scorecardresearch

‘जग’लेल्यांच्या अनुभवविश्वाची शिदोरी

कधी हवामानाचे लटकेझटके बसतात तर कधी कुणी तिथं पटकन सेट होऊन जातात.

राधिका कुंटे viva@expressindia.com

‘जग’ते रहो हे सदर यावर्षी सुरू करावं असं ठरलं, तेव्हा वाटलं काय मांडता येईल या सदरातून? कारण सध्या ‘लोकल ते ग्लोबल’ ही उक्ती सहजगत्या केवळ बोलली जात नाही, तर तितक्याच सहजपणे ती प्रत्यक्ष आचरणात आणली जाते आहे. इतकंच काय माहितीचं भांडार तर असंख्यांना एका क्लिकसरशी उपलब्ध आहे. हे कितीही खरं असलं तरी केवळ बोलणं किंवा माहिती मिळणं यापेक्षा प्रत्यक्ष अनुभव घेण्याला अद्यापतरी महत्त्व दिलं जातं आहे. त्यामुळेच आपल्याकडची तरुणाई शिक्षण किंवा नोकरीच्या निमित्ताने परदेशात जाते, तिथे राहते आहे. आपलं करिअर, आपलं आयुष्य घडवते आहे. तोच त्यांच्या अनुभवाचा लसावि मानला आणि त्यांच्या दृष्टिकोनातून जग कसं आहे, हे पाहायचं ठरवलं.

तरुणाईच्या दृष्टिकोनातून तो देश, त्यांचा भवताल, तिथली संस्कृती, कला-साहित्य, तिथला आहार-विहार, शिक्षणपद्धती, तिथली कार्यसंस्कृती आणि एकूणच राहणीमान यांचा वेध घ्यायचा प्रयत्न केला. इंग्लंड आणि अमेरिका हे देश आणि तिथल्या अनेक गोष्टी, तिथे येणं-जाणं या गोष्टी आता मुंबई-पुण्यात तळ्यात-मळ्यात करणाऱ्या आपल्यापैकी अनेकांच्या परिचयाच्या झाल्या आहेत. तरीही त्या देशांमध्ये काही वेगळे पैलू, काही हटके ठिकाणं, तिथले लक्षात राहिलेले अनुभव आणि वैशिष्टय़ं काहीजणांनी सांगितली. पाठोपाठ नंबर लागत होता तो ऑस्ट्रेलिया, जर्मनी, जपान, फ्रान्स अशा देशांचा. तिथेही भारतीयांची लक्षणीय संख्या आहे. तिथलं भाषाप्रेम, निसर्ग, माणसं आणि नागरी जीवनाच्या वैशिष्टय़ांविषयी काहीजणांनी भरभरून सांगितलं. एरवी केवळ निसर्गाचं देणं लाभलेले आणि फिरस्तीसाठी म्हणून प्रसिद्ध असणारे मॉरिशियस, न्यूझीलंड, बेल्जियम, नॉर्वे, नेदरलॅण्ड, दुबई, ओमान या देशांतल्या व्यक्तीस्वभावांचे, इतिहासाचे, चालीरीतींचे पैलू काहींनी उलगडून दाखवले. तर नायजेरिया, झिंबिया, सिएरा लिओन, व्हिएतनाम, दक्षिण आफ्रिका आदी देशांतील नागरिकांच्या रोजच्या जगण्याला असलेली भयाण वास्तवाची किनार आणि त्यातून त्यांचं तावून-सुलाखून निघणं आपल्या मध्यमवर्गीय जाणिवांवर नेमकं बोट ठेवणारं होतं. इटली, सिंगापूर, श्रीलंका, लक्झ्मबर्ग आदी देशांतल्या विविध रंगी अनुभवांचे पैलू आपल्यापुढं उलगडले.

खरं तर देशी राहून परदेशी जाणं, राहणं आणि जगणं या गोष्टींना पूर्वग्रहाची लेबले लावून त्याविषयी बोलणं तुलनेने सोपं असतं का? मात्र शिक्षण किंवा नोकरीच्या निमित्ताने परदेशी राहण्याचा निर्णय घेणं ही वाटते तेवढी सोपी गोष्ट नाही. नाना अडथळ्यांची शर्यत पार करून ही मंडळी तिथवर पोहोचतात. मग सुरू होते जणू एक शर्यतच. स्वत:चीच जगण्याची शर्यत आहे, त्या भवतालात टिकून राहण्याची शर्यत. कधी स्वत:ला सिद्ध करण्याची संधी मिळते. कधी करिअरचा ग्राफ उंच तर कधी अपयशाच्या पायऱ्याही उतराव्या लागतात. कधी परकीय भाषेचं भूत वाकुल्या दाखवतं सुरुवातीच्या काळात. कधी त्या भुताला इथूनच अर्थात भारतातूनच भाषा शिकून गेल्यामुळे आत्मविश्वासाच्या बाटलीत बंद करून टाकता येतं. कधी काही गमतीजमती घडतात तर कधी जिवाला अगदी हुरहूर लागते. कधी खाण्याचे फार हालबेहाल होतात, तर कधी जाऊ  तिथे खाऊ  म्हणत अर्थात तिथल्याच खाद्यपदार्थाचा आस्वाद घ्यायची वृत्ती अंगी बाणवली जाते. कधी हवामानाचे लटकेझटके बसतात तर कधी कुणी तिथं पटकन सेट होऊन जातात. कधी राहून राहून मायदेशाची आठवण येतेच. त्यासाठी वाट्टेल ते निमित्त पुरू शकतं. मग सहारा घेतला जातो समाजमाध्यमांचा. त्यांच्या साहाय्याने गप्पांची, भेटींची, विशिष्ट प्रसंगी हजर राहण्याची व्हर्च्युअल भूक भागवली जाते. तिथल्या मंडळींना आपल्या संस्कृती – परंपरांविषयी सांगताना अनेकदा त्या आपल्यालाच नव्याने आकळतात, तर कधी कधी तिथल्या प्रथा-शिष्टाचार मनापासून आवडल्यानं आपसूकच अंगी बाणवले जातात. तिथल्या नियम – कायद्यांचं पालन करताना कधी कधी नाकीनऊही येतात, पण तेही चांगल्यासाठीच केलेले असतात हे पुन्हा अधोरेखित होतंच.

कधी कुणाला परतीची ओढ लागते. कधी कोणी परतलेला असतो, तो पुन्हा जायचा विचार करतो. कधी कुणी पुढचा फारसा विचार केलेलाच नसतो. तर कुणाला तिथंच कायमचं राहायला आवडणार असतं. कोणी परदेशात राहूनही देशातल्या वर्तमानाबद्दल एकदम अपडेट असतात. मात्र काहींना त्यामुळे कित्येक अवघड प्रश्नांची काय उत्तरं द्यावीत, असेही प्रश्न पडतात. तर कधी काहीजणांना त्याबद्दल फारशी फिकीर असतेच, असं नाही. काहीजणांना भूतकाळ गोंजारायला आवडतो. कुणी फक्त वर्तमानातच रमतं तर कुणी भविष्याच्याच भराऱ्या मारू पाहातं. कुणाला आपल्या शहराचं प्रतिंबिब तिथल्या शहरात दिसतं. तर कुणी आपल्याकडे परदेशासारख्या सोयीसुविधा व्हायला हव्यात, असं कळकळीने मत मांडतं. कुणी पुढय़ातल्या क्षणांचा स्वीकार करत नवीन आव्हानं झेलतं आणि पेलतं. अनेकजण आपल्या आवडीला तिथल्या सवडीनुसार जोपासतात. तर काहींना काही चांगले छंद, सवयी तिथे गेल्यावर नव्याने लागतात. काहींच्या अंगी त्या त्या ठिकाणची वीकएण्ड संस्कृती मुरलेली दिसते. तर काही ती आत्मसात करायचा प्रयत्न करतात. या मंडळींपैकी ते शहर, ती माणसं आपलीशी मानली, तसंच त्या शहराने आणि माणसांनीही त्यांना आपलंसं मानलेलं दिसतं. स्नेहाच्या, माणुसकीच्या रेशीमबंधांचे अतूट धागे तिथे नव्याने तयार झालेले दिसतात.

अनेकांनी मांडलेल्या अनुभवांचं अनेक वाचकांनी ई-मेलद्वारे, व्हॉट्सअप मेसेजवर कौतुक करून किंवा प्रत्यक्ष भेटून अभिप्राय देऊन वेळोवेळी प्रशंसा केली. काहींच्या अनुभवविश्वाचा आपल्या पाल्याला किंवा आपल्याला उपयोग होईल, हे लक्षात घेऊन  काहींकडून त्या देशाविषयी जाणून घेण्यासाठी, कुणाकडून करिअरविषयी जाणून घेण्यासाठी मार्गदर्शन हवं आहे, अशी विचारणा करणारे ई-मेल्स वाचकांनी आम्हाला पाठवले. त्यामुळे थोडय़ाशा स्थिरावलेल्या मंडळींपाठोपाठ परदेशी जाऊ  इच्छिणाऱ्या काही होतकरूंची परदेशवारी थोडी सुकर व्हायला मदत झाली. ‘एकमेकां साहाय्य करू अवघे धरू सुपंथ’, असा उपदेश ही मंडळी प्रत्यक्षात आचरत असतात. तो आचरतानाच ‘जगते रहो’ हा कानमंत्र त्यांनी कायम जपलेला दिसतो. अनुभवांच्या देवाणघेवाणीतून परदेशी जाऊन शिकण्याचं किंवा काही वेगळे अनुभव जोडण्याची उर्मीही अनेकांमध्ये जागली आहे. आणि अगदी सहजतेने तिथे जाऊन आलेल्यांशी हा संवाद साधत आपला अनुभव पूर्ण करण्यासाठीचे त्यांचे प्रयत्न सुरू होतात तेव्हा हे विश्वचि माझे घर ही संकल्पना किती सहजतेने अनेक संस्कृती-वैचारिक भिन्नतेच्या भिंती दूर करते हेही अनुभवायला मिळते. वाचकांनी वेळोवेळी केलेल्या या सदराच्या कौतुकासाठी त्यांचे मन:पूर्वक आभार. वाचकहो, तुमचे आशीर्वाद आणि शुभेच्छा आम्हा सगळ्यांना जगण्याचं बळ देतात. त्यामुळे त्या कायम मिळाव्यात आणि तुमच्या ऋणांत राहता यावं, हीच इच्छा. शुभम भवतु.

मराठीतील सर्व लेख ( Lekhaa ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: World tourism radhika kunte article on world tourism

ताज्या बातम्या