दोघी!

दक्षिण ध्रुवावरदेखील या बहिणींनी भारताचा झेंडा फडकवला आहे.

मराठय़ांनी अटकेपार झेंडे लावले असं म्हणताना सबंध महाराष्ट्राला अभिमान वाटतो पण जेथे पोहोचणं खरंच कठीण आहे अशा ठिकाणी जेव्हा जगातून सर्वप्रथम दोन मुली तिथे पोहोचून भारताचा तिरंगा फडकवतात तेव्हा मात्र प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटतो. सर्व खंडांतील सर्वात उंच शिखरं आणि दोन्ही ध्रुवांना स्पर्श केलेल्या ताशी- नुन्शी मलिक या जुळ्या बहिणी भारताचा अभिमान आहेत. खऱ्या अर्थाने शिखरावर पोहोचलेल्या या दोन वीरांगनाशी साधलेला संवाद..

स्त्रीशक्ती, महिला सक्षमीकरण, लिंग समानता असे विषय आले की या गोष्टींवर तावातावाने चर्चा करणाऱ्यांना जोश चढतो. मात्र आपण केवळ चर्चेच्याच पातळीवर असताना त्यापलीकडे जात काही तरी अचाट कर्तृत्व करणाऱ्यांविषयी आपल्या कानावर येतं आणि ‘आपण अजून इथेच आहोत.. तिने ते करूनही दाखवलं’ असं काहीसं आपलं होऊन जातं. काही दिवसांपूर्वी अवघे विश्व ज्यांनी भूतलावरल्या सगळ्यात उंच जागेवरून पाहिले त्या ‘एव्हरेस्ट ट्विन्स’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ताशी आणि नुन्शी मलिक यांची गोष्ट प्रत्येकाने काही बोध घ्यावा अशीच आहे.

२००९ साली ‘गिर्यारोहणा’ची एक खेळ म्हणून ओळख झालेल्या या दोघी बहिणी खेळाच्या प्रेमात पडल्या आणि तोच तो क्षण ज्या वेळेस त्यांनी गिर्यारोहक बनण्याचं ठरवलं. पर्वतांविषयी लागलेली ओढ आज त्यांना अनेक जागतिक विक्रम बनविण्यासाठी उपयोगी पडते आहे. ‘‘आम्ही गिर्यारोहक होण्याआधी कधीच या क्षेत्रात पुढे जाण्याचा विचार केला नव्हता. लहानपणापासूनच आम्हाला मैदानी खेळांची प्रचंड आवड आहे. त्या खेळांप्रमाणेच एक खेळ म्हणून यात पडलो आणि आता पर्वतांशिवाय आमचं आयुष्य अपूर्ण आहे,’’ ताशी- नुन्शी सांगतात.

भारतीय सैन्यदलात असणारे त्यांचे वडीलच ताशी- नुन्शीचे प्रशिक्षक असल्याने त्यांनी नेहमी आपल्या मुलींना पाठिंबा दिला, मात्र काळजीपोटी मुलींना माऊंट एव्हरेस्ट सर करण्यासाठी त्यांच्या आईचा अंमळ विरोध झाला. ‘‘आमच्या आईच्या मते आम्ही फार नाजूक होतो आणि गिर्यारोहणातला धोका लक्षात घेता तिने घाबरत घाबरतच आम्हाला जाऊ  दिलं. मात्र मी आणि ताशी जेव्हा माऊंट एव्हरेस्ट आणि बाकीचे काही पर्वत सर करून आलो तेव्हा, ‘आम्ही हे करू शकतो’ असा विश्वास तिच्या मनात निर्माण झाला. बाबा आधीपासूनच यासाठी पाठिंबा देत आले आहेत तरी ते एक वाक्य नेहमी आम्हाला ऐकवतात, प्रशिक्षक आणि बाबा या दोन्ही भूमिका एकाच वेळेस निभावणं त्यांना कठीण जातं. चढाईच्या आधी तिथलं वातावरण, बिकट परिस्थिती यांचा आढावा घेताना ते किती जीवघेणं आहे हे माहीत असतानाही आम्हाला तिथे जाण्यासाठी सतत प्रोत्साहान देणं अशी काहीशी बाबांची अवघड परिस्थिती होऊ न जाते ते त्यांच्यासाठी खूप कठीण असतं,’’ नुन्शी सांगते.

माऊंट एव्हरेस्टबरोबरच या बहिणींनी जगाच्या पाठीवरच्या प्रत्येक खंडातील सगळ्यात उंच शिखर सर केलेलं आहे आणि याशिवाय उत्तर आणि दक्षिण ध्रुवावरदेखील या बहिणींनी भारताचा झेंडा फडकवला आहे. ‘सेव्हन समिट्स’ आणि दोन्ही ध्रुव यावर जाणाऱ्या या दोन्ही बहिणी भारतातूनच नव्हे तर आशिया खंडातून गेलेल्या पहिल्या आहेत. आणि विशेष म्हणजे ‘अ‍ॅव्हेन्चर्स ग्रॅण्ड स्लॅम’ म्हणून ओळखला जाणारा मानाचा किताब पटकवणाऱ्याही त्या जगातील वयाने सगळ्यात लहान गिर्यारोहक आहेत. देशातील मानांकित ‘तेंझिंग नोरगाय नॅशनल अ‍ॅडव्हेन्चर अवॉर्ड’ने मलिक बहिणींना २०१५ साली गौरविण्यात आलेलं आहे.

खऱ्या अर्थाने इतकी सगळी यशाची शिखरं गाठूनही या दोघी थांबल्या नाहीयेत. ताशी- नुन्शी आज देशामध्ये बाकी स्त्रियांना दिलं जाणारं महत्त्व, त्यांच्या विकासाच्या दृष्टीने केलं जाणारं काम, स्त्री-भ्रूणहत्या अशा अनेक संवेदनशील विषयांवर गांभिर्याने काम करत आहेत. ‘नुन्शी-ताशी फाऊंडेशन’अंतर्गत ‘लिंग समानता : स्त्री-भ्रूणहत्या निषेध’ या शीर्षकाखाली देशाच्या कानाकोपऱ्यातील स्त्रियांना सक्षम आणि सशक्त करण्यासाठी अनेक उपक्रम राबवले जात आहेत. २०१५ साली सुरू झालेल्या या फाऊंडेशनने अनेक महिलांना प्रेरणा तर दिलीच आहे मात्र शाळेतून मैदानी खेळाची गोडी वाढावी यासाठीदेखील ते प्रयत्नशील आहेत.

‘‘मुली म्हणून आमच्या आई-बाबांनी आम्हाला नेहमी पाठिंबा दिला, मात्र आजही आपल्या देशात मुलींना त्यांच्या कुवतीप्रमाणे प्रगती करता येत नाही. त्यामुळे आम्ही त्यांना सक्षम करण्यावर भर देत आहोत. तसंच आजही देशात पुरुष आणि महिला यांच्या सरासरी प्रमाणात फरक आढळून येतो आणि यावर उपाय म्हणून स्त्री-भ्रूणहत्येविरोधात आम्ही काम सुरू केलं. आम्हाला वाटतं नुसतं बोलण्यापेक्षा त्याविषयी काम करणं महत्त्वाचं आहे आणि स्त्रियांच्या दृष्टीने हे महत्त्वाचं असलं तरी पुरुषांनीही त्यात तितकाच सहभाग घेणं आवश्यक आहे. संपूर्ण समाज जेव्हा लिंगभेदाची भिंत मध्ये न आणता एकत्रितपणे काम करेल तेव्हा खऱ्या अर्थाने महिला सबलीकरण आणि सशक्तीकरण प्रत्यक्षात उतरेल,’’ इतक्या ठामपणे ताशी- नुन्शी खूप सहजतेने आपले विचार मांडून जातात.

या दोघींचे विक्रम आणि त्यांचं काम ऐकून जसं थक्क व्हायला होतं तसंच त्यांचं अवघं आयुष्यदेखील आपल्याला प्रेरणा देणारं आहे. शिखर सर करताना येणाऱ्या अडचणी माहीत असतानादेखील इतक्या उंच जाणं आणि ते सर करून झाल्यावर मनाला वाटणारा आनंद याबद्दलदेखील त्या भरभरून बोलतात.

‘‘आम्ही जन्म आणि मृत्यू हे खूप जवळून पाहिलंय. लहानपणी घराच्या मागल्या अंगणातील ‘कोळी’बघून आम्ही घाबरायचो. आता मरण कधीही येईल अशा परिस्थितीतून अनेकदा गेलोय त्यामुळे गोष्टींकडे बघण्याचा आमचा दृष्टिकोनच बदलला आहे. आमच्या पहिल्या चढाईच्या वेळेसही आम्हाला सगळे धोके माहीत होते पण तरीही एव्हरेस्ट गाठायचं मनाशी निश्चित असल्याने ते आम्ही करू शकलो. त्यात आम्ही दोघी जणी असल्याने एकमेकींची साथ तर असतेच शिवाय आम्ही खूप ‘सकारात्मक’ असतो. कारण तुमच्या डोक्याला जरी धोके माहीत असले तरी तुमचं सकारात्मक मन अनेक गोष्टी सोप्या करू शकतं आणि आम्ही आजही त्याचाच अवलंब करतो. शिखरांनी आम्हाला भरभरून दिलंय. आत्मविश्वास, स्वत:वर प्रेम करण्याची कला दिली आहे. तेच सगळं शिकत आम्ही एक एक शिखर सर करत गेलो,’’ असं या दोघी सांगतात.

ताशी- नुन्शी त्यांच्या कामातूनच अनेकांना प्रेरणा देण्याचं काम करत आहेत. येत्या ४ फेब्रुवारीला या दोघी टेडेक्स नावाच्या एका कार्यक्रमात वक्त्या म्हणून उपस्थित राहणार आहेत. तसेच अमेरिकेतील ‘माऊंटन हार्डवेअर’ नावाच्या कंपनीने ताशी- नुन्शीला करारबद्ध केलं असून येत्या वर्षांत त्यांच्या अनेक डॉक्युमेन्टरी फिल्म्समधून आपल्याला त्यांचा प्रवास पाहायला मिळेल.

खरंच किती विशेष आहे ना, कधी स्वप्नातही नसणारं विश्व त्यांनी आपलंसं केलं आणि मग तेच त्यांचं आयुष्य बनून गेलं. देशाचा तिरंगा खऱ्या अर्थाने अटकेपार नेऊन ठेवणाऱ्या या दोघींचं खरंच कौतुक वाटतं आणि त्याहूनही विशेष म्हणजे इतक्यावरच न थांबता इतर महिलांसाठी त्यांचं काम वाखाणण्याजोगं आहे. या भारत कन्या असंच काम करत राहोत आणि त्यांच्या साथीने, त्यांच्या कार्यापासून प्रेरणा घेत भारतीय महिला आणि समाज अनेक शिखरं गाठो याच सदिच्छा.

viva@expressindia.com

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व लेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Tashi nungshi malik everest twins world first twin sisters to conquer mount everest

ताज्या बातम्या