scorecardresearch

‘गोंदण’गिरी

मराठी कलाकारांमध्ये सई ताम्हणकरने गोंदवून घेतलेले टॅटूज चर्चेत आहेत.

‘#inked’ अशी कॅप्शन टाकून आपल्या शरीरावर टॅटू गोंदवून घेण्याचा ट्रेंड सध्या तरुणाईमध्ये भलताच लोकप्रिय झालेला दिसून येतोय. हा ट्रेंड आता प्रसिद्ध असला तरी एकेकाळी टॅटू गोंदवलेल्या लोकांकडे एका विचित्र नजरेतून पाहिलं जायचं. टॅटूफक्त हिप्पी काढतात असा समज आधी होता. भारतात गोंदवून घेण्याची कला प्राचीन काळापासून प्रचलित असली तरीही ती फक्त गावांपुरतीच एक प्रथा म्हणून मर्यादित राहिली. आता मात्र हाच गोंदवून घेण्याचा ट्रेंड सेलेब्रिटीपासून सर्वसामान्य लोकांपर्यंत सगळ्यांनी डोक्यावर घेतला आहे.

टॅटू गोंदवून घेण्याचा ट्रेंड हा बॉलीवूड सेलेब्रिटींनी सर्वप्रथम आणला आणि आता तो मराठी कलाकारांमध्ये स्थिरावला आहे. मराठी कलाकारांकडून प्रेरणा घेऊ न आता आपल्यापैकी कितीतरी जण वेगवेगळ्या पद्धतीने कुल टॅटूज गोंदवून घेतायेत, त्यांची छायाचित्र काढून ती सोशल मीडियावर अपलोड करताना दिसतायेत. टॅटू गोंदवणे हा ट्रेंड तसा जुनाच असला तरी त्याला पुन्हा एकदा प्रचलित करणारी बॉलीवूडमधली आजची पिढी होती. प्रियांका चोप्राने आपल्या हातावर काढलेल्या ‘डॅडीज लिटिल गर्ल’ या टॅटूमुळे माध्यमांचं लक्ष तिच्याकडे वळलं. आणि तेव्हापासून खऱ्या अर्थाने टॅटूचा ट्रेंड आपल्याकडे परतला. प्रियांकापाठोपाठ सैफ अली खानने आपल्या हातावर ‘करीना’च्या नावाचा टॅटू गोंदवून घेत तिच्यासाठी आपलं प्रेम जाहीररीत्या व्यक्त केलं. तिथपासून सुरू झालेला टॅटूचा हा ट्रेंड आजपर्यंत कायम आहे, नव्हे तो फक्त हिंदी किंवा मराठी चित्रपट सृष्टीपुरता मर्यादित राहिला नसून जनसामान्यांमध्ये रुजला आहे, असं म्हटलं तरी चुकीचं ठरणार नाही.

मराठी कलाकारांमध्ये सई ताम्हणकरने गोंदवून घेतलेले टॅटूज चर्चेत आहेत. तिने तिच्या उजव्या खांद्यावर गोंदवून घेतलेला टॅटू हा तिच्या साखरपुडय़ाची तारीख आणि ज्या दिवशी तिला तिच्या नवऱ्याने लग्नासाठी मागणी घातली ती तारीख रोमन आकडय़ांमध्ये लिहिलेली आहे. याशिवाय आपल्या उजव्या हातावर एका स्टारचा टॅटू तिने गोंदवला आहे. त्याचबरोबर आपल्या नवऱ्याचं नाव हिब्रूमध्ये टॅटूरूपात तिने गोंदवून घेतलं आहे. सई ताम्हणकरबरोबरच अमृता खानविलकर, शुभांगी गोखले यांनीसुद्धा या टॅटू ट्रेंड प्रवाहामध्ये उडी घेत आपापल्या आवडीचे टॅटूज काढले आहेत.

टॅटूजच्या या ट्रेंडमुळे आपल्या चाहत्यांना आपण गोंदवून घेतलेल्या वेगवेगळ्या टॅटूजची माहिती मिळावी किंवा आणि आपलं टॅटू प्रेम त्यांच्यापर्यंतही पोहचावं म्हणून अनेक मराठी सेलिब्रिटी आपल्या टॅटूजचे व्हिडीओ बनवून ते यूटय़ूबवर अपलोड करणं पसंत करत आहेत. तरुणाईच्या गळ्यातील ताईत असलेल्या सखी गोखलेने आपण किती टॅटूज काढले आणि त्याचा अर्थ काय हे सांगणारा व्हिडीओ एका वाहिनीमार्फत युटय़ूबवर अपलोड केला होता. त्यामध्ये तिने आपल्या चारही टॅटूजचा अर्थ आणि आपण त्यांची निवड का केली हे तिच्या चाहत्यांना सांगितलं आहे. तिने तिच्या दंडावर गोंदवलेला फुलपाखरांचा टॅटू हे स्वातंत्र्याचं प्रतीक आहे. आपल्या आईच्या वाढदिवसाच्या दिवशी तिचं नाव आपल्या मनगटावर लिहून तिला  ते अनोखं वाढदिवसाचं गिफ्ट तिने दिलं. ती नेहमीच आपल्याबरोबर राहावी म्हणून आपण तिच्या नावाचा टॅटू गोंदवून घेतल्याचंही तिने सांगितलं. कानामागे काढलेला पक्ष्यांचा टॅटू हा आपण सगळ्यांनीच प्रगतीच्या दिशेने झेप घ्यावी असं वाटतं म्हणून काढल्याचं ती सांगते तर तिने तिच्या डाव्या दंडावर शाळेचा टॅटू गोंदवून घेतला आहे. ती आणि तिच्या दोन मैत्रिणींनी शाळेचा टॅटू एकत्र गोंदवून घेतला होता. या सगळ्या टॅटूजची आणखी एक खासियत म्हणजे तिने ते सर्व वेगवेगळ्या शहरांतून, देशांतून गोंदवून घेतलेले आहेत.

सखीप्रमाणे अभिनेत्री प्रार्थना बेहरे हीसुद्धा अशा वेगवेगळ्या टॅटूजची चाहती आहे. तिनेसुद्धा आपल्या दोन जिवलग मैत्रिणींबरोबर टॅटू काढतानाचा व्हिडीओ यूटय़ूबवर अपलोड केला आहे. शाल्मली टोळे व स्वप्नाली पाटील यांच्याबरोबर आपल्या मैत्रीच्या लोगोचा टॅटू तिने पायावर काढला आहे. शिवाय, मानेवर आणि डाव्या हातावरही तिने पक्ष्यांचा टॅटू काढला आहे. नुकतंच लग्न झाल्यावर तिने आणि तिच्या नवऱ्याने आपल्या लग्नाची तारीखही रोमन आकडय़ांमध्ये अनामिकेवर गोंदवून घेतली आहे. ‘फुलपाखरू’ फेम हृता दुर्गुळे हिनेसुद्धा आपल्या टॅटूचा व्हिडीओ एका यूटय़ूब वाहिनीमार्फत प्रदर्शित केला आहे. तिच्या उजव्या हातावर असलेल्या ‘एचडीपी’ या इंग्रजी अद्याक्षरांच्या टॅटूचे रहस्यही तिने या व्हिडीओमधून स्पष्ट केले आहे. ती आणि तिच्या दोन मैत्रिणींनी हा टॅटू तिच्या वाढदिवशी गोंदवून घेतला होता. तिघींच्या नावाची अद्याक्षरं असलेला हा आपला पहिलाच आणि युनिक टॅटू असल्याचं तिने सांगितलं. थोडक्यात मित्र-मैत्रिणींबरोबर एकच टॅटू गोंदवण्याचा ट्रेंडही मराठी तारकांमध्ये गाजतोय.

आपल्या आवडत्या व्यक्तीचं किंवा एखाद्या काल्पनिक व्यक्तिरेखेचं नाव टॅटू म्हणून गोंदवून घेण्याचा प्रकारही पहायला मिळतो. अभिनेत्री प्राजक्ता माळीने आपल्या उजव्या हातावर ओशोंचं नाव गोंदवून घेतलं आहे. त्यांच्या तत्त्वज्ञानामुळे प्रभावित झाल्याने हा टॅटू गोंदवल्याचं तिने सांगितलं. तर जुई गडकरीनेही आपल्या हातावर ‘बुलेटप्रुफ’ टॅटू गोंदवला आहे. ‘आय अ‍ॅम बुलेटप्रुफ’ हे एका स्त्रीच्या आयुष्यावर आधारित गाणं आहे, त्यावरून प्रेरणा घेत कितीही संकटं आली तरी त्याचा सामना करून त्याला मात देण्याचं सामथ्र्य या गाण्यात असल्याचं जुई सांगते. श्रेया बुगडेने आपल्या पाठीवर काढलेला ‘माँ दुर्गा’चा टॅटूसुद्धा वेगळा आहे. तेजस्विनी पंडित हिने आपल्या पाठीवर ‘हँड्स ऑफ फातिमा’ चा टॅटू काढला होता. हा टॅटू सकारात्मकता, स्त्री शक्ती यासाठी ओळखला जातो. ‘फ्रेशर’ मालिकेतील मिताली मयेकरने आपल्या ‘डोरा’ नावाच्या लॅब्राडोरसारखा दिसणारा टॅटू गोंदवून घेतला आहे. टॅटूचा हा ट्रेंड फक्त नटय़ांपुरताच मर्यादित आहे असं नाही. कितीतरी अभिनेत्यांनीसुद्धा असे टॅटूज गोंदवून घेतले आहेत. आदिनाथ कोठारेने आपल्या गळ्याखाली ‘ओम’चा टॅटू गोंदवला आहे. तर संतोष जुवेकरने आपल्या मानेवर ‘जुवेकर्स’असा टॅटू गोंदवला आहे. सिद्धार्थ चांदेकरने सुद्धा आपल्या हातावर कॅमेऱ्याचा टॅटू गोंदवला आहे.

या कलाकारांनी गोंदवलेले नानाविध टॅटूज पाहून आपल्यालासुद्धा टॅटू काढण्याचा मोह आवरत नाही. पण कोणता टॅटू काढावा हा प्रश्न दत्त म्हणून समोर उभा राहतो. मात्र सध्या याबद्दल माहिती पुरवणाऱ्या अनेक सोशल नेटवर्किंग साइट्स आहेत. नुकतंच एका फेसबुक पेजवर ‘टॅटूज इन्स्पायर्ड बाय भगवद्गीता’ हा व्हीडिओ शेअर केला होता. यात गीतेची शिकवण सांगणारे वेगवेगळे सिम्बॉल्स त्यांनी दाखवले आहेत. उदाहरणार्थ कर्मतत्त्व सांगणारे बूमरँग, फळाची अपेक्षा ठेवू नका हे सांगणारा ‘वर्क विदाऊट एक्स्पेक्टेशन्स’ हा कोट, महाभारतातील प्रसिद्ध फासे असे टॅटूज त्यात आहेत. कर्करोगाविषयी जनजागृती करणारे, त्यांना पाठिंबा देणारे टॅटूजही मोठय़ा प्रमाणात गोंदवलेले पहायला मिळतात. आणखी एक लक्ष वेधून घेणारे टॅटू आहेत ते म्हणजे आत्महत्येसारख्या विचारांच्या विरोधात तीव्र नापसंती व्यक्त करत जगण्याची उमेद देणारे काही टॅटूज आहेत.  ‘;’(अर्धविराम) किंवा kcont;nuel असे प्रतिकात्मक टॅटूजही गोंदवून घेतले जातात.

टॅटू गोंदवून घेण्याचा हा ट्रेंड आता जगप्रसिद्ध असला तरी त्याबद्दलचे काही गैरसमज अजूनही लोकांमध्ये प्रचलित आहेत. एकदा टॅटू गोंदवल्यावर रक्तदान करता येत नाही, कारण टॅटू काढताना ती शाई तुमच्या रक्तात मिसळते व त्यामुळे ते अशुद्ध होतं. असं रक्त अन्य कोणासाठीही घातक ठरू शकतं, असं म्हटलं जातं. हे काही अंशी खरं असलं तरी नुकत्याच झालेल्या सर्वेक्षणानुसार टॅटू गोंदवलेला माणूस सहा महिन्यांनी रक्तदान करू शकतो, असं डॉक्टरांनी मान्य केलं आहे. त्यामुळे आता भीतीला दूर सारत आपल्या व्यक्तित्वाचे प्रकटीकरण करणाऱ्या सर्जनशील टॅटूजची गोंदणकथा झपाटय़ाने लोकप्रिय होते आहे.

viva@expressindia.com

मराठीतील सर्व लेख ( Lekhaa ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Tattoo concept tattoo trend in bollywood tattoo trend in marathi industry