लेस्बिअन-गे-बायसेक्शुअल-ट्रान्सजेंडर म्हणजेच एलजीबीटी कम्युनिटीमध्ये ‘कमिंग आऊट’ ही टर्म ‘एका संघर्षांची समाप्ती’ या अर्थाने वापरली जाते. समाजात आपल्यासारखे अजून भरपूर लोक असून आपण आहोत तसं आपल्याला स्वीकारणं व आपलं वेगळं अस्तित्व मान्य करणं म्हणजे एलजीबीटींसाठी ‘कमिंग आऊट’. निरनिराळ्या स्वयंसेवी संस्था तसंच एलजीबीटी कम्युनिटी ग्रुप्स या कमिंग आऊट प्रोसेससाठी मदत करताना आपल्याला दिसतात. दिवसेंदिवस वाढणाऱ्या कम्युनिकेशन मीडियम तसंच सोशल अ‍ॅक्सेपटन्स यामुळे गेल्या काही वर्षांत कोणत्याही दबावासमोर न झुकता ‘कमिंग आऊट’ करणाऱ्या तरुणाईचं प्रमाण वाढतंय. परंतु असं असलं तरी गे आणि ट्रान्सजेंडर कम्युनिटीइतकं धाडस अजूनही समलिंगी मुलींना दाखवणं शक्य झालेलं नाहीये. सोशल प्रेशरसोबतच फॅमिली प्रेशर हा या मधला प्रमुख अडथळा ठरताना दिसतोय. त्यामुळे एलजीबीटी कम्युनिटीमध्ये ‘कमिंग आऊट’ हे स्वत:सोबत सुरू असलेल्या द्वंद्वाची अखेर असं असलं तरी संपूर्ण समाजाचं वैचारिक ‘कमिंग आऊट’ होण्यासाठी अजून काही वेळ द्यावा लागणार आहे एवढं नक्की! ‘कमिंग आऊट’ स्ट्रगल मांडणारी ही प्रातिनिधिक उदाहरणं..

मुलींची लैंगिकता अव्यक्तच – सोनल ग्यानी
आपल्या समाजात मुलीनं तिच्या लैंगिकतेबद्दल बोलणं किंवा व्यक्त होणं हेच मुळी मान्य नाहीय. त्यामुळे समलिंगी आकर्षण असणाऱ्या स्त्रियांचं व्यक्त होणं ही आणखी भयानक गोष्ट मानली जाते. मला पौगंडावस्थेत असतानाच माझ्या सेक्सश्युअ‍ॅलिटीची जाणीव झाली. पण आपल्याकडे माहितीचा अभाव असल्याने ठाम काहीच कळत नव्हतं. अखेर कॉलेजमध्ये असताना साधारण अठराव्या वर्षी ते व्यक्त झालं. माझ्या घरी खरं तर मोकळं वातावरण. माझी आई महाराष्ट्रीय आणि वडील पंजाबी.. मी गोव्यात वाढलेले. तरीही माझ्या ‘कमिंग आऊट’ला वेळ लागला. तीन वर्षांपूर्वी मी घरी सांगितलं. पालकांनी मला समजून घेतलं आणि सपोर्ट केला. मी सध्या माझ्या पार्टनरबरोबर मुंबईत राहते. तिच्या घरी मात्र परिस्थिती गंभीर आहे. ती मुळात उत्तर प्रदेशातील एकत्र कुटुंबातून आली आहे आणि तिच्या कुटुंबाला आमचे संबंध अजूनही अनैसर्गिक वाटतात. मुलगी लहान असल्यापासून तिच्या लग्नाच्या गप्पा मारणाऱ्या आपल्या संस्कृतीमध्ये असं दोन मुलींचं एकत्र राहणं अनेकांना पचनी पडत नाही. घरचे सपोर्टिव्ह असले तरी समाजात भेदभाव सहन करावा लागतो. तसं व्हावं वाटत नसेल तर आमची सेक्सश्युअल आयडेंटिटी लपवून ठेवण्याचा सल्ला दिला जातो. पुन्हा या संबंधांना कायदेशीर मान्यता नाही. त्यामुळे आम्हाला घरासाठी एकत्र कर्ज घेता येत नाही आणि अशा अनेक छोटय़ा-मोठय़ा बाबतीत भेदभाव सहन करावा लागतो. पण हळूहळू या अव्यक्त विषयावर चर्चा व्हायला लागली आहे. उमंग नावाने एक गट समलिंगी स्त्रियांसाठी कार्यरत आहे. त्यासाठी मीदेखील काम करते. आमच्या हेल्पलाइन नंबरवर (९९३००९५८५६) अनेक जणी त्यांचे प्रश्न घेऊन येतात. याविषयी अधिक माहिती या वेबसाईटवर मिळेल. http:// http://www.humsafar.org/umang.html

vv03 न्यूनगंडातून बाहेर येणं महत्त्वाचं – नक्षत्र बागवे
वयाच्या १४ व्या वर्षांपासून मला ‘मी’ वेगळा आहे असं प्रकर्षांनं वाटायचं. मला मुलांचं आकर्षण वाटायचं. शालेय आयुष्य कन्फ्युजनमध्ये गेल्यानंतर कॉलेजमध्ये मात्र मी या गोष्टीचा शोध घ्यायचं ठरवलं आणि सायबर कॅफेमध्ये जाऊन इंटरनेटच्या माध्यमातून मला माहिती मिळाली. मी ‘गे’ आहे हे त्या वेळी समजलं आणि असं वाटणारा मी एकटा नाहीये किंवा माझ्या फिलिंग्स नॅचरल आहेत याची खात्री पटली. त्यानंतर मी सोशल साइट्सच्या साइट्सच्या माध्यमातून अनेक अशा लोकांशी बोललो. त्यामुळे माझा न्यूनगंड कमी झाला. परंतु घरच्यांना हे सांगणं हा टास्क अजून पार करायचा होता. बारावीच्या परीक्षेला काही महिने शिल्लक असताना मी त्यांना हे सांगितलं. त्यावर माझे बाबा काही बोलले नाहीत परंतु आईला मोठा शॉक बसला. परंतु माझी बारावी असल्याने घरच्यांनी तो विषय पुन्हा काढायचा नाही असं ठरवलं आणि तू स्वत:च्या पायावर उभा राहत नाहीस तोवर कोणाला यासंदर्भात काही सांगू नकोस असं सांगितलं. परंतु कॉलेजच्या शेवटच्या वर्षांत शिकत असताना ‘एशियाज फर्स्ट एलजीबीटी फ्लॅश मॉब’ मध्ये मी सहभागी झालो आणि त्याचे फोटो सर्व दैनिकांमध्ये छापले गेले. सर्व नातेवाईकांना, मित्र-मैत्रिणींना ही गोष्ट कळाली. त्यानंतर मुंबईत, गुजरातेत मी एलजीबीटी प्राइड मार्चचं नेतृत्व केलं. दरम्यान मी माझ्या कमिंग आऊटच्या स्ट्रगलवर साध्या कॅमेराने शूट करून एक शॉर्ट फिल्म बनवली, ‘लॉगिंग आऊट’ नावाची. सरप्रायझिंगली मुंबईत होणाऱ्या ‘कशिश इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल’मध्ये तिला अ‍ॅवार्ड मिळालं. त्यानंतर समलिंगी संबंधांवर आधारित अनेक शॉर्ट फिल्म्स बनवल्या. इंडियन एलजीबीटी अवेअरनेस वर्ल्ड टूरसाठी माझी निवड झाली. आता मला ओळख मिळाली, यशही मिळालं. त्यामुळे नातेवाईकांचा विरोधही मावळलाय.कोणत्याही प्रकारचं डिस्क्रिमिनेशन मला सहन करावं लागत नाही. मला जेव्हा रोल मॉडेलची गरज होती तेव्हा माझ्यासमोर कोणी नव्हतं परंतु आज अनेक मुलांसाठी मी रोल मॉडेल आहे व त्यांना मी मदत करू शकतो याचं समाधान माझ्यासाठी सगळ्यात मोठं आहे!

पार्टनर म्हणून ‘कमिंग आऊट’ अवघड – अजित
मी गे आहे हे वास्तवच स्वीकारणं जळगावसारख्या निमशहरी भागात असणाऱ्या माझ्या आई-वडिलांना जड गेलं होतं. त्यामुळे आता पार्टनरसोबतच्या आयुष्याबद्दल ‘डोंट आस्क, डोंट टेल’ अशी परिस्थिती आहे. आणि हेच समाजाच्या बाबतीत लागू पडते. मी स्वत: गे आहे हे मी खुलेपणाने सांगू शकतो, पण आम्ही पार्टनर आहोत असं सांगणं आजतरी अवघडच आहे. आमच्या समाधानासाठी जरी आम्ही लग्न केलं तरी त्याला कसलाच कायदेशीर आधार असणार नाही. त्यामुळे अनेक व्यावहारिक अडचणी येतात. आम्हाला घर घ्यायचं आहे. पण दोघांना एकत्रित कर्ज मिळत नाही.त्यामुळे हे अशक्य आहे. त्यामुळे आता पहिली लढाई ३७७ ची, त्यानंतर सेम सेक्स मॅरेजचा विषय येईल.
(अजितच्या विनंतीवरून त्याचे खरे नाव दिलेले नाही.)

vv04ट्रान्सजेंडरविषयी अजूनही गैरसमज – सिद्धांत
मी मध्यमवर्गीय कुटुंबात लहानाचा मोठा झालो. शाळेत असताना मला मुलगी असून मुलींबद्दल आकर्षण वाटायचं. परंतु हे काय आहे हे कोणालाही विचारण्याची सोय नव्हती. परंतु आपण इतरांपेक्षा वेगळे आहोत ही जाणीव कायम सोबत असायची. अशातच ऑर्कुटवर एका लेस्बिअन मुलीशी माझी मैत्री झाली आणि तिच्या माध्यमातून मी एका लेस्बिअन ग्रुपशी कनेक्ट झालो. परंतु तिथे गेल्यावरही मला कम्फर्टेबल वाटायचं नाही. मुळात मी माझ्या शरीरासोबतच कम्फर्टेबल नव्हतो. हे मला तेव्हा कळलं, परंतु कारण मात्र समजत नव्हतं. अशातच २००८ मध्ये एका ट्रान्सजेंडर मित्राशी माझी ओळख झाली आणि त्याच्याशी बोलल्यानंतर मला मी ट्रान्सजेंडर आहे हे समजलं. मी स्वत:पुरतं हे स्वीकारलं. परंतु दरम्यान माझी आई खूप आजारी असल्याने घरी सांगणं मला शक्य होत नव्हतं. २०११ मध्ये आई आम्हाला सोडून गेली आणि त्यानंतर मात्र मी ट्रान्झिशन करून घ्यायचं ठरवलं. त्यासाठी २०१२ पासून मी मेल हार्मोन्सचा इनटेक सुरू केला आणि वर्षभराने २०१३ मध्ये ट्रान्झिशन सर्जरी करून घेतली. या सगळ्या दरम्यान माझ्या बाबांनी तसंच माझ्या सर्व नातेवाईकांनी मला खूप सपोर्ट दिला. आपल्याकडे ट्रान्सजेंडर म्हणजे हिजडा किंवा छक्का असंच समजलं जातं. परंतु त्यापलीकडेही समजून घेण्यासारख्या भरपूर गोष्टी आहेत. माझ्या घरच्यांनी ते सारं समजून घ्यायची तयारी दाखवली. त्याचप्रमाणे ऑफिसमध्ये किंवा मित्र-मैत्रिणींमध्येसुद्धा हे सगळं खूप सहज स्वीकारलं गेलं. आता सरकारने देऊ केलेल्या लीगल हेल्पमुळे कामाच्या ठिकाणी आणि डॉक्युमेंट्स वगैरे बनवताना येणाऱ्या अडचणी कमी होतील. पण अजूनही आपल्याकडे या विषयांबद्दल लोकांना पुरेशी माहिती नाहीये. परंतु आता हे ‘न बोलायचे विषय’ राहिले नाहीयेत. त्यामुळे भविष्याबद्दल मी खूप आशादायी आहे.

(शब्दांकन – अरुंधती जोशी, सुहास जोशी, भक्ती तांबे)
– viva.loksatta@gmail.com