर्याय उपलब्ध करून दिले होते त्याचबरोबरीने युनिसेक्स फॅशनही खरेदीसाठी बाजारात उपलब्ध होती. मुलींसाठी कपडे, दागिने, अ‍ॅक्सेसरीज, चपला, बॅग्ज आणि कॉस्मॅटिक्सवर ई बाजारात भरपूर पर्याय आणि सवलती असतातच; पण त्याचबरोबर युनिसेक्स आणि मुलांसाठीसुद्धा भरपूर सवलती या वर्षी खास करून उपलब्ध झाल्या होत्या.

नवीन वर्ष हे दोन कारणांसाठी महत्त्वपूर्ण ठरणारे असेल. एक म्हणजे जीएसटी कमी होण्याची शक्यता आणि ग्राहकांची दर्जेदार, अस्सल वस्तूंची मागणी; पण पुढच्या वर्षी खरेदीचे पर्याय कसे वाढलेले असतील? काय बदल होतील आणि किमतीत वैविध्यता कशी पाहायला मिळेल याचा थोडा अंदाज घेऊयात..

* या वर्षी लग्नसराईचा मोसम होता, त्यामुळे ट्रॅडिशनल कपडे व दागिने यांना मोठय़ा प्रमाणात मागणी होती. त्याचबरोबरीने ई-बाजारात तर ट्रॅडिशनल फॅशनला अनुसरून सूट आणि सवलती होत्याच. पुढच्या वर्षी ट्रेण्डमधील डिझायनर कपडे तसेच मॉडर्न आणि पारंपरिक कपडय़ांना जास्त प्राधान्य दिले जाईल. म्हणजेच कुर्ती-घागरा, लेहेंगा-शर्टटाइप कुर्ता, फेमिनाइन फॅशन, हिप्पी अशा विविध देशी मॉडर्न कपडय़ांवर सूट जास्त प्रमाणात ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी उपलब्ध असेल. डिझायनर कपडय़ांच्या किमती बऱ्यापैकी वाढलेल्या असतील. डिझायनर वेअरमध्ये जॅकेट्स आणि कोट दिसतील. मेन्सवेअरमध्ये लेदर, खादी असे जीन्स, ट्राऊ झर्सवर घालायला सुटेबल असलेले साधे जॅकेट्स स्वस्त दरात मिळतील.

* चपलांमध्ये अ‍ॅमेझॉनसह इतर मोठय़ा ई-कॉमर्स वेबसाइटवर ‘शनेल’, ‘डिओर’ असे काही ब्रॅण्ड्स मोठय़ा प्रमाणात शिरकाव करतील. यात प्रामुख्याने ग्लासटाइप हिल्स या सेमी साइज आणि पेन्सिलमध्ये येतील. लेदर शूजवर पुढील वर्षी डिस्काऊं ट्स असतील ज्यात मेन्सवेअर असेल आणि खादी शूजही ई बाजारात उपलब्ध होतील. यंदा खादीची विक्री सर्वच प्रकारांत वाढली आहे. खादी चपला १,०००, १,५०० – ६००, २००० या रुपयांपासून सुरू होतील. बाकी कॅ ज्युअल शूज वेडिंग सीझनमध्ये उपलब्ध असतील, त्यावरसुद्धा सीझननुसार डिस्काउंट्स असतील.

* मेकअप आणि कॉस्मॅटिक्समध्ये प्युअर व्हेजिटेबल, ऑरगॅनिक आणि आयुर्वेदिक प्रॉडक्ट्स मोठय़ा प्रमाणात उपलब्ध होतील. हेल्थकेअर, थेरपी बेस्ड ब्युटी प्रॉडक्टवर सवलती दिल्या जातील. बोरो प्लस, हिमालया, कामा, लोटस या ब्रॅण्डकडून फेअरनेस क्रीम्स उपलब्ध होतील. हर्बल्स, आवाकाडो या फ्लेवरयुक्त स्पेशल क्रीम्सचाही भरणा असेल. लिपवेअर हे ऑरगॅनिक, फ्रुट आणि व्हेजिटेबल फ्लेवरमध्ये येतील. ३०० रुपयांपासून यांची किंमत पुढे वाढू शकते. मेकअप प्रॉडक्ट्स मोठय़ा प्रमाणात उपलब्ध होतील याचे कारण यांचा ग्राहकही वाढला आहे. आयलायनरमध्ये ऑफबीट रंग असतील. शिमरपेक्षा डार्क रंगाच्या, मॅट रंगाच्या आणि विविध कॉम्बो कलर्सच्या प्रॉडक्ट्सना वाव असेल.

* गोल्ड, सिल्व्हर आणि मेटॅलिकमध्ये रिंग्स, इयरिंग्स पाहायला मिळतील. थोडे ओव्हरसाइज अ‍ॅक्सेसरीजसुद्धा ट्रेण्डमध्ये असतील ज्यात बऱ्यापैकी फंकी तसेच मिसमॅच रंग आणि मेटल्स असतील. स्टोनिंग, मिरर वर्क आणि ऑक्सिडाइज्ड ज्वेलरीत पॅटर्न्‍स आणि कोरीवकाम असेल. राजस्थानी ज्वेलरी तसेच बाजूबंद, नथ या पारंपरिक दागिन्यांना मागणी न संपणारी असल्याने यातलेही विविध प्रकार ई बाजारात उपलब्ध होण्यासारखे आहेत. डायमंड ज्वेलरी २०,००० रुपयांपासून सुरू होऊन १,३०,८०० किमतीपर्यंत या ज्वेलरी उपलब्ध होतील.

* ई बाजारात परदेशातील किंवा स्थानिकही काही नवीन प्रॉडक्ट्स, नवीन ब्रॅण्ड्सही शिरकाव करणार आहेत. सीझनल वेअर, ऑफिस वेअर, कॉलेज वेअर त्या त्या कालावधीत भरपूर पर्यायाने उपलब्ध करून देण्यात येतील. नव्या वर्षी ग्राहकांनी व्हिज्युअल कन्टेन्ट तपासूनच खरेदी करावी. कारण प्रत्येक ब्रॅण्ड्सनी प्रॉडक्ट्सचे फोटो टाकताना ते फोटोशूट केलेलेच असले पाहिजेत हा नियम आहे. त्यामुळे त्याची नीट तपासणी करून घ्यावी.

नवीन वर्षी एक जागरूक ग्राहक म्हणून ई बाजारात आत्मविश्वासाने खरेदी करण्यास काहीच हरकत नाही. रिटेलर्स, मार्केटतज्ज्ञ, ब्लॉगर्स यांच्या सल्ल्याने खरेदी केल्यास ग्राहक म्हणून तुम्हालाही एक विश्वास नक्की मिळेल.

viva@expressindia.com

मराठीतील सर्व लेख ( Lekhaa ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Shopping customers wish for quality genuine items in new year

ताज्या बातम्या