परीक्षा, अभ्यास, रिलेशनशिप, मैत्री, करिअर, लुक्स.. यातलं काहीही हल्ली तणाव निर्माण करतं. असुरक्षितता, घाई, धावपळ, स्पर्धा आणि तणाव.. यातून सुटका नाही का? हे सगळं नसेल तर आयुष्यात मजा काय? याचा समतोल साधता येईल का मग?
स्ट्रेस मॅनेजमेंटच्या टिप्स देणाऱ्या गोष्टी दर आठवडय़ाला..
त्या दिवशी सुट्टी होती. आदितीच्या बाबांचे मित्र त्या गावात राहायचे. त्यांनी जेवायला बोलावलं. ती गेल्या गेल्या त्यांच्या दोन मुलांनी तिला गराडा घातला. बॅकग्राऊंडला रेडिओ चालू होता. कुकरची शिट्टी झाली आणि ताज्या वरणभाताचा दरवळ पसरला. आदितीला एकदम बरं वाटलं. मनावरचं मळभ दूर झाल्यासारखं, मोकळं फीलिंग आलं. किती दिवसांनी ती हे सुवास, हे आवाज अनुभवत होती. साधंच जेवण, पण ती मनापासून जेवली. काकांबरोबर पाहिलेली मॅच, त्यावर हिरिरीनं केलेली चर्चा आणि मुलांशी केलेली दंगामस्ती असं सगळं मनात घोळवत ती परतली. होस्टेलवर आल्यावर तिथे ऐकलेलं एक जुनं हिंदी गाणं आपण गुणगुणतोय हे लक्षात आल्यावर तिला आश्चर्यच वाटलं. लहानपणी रात्री झोपवताना बाबा हे गाणं गायचे. फार दिवसांनी तिला गाढ झोप लागली.
घरी आई-बाबांशी वादावादी व्हायची, धाकटय़ा बहिणीचा राग यायचा. तेव्हा वाटायचं कधी एकदा घराबाहेर पडतोय आणि आपलं आपलं स्वतंत्र राहतोय. मग बारावीचा रिझल्ट लागला. चांगला लागला तो. हवा तो कोर्स, हवं ते कॉलेज, सगळं मिळालं. कॉलेजच्या छानशा कॅम्पसमध्ये होस्टेल होतं. तिला स्वतंत्र रूम होती. आदिती नेहमी हसतमुख असणारी मुलगी. आई म्हणते सुद्धा, कुठेही पडली तरी मांजरासारखी आपल्या पायांवर उभी राहील आदिती. पण या नवीन कॉलेजमध्ये मैत्रिणी मात्र फारशा मिळाल्या नव्हत्या. अर्थात त्याला जबाबदार होत्या तिच्या मैत्रिणींसाठी म्हणून असलेल्या काही खास अटी. एखादी कधी खोटं बोलली किंवा दिलेलं प्रॉमिस पाळलं नाही किंवा हवा तसा रिस्पॉन्स दिला नाही तर कशी मैत्री करायची तिच्याशी असं वाटून आदिती तिला टाळायची. कुणाच्या सवयी आवडत नाहीत तर कुणाचे विचार जुळत नाहीत असं करता करता बऱ्याच जणी तिच्या मैत्रिणींच्या यादीतून कटाप झाल्या. आपली मैत्रीण व्हायला इथं कुणीच लायक नाही असं आता आदितीनं ठरवून टाकलं.
लेक्चर्स, असाइनमेंट्स, अभ्यास अशा सगळ्यात दिवस संपायचा पण संध्याकाळ आणि रात्र नको वाटायची. मिळालेल्या भल्यामोठय़ा मोकळ्या वेळाची पोकळी कशी भरून काढायची? मग ती सोशल मीडियाचा आधार घ्यायला लागली. इकडून आलेले मेसेजेस तिकडे फॉरवर्ड कर, कुणाला उत्तर म्हणून दहा इमोटीकॉन्स टाक, इतरांचे फोटो बघ असं सगळं करता करता छान फ्रेश व्हायचं सोडून ती अगदी थकून जायची. तिला खरं तर माहिती आहे की लोक आपल्या नसलेल्या अचिव्हमेंट्स ग्लोरिफाय करतात, त्यावर लिहिलेल्या बऱ्याचशा गोष्टी पोकळ असतात. पण तरीही तिला उगीचच एक कॉम्प्लेक्स यायला लागला. एकटेपणात मग भरच पडायला लागली. वर त्या दिवशी काकांकडे जाऊन आल्यावर तिच्या लक्षात आलं आपण घरच्यांना किती मिस करतोय ते.
असा गर्दीत असूनही एकाकी असण्याचा अनुभव घेतलाय कधी? आपल्याला स्पेस नक्कीच हवी असते. पण कितीही म्हटलं तरी फार काळ नाही एकटं राहता येत. सोसायटीमध्ये राहणं ही गरज असते आपली. आणि त्यासाठी आपल्या मूळ स्वभावाविरुद्ध कळत-नकळत कितीतरी अॅडजस्टमेंट्स करत असतो आपण. काहींना ते सहज जमतं तर काहींना अवघड जातं आणि काहींना तर कितीही केलं तरी जमतच नाही. हवाहवासा वाटणारा एकांत मग अंगावर येतो, नकोसा वाटू लागतो आणि त्या एकाकीपणातून डिप्रेशनमध्ये जायला वेळ लागत नाही. कुणी म्हणेल, ‘हे काय बोलणं झालं आजच्या एकविसाव्या शतकात? इंटरनेट असेल तर स्पेसमधूनसुद्धा इतरांच्या टचमध्ये राहता येतं. काही एकटं पडायला नको.’ पण फेसबुकवर ढीगभर दोस्त असतील, मनातलं काही शेअर करायचं असेल तर एकही महाभाग सापडत नाही. ‘कुणाशी बोलायचं आता?’ असा प्रश्न पुढे ठाकतो. एकटं असणं आणि एकाकी होणं यातली सीमारेषा खूप धूसर आहे नाही?
आपलं लाइफ खूप फास्ट झालंय. सतत काही ना काही घडत असतं. आपण बरं आणि आपलं बरं, उगीच लोकांच्या भानगडीत कशाला पडा अशी अॅटिटय़ूड असते लोकांची. इतरांशी संबंध खूप वरवर ठेवले जातात. त्यातूनच एकाकीपणा हा एक आजार उपटलाय की काय? आणि पूर्वी नव्हता की काय तो? कोण जाणे! पण आज तो जास्त ठळकपणे जाणवतोय हे मात्र नक्की.
कदाचित पूर्वी घरापासून लांब राहण्याची वेळ फारशी येत नसेल. मुलींना तर शिक्षण संपेपर्यंत आई-बाबांकडे आणि तिथून सरळ रवानगी सासरी. आता मात्र शिक्षणासाठी, नोकरीसाठी, अनुभवासाठी म्हणून घरातून बाहेर पडतो आपण मुलं,मुली दोघंही. काही वेळा देशाबाहेरही जातो. आजूबाजूला माणसं असण्याची इतकी सवय असते की एकटं राहणं म्हणजे नक्की काय हे तेव्हा लक्षात येत नाही. आदितीचा होस्टेलवरून फोन आला तेव्हा आम्ही या सगळ्या गोष्टी डिस्कस केल्या. या एकाकीपणावर उपाय काय? त्या समुद्रमंथनातून आमच्या हाती आलेली रत्नं अशी –
- वेळ जात नाही, कंटाळा आला म्हणून उगीचच सोशल मीडियावर जायचं नाही.
- इतरांशी मैत्री करायचा आपणहून, प्रोअॅक्टिव्हली प्रयत्न करायचा.
- नव्यानं मैत्री करताना आपल्या सगळ्या गैरसमजुती, अपेक्षा बाजूला ठेवायच्या.
- प्रत्येक जण आपला खास, जवळचा दोस्त व्हायला हवा/हवी असा अट्टहास नाही करायचा. काही मैत्रिणी फक्त अभ्यासापुरत्या, काही मजेपुरत्या असतील आणि त्यातली एखाद-दुसरीच मनातलं शेअर करायला मिळेल याचं भान ठेवायचं.
- व्यायाम आणि हॉबीज हेही आपले चांगले दोस्त बनू शकतात.
आता आदिती सुट्टीत येईल तेव्हा बघू या रत्नांचा काय उजेड पडलाय तो!
viva@expressindia.com
