Watchलेले काही : मोठी झालेली मुले!

पर्यटकांना ऐकून त्यांच्याशी संवाद करून त्याने या भाषांवर हुकमत मिळविल्याचे लक्षात येते.

गुगलइतक्याच महत्त्वाच्या बनलेल्या यूटय़ूब या माध्यम समुद्रातले वॉचलेले काही कण अर्थात काही मस्ट वॉचव्हिडीओ.

जगभरातील सर्वच ठिकाणी सारख्याच प्रमाणात घरातील लहान मुलांचे लाडकौतुक करणारी वडीलधारी मंडळी होती. या पिढीतही आहेत. पण आता नुसतीच तोंडदाखल कौतुक करणारी नाही, तर त्या कौतुकाचे दाखले जतन करून ठेवण्याची ताकद असलेली. या पिढीला लहान मुलांचे सारेच लाड कॅमेऱ्यामध्ये कैद करण्यासाठी आणि जगाशी शेअर करण्यासाठी माध्यमे लाभली आहेत. मोबाइल कॅमेऱ्यावरून बाळाच्या रांगण्यापासून चालण्या, बडबडण्याच्या अवस्थांना कॅमेऱ्यात पकडून ठेवण्याची प्रवृत्ती वाढत असून लगोलग ती समाजमाध्यमांमध्ये इतरांनी पाहावी याचसाठी टाकली जात आहेत. गोंडस बोबडय़ा बोलांनी युक्त स्मार्ट मुलांच्या मोठय़ांनाही लाजवतील अशा स्मार्टपणाच्या खुणा यूटय़ूबवर खंडीभर पेरलेल्या आहेत. या व्हिडीओजमध्ये कॅमेराधीट मुलांच्या जगभरातील आवृत्त्या दिसतात. त्यांच्यात आलेल्या अकाली प्रौढपणाचे नमुने दिसतात.

कुठल्याशा देशातील एक पाचेक वर्षांची निष्ठावंत प्राणीप्रेमी मुलगी ‘मी मांस खाणार नाही, माणसांनी मांस खावू नये. प्राण्यांना मारून शिजवत ठेवले, तर त्या प्राण्यांना काय वाटेल’ असे सांगताना पार रडवेल्या स्थितीत जाते. तिला प्राणी आवडतात, त्यामुळे प्राण्यांना मारणे कसे वाईट आहे, हे ती पोटतिडकीने सांगत राहते. आधी तिचे बोलणे गमतीशीर वाटत असले, तरी नंतर त्या बडबडीमधली प्राणीआस्था थक्क करून सोडते. एका व्हिडीओमध्ये नुकत्याच मारलेल्या कोंबडीच्या शरीराचे तुकडे करू नयेत म्हणून आपल्या वडीलधाऱ्यांशी हुज्जत घालणारे पाच-सात वर्षांचे पोर दिसते. एकप्रकारचे भांडणच आहे ते. पण त्यात लहान मुलगा जे सांगतोय, ते मोठय़ांच्याही विचार आवाक्यात येऊ शकणार नाही.

आणखी एका व्हिडीओमध्ये चारएक वर्षांची चिमुकली आपल्या बाबाला वर्गात आपला बॉयफ्रेण्ड असल्याचे सांगताना दिसते. बाबा ‘असं काही नसतं’ म्हणतो, वर तिला वेडय़ात काढतो. तर ती त्याच्याशी त्या मुद्दय़ावरून भांडताना दिसते. अशाच प्रकारच्या एका व्हिडीओमध्ये चार वर्षांची मुलगी घर सोडून जाताना दिसते. तिचे कारण ऐकले तर थक्क व्हाल. ‘बॉयफ्रेण्ड वगैरे काही करायचे नाही.’ हे वडिलांकडून रागेरागे ऐकल्यामुळे तिने हे टोकाचे पाऊल उचलले असून खांद्यावर शाळेची बॅग अडकवून तिचा घर सोडण्याचा निर्धार कॅमेऱ्यात चित्रित करण्यात आला आहे.

दुसऱ्या एका व्हिडीओमध्ये एक चारेक वर्षांचे मूल ‘मी लग्नच करणार नाही’ असे सांगत राहतो. ‘लग्न केल्यामुळे चुंबन घ्यावे लागेल आणि मला कुणाचेही चुंबन घ्यायचे नाही. पण मला मोठे झाल्यावर बाबा व्हायचे आहे.’ अशी गमतीशीर विधाने तो करतो. पिझ्झा खाताना ही उत्तरे देताना ‘आर यू किडिंग?’ हे त्याचे विधान खळाळून हसायला लावू शकते, या मुलाचे लांबलचक तत्त्वज्ञान आपल्याला आणखीही अनेक व्हिडीओजमध्ये पाहायला मिळते.

एका व्हिडीओमध्ये धर्मशाला येथे रस्त्यावर राहणारा मुलगा आपल्या जगण्याची गोष्ट एका परदेशी महिलेला मुलाखतीत सांगताना आढळतो. महाराष्ट्रामधील आपल्या कुटुंबाचा चरितार्थ या मुलावर असल्याचे समजल्यावर या व्हिडीओजवर जगभरातून ज्या प्रतिक्रिया आलेल्या आहेत, त्याही बघाव्यात अशा आहेत. अमेरिकेमध्ये शब्दांच्या अचूक स्पेलिंग सांगणाऱ्या भारतीय मुलांची मक्तेदारी का आहे, याचा दाखला देणारे अनेक व्हिडीओज  यूटय़ूबवर आहेत. मुंबईच्या रस्त्यांवर मोरपिसे विकता-विकता १० भाषा शिकणाऱ्या रविकुमार या गुजराती मुलाचे कैक व्हिडीओज ‘रवी द लिंगो किड’ सर्च दिल्यास पाहायला मिळू शकतात. आठव्या वर्षांपासून तो १० परदेशी भाषा अस्खलित बोलत आहे. पर्यटकांना ऐकून त्यांच्याशी संवाद करून त्याने या भाषांवर हुकमत मिळविल्याचे लक्षात येते.

हे सगळे व्हिडीओ कॅमेरा कारागिरी नाहीत, तरीही त्यातल्या मुलांचा चौकस बडबड भागच त्यांना सशक्त बनवतो. तरीही आश्चर्य वाटते, ते हे व्हिडीओ करणाऱ्या व्यक्तींच्या मानसिकतेचे. आपली मुले स्मार्ट बोलतायत, याच्या अत्यानंदाने ती व्हिडीओ निव्वळ समाजमाध्यमांवर टाकायसाठी आसुसलेली आहेत. एक मुलगा आपण जाडे होऊ या भीतीने रडताना दिसतो. सुरुवातीला गंमत वाटते. नंतर त्या मुलाचे जाड होण्याच्या भीतीबद्दलचे रडणे आणि रडू न थोपवता त्याला जाडपणाबद्दलच्या गोष्टी सांगून दहशत देण्याचा प्रकार भीतीदायक वाटायला लागतो. त्या मुलाच्या जाडपणाबाबतच्या भीतीला दूर करण्याऐवजी त्या भीतीची नोंद जगभर करणे कितपत योग्य? असा विचार मनात डोकावायला लागतो. लहान मुलांच्या कित्येक करामती आणि संभाषण ‘फनी’ म्हणून पाहिले जात आहे. लोकप्रिय व्हिडीओजचे अनुकरण करणारे व्हिडीओ नव्याने दाखल होत आहेत. तो गमतीचाच प्रकार आहे. बालपणीच मोठय़ा झालेल्या जगभरच्या मनोवृत्ती अनुभवून आपल्याला काय वाटते, ते पडताळण्यासाठी सोबतच्या लिंकचे हे व्हिडीओ पाहाच.

viva@expressindia.com

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Small children viral video