अक्षय्य तृतीया म्हणजे घरातल्या दागिन्यांमध्ये भर घालण्याची चालून आलेली सर्वमान्य संधीच. मात्र दागिन्यांच्या नेहमीच्या डिझाइन्समध्ये अनेक प्रयोग केले जात आहेत. लग्नसराईमध्ये पारंपरिक दागिन्यांना महत्त्व असलं, तरी त्यातले नावीन्यपूर्ण प्रयोग तरुणाईला खुणावतात. नेहमीची सरळसोट मणी गुंफून घडवलेल्या पारंपरिक दागिन्यांची जागा कलात्मक टेम्पल ज्युलरी, वेगवेगळी मोटिफ्स वापरून सजलेल्या दागिन्यांनी घेतली आहे. विशेष म्हणजे भारताच्या वेगवेगळ्या भागातील पारंपरिक डिझाइन्सची सरमिसळ या नव्या प्रयोगांमध्ये बघायला मिळते. म्हणजे दक्षिण भारतातील मंदिरांच्या कळसांवरील नक्षीकाम उत्तर भारतीय धाटणीच्या नेकलेसमध्ये बघायला मिळेल. मीनाकारीतील नेहमीच्या मोटिफ्सऐवजी दक्षिण भारतीय मोटिफ दिसतील. राजस्थानातील राजवाडय़ांच्या भिंतीवरील कोरीवकामाची वेलबुट्टी दक्षिण भारतीय दागिन्यांमध्ये दिसते. देवदेवतांच्या प्रतिमा वापरून केलेली टेम्पल ज्युलरी तर आता कुठल्या एका प्रांताचं वैशिष्टय़ राहिलेलं नसून ती भारताची ज्युलरी म्हणूनच प्रसिद्ध आहे.

महाराष्ट्र म्हटलं की, डोळ्यासमोर येतो कोल्हापुरी साज, लक्ष्मीहार, पोहेहार, ठुशी नि अर्थातच झुबकेदार नथ. आता एका ठुशीमध्येदेखील अनेक डिझाइन्स दिसतील. त्यामध्ये टेम्पल ज्युलरीच्या ट्रेण्डला साजेचे पदक असलेली ठुशी सध्या लोकप्रिय आहे. बाकीच्या प्रांतिक दागिन्यांमध्येही हल्ली इतर प्रादेशिक वैशिष्टय़ं दिसतात. आसामच्या जुंबिरीपासून ते केरळच्या कासुमालापर्यंत प्रत्येक राज्याच्या पारंपरिक दागिन्यांमध्ये कमालीचं वैविध्य आढळतं. पारंपरिक दागिन्यांची परिभाषा बदलताना दिसत आहे, ती अशी. उत्तर प्रदेशच्या मांगटिक्यामध्ये तामिळनाडूची मंदिर रचना रेखाटली जाऊ  लागली आहे. मांगटिका किंवा मुस्लीम संस्कृतीच्या जवळ जाणाऱ्या झुबकेदार बिंदीमध्ये चाँदबरोबरच आता मोर, बुट्टे, कोयरीदेखील दिसू लागली आहे.

सोन्याचे भाव कायम चढे असल्यामुळे निव्वळ सोन्याचे दागिने बनवणंदेखील तरुणाई टाळते. त्याऐवजी दिसायला छान आणि खिशाला परवडणारे सोनंमिश्रित दागिने, सोन्याचं पाणी चढवलेली ज्युलरी आणि एकंदर सोन्यासारखीच दिसणारी पण अगदी २३-२४ कॅरेट शुद्ध सोनं नसलेली ज्युलरी घालणं पसंत केलं जात आहे. चांदीचे दागिने हल्ली पसंत केले जातात. चांदीवर सोन्याचा मुलामा दिलेल्या दागिन्यांचं मध्यंतरी प्रस्थ होतं. आता मात्र तरुण मुली चांदीचेच पांढरे दागिने पसंत करतात. हल्ली ऑक्सिडाइज्ड दागिन्यांनादेखील पसंती दर्शवली जात आहे. चंदेरी काठ असलेल्या साडय़ा ट्रेंण्डमध्ये असल्याने त्यावर शोभून दिसणारी हे ज्युलरी सध्या चलतीत आहे. नथ म्हटलं की मोती आणि सोनं यांचंच डिझाइन डोळ्यापुढे येतं. आता मात्र चांदीवर विविध स्टोन्स वापरून सुशोभित केलेली नथ ट्रेण्डमध्ये आहे. नोजपिन म्हणून आवर्जून घातल्या जाणाऱ्या फॅशन अ‍ॅक्सेसरीजमध्ये पानडय़ा, कोयरी, त्रिशूळ, कमळ असे पारंपरिक आकार दिसतात. नथीप्रमाणेच कंबरपट्टा सध्या ट्रेण्डमध्ये आहे. उत्तर भारतातील कमरबंद, महाराष्ट्रातील मेखला, तामिळनाडूतील ओटीयानम आता एक मस्ट अ‍ॅक्सेसरी म्हणून तरुणी मिरवतात. अनेक संस्कृतीचं मीलन करून साकारलेले हे पारंपरिक तरीही वेगळेपणा असलेले दागिने सध्याच्या वेडिंग सीझनमध्ये हिट आहेत.

viva@expressindia.com