परीक्षा, अभ्यास, रिलेशनशिप, मैत्री, करिअर, लुक्स.. तरुणाईच्या आयुष्यात यातलं काहीही हल्ली तणाव निर्माण करतं. असुरक्षितता, घाई, धावपळ, स्पर्धा आणि तणाव.. यातून सुटका नाही का? हे सगळं नसेल तर आयुष्यात मजा काय? यातली खुमारी तर राहिली पाहिजे, पण तोलही जायला नको. करता येईल असं? स्ट्रेस मॅनेजमेंटच्या टिप्स देणाऱ्या गोष्टी दर आठवडय़ाला..

सगळ्यांची नुसती धमाल चालली होती. कारण आजची पार्टी अशी-तशी कुठे ही नव्हती नेहमीसारखी, चक्क फाइव्ह स्टार हॉटेलमध्ये होती. काही जण तर पहिल्यांदाच अशा ठिकाणी आले होते. निमित्त होतं विपिनच्या वाढदिवसाचं. आज सगळ्यांनी मिळून विपिनला कापायचं ठरवलं होतं. त्याच्या खिशाला काही फारसा फरक पडणार नव्हता म्हणा! त्याच्याकडे नेहमीच भरपूर पैसे असायचे. कुठेही बाहेर गेलं की तो बिल भरायला तयार असायचा. कॉलेजच्या कडकीच्या दिवसात ही फार मोठी सोयीची गोष्ट होती.

विपिनची लाइफस्टाइल त्याच्या मित्रांच्या हेव्याचा विषय होती. तो स्वत:च्या पॉश फ्लॅटमध्ये राहायचा. फोर व्हीलरमधून कॉलेजला यायचा. ब्रँडेड कपडय़ांशिवाय कपडे वापरायचा नाही. साहजिकच त्याच्याभोवती कायम मित्र-मैत्रिणींचा गराडा असायचा. शिवाय कुणी ना कुणी गर्लफ्रें ड असायचीच. आता काही किरकोळ प्रॉब्लेम्स होते, नाही असं नाही. पण त्याकडे लोक दुर्लक्ष करायचे. उदाहरणार्थ, तो एकेका वर्गात दोन-दोन वर्ष काढायचा, त्याला अनेक व्यसनं होती, तो कधीच व्यायाम करायचा नाही, त्याचं वजन प्रचंड वाढलं होतं.. पण ती एक यिडिश म्हण आहे ना, ‘श्रीमंत माणसं नेहमीच सुंदर, सद्गुणी असतात, त्यांना गायला चांगलं येतं आणि ते फार छान शिंकतात!’ तसं त्याच्या फालतू गोष्टीचंही अतोनात कौतुक व्हायचं. त्याच्या मित्रांना स्तुती करताना शब्द पुरे पडायचे नाहीत.

कसाबसा विपिन ग्रॅज्युएट झाला. घरी वडिलांचा व्यवसाय होताच. तो तिथं जॉइन झाला, पण त्याला ऐष करायची सवय झाली होती, आराम करायची चटक लागली होती. कुठलीही जबाबदारी घ्यायची वेळच कधी आली नव्हती. पुढे काही ध्येय नव्हतं. भरीला व्यसनं होतीच. वडील कष्टातून वर आले होते. पण मुलांना याची काहीच सवय नव्हती. त्यामुळे विपिन त्यांच्या कारभारातला एक मायनर खेळाडू झाला. त्याच्यावर कुठलंही महत्त्वाचं काम टाकायचं धाडस वडिलांना झालं नाही.

काय मिळवलं विपिननं कॉलेजमध्ये मजा करून? मित्रांना पाटर्य़ा देऊन? तात्पुरती सवंग लोकप्रियता मिळवून? त्याला मिळालेले सगळे मित्र हे गुळाला लागलेल्या मुंगळ्यांसारखे होते, पैशाच्या जोरावर त्याला तात्पुरते चिकटलेले. एखादा जरी खरा, जेन्युईन मित्र किंवा मैत्रीण मिळाली असती तर त्यांनी त्याला वास्तवाची जाणीव करून दिली असती. त्याला मिळालेल्या आयत्या सुखाच्या, वरवर हव्याशा वाटणाऱ्या आयुष्याला वेळीच नीट मार्ग दाखवला असता. कदाचित व्यसनांपासून त्याला वाचवलं असतं. पण विपिनच्या श्रीमंतीमुळे असे कुणी त्याच्या फार जवळ आले नाहीत. आणि त्याला तरी उसंत कुठे होती एवढा खोल विचार करायला, या नात्यांचं महत्त्व जाणवायला! आणि त्याची काय चूक म्हणा. आपण सगळेच जगतोय भौतिक जगात. इथं पैसा हाच परमेश्वर! एकदा भरपूर पैसे मिळाले की सगळे प्रॉब्लेम्स सुटतील या आशेवर त्याच्या मागे लागत बसतो. पण कित्येक गोष्टी अशा असतात की, ज्या पैशाने मिळत नाहीत. प्रेम कुठे विकत मिळतं? वेळ कुठे विकत मिळतो? आरोग्य कुठे विकत मिळतं? आणखी एक, पैसे कधी तरी चोरले जातात, संपतात. पण आपल्याकडचे किती तरी गुण असे असतात की ते कधीच संपत नाहीत, कुणीच चोरू शकत नाही. मग ती मदत करण्याची वृत्ती असो, आस्था असो, प्रामाणिकपणा असो की हुशारी असो.

आणि तरीही हे पैसे कोणाकडे कधीच पुरेसे नसतात किंवा पुरेसे वाटत नाहीत म्हणा. ‘मला हवे तितके पैसे मिळालेत, आता मी थांबतो’, असं म्हणणारा महाभाग अगदी क्वचित सापडेल. मिडास राजाच्या गोष्टीत नाही का? राजा वर मिळवतो की तो ज्या गोष्टीला हात लावेल ती सोन्याची होईल. त्याच्याकडे पैसे नव्हते का? पण ‘आणखी आणखी’ मिळवण्याच्या रोगाचा शिकार होता तो. अर्थात, पैशाला कमी लेखून चालणार नाही. इतर कुठलंही सोंग आणता येतं, पण पैशाचं सोंग आणता येत नाही असं म्हणतात. आजारी पडल्यावर हॉस्पिटलचं बिल भरायला पैसेच लागतात. आणि भूक लागली की अन्न मिळवायलाही पैसेच लागतात. पण आपण बाकीच्या बाबतीत म्हणतो तसाच इथंही काही मध्यम मार्ग काढायला हवा. कारण पैसे जसे मदत करतात तसे आपला जगण्याचा हेतू, काम करण्याचा उत्साह आणि प्रेरणा काढूनही घेतात. त्यामुळे तुम्हाला आत्ताच याविषयी काही विचार करायला सुरुवात करायला हवी. आणि महात्मा गांधींचं म्हणणं लक्षात ठेवायला हवं.. ‘देअर इज इनफ फॉर एव्हरीबडीज नीड, बट नॉट इनफ फॉर एव्हरीबडीज ग्रीड!’

डॉ. वैशाली देशमुख – viva@expressindia.com