‘ताण’लेल्या गोष्टी : तणावमंत्र! 

जगात दोन प्रकारचे लोक असतात. गोष्टी घडण्याची वाट बघणारे आणि गोष्टी घडवणा

 

परीक्षा, अभ्यास, रिलेशनशिप, मैत्री, करिअर, लुक्स.. तरुणाईच्या आयुष्यात यातलं काहीही हल्ली तणाव निर्माण करतं. असुरक्षितता, घाई, धावपळ, स्पर्धा आणि तणाव.. यातून सुटका नाही का? हे सगळं नसेल तर आयुष्यात मजा काय? यातली खुमारी तर राहिली पाहिजे, पण तोलही जायला नको. करता येईल असं

२००८ चा ऑगस्ट महिना. तमाम भारतीयांचे डोळे टीव्हीच्या पडद्यावर खिळून राहिले होते. १० मीटर एअर रायफल इव्हेंटचा फायनल राऊंड सुरू होता आणि आश्चर्य घडलं. भारताच्या अभिनव बिंद्राने चक्क गोल्ड मेडलचा वेध घेतला. मेडल मिळाल्यावर कॅ मेरा त्याच्या चेहऱ्यावर फोकस झाला, तर अभिनव बिंद्रा कुठलीही तीव्र भावना न दाखवता शांतपणे उभा होता. कुठल्याही परिस्थितीत शांत कसं राहायचं याचं उदाहरणच जणू मूर्तिमंत समोर उभं होतं आणि त्याच्या या ऐतिहासिक विजयामागचं गुपितही.

जगात दोन प्रकारचे लोक असतात. गोष्टी घडण्याची वाट बघणारे आणि गोष्टी घडवणारे. ‘मला कधीच बस मिळत नाही, कितीही प्रयत्न केला तरी मी कधीच वेळेवर पोचत नाही.’ अशी विधानं करता तुम्ही स्वत:शी कधी? याला मानसशास्त्रीय भाषेत ‘निगेटिव्ह सेल्फ टॉक’ असं म्हणतात. अर्थातच आपण आपलं भविष्य नक्की चुकणार असं गृहीत धरत असतो. अशा वेळी आपण असतो पहिल्या गटातले, असाहाय्यपणे येईल ती गोष्ट स्वीकारत राहणारे! त्यावर कुठलीही अ‍ॅक्शन न घेणारे! पण दुसऱ्या गटातल्या लोकांना आपला परिस्थितीवर ताबा आहे असा आत्मविश्वास असतो. त्यामुळे येणाऱ्या अडथळ्यांना, समस्यांना तोंड द्यायची त्यांची तयारी असते. साहजिकच ते जास्त यशस्वी होतात. ताणतणावांवर ते विजय मिळवतात. अशाच काही प्रसिद्ध व्यक्ती काय करतात त्यांना ताण आल्यावर? बघू या..

पंतप्रधान नरेंद्र मोदी पासष्टी उलटल्यावरही आपला व्यग्र दिनक्रम कसा काय पार पडू शकतात? ते त्याचं श्रेय रोज सकाळी लवकर उठून योगासनं आणि ध्यानधारणा करण्याला देतात.

बराक ओबामा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष होते तेव्हा त्यांच्या प्रत्येक क्षणावर, प्रत्येक बारीकसारीक अ‍ॅक्शनवर सगळ्यांचा डोळा असायचा. ते रोज सकाळी व्यायाम करायचे, पण त्यांचा सगळ्यात मोठा स्ट्रेस बस्टर असायचा कुटुंबाबरोबर वेळ घालवणे. फर्स्ट लेडी मिशेल ओबामा म्युझिक ऐकून, जिममध्ये व्यायाम करून आणि सायकलवर फेरफटका मारून आपलं मन ताळ्यावर ठेवायच्या.

फुटबॉलपटू रोनाल्डो पंचिंग बॅगवर ठोसे मारून आणि ड्रम्स वाजवून आपला ताण घालवतो. फारच झालं तर तो एखाद्या खोलीत शांतपणे काही वेळ एकटा बसतो.

आपला महेंद्रसिंग धोनी तर ‘कॅप्टन कूल’ म्हणूनच प्रसिद्ध आहे. गेली कित्येक र्वष तो शांतपणे क्रिकेटच्या मैदानावर कुठल्याही आणीबाणीला तोंड द्यायला सज्ज असतो. त्याच्या या ‘कूल’पणाचं रहस्य काय माहितेय? तो म्हणे बॅटिंग करताना चक्क गाणी गुणगुणतो.

प्रख्यात टॉक शो होस्ट ओप्रा विन्फ्रे सतत व्यग्र असते. अशा वेळी ताण येणारच ना! ती मग आपला दिवस काळजीपूर्वक आखते. दिवसभरात आपण काय, केव्हा करणार आहोत हे माहिती असलं की ताण येण्याचा प्रश्नच नाही, असं तिचं मत. शिवाय ती रोज किमान सहा तासांची झोप चुकवत नाही.

ब्रॅड पिट हा हॉलीवूड हिरो कोडी आणि शब्दकोडी सोडवतो, तर त्याची एके काळाची पत्नी अँजेलिना जोली ट्रँपोलीनवर उडय़ा मारणे, मुलांबरोबर चित्र काढणे अशा छोटय़ा छोटय़ा गोष्टींत आनंद शोधते. बॉलीवूडमधले चिरतरुण हिरो अमिताभ बच्चन शास्त्रीय संगीत ऐकतात आणि रिलॅक्स होतात, तर ‘देसी गर्ल’ प्रियांका चोप्रा ध्यान आणि मनावर नियंत्रण आणणारी तंत्रे वापरून तणावांचा सामना करते.

विश्वनाथन आनंद कुणाला माहिती नाही? बुद्धिबळात भारताचं नाव त्यानं जगाच्या नकाशावर नेलं. तो रोज व्यायाम तर करतोच, पण कुठल्याही महत्त्वाच्या मॅचच्या आधी कुटुंबाबरोबर एखाद्या छोटय़ाशा ट्रिपला जातो.

उद्योगपती रिचर्ड ब्रॉन्सन म्हणतात की, कुठल्या गोष्टीला महत्त्व द्यायचं हे एकदा पक्कं ठरवलं, की इतर फालतू गोष्टींचा ताण येतच नाही. त्यांनी ठरवलंय कुटुंब आणि आरोग्य हे त्यांच्या आयुष्यात सर्वात महत्त्वाचे आहेत, त्यापलीकडच्या घटना आपलं काही फार वाकडं करू शकणार नाहीयेत. त्यामुळे त्यांचा अति ताण घ्यायचा नाही.

धावपटू उसेन बोल्ट म्हणजे फास्टेस्ट मॅन ऑन अर्थ! ताणावरचा त्याचा उपाय तुम्हाला नक्की आवडेल. तो प्ले स्टेशन खेळतो. तर अतिशय लहान वयात लिजेंड बनून राहिलेला सचिन तेंडुलकर कुटुंब आणि मेडिटेशन यांना स्ट्रेस बस्टर मानतो.

बिल गेट्स इतके श्रीमंत आहेत, की त्यांना काही अडचणी येत असतील यावर आपला काही विश्वास बसत नाही; पण उलट त्यांना सतत कुठल्या न कुठल्या गुंतागुंतीला तोंड द्यायला लागतं. त्यांची पद्धत अशी की, ते कुठलाही प्रॉब्लेम छोटय़ा छोटय़ा भागांत विभागतात, मग तो हाताळणं तितकंसं कठीण जात नाही. दुसरे अतिश्रीमंत गटात मोडणारे अमेरिकन उद्योगपती वॉरन बफे! त्यांनी आपल्या कामाच्या जागेतून कॉम्प्युटर्स हद्दपार केलेयत. आपली कामाची जागा निवांत आणि स्वच्छ असेल, तिथे पसारा नसेल तर आपण तणाव न घेता जास्तीत जास्त काम करू शकतो यावर त्यांचा विश्वास आहे.

बहुतेक थोर लोकांच्या मते उगीच भूतकाळात कुजत बसण्यापेक्षा किंवा भविष्यकाळाच्या चिंतेत हरवून जाण्यापेक्षा, आत्ता समोर असलेल्या क्षणात राहायला हवं. म्हणजे आपण अनावश्यक ताण न घेता आयुष्य जगू शकू. त्यांचा मंत्र असतो, ‘हेही दिवस जातील!’

आपला मंत्र मात्र आपणच शोधायला हवा, नाही का?

viva@expressindia.com

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Solution for stress free stress management

ताज्या बातम्या